(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे जिवंत वा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

चम्या कम्या पम्या आणि रम्या हे चार दोस्त होते.चमन कमलाकर पद्माकर आणि रमाकांत अशी जरी त्यांची नावे असली तरी ते वरील नावानेच ओळखले जायचे.बर्‍याच  वेळा ते चांडाळ चौकडी या नावाने सुद्धा ओळखले जात असत.परिसरात चांडाळ चौकडी असे म्हटल्यावर यांचे चेहरे सर्वांच्या डोळ्यासमोर येत.         

त्या रात्री पम्या मोटरसायकलवरून जात होता .रात्रीचे दहा वाजले होते .समोरच एक सुंदर मुलगी रिक्षासाठी हात दाखवीत होती .परंतु एकही रिक्षा थांबत नव्हती .पम्या येताना पाहून तिने अंगठा दाखवत मला लिफ्ट देणार का असे विचारले .तिचे वय  सुमारे बावीस वर्षे असावे. तिने डोळा मारल्याचा भास पम्याला झाला. ती तरुणी अत्यंत सुंदर व रेखीव होती .गोरीपान, लांबसडक केस, कमनीय बांधा, आकर्षक वेशभूषा, अश्या तिच्या वैशिष्ट्यांची दर्दी पम्याने क्षणार्धात नोंद घेतली.पम्याची कीर्ती जर तिला माहीत असती तर तिने हे धाडस केले नसते .अशी चालून आलेली संधी पम्या हातची थोडीच  दवडणार.त्याने सफाईदारपणे स्टाईलमध्ये मोटारसायकल थांबविली .एकदा केसावरून स्टाईलमध्ये हात फिरवून त्याने ऑफकोर्स का नाही का नाही बसाना म्हणून पाठीमागच्या सीटकडे निर्देश केला.

तीही संकोच न करता त्याला अगदी खेटून बसली व सहजपणे त्याच्या कमरेभोवती हात टाकला. पम्याला गळाला मासोळी आयती सापडल्यासारखे वाटले.ही पोरगी चालू दिसते असा विचार त्याच्या मनात आला . अकस्मात आलेल्या संधीचा त्याने  पुरेपूर फायदा घेण्याचे ठरविले.तिच्याशी लाडीगोडी करून तिला खोलीवर न्यावी, की हॉटेलात न्यावी, की गावाबाहेरील तळ्याकाठी काळोख्या कोपऱ्यात न्यावी, यावर तो विचार करू लागला.तिची तयारी असल्यास प्रथम तिला तळ्याकाठी न्यावी व नंतर प्रकरण बोटचेपे आहे असे वाटल्यास मग तिला हॉटेलात न्यावी असे त्याने मनाशी ठरविले .तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारता तिने तुम्ही न्याल तिकडे असे मोकळेपणाने सांगितले. पम्याचा आनंद गगनात मावेना. आपण स्वर्गात आहो असे त्याला वाटू लागले .आज उठल्याबरोबर कुणाचे तोंड पाहिले होते ते त्याला आठवेना.त्याने स्वतःचेच तोंड आरशात पाहिले होते !पम्याने गाडी हायवेवर घेतली.गावाबाहेरील तळ्यावर जायचे त्याने निश्चित केले. यावेळी तिथे सामसूम असणार हे त्याला अनुभवाने माहीत होते .घरात नेणे जरा धोक्याचे होते .हॉटेलात नेणे खर्चिक होते .हा तळ्याचा मार्ग चांगला होता.वाटलेच तर पुढे हॉटेलमध्ये जाता येणार होते .

हायवेला लागल्यानंतर त्याला आपल्या खांद्यावरील हात जड जड होत आहे असे वाटू लागले .मध्येच त्याला खांद्यावरील हात लांब झाला व त्याने स्टिअरिंग धरले असेही वाटले.तो पुन्हा डोळ्याच्या कोपऱ्यातून  बघतो तो हात पाठीवर व्यवस्थित होता .नंतर हात एकदम लांब व एकदम आखूड होऊ लागला .मध्येच हात प्रचंड जड वाटे आणि खांदा प्रचंड  वजनामुळे डाव्या बाजूला झुके.तर क्षणात तो नॉर्मल होई. मध्येच त्याला हाताची सर्व हाडे दिसत तर मध्येच व्यवस्थित मांसल गोरा गोरा  हात दिसे .आपण जास्त पेग तर घेतले नाहीत ना असे त्याला वाटू लागले. त्याच्या कंबरेभोवतालची हाताची मिठी जास्त जास्त घट्ट घट्ट  होऊ लागली.एकदा तर ती मिठी इतकी घट्ट  झाली की त्याला श्वास घेता येईना. त्या काळमिठीमुळे आपले दोन तुकडे होतात की काय असे त्याला वाटले . त्याने आरशात पाहिले तर त्याला आपल्या मागे केवळ हाडांचा सापळा बसला आहे असे दिसले .त्याला मागून शब्द ऐकू आले ती मीच आहे. मी तुम्हा चौघांना सोडणार नाही.मी तुम्हा चौघांना मिळणार नाही तर मी कुणालाच मिळणार नाही असे तुम्ही म्हणत होता ना?भोगा आपल्या कर्माची फळे . त्याच वेळी लांब झालेल्या तिच्या हाताने स्टेअरिंग फिरविले व गाडी एका ट्रकवर जाऊन आदळली . 

पम्या शुद्धीवर आला तो हॉस्पिटलमध्येच.गेले पंधरा दिवस तो बेशुद्धीत होता .त्याचा एक पाय एक हात अपघातात अत्यंत वाईट पद्धतीने चिरडले गेल्यामुळे काढून टाकण्यात आले होते. एक डोळाहि अपघातात गेला होता .तो कधीच नीट चालू शकणार नव्हता.दोन्ही हातानी काम करू शकणार नव्हता.त्याचे मित्र त्याला रोज भेटण्यासाठी येत होते .त्यांना त्याने सर्व हकीकत सांगितली होती .ती तीच अगम्या आहे .तिच्यापासून सावध राहा.पूर्ण काळजी घ्या.ती हडळ झाली आहे .ती प्रतिशोध घेण्यासाठी आली आहे. ती तुम्हाला सोडणार नाही .असे पुन्हा पुन्हा बजावून सांगितले होते .विशेषतः  रात्री कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडायचे नाही असेहि त्याने बजावले होते.

अनेक ऑपरेशन्स अनेक प्रकारचे हाल सोसल्यानंतर सहा महिन्यांनी तो मोडका तोडका होऊन  घरी जाऊ शकला .घरी गेला तरी त्याला रोज रात्री स्वप्न पडे.स्वप्नात हाडांचा सापळा दिसे. ती विकट हास्य करताना दिसे. तिचे  कमी जास्त लांब होणारे हात दिसत. आणि तो दचकून झोपेतून जागा  होत असे.रात्र रात्र झोपेशिवाय काढल्यामुळे, तिच्या सतत होणाऱ्या  भयानक दर्शनामुळे, तो दिवसेन् दिवस खंगत चालला होता .  

सर्वजण हादरले होते.ते रात्रीचे मुळीच बाहेर पडत नव्हते. सहा महिने काहीच झाले नाही तेव्हा त्यांना पम्याला भास झाला असेल असे वाटले.एक दोन जास्त पेग मारले असतील. मग त्याला काहीही भास झाले असतील. अशी मनाची समजूत करून ते पुन्हा रात्रीचे बाहेर जाऊ लागले .पम्याने सांगितलेले खरे असो किंवा खोटे असो, कुणाही मुलीने आपल्याला लिफ्ट मागितली तर ती द्यायची नाही अशी खूणगाठ त्यांनी  आपल्या मनाशी बांधून ठेवली. 

चम्याचे वडिल  एका रात्री खूप आजारी झाले.त्यांना रातोरात हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले.अॅम्ब्युलन्स बरोबर चम्या हॉस्पिटलमध्ये गेला.वडिलांना काही दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले .चम्या रात्रीचा अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये थांबत असे.वडील हळूहळू बरे होत होते.काही दिवसांनी त्यांना स्पेशल रुममध्ये हलविण्यात आले .या सर्व गडबडीमध्ये चम्या बरेच काही विसरला होता .एक दिवस वडिलांचा जीव थोडा घाबरा झाल्यामुळे त्याने बेल वाजवली परंतु कुणी न आल्यामुळे तो नर्सला बोलविण्यासाठी गेला.वडील पुन्हा नार्मलला आल्यावर डॉक्टरांनी काही औषधे आणण्यास सांगितली.ती आणण्यासाठी तो बाहेर पडला .त्याच्या समोरच एक नर्स चालत होती .चालता चालता ती जरा थांबली .तिने चम्याच्या हातात एक चिठी  कोंबली.त्यावर सतरा नर्सेस क्वार्टर असे लिहिलेले होते. तेवढ्यात ती लिफ्टमधून निघून गेली होती .तिच्या एका दृष्टीक्षेपात चम्या त्याचा तो राहिला नाही. तो सर्व काही विसरला .मोहिनी मंत्र टाकल्याप्रमाणे तो औषधे आणण्याऐवजी लिफ्टमधून नर्सेस क्वार्टरकडे गेला.रूम नंबर सतरा

ठोठावल्यावर आतून दरवाजा उघडाच आहे असे उत्तर आले .तो दरवाजा उघडून आत गेला .प्लीज कडी लावा ना असे तिने लाडिकपणे  सांगितले.कॉटवर ती अंगावर पांघरुण घेऊन झोपली होती.चादरी खाली ती विवस्त्र असणार हे त्याच्या ताबडतोब लक्षात आले . आतुरतेने तो तिच्या शेजारी कॉटवर बसला.तिला केंव्हा मिठीत घेतो असे त्याला झाले होते .तिने त्याचा हात हातात घेतला.तिचा हात थोडा गरम लागत होता.त्याला वेड्याला तो कामज्वर वाटला. अकस्मात तिचा हात  उकळत्या पाण्याप्रमाणे गरम झाला.त्याने चटका बसल्यामुळे हात पटकन काढून घेतला .तिने त्याचा हात पुन्हा पकडला .यावेळी हाताचे टेंपरेचर नॉर्मल होते.दुसऱ्याच क्षणी तिचा हात बर्फासारखा गार लागला.चटका बसल्याप्रमाणे त्याने तो ओढण्याचा प्रयत्न केला .परंतु ती काळ मिठी होती .तिने त्याचा हात एवढ्या जोरात दाबला की त्याचे हाताचे हाड काडकन् मोडले .त्याला आपण कुठे आलो ते लक्षात आले.आपल्याला कुणी भुलविले व इथे आणले तेही त्यांच्या लक्षात आले.आता आपली सुटका नाही हे त्याने ओळखले .भीतीने तो थरथर कापू लागला .त्याच्या सर्वागाला दरदरून घाम फुटला .स्नान केल्यासारखा तो घामाने ओला चिंब झाला.पम्याने दिलेली सूचना विसरल्याची त्याला खंत वाटली . पश्चातापाचा आता काही उपयोग नव्हता. दुसऱ्या हाताने तिने आपल्या अंगावरील चादर दूर केली.त्याखाली एक हाडांचा सापळा होता .तो सापळा दात विचकीत  हसत होता.मरता मरता त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी केलेल्या निर्घृण कृत्याचा पट उलगडत गेला . त्याच क्षणी त्याला जोरात हार्ट अटॅक आला .तो जागच्या जागी कोसळला.मरता मरता त्याला त्यांनी अगम्याशी केलेले सर्व  चाळे आठवले .

रूम नंबर सतराची नर्स आपली रात्रपाळी संपवून सकाळी खोलीवर आली .कुलूप उघडून खोलीत शिरताच तिला जमिनीवर कोसळलेला चम्या दिसला . तीही एक दीर्घ किंकाळी फोडून बेशुद्ध झाली .कुलूप लावलेले असताना चम्या आत कसा आला ते कुणालाही कळले नाही.चम्याचा ग्रंथ तिथेच आटोपला.

ही बातमी रम्या ,कम्या,व पम्या यांना कळली. रम्या व कम्या ताबडतोब  पम्याला भेटायला आले.पम्या म्हणाला हे काम त्या हडळीचेच आहे.ती मेली परंतु हडळ रूपाने अस्तित्वात आहे .आपल्या सगळ्यांना मारल्याशिवाय किंवा अपंग केल्याशिवाय ती स्वस्थ बसणार नाही.मी तर सर्वदृष्टीने अपंग झालो .तिने माझा अपघात घडवून आणला .सर्वदृष्टीनी मी कुठल्याही कामाचा राहिलो नाही.

मी व चम्या यांच्यावर तर तिने बदला घेतलाच.चम्या मेला. तो सुटला. मलाही तिने अपघातात ठार मारले असते तर बरे झाले असते .मी का जिवंत राहिलो ते मला कळत नाही .  तुम्हा दोघांवर सूड उगवल्याशिवाय ती राहणार नाही . 

( क्रमशः) 

३१/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel