(एक काल्पनिक परंतु संभाव्य गोष्ट )

त्या घनदाट जंगलातून आम्ही चौघेही तीन दिवसानंतर बाहेर पडलो .पाच फेब्रुवारी दोन हजार सतराला आम्ही जंगलात शिरलो .सात फेब्रुवरी सतराला बाहेर आलो . दोन पूर्ण रात्री व तीन दिवस आम्ही जंगलात होतो .हा आमचा हिशोब झाला .आम्हा चौघांनाही आम्ही केवळ दोन रात्री जंगलात होतो असे वाटत होते .व आज सात फेब्रुवारी दोन हजार सतरा असला पाहिजे अशी आमची समजूत होती.आमच्या हातावरील घड्याळे तीच तारीख दाखवित होती .मोबाइलही तीच तारीख दाखवित होते .त्या गूढ जंगलाला चेक नाका होता. कोण कोणत्या तारखेला जंगलात जाण्यासाठी निघाले व  कोण कोणत्या तारखेला बाहेर आले याची नोंद ठेवली जात असे.आम्ही जंगलातून बाहेर पडलो तेव्हा चेक नाक्यावरील दिनदर्शिकेमध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार सतरा ही तारीख दाखविली जात होती .आमच्या हिशोबाने आम्ही केवळ दोन रात्री जंगलात होतो तर बाहेरील जगाच्या हिशोबात आम्ही पाच रात्री जंगलात होतो .आम्ही चेकनाक्यावरील कारकुनाकडे आमची बाहेर पडत असल्याची नोंद करताना तारखेविषयी चौकशी केली .त्याने आपले घड्याळ आम्हाला दाखविले . भिंतीवरील घडय़ाळ्याकडे बोट दाखविले .त्याने त्याच्या मोबाइलवरील तारीखही दाखविली .पुढे हसून तो म्हणाला हा केवळ तुमचाच अनुभव नाही तर जो जो या जंगलात जातो त्याला असाच अनुभव येतो .त्याच्या काही रात्री व काही दिवस हिशेबातून नाहीसे झालेले असतात.म्हणूनच या जंगलाला गूढ , भारित ,अजब ,जंगल असे म्हटले जाते.    

याचा दुसरा अर्थ म्हणजे आमच्या जवळील घड्याळ मोबाइल यांच्यामध्येही काळ तीन रात्री व चार दिवस अस्तित्वात नव्हता .ही एक आश्चर्यजनक गोष्ट होती .

याबद्दल आम्हाला अगोदरच माहिती होती .या गूढ अजब जंगलाबद्दल आम्ही वाचले व  ऐकले होते.आमच्या काही मित्रांनी तेथे जाऊन आल्यावर त्यांना आलेला अनुभवही सांगितला होता .आमचा त्यांच्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता .प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून आम्ही चौघे मित्र केवळ त्यासाठी मुद्दाम पुण्याहून आलो होतो .

या गूढ अजब जंगलाबद्दल आम्हाला पुढील प्रमाणे सांगण्यात आले होते .तशाच काही गोष्टी वाचनातही आल्या होत्या.

काही  जण म्हणत हे जंगल भुताटकीने भरलेले आहे.आम्हाला भुताचा कुठेही अनुभव आला नाही .

या जंगलांमध्ये आलेला मनुष्य जंगलात हरवतो .तो बाहेर पडू शकत नाही.बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो गोल गोल फिरत राहतो आणि शेवटी त्याचा येथेच मृत्यू होतो . ही केवळ अफवा आहे असे आमच्या पुढे लक्षात आले .काळ हरवतो परंतु मनुष्य हरवत नाही .

काही जणांचे असे मानणे होते की या जंगलात कोणतेही पशु पक्षी सरपटणारे प्राणी किंवा इतर कीटक  रहात नाहीत.आम्हाला कुठेही काहीही जिवंतपणाचे लक्षण दिसले नाही 

कोणतेही प्राणी नाहीत कारण त्यांना भुतांचे अस्तित्व जाणवते .अशी समजूत आहे .निदान आम्हाला तरी कुठे भुताचे अस्तित्व जाणवले नाही .

काही जण म्हणतात की या जंगलात तुमच्यावर अचानक हल्ला होतो.हल्ला झाल्याचे तुम्हाला कळत नाही .तुमच्या अंगावर वळ उठतात  जखमा होतात परंतु त्याच्या वेदना तुम्हाला जाणवत नाहीत.तुम्ही जंगलातून बाहेर पडलात की मात्र वेदना सुरू होतात.

काही जणांचे असे मानणे होते की या जंगलात शिरल्यावर तुम्ही संमोहित होता .त्यामुळे तुम्हाला काळाचे भान रहात नाही . तुम्हाला दोन तीन दिवस गेले असे वाटेल परंतु प्रत्यक्षात त्याहून जास्त दिवस गेलेले असतील .

तुम्ही संमोहित का होता? तुम्हाला काळाचे भान का रहात नाही? तुम्हाला झालेल्या जखमांची जाणीच का नसते?याबद्दल निरनिराळी कारणे दिली जात . 

भुतांच्या अस्तित्वामुळे असे होते असा एक सूर होता .

तर काही जणांना इथे मानवापेक्षा उच्च कोटीतील यक्ष इत्यादी लोक वस्ती करतात आणि त्यामुळे असा अनुभव येतो .असे वाटत होते .त्यांच्या प्रांतात तुम्ही आल्यामुळे ते तुम्हाला इजा करतात असे काही जणांचे म्हणणे होते.आम्हाला तरी कुणी इजा केली नाही, किंवा आम्ही परस्परांना इजा केली नाही, किंवा अन्य कारणाने आम्हाला इजा झाली नाही .

येथे गूढ वनस्पतींचे झाडांचे अस्तित्व आहे त्यामधून काही विशिष्ट प्रकारचे किरण व वायू उत्सर्जित होत असतात आणि त्यामुळे मानवांच्या मेंदूवर परिणाम होतो.त्याचे काळाचे भान काही वेळा हरवते.अशी काही जणांची समजूत आहे 

ही बातमी सर्वत्र पसरल्यावर निरनिराळया प्रसारमाध्यमांनी ती उचलून धरली.टीव्ही रेडिओ यावर बातम्या मुलाखती चर्चा सुरू झाल्या .नियतकालिकातून यावरती लेखही आले .त्यामध्ये विश्लेषण करणारे टीका करणारे समर्थन करणारे स्पष्टीकरण देणारे इथपासून हा सगळा मूर्खपणा आहे.जंगल टुरिझम वाढण्यासाठी ही एक आवई उठवली  आहे असेही म्हणणारे होते.

हा सर्व गदारोळ कानावर पडल्यावर आमचे कुतूहल जागृत झाले .आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो .प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आम्ही ठरविले .आम्ही चौघे मित्र निघालो होतो .गोव्यात जाणार्‍या  फोंडा घाटाच्या दक्षिणेला काही किलोमीटरवर एक जंगलाचा पट्टा आहे .सुमारे पाच बाय दहा किलोमीटरचा हा पट्टा आहे.ते जंगल भारित असल्यामुळे असे अनुभव येतात .

वन खात्याने या जंगलाच्या पट्ट्यावर दोन्ही बाजूला चेकपोस्ट बसविले आहेत .जंगलाला काटेरी कुंपण घातलेले आहे .कोणत्याही बाजूने आत जाणाऱ्या माणसांची पूर्ण नोंद ठेवली जाते .ते आत गेले केव्हा व बाहेर पडले केव्हा यांची नोंद असते.दोन्ही चेक पोस्टचे परस्परांशी माहितीचे संवहन होत असते .

वन खात्याने आत रस्ते खेळविले आहेत .चेकपोस्टवरून जाताना आपण किती दिवस आत राहणार आहोत याची नोंद करावी लागते .नोंद केल्याच्या तिप्पट दिवसाहून जास्त काळ झाल्यावर जो मनुष्य आला नाही त्याचा तपास वनखात्यामार्फत   केला जातो .तिप्पट दिवसाहून जास्त अशी अट ठेवण्याचे कारण की आत गेलेला मनुष्य दोन दिवस राहलो असे  समजत असतो परंतु प्रत्यक्षात तो दुप्पट किंवा तिप्पट काळ आत राहिलेला असतो.आत गेलेला मनुष्य काळाचे भान हरवतो .त्यांच्यासाठी काळ  हळू चालतो किंवा मध्येच केव्हातरी बंद पडलेला असतो.साधारणपणे जितके दिवस मनुष्य आत राहणार असतो त्याच्या तिपटीपेक्षा कमी वेळात तो बाहेर येतो . असा आजपर्यंतचा अनुभव आहे .त्याला मात्र आपण जितके दिवस आत राहणार अशी नोंद केली तितकेच दिवस राहलो असे प्रामाणिकपणे वाटत असते.आत जाताना प्रत्येकाने तो जितके दिवस राहणार असेल त्याच्या तिप्पट दिवस पुरेल इतका शिधा  घेतलेला आहे की नाही याची तपासणी केली जाते.आत गेलेल्याचे किती दिवस हरवतील किंवा किती दिवस हळू चालतील सांगता येणार नाही.त्या त्या व्यक्तीवर व इतर परिस्थितीवर ते अवलंबून असते .हल्ली प्रत्येक व्यक्तीला एक बटना सारखे यंत्र दिले जाते.त्या यंत्रामुळे चेकपोस्टवरील मनुष्याला आत गेलेला मनुष्य कुठे आहे ते सतत समजत राहते.  तो बाहेर न आल्यास तो असेल तिथे जाऊन त्याला घेऊन येता येते .

( क्रमशः)

१५/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel