चेतनला ट्रेकिंगचा शौक होता.त्याच प्रमाणे उगीचच्या उगीच केवळ करमणूक, आनंद, म्हणून भटकण्याचे वेड होते.सदावर्ते या ऐवजी भटकळ हे आडनाव त्याला शोभून दिसले असते .कुठेही ट्रेकिंग योग्य शिखर डोंगर दिसला की तो त्यावर चढाई करीत असे.पाठीवर आवश्यक सामानाची सॅक अडकवून तो दर्‍याखोर्‍यातून सृष्टी सौंदर्य पाहात हिंडत असे .हिमालयातील दऱ्याखोऱ्यातही हिंडण्याचा त्याला असाच शौक होता.घरचा संपन्न होता .पैसे मिळविण्यासाठी त्याला कष्ट करावे लागत नव्हते.त्यांचा भरभराटीला आलेला व्यवसाय वडील व त्याचा थोरला भाऊ सांभाळीत होते .कामाची जबाबदारी अंगावर पडेपर्यंत तो आपली फिरण्याची हौस भागवून घेत होता .सृष्टीसौंदर्य बघत फिरण्याची त्याला खूप आवड होती .हिमालयात हिंडताना तो दर्‍याखोर्‍यातील एखाद्या जवळच्या शहरात,एखाद्या हॉटेलात,आपला बाडबिस्तारा टाकीत असे.तेथील एखाद्या हॉटेलात उतरून तो नंतर जवळचा प्रदेश फिरत असे.

असाच एकदा तो नेपाळमध्ये गेला होता .पोखरा जवळच्या डोंगररांगांमध्ये तो फिरत होता.पोखराच्या एका हॉटेलमध्ये त्याने काही दिवसांसाठी रूम बुक केली होती .अर्ध बर्फाछादित डोंगरात हिंडता हिंडता पाऊस सुरू झाल्यामुळे तो आश्रय शोधत होता .त्याला जवळच एक गुहा दिसली .गुहेमध्ये आश्रय घेण्यासाठी तो शिरला .ती गुहा लांबलचक होती .तिला दोन ठिकाणी दारे होती .एका दारातून आत शिरून दुसऱ्या दारातून किंवा शिरलो त्याच दारातून बाहेर पडता येत असे.ही गुहा काही अजब स्वरूपाची होती.आत काळोख नव्हता. सर्वत्र मंद प्रकाश पसरलेला होता.हा प्रकाश अद्भुत तेजस्वी अवर्णनीय स्वर्गीय वाटत होता.चेतनने या प्रकाशाचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला .परंतु त्याला हा प्रकाश उठून येतो ते कळले नाही .गुहेत ठिकठिकाणी बसण्यासाठी चौकोनी दगडी आसने  होती.झोपायचे झाल्यास सहा फूट लांबीच्या दगडी शय्याही होत्या.गुहेमध्ये थंडी अजिबात लागत नव्हती.कुठेही काहीहि न पेटविता समाधानकारक गरम हवा होती.जशी काही गुहा वातानुकुलीत केलेली होती .

त्यातील एका दगडी शय्येवर तो बसला .शय्या जरी दगडी वाटत असली तरी ती गादीसारखी, स्पंजासारखी, नरम होती .पाठीवरील सॅक त्याने बाजूला ठेवली.थोडा वेळ तो विश्रांती घ्यावी म्हणून आडवा झाला.अंगावर पांघरूण घ्यावे म्हणून शाल काढण्यासाठी त्याने पिशवीकडे हात नेला तोच त्याच्या अंगावर एक पश्मीना शाल आली.  अत्यंत दमलेला असल्यामुळे ही शाल कुठून आली याचा विचार न करता ती शाल उघडून तो केव्हा झोपला ,  त्याला केव्हा गाढ झोप लागली ते त्याला कळले नाही .

तो जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला क्षणभर आपण कुठे आहोत ते कळेना .एकदा त्याला आपण हॉटेलमधील खोलीत आहोत की काय असा संदेह निर्माण झाला .थोड्या वेळात त्याला आपली भटकंती,पाऊस, आश्रय शोधण्यासाठी धावपळ,गुहा ,त्यात घेतलेला आश्रय इत्यादी गोष्टींची आठवण झाली .त्या गुहेत सर्वच गोष्टी अजब होत्या .कुठून येत आहे ते न कळणारा दैवी मंद प्रकाश,दगडा सारखी दिसणारी परंतु  मऊ आसने, वातानुकूलित वातावरण, सर्वच काही आश्चर्यजनक होते .खरे आश्चर्य तर पुढेच होते.

उठल्यावर त्याला भूक लागली असे वाटले .पिशवी उघडून त्यातून बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ काढावेत असे त्याला वाटले .असा विचार त्याच्या मनात येतो न येतो तोच त्याच्या पुढ्यात फराळाचे ताट दिसू लागले .त्यात त्याला आवडणारे सर्व पदार्थ होते.ज्याने ताट पाठविले तो जसा काही मनकवडा होता.दाक्षिणात्य पदार्थ  मेदूवडा  इडली असे पदार्थ त्याला आवडत असत .

तर गोडामध्ये बंगाली मिठाई व श्रीखंड आवडे.त्या ताटामध्ये मेदूवडे इडल्या  चटणी श्रीखंड आणि रसगुल्ले होते .सोबत एक डिश होती .त्याने त्यातील हवे तेवढे पदार्थ डिशमध्ये घेऊन तृप्त होईपर्यंत खाल्ले .गुहेतील प्रकाश जसा दैवी वाटत होता त्याप्रमाणेच या पदार्थांची चवही खास होती.खाणे होताच त्याला तहानेची जाणीव झाली.पाण्याची बाटली काढण्यासाठी तो पिशवीकडे हात नेणार एवढ्यात पाण्याने भरलेला ग्लास त्याच्या पुढ्यात आला .त्या पाण्याला वाळ्याचा सुगंध येत होता .पाणी पिऊन फराळ करून तो ताजातवाना झाला .पाणी पिऊन ग्लास खाली ठेवल्याबरोबर ग्लास अदृश्य झाला .तो फराळाच्या  ताटाकडे पाहातो तो तेही अदृश्य झालेले होते.

काय चालले आहे तेच त्याला कळेना .अापण पोखराच्या हॉटेलमधील रुममध्ये आहोत आणि आपल्याला स्वप्न पडत आहे  असे त्याला वाटू लागले .म्हणून त्याने स्वतःलाच एक जोरदार चिमटा काढला . त्याची कळ मस्तकात गेल्यावर त्याला आपण स्वप्नात नाही याची खात्री झाली. 

विश्रांती पुरे झाली. ही गुहा कशी आहे ते तरी पाहू या म्हणून तो  गुहेत हिंडू लागला .प्रकाश कुठून येतो ते त्याला कळत नव्हते.गुहा वातानुकूलित कशी ते लक्षात येत नव्हते . अन्नपदार्थ पाणी कुठून आले तेही त्याला कळत नव्हते.तो जसा काही कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला होता .एखादी गोष्ट मनात येण्याचा अवकाश की त्याला ती लगेच मिळत होती .खरेच मनात आलेली गोष्ट, मिळते का ?मनात आलेली इच्छा पूर्ण होते का ?ते पाहण्यासाठी त्याने आत्ता इथे एखादी मैत्रीण आपल्याबरोबर असती तर किती मजा आली असती अशी इच्छा केली.त्याबरोबर एक युवती त्याच्या पुढ्यात हवेतून निर्माण झाली .तिला अकस्मात अवतीर्ण झालेली पाहून तो एकदम दचकला.थोडावेळ त्याने तिच्याशी मराठी व इंग्लिश मिश्र भाषेमध्ये गप्पा मारल्या.तिला मराठी इंग्लिश व हिंदी उत्तम येत होते .हा खेळ पुरे झाला असे त्याच्या मनात आले. त्याबरोबर ती युवती अदृश्य झाली .गुहा चिंचोळी नसून तिला बऱ्यापैकी रुंदी होती.नैसर्गिक विधी उरकण्यासाठी गुहेतच व्यवस्था होती .जसा काही तो सर्वार्थाने स्वयंपूर्ण ब्लॉक होता .गंमत म्हणून त्याने मद्य  पिण्याची इच्छा केली .लगेच उत्कृष्ट रुचीचे मद्य एका पेल्यामध्ये त्याच्या पुढ्यात ट्रेमधून आले. ते मद्यही त्याचे आवडते होते.  गुहा पाहात पाहात हिंडत असताना तो गुहेच्या दुसर्‍या  टोकाजवळ आला .त्याचा पाय गुहेतून बाहेर निघत नव्हता .या स्वर्गात ,या कल्पवृक्षाखाली,कायम राहावे असे त्याला वाटत होते .

मनाचा निग्रह करून तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडला .बाहेर पडल्यावर त्याला आपण कुठे आहोत ते लक्षात येत नव्हते .सर्वत्र अत्यंत  गर्द झाडी होती .तो गुहेत शिरताना ज्या अरण्यामधून आला होता ते हे अरण्य नव्हते.त्या अरण्यात नदी निर्झर नव्हते .आंब्याची गर्द झाडी नव्हती.तिथे हिमालयात आढळणारे वृक्ष होते. बर्फ होता.थंडी होती.मेघ नव्हते. इथे गुहेतून बाहेर आल्यावर त्याला सर्वत्र कितीतरी निर्झर वाहताना दिसत होते. एक नदी  होती . बाहेर स्वच्छ ऊन पडले होते.नदी दुथडी भरून वाहत होती .थंडीचा कुठेही मागमूस नव्हता .हवा उबदार होती .त्याला आतून जाणवत होते की हे जग त्या जगाहून निराळे आहे.हा काळ त्या काळाहून  निराळा आहे .तो आता पोखराला कसा परत जाणार होता ?पोखरा जाग्यावर शिल्लक नसले तर ?हे जग तेच परंतु  काळ वेगळा असला तर ?आता तो आपल्या पूर्वीच्या जगात,पूर्वीच्या काळात' कसा केव्हा जाणार होता ?तो आता विश्वाच्या कुठच्या भागात होता ?ती गुहा म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळात जायचा रस्ता तर नव्हता ?का एका जगातून दुसऱ्या जगात जाण्याचा रस्ता होता ?का एका मितीमधून दुसऱ्या मितीमध्ये जाण्याचा रस्ता होता ?का आपल्या जगाला समांतर असलेल्या दुसऱ्या जगात तो आला होता ?

कुठे जावे? काय करावे? या विचारात तो होता. निदान या अरण्यातून बाहेर तर पडू या मग काय होईल ते होईल .अशा विचाराने पाठीवरील पिशवी सावरीत  तो चालू लागला .एवढ्यात त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला .घोड्यावरून काही सैनिक त्याच्या दिशेने दौडत आले. त्यांचा पोशाख त्याला माहित असलेल्या सैनिकांच्या पोषाखाहून सर्वस्वी निराळा होता .त्यांच्यामध्ये एक प्रमुख वाटत होता .तो कॅप्टन दर्जाचा असावा .त्यांची भाषाही अगम्य होती .चेतन हिंदुस्थानात जवळजवळ सर्वत्र फिरलेला असल्यामुळे त्याला अनेक भाषा माहित होत्या .त्यातील काही भाषा तो बोलूही शकत होता .काही त्याला कळत होत्या .काही अगम्य होत्या .ही भाषा त्याला माहीत असलेल्या कुठल्याही भाषांपैकी नव्हती .

ते सर्व चेतनकडे दुसऱ्या  जगातून आलेल्या माणसाकडे जसे पाहावे तसे पाहात होते.जीनची पँट जर्कीन या पोशाखाकडे ते आत्तापर्यंत कधीच न पाहिलेल्या वस्तूकडे बघावे तसे पाहात होते . तर चेतन त्यांच्याकडे तसाच ते दुसऱ्या जगातील आहेत अशा   दृष्टीने पाहात होता .त्यांचा प्रमुख असलेल्या सैनिकाने त्यांच्या हाताखालील सैनिकांना काही आज्ञा केली.तो काय बोलला हे जरी कळले नाही तरी त्याने काहीतरी हुकूम सोडला एवढे चेतनला कळले.सैनिक  घोड्यावरून खाडकन् उतरले व धावत चेतनकडे आले.त्यांनी त्याला काढण्या लावल्या व कैद केले .नंतर त्याला घोड्यावर बसवून ते त्यांच्या(बहुधा ) राजाकडे राजधानीकडे निघाले.

आता हे आपल्याला कुठे नेणार ?आपले काय करणार ?आपल्याला ठार तर मारणार नाही ना ?जगलो तरी या जगात यांच्यातच आपल्याला राहावे लागणार का ?कधीतरी आपण आपल्या जगात आपल्या घरी जाऊ का ?

असे असंख्य प्रश्न चेतनच्या मनात गर्दी करीत होते .सर्व सैनिक त्याच्यासह एका निश्चित ठिकाणाकडे जात होते .त्याला मात्र ते सैनिक कुठे नेत आहेत ते ठिकाणी अज्ञात होते .

(क्रमशः)

१७/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel