(ही कथा काल्पनिक आहे. गुहेचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये !!प्रयत्न केल्यास एखादी गुहा सापडू शकते .परंतु कथेतील गुहा ती असेल असे सांगता येत नाही )

छिन्नी हातोड्याला सहजासहजी दाद देणारा तो दगड नव्हता .अलिबाबा व चाळीस चोर ही कथा आम्हाला आठवली .

प्रत्येकाने त्या दगडाच्या पुढ्यात उभे राहून निरनिराळी खुणेची वाक्ये म्हणून तो दगड बाजूला होतो का ते गंमत म्हणून पाहिले.तो दगड एक सूतही  हलला नाही.आम्ही ती गुहा नक्की कुठे आहे त्यासाठी काही खुणा निश्चित केल्या .काही खुणा आम्ही निर्माण केल्या .तिथे पडणारा प्रचंड पाऊस वाहणारे ओहोळ यामुळे खाणाखुणा नाहीशा होणे सहज शक्य होते.घाटापासून तिथे जाईपर्यंत कोणत्या निरनिराळ्या खुणा डाव्या उजव्या बाजूला आहेत ते आम्ही एका डायरीमध्ये लिहून काढले .प्रत्येकाने त्याची प्रत आपल्याजवळ ठेवली .हेतू एवढाच की पुन्हा तिथे जाणे आपल्याला शक्य व्हावे . नंतर त्या जंगलातून घाटातील रस्त्यावर परत येऊन आम्ही आपापल्या घरी परत आलो .

ते धन प्राप्त करून घ्यायचे हा आम्हा चौघांचा निश्चय होता .सरकारी अधिकाऱ्यांना कळविले असते तर अगोदर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नसता .एवढ्या घनघोर जंगलात आमच्या बरोबर येण्यास ते कदाचित तयार झाले नसते.त्यासाठी लागणार्‍या  प्रचंड पैशाला संमती देणे त्यांना शक्य नव्हते .त्यापेक्षा आपण काही तरी कल्पना लढवू या आणि ते धन मोकळे करूया असे आम्ही ठरविले . नंतर आम्ही कदाचित ती गोष्ट शासनाला कळविली असती.

ही सर्व गोष्ट गुप्त ठेवणे आवश्यक होते .नाही तर कुणीतरी काहीतरी कल्पना लढवून सर्व खजिना साफ केला असता .शेवटी आम्ही सुरुंगाचा स्फोट करून तो दगड मोकळा करण्याचे ठरविले.त्यासाठी सुरुंग मिळविणे त्याचा स्फोट कसा करायचा याचे शिक्षण घेणे .आपल्या जिवाची काळजी घेणे .ते सर्व धन त्या दाट खडतर जंगलातून वाहून बाहेर रस्त्यावर आणणे .पुन्हा या बाबतीत पूर्ण गुप्तता पाळणे .यासाठी नियोजनाची आवश्यकता होती .या कामासाठी भरपूर वेळ व पैसा लागणार होता .आमच्यापैकी प्रत्येकजण कुठेना कुठे नोकरी करीत होता.एवढा वेळ व पैसा उपलब्ध करणे आम्हाला शक्य नव्हते .मजूर लावल्याशिवाय तेथे जाणे स्फोट घडवून आणणे व सर्व रांजण रिकामे करून ते यशस्वीपणे आपल्या घरी आणणे शक्य नव्हते. या कामात गुप्तता बाळगणे शक्य नव्हते . 

जास्त विचार करता असे लक्षात येऊ लागले की अशाप्रकारे  ते द्रव्य सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि कोणाच्याही लक्षात न येता घरी नेणे शक्य नाही .घरी नेले तरी त्याचे सर्वांमध्ये वाटप करून ते हळूहळू बाजारात आणून त्याचे रूपांतर  आपल्या पैशांमध्ये करून ते सर्व यशस्वीपणे पचविणे  शक्य नाही . मोठ्या प्रमाणात सुरुंग मिळविणे मग सर्व योजना यशस्वीपणे पार पाडणे हे शक्य नाही .धन अपहार हा विचार दरोडेखोरीचा झाला .सभ्य माणसाचे हे लक्षण नाही .जरी प्रथम द्रव्याची लालसा निर्माण झाली असली तरी नंतर आमच्या विचारांवर  सुसंस्कृततेचा प्रभाव  पडू लागला होता .तेव्हा आपल्याला समजलेली माहिती योग्य व्यक्तींसमोर मांडावी आणि नंतर योग्य मार्गाने कायद्याने जे होईल ते करावे असा विचार निश्चित झाला . आमची अपार द्रव्य लालसा नष्ट झाली .धन मिळाल्यावर आम्हाला नियमाप्रमाणे त्यातील काही टक्के मिळालेच असते.एखादा म्हणेल अपरिमित अशक्य अडचणी पाहून आमची द्रव्यलालसा नष्ट झाली.कदाचित तसेही असू शकेल .  

अपॉइंटमेंट घेऊन आम्ही सरळ मुख्यमंत्र्यांकडे गेलो .त्यांच्या कानावर सर्व हकीगत घातली .त्यांना तेथील जागेचे व गुहेचे आंतील फोटो दाखविले. त्यांनी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली .आम्ही दगड फोडण्याच्या सर्व यंत्रणेसह तिथे पोचलो.लोकांना त्या जंगलात नक्की काय होणार आहे याची कल्पना नव्हती.बातमीदारानाही याचा सुगावा लागू दिला नाही .जंगलात बहुधा  काहीतरी सर्वेक्षणाचे काम चालले असावे असा बातमीदारांचा अंदाज होता.एखादा रस्ता किंवा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण चालले असावे असे सर्वांना वाटले.त्यामुळे या हालचालींकडे कुणीही लक्ष दिले नाही .

सुरुंग लावण्यात आले. त्याला बत्ती देण्यात आली.आम्ही सर्वजण सुरक्षित अंतरावर लांब बसलो होतो .सुरुंग उडाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला .आणि नंतर काय झाले कुणास ठाऊक परंतु सर्व डोंगर कोसळून सपाट होतो की काय असे आम्हाला वाटले.कानठळ्या बसविणारा आवाज झाला .ती गुहा डोंगरांवरील माती दगड इत्यादी कोसळून संपूर्णपणे गाडली गेली.इथे काही होते याचा नावनिशाणही राहिला नाही .केवळ एक मोठा डोंगर अस्तित्वात राहिला . कदाचित त्या वेळी एक छोटासा भूकंप झाला असावा असे मला वाटते.कदाचित त्या धनाचे रक्षण करणारी देवता असावी व तिने हे सर्व केले असावे असे  एकदा वाटले .कारण त्याशिवाय एवढ्या स्फोटाने एवढा डोंगर कोसळणे शक्य नव्हते.

तेवढ्यात पुन्हा  निवडणुका आल्या. नवीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आले.त्यांना सर्व पटवून देऊन डोंगर सपाट करणे,गुहेतील धन शोधून काढणे , शक्य नव्हते .वर्तमानपत्रात विधानसभेत सर्वत्र त्याची चर्चा झाली असती .एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्चाला कुणीही  परवानगी दिली नसती.गुहा सापडली असती की नाही तेही सांगता येत नाही .त्या विशिष्ट डोंगरा ऐवजी जर चुकून दुसरा डोंगर खणला गेला असता तर अर्थातच गुहा सापडली नसती. त्यामुळे तो नाद आम्ही सोडून दिला.

वर्षातून एक दोनदा तिथे जाउन जेवढय़ा जमतील तेवढ्या मोहरा आपण आणल्या असत्या तर मालामाल झालो असतो असा विचार आमच्या मनात आला.सर्व धन मिळविण्याच्या प्रयत्नात ज्या काही थोड्याबहुत मोहरा हाती लागल्या असत्या त्याही गेल्या.  

त्या दिवशी मी गुहेमध्ये गेलो तेव्हा खिशात घालून आणलेल्या मूठभर मोहरांपैकी या चार मोहरा माझ्या जवळ शिल्लक राहिल्या.~एवढी हकिगत सांगून आजोबा बोलायचे थांबले .त्या मोहरा आजोबा व त्यांचे मित्र यांनी  आठवण म्हणून जवळ ठेवल्या होत्या.आजोबानी त्या मोहोरा वसंताला दाखविल्या होत्या.त्यातील एक मोहोर आठवण म्हणून आजोबांनी वसंताला दिली होती .आजोबांनी त्यावेळचे  गुहेतील व गुहेबाहेरील सर्व फोटो दाखविले. हे सर्व वसंताला त्या डोंगराकडे पाहात असताना आठवत होते .आजोबानी त्या गुहेच्या सर्व खाणा खुणा वसंताला सांगितल्या होत्या.पन्नास वर्षांत घाटातील रस्ता तिथे जाणाऱी पायवाट डोंगरांची रचना यामध्ये उलथापालथ होणे स्वाभाविक होते . आपण बरोबर त्याच जागी आलो आहोत याची वसंता सर्वत्र पाहून खात्री करून घेत होता .परंतु त्याची त्यालाच खात्री वाटत नव्हती. त्या गुहेचा कुठे मागमूसही दिसत नव्हता .डोंगरांमध्ये ती गुहा कुठे तरी पूर्णपणे लपली होती.

*शेवटी ती गुहा जेव्हा  ज्याला सापडणार असेल तेव्हाच त्याला सापडणार होती.*

*तूर्त ती अज्ञात होती .वसंता व त्याच्या मित्रांनी  आसपास हिंडून काही तपास लागतो का ते पाहिले परंतु कुठेही काहीही नामोनिशाण सापडले नाही.*

*सर्वजण गेले त्याच पायवाटेने परत घाटात आले.*

*आजोबांनी  आपल्याला एखादी कहाणी रचून तर सांगितली नाही ना असे वसंताला व त्याच्या मित्रांना  काही वेळा वाटते .*

*वसंताच तर आपली फिरकी घेत नाहीना असाही त्याच्या मित्रांना संशय आहे* 

*आजोबा अशी आपली चेष्टा करतील असे त्याला वाटत नाही *

*खरे काय ते आजोबांनाच माहिती.*

(समाप्त)

२८/७/२०१९@प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel