(ही कथा व यातील पात्रे संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

पूनम व संजय ही भावंडे  पोरकी  होती.त्यांची वये अनुक्रमे वीस वर्षे व अठरा वर्षे अशी होती. त्यांचे आई वडील ,ऑफिसमधून घरी येत असताना  वर्षभरापूर्वी मोटार अपघातात वारले होते .आईवडिलानी हा राहाता ब्लॉक व दहा लाख रुपये मागे ठेवले होते.  त्याशिवाय विमा ग्रॅच्युटी इत्यादी मिळून जवळजवळ वीस लाख रुपये त्याना मिळाले होते. बहीण भावंडांचे व्याजाच्या उत्पन्नावर ठीक चालले होते .दोघेही कॉलेजमध्ये जात होती.पूनम शेवटच्या वर्षाला होती तर संजय दुसऱ्या वर्षाला होता .त्यांना जवळचे नातेवाईक नव्हते .दोघांनाही वेळप्रसंगी शेजारी मदत करीत असत .पोरक्या भावंडांकडे सर्वच सहानुभूतीने पाहत असत .पूनम स्वयंपाक चांगला करीत असे.ती रोज स्वयंपाक करून नंतर कॉलेजात जात असे .दोन्ही  भावंडे स्कूटरवर बरोबरच कॉलेजला जात. पूनम  देखणी होती .गल्लीतील टारगट मवाली पोरे तिला येता जाताना नेहमी सतावीत असत . तिचे आई वडील मेल्यापासून पोरांचा उच्छाद जास्तच वाढला होता .शिट्ट्या मारणे नावाने हाक मारणे पाठोपाठ स्कूटरवरून मोटारसायकलवरून कॉलेजपर्यंत येणे यामुळे पूनम त्रासली होती .त्यांचा बंदोबस्त कसा करावा तेच तिला कळत नव्हते .त्या मुलांचे चाळे बघून संजयचे हात शिवशिवत.परंतु तो एकटा काहीही करू शकत नव्हता .जर तो त्यांना जाब विचारायला गेला असता तर त्यांनी त्याची हुर्रे उडवली असती .जर त्याने मारामारी करायचे ठरविले असते तर त्यांनी त्याची चटणी केव्हाच केली असती. ती मुले गुंड होती आणि त्यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त होता .तरीही पूनमने पोलिस चौकीमध्ये जाऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मुलांची नावे ऐकताच पोलिसांनी पुराव्याशिवाय तक्रार नोंदवून घेणार नाही म्हणून सांगितले होते.उगीच आणखी संकटात पडाल. दुर्लक्ष करा. असा वर सल्लाही दिला होता .त्यांचा त्रास कमी होईल ही आशा पूर्णपणे मावळली होती .

रविवारचा दिवस होता.दोघेही बाहेरून नुकतीच घरी आली होती.रविवारी संध्याकाळी कुणी ना कुणी काही ना काही कारणाने बाहेर गेलेले असल्यामुळे सोसायटीमध्ये तशी सामसूम होती .रात्रीचे नऊ वाजले होते एवढ्यात दरवाज्यावरील बेल वाजली .त्यांच्या ब्लॉकला सिक्युरिटी डोअर नव्हता. संजयने दरवाजा उघडल्याबरोबर कुणीतरी त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्मचा रुमाल ठेवला .त्यानंतर जेव्हा तो शुद्धीवर आला  तेव्हा त्याला खुर्चीला बांधून ठेवलेले होते .समोर त्याची लाडकी बहिण, एकुलती एक बहीण पूनम, अस्ताव्यस्त विवस्त्र स्थितीत पडलेली होती .आणि ते चार नराधम तिच्या शरिराशी वाटेल तसे खेळत होते .त्याने रागाने हालचाल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला खुर्चीला घट्ट बांधलेले असल्यामुळे तो काहीही हालचाल करू शकला नाही .आपल्या बहिणीचे चाललेले हाल तिच्यावर  त्या चौघा नराधमाकडून होणारे अत्याचार  निमूटपणे पाहण्याशिवाय त्याचा इलाज नव्हता.त्याच्या मुठी रागाने वळल्या होत्या आणि बघवत नाही म्हणून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते.

त्याची बहिण अर्धवट शुद्धीत व अर्धवट बेशुद्धीत होती.

जरा वेळाने ते चार नराधम त्यांना तशाच अवस्थेत सोडून दरवाजा बंद करून निघून गेले .ते गेल्यानंतर त्याने सरकवत सरकवत खुर्ची स्वयंपाकघरात नेली .हात बांधलेल्या अवस्थेत मोठ्या कष्टाने ओट्यावरील सुरी घेतली व आपल्याला बांधलेल्या दोऱ्या कापण्याचा प्रयत्न सुरू केला .अर्ध्या तासाने तो आपला डावा हात मोकळा करू शकला .नंतर पाच दहा मिनिटांत तो पूर्णपणे मुक्त झाला .त्याने प्रथम पूनमच्या शरीरावर एक चादर टाकली .नंतर पाणी आणून त्याने तिच्या चेहऱ्यावर शिंपडले.त्याला एकदा शेजारच्या वसंत काकांना हाक मारावी असे वाटले .परंतु त्याने तो विचार रद्द केला .जरा वेळाने पूनम शुद्धीवर आली .तशीच चादर लपेटून खुरडत खुरडत ती दुसर्‍या  खोलीत गेली .तिने कसेबसे कपडे घातले. तिचे शरीर त्या चौघा नराधमांनी इतके चुरगळले होते की तिला धड चालताही येत नव्हते .

दोघांनीही झालेला प्रकार सोसायटीत कुणालाही सांगायचा नाही असे ठरविले .त्याचप्रमाणे पोलिस कम्प्लेंट करायची नाही असेही ठरविले . ते तक्रार करण्यासाठी पोलीस चौकीवर गेले तेव्हा त्यांना वाईट अनुभव आला होता .पोलिस काहीही करणार नाहीत याची त्याना खात्री पटली होती त्या चार गुंड मुलांपैकी दोन गुंड  विलक्षण राजकीय प्रभाव असलेल्या दोन पुढाऱ्यांचे मुलगे होते.तर दोघे गावातील जानेमाने गुंडांचे चिरंजीव होते .अगोदर काही अॅक्शन पोलिसांकडून होणार नाही .जरी काही कारवाई पोलिसांकडून झाली तरी केस कच्ची ठेवली जाईल .सोसायटीभर बेअब्रू होईल .लोकांना चघळण्यासाठी काहीतरी खाद्य मिळेल.आपल्याला वकील व पोलिस वाटेल तसे उभे आडवे प्रश्न विचारून हैराण करतील . आपल्याला कुणा मोठ्याचा पाठिंबा नाही.गप्प बसलेले बरे असा त्या दोघांनी विचार केला.

हॉस्पिटलमध्ये न जाता, कारण सर्व प्रकार तिथे उघड झाला असता,ती दोघे फॅमिली डॉक्टरकडे गेली. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना पोलिसांकडे व हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.त्यांनी त्यांची बाजू सांगितल्यावर व निग्रहाने आम्ही जाणार नाही असे सांगितल्यावर त्यांनी औषधोपचार केले .चार दिवस तसेच गेले . पूनम कॉलेजमध्ये जात नव्हती .संजय चार दिवसांनी पूनमच्या आग्रहावरून  कॉलेजमध्ये गेला  असताना त्याला पोलिसांचा फोन आला .त्याच्या बहिणीने सोसायटीच्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली होती .

पोस्टमार्टेममध्ये त्या दिवशी रात्री झालेला प्रकार उघडकीस आला .त्याला पोलिसांना काय झाले ते खरे खरे सांगावे लागले .त्या चार गुंड मुलांची नावे ऐकताच पोलिसांनी ती केस गुंडाळली .शवविच्छेदन करणारे डॉक्टरही गप्प बसले .सर्व काही शांत शांत झाले .

त्या दिवसापासून संजयला झोप येत नव्हती .झोप लागली तरी ती दोन चार तास लागे.झोपेतून दचकून तो जागा होई.त्याच्या डोक्यात एकच प्रश्न सारखा घोंगावत होता .या अत्याचाराचा त्यातून झालेल्या बहिणीच्या मृत्यूचा सूड कसा घ्यायचा . सूड सूड एकच शब्द त्यांच्या डोक्यावर सारखा घणाघात करीत होता .असेच काही दिवस गेले आणि त्याला एका रात्री स्वप्न पडले .

तो एका जंगलात होता .रात्र होती दाट झाडीमधून फिकट चांदणे जमिनीवर पडले होते .त्याचे चित्रविचित्र आकार दिसत होते .रातकिडय़ांचा किर्र आवाज येत होता .समोरच त्याला एक गुहा दिसत होती .त्या गुहेमध्ये बहुधा एखादी मशाल रोवलेली असावी .त्याचा प्रकाश गुहेबाहेर येत होता .वाऱ्याबरोबर हलणाऱ्या मशालीच्या ज्योतीमुळे बाहेरील प्रकाशही वेडावाकडा नाचत होता .आणि तो स्वप्नातून दचकून जागा झाला .

दुसऱ्या दिवशी त्याचे स्वप्न काल जिथे संपले तिथून पुढे चालू झाले. मंतरल्यासारखा तो त्या गुहेकडे चालत गेला .मंतरल्यासारखा तो आत गेला. एक जटाधारी पद्मासनामध्ये ध्यानस्थ बसलेला होता. 

आणि तो स्वप्नातून खाडकन जागा झाला .त्याला त्या स्वप्नांचा अर्थच कळेना .

तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा तेच स्वप्न पडले मात्र या वेळी त्या  ॠषीने आपली नेत्र उघडले होते .

चौथ्या  दिवशी ते ऋषी त्याच्याजवळ काहीतरी बोलले. त्यांनी त्याला त्यांच्याकडे येण्यास सांगितले .

दुसऱ्या दिवशी दिवसभर तो ते ऋषी कुठे आहेत त्यांच्याकडे कसे जावे याचाच विचार करीत होता .

पांचव्या दिवशी गुरूंसमोर स्वप्नात तो उभा होता तेव्हा त्याने तिकडे कसे यायचे ते त्यांना विचारले आणि स्वप्न संपले .

पांच दिवस एखाद्या मालिकेसारखे त्याला स्वप्न पडत होते.तो थोडा थोडा पुढे सरकत होता आणि दरवेळेला स्वप्न संपत होते .अजूनही त्याला तिथे कसे पोचावे ते कळले नव्हते .

सलग सहाव्या दिवशी त्याला पुन्हा तेच स्वप्न पडले .तिथे कसे यायचे ते त्याला त्या अवलियांनी आज सांगितले.

आणि नेहमीप्रमाणे तो स्वप्नातून खाडकन  जागा झाला .गुरूने सांगितलेली वाट या वेळी त्याला स्पष्टपणे आठवत होती.त्याने लगेच थोडेसे कपडे पाठीवरच्या पिशवीमध्ये भरले.थोडे पैसे बरोबर घेतले व ब्लॉकला कुलूप लावून तो बसस्टँडच्या दिशेने निघाला . प्रवास करत करत तो कोकणात जाणाऱ्या आंबा घाटाच्या सुरुवातीला आला.त्याला त्या अवलियाने सांगितलेली  ओळखीची खूण पटली आणि त्याने बस थांबविण्यास सांगितली .बसमधून उतरून तो घाटाचा उतार उतरू लागला .त्याला गुरूंनी सांगितलेला  रस्ता स्पष्टपणे आठवत होता .उतरता उतरता त्याला एक पायवाट  डाव्या बाजूला जाताना दिसली .त्याला बरोबर खूण पटली .तो डाव्या बाजूच्या खोऱ्यात उतरू लागला .जसजसा तो जात होता तसतसा  रस्ता त्याच्या लक्षात येत होता.शेवटी तो त्या गुहेच्या तोंडापाशी येऊन उभा राहिला .आत एकदम जावे की न जावे असा विचार करीत असताना त्याने शेवटी आत जाण्याच्या निश्चय  केला .आत गेल्यावर त्याला पाजळलेल्या टेंभ्यासमोर बसलेले गुरू दिसले .

त्यांनी प्रसन्न मुद्रेने त्याला आत येण्यास सांगितले .त्यांच्या शेजारील आसनांवर बसण्यास त्यानी सुचविले.ते पुढे म्हणाले :वत्सा तुझे दुःख मला माहीत आहे. म्हणूनच मी तुझ्या स्वप्नात येवून तुला येथे बोलवून घेतले .मी तुला आता एक मंत्र देतो .या अरण्यात वाहणाऱ्या नदीमध्ये कंबरेइतक्या पाण्यात उभे राहून हा मंत्र जपायचा आहे.किती दिवस मंत्र जपावा लागेल ते मला सांगता येणार नाही.कदाचित दोन चार दिवस, कदाचित एक दोन महिने,कदाचित एक दोन वर्षे तुला ही उपासना करावी लागेल .मंत्र सिद्ध झाल्यावर एक दिव्य पुरुष  तुला भेटेल.पुढे काय करायचे ते तो सांगेल. एवढे सांगून तो अवलिया थांबला .

( क्रमशः)

६/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel