थोड्याच वेळात ते अरण्याबाहेर आले. आता ते एका मोठ्या हमरस्त्यावर होते.हमरस्ता अनेक पदरी होता .पादचारी,घोडे, हत्ती, रथ, व अन्य अशा प्रत्येकासाठी येण्याला व जाण्याला वेगळे मार्ग होते.एवढा मोठा मार्ग पाहून चेतन चकित झाला . महामार्गावर बऱ्यापैकी रहदारी होती .रस्ते पक्के व गुळगुळीत होते .दोन मार्गांमध्ये फुलझाडे लावलेली  होती.महामार्गाच्या  मध्यभागी व दोन्ही बाजूना वृक्ष लावलेले होते .त्यामुळे सर्वत्र सावली  होती .फुलांचा सुगंध, वृक्षांच्या छाया, यामुळे एक निराळेच वातावरण  निर्माण झाले होते. रथ मार्गावर  एका रथात एक पिंजरा होता. 

हा पिंजरा कशासाठी आहे असा तो विचार करीत आहे तोच त्याला सैनिकांनी  घोडय़ावरून उतरले आणि खेचत त्या पिंजऱ्यांमध्ये ढकलले .पिंजऱ्याला बाहेरून कुलूप लावण्यात आले .आणि नंतर तो रथ राजमार्गावरून बहुधा  राजवाड्याकडे निघाला .सर्व लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.ते असे का पाहात आहेत ते त्याच्या लक्षात येत नव्हते .त्याच्या ते एकदम लक्षात आले.आत्तापर्यंत सैनिकांनी पकडल्यापासून विचित्र अरण्य , विचित्र वातावरण, अकस्मात कैद केले जाणे, यामुळे ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नव्हती.

हे सर्व लोक जरी पृथ्वीवरील माणसांप्रमाणे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये एक  फरक होता .या लोकांचे कान फार मोठे  तळहाताएवढे होते.आणि नाक पोपटासारखे लांब आणि त्याच्या चोचीसारखे टोकदार होते.चेतनचे आखुड नाक,लहान कान,आत्तापर्यंत न पाहिलेला विचित्र पोषाख ,जीन्स व जर्कीन यांमुळे ते सर्व चेतनकडे एखाद्या विचित्र प्राण्याकडे पाहावे तसे पाहात होते.पिंजर्‍याला बारीक जाळी लावलेली होती . बहुधा लोकांनी दगड मारले तर ते लागू नयेत असा हेतू असावा.शिवाय त्याच्या रक्षणासाठी चार सैनिकही त्या रथामध्ये होते .

तासाभरात ते सर्व एका मोठ्या भुईकोट किल्ल्याजवळ आले .दिवस असल्यामुळे किल्ल्याचा दरवाजा उघडा होता .किल्ल्याच्या बाहेर व आत नागरी वस्ती होती .भुईकोट किल्ल्याच्या मध्यभागी राजवाडा होता .काही चौरस किलोमीटर परिसरात राजवाडा व राजवंशातील लोकांचे वाडे होते.त्यांचे न्यायमंडळ , दरबार भरण्याची जागा ,हे सर्व  राजवाड्याच्या परिसरामध्ये होते. त्याच्या बाहेर पुन्हा एक तटबंदी होती .सर्वात बाहेरील तटबंदी धरून एकूण तीन तटबंद्या होत्या .

ज्या अर्थी एवढा बंदोबस्त होता त्याअर्थी हे लोकही आपल्यासारखेच भांडत मारामाऱ्या करीत युद्ध करीत असावेत हे त्याच्या लक्षात आले.त्यांची भाषा चेतनला कळत नव्हती.त्यांच्याशी तो फक्त खुणेने बोलू शकत होता .शेवटी त्याला सर्वात आतील कोटामध्ये नेण्यात आले.एका कोठडीमध्ये बंदिस्त करण्यात आले .तो बहुधा जुना तुरुंग असावा .आता तिथे एकही कैदी नव्हता .सर्व तुरुंग ओस पडला होता .

दुसऱ्या  दिवशी त्याला राजापुढे उभे करण्यात आले. त्यांच्या भाषेत कोण काय बोलत होते ते त्याला कळत नव्हते.त्याला पकडणारा गटप्रमुख काहीतरी तावातावाने सांगत होता .राजा ते शांतपणे ऐकत होता.आपण गुहेतून बाहेर आल्याबरोबर लगेच हे तिथे कसे आले हे चेतनला कळत नव्हते. राज्यात सर्वत्र लक्ष ठेवण्याची काहीतरी व्यवस्था असावी असे त्याच्या लक्षात आले .परंतु ती व्यवस्था काय असावी ते त्याला कळत नव्हते .आकाशात कुठे ड्रोन फिरताना दिसत नव्हते .उपग्रहामार्फत ते लक्ष ठेवीत असावेल असा अंदाज त्याने केला .राजाराणीबरोबर राजकन्याहि उच्चासनावर  बसलेली होती .तिचे कान व तिचे नाक  पृथ्वीवरील हल्लींच्या लोकांप्रमाणे लहान होते .

राज्यकन्या दिसायला आपल्या मापकाप्रमाणे  चांगली होती.त्या लोकांच्या विचाराप्रमाणे ती कुरूप होती .त्याच्यावरील आरोपांचा व फिर्यादीचा काय निर्णय झाला ते त्याला कळले नाही .परंतु त्याला मोकळे सोडण्यात आले .त्याला खायला प्यायला व्यवस्थित देत होते.त्याला कुठेही फिरण्याची मुभा होती .त्याच्यावर लक्ष ठेवले जात असावे .ते कसे ते त्याला कळत नव्हते.

असेच काही दिवस गेले .त्याला हळूहळू त्या लोकांची भाषा कळू लागली होती .पूर्वी चोर्‍या दरोडे खून मारामाऱ्या युध्दे वगेरे होत असत .गेली दोन पिढ्या म्हणजे सुमारे वीस वर्षे हे सर्व प्रकार थांबले होते .कुणीही कुणाच्याही वस्तूला हात लावीत नसे .लोक बिनधास्त दरवाजे उघडे टाकून कुठेही जात असत .ज्याला आपण रामराज्य असे म्हणतो ते खऱ्या अर्थाने अवतीर्ण झाले होते.लोकांमध्ये असा बदल कसा झाला ते त्याला कळले नाही.बदलामागील प्रेरणा त्याला कळली नाही . 

एक दिवस तो असाच फिरत असताना त्याला बागेत राजकन्या भेटली .राजकन्या  त्याला भेटण्यासाठी मुद्दाम बागेत आली होती .आपल्या सारखाच लहान कानांचा आखूड नाकाचा हा तरुण तिला आवडला होता .तिच्याशी गप्पा मारता मारता त्याला त्यांच्या राज्याबद्दल बरीच माहिती कळली.त्यांना अंतर्ज्ञानाने बऱ्याच गोष्टी कळत असत .चेतन त्या अरण्यात अकस्मात आल्याची माहितीही त्यांना अशीच अंतर्ज्ञानाने कळली होती .त्याचा ठावठिकाणा  त्यांना लगेच कळला होता .त्याच्यापासून त्यांना धोका वाटला होता. त्यामुळेच ते सैनिक  त्याला पकडण्यासाठी आले होते. हा कुणीतरी धोकादायक प्राणी असावा असे त्यांना वाटले होते .चेतन कुणालाही धोकादायक नाही हे त्यांच्या आता लक्षात आले होते.त्यामुळे त्यांनी त्याला कुठेही जाण्याची परवानगी दिली होती .त्याला बंदिस्त ठेवला नव्हता .

तो व राजकन्या यांची रोजच भेट होत होती.हळूहळू दोघे एकमेकाना आवडू लागले होते.तिच्याशी विवाह करावा असेही त्याला वाटू लागले होते. परंतु इथे राहणे त्याला रुचत नव्हते .आपल्या जगात जाण्यासाठी त्याचे मन तडफडत होते .या लोकांत राहण्याला तो थोड्याच दिवसात कंटाळला होता.येथून पळून कसे जाता येईल याचा तो विचार करीत होता.जर आपण त्या अरण्यात गेलो व गुहेच्या ज्या दरवाजातून बाहेर पडलो,त्याच दरवाजातून जर आत शिरलो आणि दुसरीकडून बाहेर आलो तर आपण आपल्या जगात येऊ असे त्याला वाटत होते .

ती गुहा दोन काळांना किंवा दोन जगांना सांधणारा एक दुवा असावी.त्या गुहेच्या मार्फत तो एका जगातून दुसऱ्या जगात आला होता .जर तो उलट परत गेला असता तर आपल्या  पूर्वीच्या जगात तो आला असता.अशी त्याची कल्पना होती .तो जर त्या गुहेतून उलटा परत गेला असता तर त्याची कल्पना बरोबर आहे  की नाही ते कळले असते .शक्यता होती की तो वनवे ट्रॅफिक असेल .आणि चेतन या दुसऱ्या जगात कायमचा अडकून पडेल .

खरे काय ते प्रत्यक्ष गुहेतून गेल्यानंतरच कळले असते .शक्यता आहे कि गुहा हा एक ट्रॅप होता .असे उलट सुलट विचार त्यांच्या मनात सतत येत असत .प्रत्यक्ष गेल्याशिवाय काहीच कळले नसते .

तो एकटा ते अरण्य शोधून काढू शकत नव्हता.जरी अरण्य शोधून काढले तरी त्या विस्तीर्ण अरण्यातील गुहा शोधून काढणे आणखी कठीण काम होते.मुळात या अंतर्ज्ञानी लोकांमध्ये कुणालाही न कळता तेथपर्यंत  जाणे अशक्य होते .

त्याने राजकन्या रुचीराची  त्यासाठी मदत घेण्याचे ठरविले .त्याने त्याचा जीव इथे कसा तडफडत आहे ते तिला समजून सांगितले .तो परत जाऊ इच्छितो असेही सांगितले .तिने त्याला मदत करावी अशी इच्छा प्रगट केली .तू मदत करशील का? म्हणून विचारले.

त्याच्यावरील प्रेमामुळे तिने त्याला मदत करण्याचे ठरविले .तो तिच्या जगात तिच्याशी विवाह करून राहू इच्छित नाही हे ऐकून तिला दुःख झाले.त्याने आपल्याला तू माझ्याबरोबर तिकडे येशील का ?असे विचारावे असे तिला उत्कटतेने वाटत होते .

तिने पळून जाण्यासाठी जे काही आवश्यक होते त्या गोष्टी केल्या .एक खास रथ नदीकिनारी फिरायला जाण्यासाठी तयार करण्यास सांगितला .त्या रथामध्ये दोघेही बसून फिरायला निघाले .राजघराण्यातील कुणाचीही त्या गोष्टीला आडकाठी नव्हती .रथ त्या अरण्यात आल्याबरोबर तिने  रथ थांबविला .त्याला उडी मारण्यास सांगितले.तीही रथातून  उतरली .त्याचा हात पकडून तिने त्या गुहेकडे धाव ठोकली . तिला अंतर्ज्ञानाने ती गुहा कुठे आहे ते बरोबर माहित होते. ती रथातून उतरल्याचे व त्याच्यासोबत गुहेकडे धावत असल्याचे राजाला अंतर्ज्ञानाने कळले.त्याने लगेच त्या ठिकाणाच्या आसपास असलेल्या शिपायांना त्या दोघांना पकडण्याची आज्ञा केली. तर दुसऱ्या गटाला गुहेच्या तोंडावर उभे राहून त्यांना आत जाण्यास प्रतिबंध करण्याची आज्ञा केली.

राजाने दिलेली आज्ञा तिला लगेच समजली.तिने चेतनला जीव खाऊन पळण्यास  सांगितले . धावता धावता राजाच्या आज्ञा तिने सांगितल्या .आपण आता पकडले जाणार आपल्याला आतापर्यंत जे स्वातंत्र्य मिळाले ते यापुढे पकडले गेल्यास मिळणार नाही .याची त्याला कल्पना आली .जीव तोडून तो पळू लागला .त्याला दुखापत होता कामा नये असे राजाने निक्षून सांगितले होते.आपली मुलगी त्याच्यावर प्रेम करते हे राजाच्या लक्षात आले होते.राजाचा विचार आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून द्यावे असे होते . तो आपल्या मुलीसह इथेच राहावा असे त्याला वाटत होते.

काही शिपाई पाठीमागून धावत येत आहेत .गुहेच्या तोंडावर काही शिपाई आहेत .अशा कात्रीत ती दोघे सापडली .रुचिराने त्याचा हात घट्ट धरून  जोरात दोन शिपायांच्या मधून मुसंडी मारली .राजकन्येला अडविण्याचे धाडस त्या शिपायांना झाले नाही .किंवा प्रतिक्षित क्रियेने त्यांनी तिला वाट करून दिली .ती दोघे त्या अजब गुहेत  शिरली.

रुचिरा आपला हात सोडून देईल व परत फिरेल असे त्याला वाटत होते.परंतु रुचिराने तसे केले नाही.तिने त्याला मी तुझी साथ सोडू शकत नाही असे सांगितले .ते ऐकून त्याला अतिशय आनंद झाला .गुहेत सैनिक शिरू शकत नव्हते.

*त्या दोघांनी त्या अजब गुहेत विश्रांती घेतली .*

*नंतर आरामात चालत दुसऱ्या बाजूने ती दोघे चेतनच्या जगात आली .*

*आपले  पूर्वीचे ओळखीचे अरण्य पाहून त्याला आपण आपल्याच जगात आल्याची खात्री पटली.*

*रुचिराबरोबर आनंदातिशयाने तो तेथील एका खडकावर बसला.*

१८/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel