(ही कथा व यातील पात्रे संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

१ गुड्डू

त्याने प्रथम गुड्डूवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली .गुड्डू हा अनेकदा गुत्त्यावर जात असे.त्याचा ठरलेला गुत्ता होता.त्या ठिकाणीच त्याला गाठावा असे त्याने ठरविले .एकदा रूप बदलल्यानंतर ते रूप फक्त एक तासच राहणार होते .त्यामुळे मंत्र म्हणून रूप बदलल्यावर शक्य तितक्या लवकर शिक्षा आणि लगेच त्या स्थळापासून दूर जाणे आवश्यक होते .जिथे त्याने बळी घेतला तिथेच किंवा आसपास तो सापडला असता तर त्याचा जीव धोक्यात आला असता .त्याला फक्त पाच वेळा मंत्र जपून रूप बदलता येणार होते.त्याला चार जणांचा बळी घ्यायचा होता.एकदा अपयश आले असते तरी चालले असते .त्याहून जास्त अपयश येते तर त्याला सगळ्यांना शिक्षा देता आली नसती. एकाच वेळी एकाहून जास्त जणाना ठार मारण्याचा प्रयत्न करणे धोक्याचे होते 

जरी गुत्ता  म्हटले तरी ती जागा एक पॉश हॉटेल होते.तिथे दोन विभाग होते .एका विभागात इंग्लिश  दारू मिळे तर दुसऱ्या विभागात देशी दारू मिळे.गुड्डू देशी दारू पीत असे .संजय गुड्डू येण्याआधीच त्या हॉटेलात गेला.जनरल विभागात तो कॉफी पीत बसला .थोड्याच वेळात गुड्डू आत येताना दिसला .तो व त्याचे मित्र सरळ देशी विभागात गेले.कॉफीचे पैसे त्याने आलेल्या बिलावर ठेविले. वेटर जाताच त्याने मंत्र जपायला सुरुवात केली.मंत्र पूर्ण होताच त्याचे रूपांतर एका भयंकर विषारी इंगळी मध्ये झाले . त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नाही याची काळजी घेणे जरुरीचे होते .तेवढ्यात वेटर पैसे नेण्यासाठी आला .साहेबांना बाहेर जाताना त्यांने पाहिले नव्हते .साहेब कुठे गेले अशा विचारात तो पडला .जरावेळ घुटमळून तो पैसे घेऊन निघून गेला. 

खुर्ची खाली दबा धरून संजय बसला होता .वेटर गेल्यावर चपळाईने कडेकडेने तो गुत्त्याच्या  दरवाज्यातून आत शिरला .लोक आत बाहेर जात येत होते .त्यांच्या बुटाचा पाय आपल्यावर पडणार नाही याची काळजी तो घेत होता .शक्य तितक्या लवकर गुड्डूला गाठायचे होते .निशाणा सारखी नांगी वर करून तुरुतुरु चालत जात असताना संजयला गंमत वाटत होती .दबकत दबकत तो गुड्डू बसला होता त्या टेबलाजवळ गेला .तिथून टेबलाच्या पायावरून तो वर चढला.तिथून त्याने गुड्डूच्या हातावर उडी मारली .एवढे होईपर्यंत पंधरा मिनिटे गेली होती .त्याने त्याच्या उघड्या हातावर नांगी मारली.

हाताला दंश होताच त्याने हात जोरात झटकला. त्याचा हात संजयला जोरात लागला आणि तो उडून शेजारच्या भिंतीवर आपटला .संजयच्या मस्तकात एक कळ उठली .त्याला धड चालता येईना.आपल्या इवल्याशा पायांनी हळूहळू चालत सरपटत मोठया मुष्किलीने तो बाहेरच्या सर्वसाधारण विभागात आला .तिथे जमिनीवर एकाने आपली ब्रीफकेस ठेवली होती .त्या ब्रीफकेसवर तो चढून बसला .ब्रीफकेस काळ्या रंगाची असल्यामुळे तो सहज दिसत नव्हता .त्या माणसाने ब्रीफकेस  उचलली. ती नेऊन आपल्या मोटारीत मागच्या बाजूला ठेवली. त्या अगोदरच तो सफाईने मोटारींच्या टपावर चढला.थोड्याच वेळात तो मोटारी बरोबर घटनास्थळापासून दूर गेला .

इकडे गुड्डू अंगात विष भिनल्यामुळे जमिनीवर कोसळला .तो जोरजोरात ओरडत होता.काय झाले ते कुणालाच कळत नव्हते .त्याला बहुधा  हार्टअटॅक आला असावा असे सर्वांना वाटले .त्याला त्याच्या मित्रांनी मोटारीतून घाईघाईने हॉस्पिटलमध्ये नेले.डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले .हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तो गुरासारखा जोरात ओरडत होता .हळूहळू त्यांचा आवाज मंद होत गेला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला .मृत्यू अगोदर त्याला रामशास्त्री म्हणून आलेले पत्र आठवले .त्या रामशास्त्र्यांने आपल्याला मारले हे त्यांने ओळखले .

संजयने चार लक्ष्यांपैकी एका लक्ष्याचा बळी घेतला होता .

* पूनमच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच तो समाधानाने झोपला .*

गुड्डू मेल्याचे कळताच उरलेले तिघे प्रचंड हादरले .रामशास्त्री खोटा नाही हे त्यांच्या लक्षात आले.या रामशास्त्र्यांने गुड्डूला कसे मारले तेच त्याना कळेना.रामशास्त्र्याने मारले की खरेच गुड्डूला हार्टअॅटॅक आला तेही त्यांना कळेना. हॉटेल मालकाशी त्यांची चांगली ओळख होती.त्यांनी त्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले .इंगळीने गुड्डूच्या हातावर मारलेली उडी स्पष्टपणे दिसत होती.हॉटेलमध्ये इंगळी कुठून आली ते त्यांना कळेना .ही इंगळी रामशास्त्र्याने तर सोडली नसेल ना ?सामंतच्या डोक्यात विचार आला .यातून त्यांच्या हाती विशेष काही लागले नाही .सुदैवाने प्रवेशदारावरच्या कॅमेरातील फुटेज त्यांनी पाहिले नाही.नाहीतर पूनमचा भाऊ संजय तिथे आला होता हे त्यांना सहज कळले असते .

उरलेल्या तिघांनी पूर्ण काळजी घ्यायचे ठरविले . रोज रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्याबरोबर एकमेकांना फोन करायचे  असे ठरविले .

२ सज्जू

संजयच्या क्रमांकाप्रमाणे आता नंबर सज्जूचा होता.सज्जू रोज बदनाम वस्तीमध्ये त्याच्या रखेलकडे जात असे .त्याला तिथे गाठायचे त्याने ठरविले .त्याप्रमाणे तिथे जाऊन तो त्या घराच्या समोरील हॉटेलमध्ये चहा पीत बसला .सज्जू केव्हा येतो व आंत शिरतो याकडे त्यांचे लक्ष होते.रात्री अकरा वाजता नेहमीप्रमाणे सज्जू आत शिरला.संजयही चहा संपवून त्याच्या पाठोपाठ त्या घरात शिरला .खोल्यांच्या दरवाजांना फटी होत्या हे त्यांच्या पथ्यावर पडले .दरवाज्या बाहेरच्या बोळीत उभे राहून त्याने मंत्र जपण्यास सुरुवात केली.पुढील काम सोपे होते .

त्या रात्री सज्जूचा कुणालाही फोन गेला नाही .त्याला फोन केल्यावर उत्तर देत नाही असा जबाब येत होता .राघव व सामंत दोघेही घाबरले त्यांनी लगेच सज्जूचे घर गाठले. तिथे त्यांना सज्जू मेल्याचे कळले.दोघांनाही प्रचंड शॉक बसला .काय करावे कुठे जावे ते त्यांना कळेना . त्या रात्री दोघेही शांत झोपू शकले नाहीत .रात्रभर  दोघेही तळमळत होते.हा रामशास्त्री कोण त्याचा तपास लागत नव्हता .साधाभोळा बावळट दिसणारा संजय असे काही करू शकेल असा त्यांना संशय येत नव्हता .तरीही त्यांनी आपला संजय वरील वॉच वाढविण्याचे ठरविले .

गुड्डू व सज्जू या दोघांचा बळी घेईपर्यंत बारा दिवस निघून गेले होते .कोण कुठे जातो ते पाहणे,कोण कुठे मिळेल त्याची खात्री करणे, नंतर दबा धरून आपले सावज गाठणे यात काही दिवस सहज जात असत.

३ राघव

राघव वडिलांच्या बरोबर किंवा स्वतंत्र पार्टी ऑफिसमध्ये अधूनमधून जात असे .त्याला त्याने पार्टी ऑफिसमध्ये गाठण्याचे ठरविले. पार्टी ऑफिसमध्ये जाणे धोक्याचे आहे याची त्याला कल्पना होती .संजय आसपास दिसता तरी राघवच्या गुंडानी त्याची चटणी केली असती. इथे संजय किंवा रामशास्त्री येण्याचे धाडस करणार नाहीत, अशा खात्रीमुळे राघव थोडासा निर्धास्त व बेसावध असेल तेव्हा त्याला तिथेच गाठणे योग्य असे संजयने ठरविले.

संजयने तसेच तिथे जाणे धोक्याचे होते .त्याने थोडेसे वेषांतर करायचे ठरविले.शाळेत व कॉलेजमध्ये त्याने नाटकात काम केले होते .वेषांतर करण्याचे सामान कुठे मिळते वेषांतर कसे करायचे याची त्याला माहिती होती.त्याला कुणी ओळखणार नाही असे वेषांतर करून तो पार्टी ऑफिसवर पोचला.तो मध्यमवयीन माणूस बनला होता .राघव तिथे आल्यावर संजय त्याला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेला.महिलांच्या वसतीगृहाला मदत मिळविण्याच्या बहाण्याने तो तिथे गेला होता .गप्पा मारीत असताना त्याने तो कोण आहे ते त्याला सांगितले.उरलेल्या दोघांना त्याने कसे मारले तेही सांगितले .राघवने चपळाईने संजयला मारण्यासाठी पिस्तूल काढले. तो पिस्तुल काढत असताना   त्याने मंत्र जपून इंगळीच्या रूपाने त्याच्या अंगावर उडी मारली व आपला कार्यभाग साधला .   

सामंत

राघवचाहि  मृत्यू झाल्याचे पाहून सामंत वेडापिसा झाला .हा रामशास्त्री आपल्याला सोडत नाही हे त्यांच्या लक्षात आले .हा रामशास्त्री मारतो कसा तेही त्यांच्या लक्षात येईना .आपण पाताळात लपलो तरी हा रामशास्त्री आपल्याला शोधून काढेल याची त्याला खात्री पटली.संजय जवळ अजून बारा दिवस शिल्लक होते .तेवढ्या काळात त्याला मंत्राचा वापर करावा लागणार होता.दिव्य पुरुषाने सांगितल्याप्रमाणे नंतर तो मंत्र निरुपयोगी ठरला असता.

काही दिवस सामंतला तसेच तडफडू द्यावे असे संजयने ठरविले.नंतर तो कदाचित निर्धास्त होईल . आणि मगच त्याला गाठावे असे ठरविले .

त्याने एक छोटेसे पत्र सामंतला लिहिले.

मी ठरविल्याप्रमाणे तिघांना माझ्या पद्धतीने शिक्षा ठोठावली आहे .आता तुझा नंबर आहे .तू सगळ्या गँगचा लीडर होतास. म्हणून तुझा नंबर मी मुद्दाम शेवटी ठेविला आहे .तू काहीही कर. कुठेही लप. कितीही संरक्षक ठेव.मी तुला गाठणार म्हणजे  गाठणारच

रामशास्त्री

सामंतला हा आपल्याला सोडणार नाही याची खात्री पटली .आपण घराबाहेर पडायचे नाही असे त्याने ठरविले .घराबाहेर त्याने कडक पहारा ठेवला .त्याच्या परवानगीशिवाय मुंगीही आत शिरणार नाही असा बंदोबस्त त्याने केला .आणि झोपेशिवाय तो तळमळत स्वतःला बंदिस्त करून राहिला .

संजयने आठ दिवस जावू दिले .आठ दिवस झोपेशिवाय काढल्यामुळे सामंतला प्रचंड झोप येत होती .परंतु प्रत्यक्षात मात्र झोप येत नव्हती .त्याला खाणे पिणे सुचत नव्हते .आठ दिवसांत काळजीने तो अर्धा झाला होता .एका रात्रीत त्याचे सर्व केसही पिकले होते .त्याच्या आई वडिलांना त्याच्याकडे बघवत नव्हते .तो असे वेड्यासारखे का करतो त्याला कुणाकडून भीती आहे हे पुन्हा पुन्हा विचारूनही तो सांगत नव्हता .

शेवटी त्याने  ज्योतिषाने दहा दिवस जप त्या काळात तुझा मृत्यू ओढवेल असे सांगितले आहे अशी थाप मारली.तेव्हा कुठे त्यांच्या आई वडिलांची त्याच्याशी होणारी भुणभुण  थांबली .

शेवटचे दोन दिवस उरले होते .संजय सामंतच्या घराबाहेर उभा होता .त्याला आत तसेच जाणे अशक्य होते .त्याने मंत्र जपून इंगळीचे रूप धारण केले.भरभर भिंतीवरून छतावरून सामंतच्या खोलीकडे जाण्यास त्याने सुरुवात केली .दरवाजा बंद करून सामंत आत मृत्यूची वाट पाहात बसला होता .खोलीत जाण्याला कुठेही फट नव्हती.वेळ भरभर निघून जात होती .जर तास पूर्ण झाला असता तर तो मूळ रूपात प्रगट झाला असता .मग त्याला परमेश्वरही वाचवू शकला नसता .संजय मृत्यूला घाबरत नव्हता.पूनमच्या मृत्यूचा सूड पूर्ण करण्या अगोदर त्याला मृत्यू नको होता .

फिरता फिरता शेवटी त्याला टॉयलेटमधे  जाण्यासाठी फट सापडली .तो जेमतेम आत गेला आणि तास पुरा झाला .मंत्राचा परिणाम संपला .मूळ रूपात संजय प्रगट झाला .टॉयलेटमधून त्याने सामंतच्या खोलीचा अंदाज घेतला .तिथे दिवा होता परंतु सामसूम दिसत होती .टॉयलेटचा दरवाजा किलकिला करून त्याने पाहिले.सामंत आठ दिवस झोप न लागल्यामुळे बेडवर घोरत पडला होता .तो दरवाजा उघडून खोलीत  शिरला .त्याने प्रथम बेल व सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडले. नंतर दरवाजा आतून लॉक केला.खिशातून  चिकटपट्टी काढली आणि सामंतच्या तोंडावर लावली.सामंत दचकून जागा झाला .संजयने तोपर्यंत त्याचे हातही बांधले होते .त्यानंतर त्याने त्याचे पाय बांधले .सामंत हताशपणे एखाद्या कापायला काढलेल्या बकर्‍यासारखा संजयकडे बघत होता .

सामंतला माहित असलेला त्याच्या पापाचा पाढा पुन्हा वाचण्यास संजयने सुरुवात केली .तिघांचे बळी कसे घेतले हे सविस्तर सांगितल्यावर त्याने आता तुझा बळी घेणार आहे असे सांगितले.तुला ठार कसा मारणार तेही सांगितले .

सुरक्षितता म्हणून त्या खोलीत सीसीटीव्ही  बसवलेला होता .संजयने त्याचे कनेक्शन अगोदरच तोडले होते .बाहेर मॉनिटरिंग करणाऱ्याला स्क्रीनवर काहीही दिसेना. काहीतरी गडबड आहे धोका आहे असे त्याच्या लक्षात आले.  फोन केला तर सामंत फोनही उचलत नव्हता.दरवाजा ठोठावल्यावर काही जबाबही मिळत नव्हता .दरवाजा उघडत नाही असे लक्षात येताच त्यांनी दरवाजा फोडण्यास सुरुवात केली.आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता .थोड्याच वेळात दरवाजा फोडून ते आत आले असते.संजयने मंत्र जपण्यास सुरुवात केली .सामंतला दंश केल्यावर त्याने कॉटवरून खाली उडी मारली .एवढ्यात दरवाजा तोडून रक्षक आत आले. 

सामंत वेदनांनी कळवळत होता .तो नुसता ओरडत होता . नक्की काय झाले ते त्याला सांगता येत नव्हते. तो हळूहळू बोलण्याच्या पलीकडे जात होता .मारेकरी शोधण्यासाठी सर्वजण जिकडे तिकडे धावपळ करत होते .संजय तुरुतुरु खोलीच्या बाहेर पडला.कुणीतरी अॅम्बुलन्स बोलाविल्याचे त्याने ऐकले.घरात उडालेल्या गोंधळात स्वत:ला जपत घराबाहेर पडण्यासाठी विलंब लागत होता. 

*तो जेमतेम घराबाहेर कसातरी पडला आणि त्याचे रूपांतर होण्यास सुरुवात झाली .*

* सूड पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता .*

* सामंतच्या घराकडे एक समाधानाचा कटाक्ष टाकून तो आपल्या घराकडे शांतपणे चालू लागला* 

(समाप्त )

६/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel