सुधाने मधुकरला उठविले. मधुकरने अॅम्ब्युलन्स मागविली.चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहून सुधा घरी परत आली .मधुकरने डॉक्टरांशी चर्चा केली .डॉक्टरांनी विशेष काळजी करू नका म्हणून नेहमीप्रमाणे सांगितले .एखदे वेळ असे होते.ती प्रवृत्ती आहे असे नाही. असे त्यांच्या बोलण्यात आले.त्यांनी काही औषधे लिहून दिली .पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले .दोन महिने संबंध येऊ देऊ नका म्हणून सांगितले .तिला गाढ झोप लागावी स्वप्ने पडू नयेत म्हणून काही गोळ्या दिल्या .संध्याकाळी ग्राऊंडवर तीन चार किलोमीटर तरी चाल झाली पाहिजे असेही सांगितले .श्रम झाल्यानंतर दमल्यामुळे व औषधामुळे झोप जास्त व्यवस्थित व गाढ लागेल असा डॉक्टरांचा  विश्वास होता .काही दिवस तिला विश्रांतीसाठी औरंगाबादला पाठवा असेही सांगितले .तिची भयानक स्वप्ने कमी झाली.एकूणच स्वप्ने कमी झाली .वत्सला स्वप्नात येणे दचकून उठणे हे थांबल्यासारखे वाटले .असेच सहा महिने गेले .

सुधाला पुन्हा दिवस गेले .डॉक्टरनी फार काळजी घ्यायला सांगितली .वत्सला पुन्हा स्वप्नात येऊ लागली .एकदा तर ती वत्सला सारखेच वागू लागली .वत्सलेची बोलण्याची पद्धत वेगळी होती. त्यामध्ये ग्रामीण व कोकणी स्पर्श होता .तर सुधाचे बोलणे मराठवाडी धाटणीचे असे.तिचे असे बोलणे ऐकून तू अशी कशी बोलते असेही मधुकर म्हणाला.त्यावर कुठे काय मी तर नेहमी अशीच बोलते असे सुधा त्यावर म्हणाली. सर्व हकिगत मधुकरला माहिती असल्यामुळे वत्सला हिच्या अंगात आली की काय असाही संशय मधुकरला आला .तुला मी लहानपणापासून पाहतेय .तू मला तेव्हांपासून आवडत असस.तुझी जात वेगळी आणि माझी जात वेगळी म्हणून मी स्वतःला आवरले होते .आता मी मुक्त आहे .मी तुझ्याबरोबर संसार करणार .असे काहीबाही विचित्र सुधा बोलू लागली होती .मधुकर घाबरून गेला .सुधाचे लक्षण काही ठीक दिसत नव्हते.  केव्हा ती नॉर्मल असे. नेहमीसारखे तिचे बोलणे वागणे चालणे वगैरे असे .तर केव्हा ती वत्सला अंगात आल्यासारखी बोलू लागे.आणि एक दिवस रात्री तिला पुन्हा भयानक स्वप्न पडले .वत्सला स्वप्नात आली होती .तुला मुलांचे सुख लागू देणार नाही असे ती बडबडत होती .सुधा भयानक घाबरली .तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला .ती किंचाळतच जागी झाली .तिची साडी लाल झाली होती .तिचा पुन्हा गर्भपात झाला होता .

सर्व काही ठीक असताना एकाएकी असे झाल्यामुळे डॉक्टरही संभ्रमात पडले होते .त्यांना ही केस पूर्णपणे सायकिक स्वरूपाची वाटत होती .त्यांनी मधुकरला एका प्रख्यात मानसरोगतज्ञाकडे जाण्यास सांगितले .त्यांच्याकडे गेल्यावर त्यानी वत्सला कोकण सुधा मधुकर त्यांचे परस्परांशी असलेले नाते याबद्दल सर्व शांतपणे मधुकरकडून ऐकून घेतले. अनेक प्रश्न विचारून सर्व गोष्टी नीट माहिती करून घेतल्या .

त्यानंतर सुधाला पाच ते दहा सिटिंग्ज द्यावी लागतील .प्रत्येक वेळी सुमारे अर्धातास तिच्याजवळ बोलावे लागेल .कदाचित संमोहननिद्रेचाही वापर करावा लागेल .तिच्या अंतर्मनात खोलवर भुते व त्याबद्दलची भीती बसलेली आहे.त्याचप्रमाणे वत्सलेचा मृत्यू, वत्सलेशी असलेली जवळीक,तिने दिलेली भुतांची सविस्तर माहिती, यामुळे तिला वत्सला आपल्या अंगात येते असा पक्का ग्रह झालेला आहे .हे सर्व तिच्या अंतर्मनातून काढून टाकावे लागेल वगैरे वगैरे  बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या .त्यावेळी तुम्हीही तिथे असता कामा नये .मी पेशंट सिस्टर असतील असेही सांगितले .यासाठी सुधाचे मन तयार करावे लागेल .तिने पूर्ण सहकार्य केले पाहिजे .पेशंटच्या  सहकार्याशिवाय अशा प्रकारची ट्रीटमेंट फलदायी ठरत नाही .तेव्हा तुम्ही तिच्याशी सविस्तर बोला त्याप्रमाणेच मीही सविस्तर बोलतो वगैरे अनेक गोष्टी डॉक्टरनी मधुकरला सांगितल्या .मधुकरने सुधाच्या आईला काही दिवस बोलावून घेतले .डॉक्टर बरोबरच्या दहा सिटिंग्सनंतर सुधा नॉर्मल झाल्यासारखी वाटू लागली .तिच्या बोलण्यात वत्सला येईनाशी झाली .तिची स्वप्नेही पूर्णपणे थांबली .मध्यंतरीच्या काळात तिची प्रकृती खूपच खालावली होती .तिची प्रकृतीही सुधारली .सर्व काही पूर्वीसारखे वाटू लागले .

आपण अमेरिकेला कामासाठी गेलो त्यावेळी सुधाला कोकणात कुठून ठेवली असा जो पश्चाताप त्याला होत होता तोही आता मागे पडला .तिची आई औरंगाबादला परत गेली .दोघांचा संसार सुरळीत चालू झाला .मधल्या काही काळातील काळ्याकुट्ट अध्यायावर पांघरूण पडले होते  .असेच काही महिने गेले .सुधाला पुन्हा दिवस गेले .पुन्हा स्वप्न मालिकेला सुरुवात झाली .दोघांनाही काय करावे ते कळेना.आणि एक दिवस म्हणजे रात्री स्वप्न पडून किंचाळत सुधा जागी झाली .तिला स्वप्नात आपल्या पोटावर  बसून वत्सला बुक्के मारत आहे  असे स्वप्न पडले होते .आणि पुन्हा मागच्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली .आपण असे काय पाप केले आहे म्हणून असे दैव आपल्या वाटेला आले ते दोघांना कळेना .

पुन: डॉक्टर पुन: सायकॅट्रिक पुन्हा सिटिंग्स पुन्हा तेच चक्र सुरू झाले .यावेळी डॉक्टरनी थोडी वेगळी ट्रिटमेंट दिली होती.ओषधातही बदल केला होता .ट्रिटमेंट पूर्ण झाल्यावर हवापालट करण्यास सांगितले .दोघेही काही दिवस उटकमंडला जाऊन परत आली .आल्यावर ते डॉक्टरना भेटण्यासाठी गेले होते.त्यावेळी डॉक्टरने त्यांना आणखी एक नवीन उपाय सुचविला .सांगलीला कुणी एक महंत राहतात .त्यांना भेटून सर्व हकिगत सांगावी .ते दत्त उपासक आहेत .ते यावर काही जालीम उपाय करतील .अशा प्रकारच्या केसेसमध्ये त्यांच्या उपायांनी बर्‍याच  जणांना बरे वाटले आहे असेही त्यांनी सांगितले .त्यांच्या बोलण्यातून त्या महंतांबद्दल खूपच आदर डोकावत होता.तिथे तुम्हाला निश्चित बरे वाटेल असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता .हाही त्यांच्या ट्रीटमेंटचा भाग होता की काय कोण जाणे .

असा प्रसंग ज्यांच्यावर येतो त्यांचा विश्वास नसला तरीही ते संत महंत साधू भगत इत्यादी उपाय करू लागतात .मनुष्य दीनवाणा झालेला असतो .कशानेही उजाडूदे परंतु एकदाचे उजाडूदे असे त्याला वाटत असते.शेवटी त्यांनी त्या महंतांकडे जाण्याचे निश्चित केले .

त्या बाबांकडे गेल्यावर तेथील एकूण वातावरण पाहून दोघेही भारावले .दत्त मंदिर, दोन्ही बाजूला ओवऱ्या, त्यांमध्ये राहणारा भक्तगण, शेजारी असलेली धर्मशाळा,त्यात असलेली राहण्याची व्यवस्था, नुसत्या दर्शनासाठी किंवा मधुकरप्रमाणेच काही कामासाठी आलेली कुटुंबे,सकाळ संध्याकाळ होणारी आरती,धूप ऊद याचा दरवळणारा  सुवास ,सभोवती असलेली दाट झाडी ,सर्व वातावरण भारल्यासारखे वाटत होते .बाबांचे प्रवचन, त्यांचा आश्वस्त चेहरा ,त्यांचे हळू आवाजातील बोलणे, शांत चेहरा, या सर्वामुळे आपल्याला निश्चित बरे वाटणारच, अशा प्रकारचा एक भाव खात्री प्रत्येक येणाऱ्याला वाटत असे .त्याचाच एक फार चांगला मानसिक परिणाम होत असे.हीही एक प्रकारची मनोवैज्ञानिक उपाययोजना होती .

प्रथम त्यांना इथे येण्याची भीती वाटत होती .रोग्याला बांधून ठेवतात. त्याला फटके मारतात. असे अनेक रोगी तिथे आलेले असतात.अंगात आलेले अनेक प्रकारचे अंगविक्षेप करीत असतात .रोग्याला खाण्यापिण्या शिवाय काही दिवस ठेवतात .रोग्यानी मारलेल्या किंचाळ्यानी एकूण वातावरण गूढ व भीतीदायक असते . असे बरेच काही त्या दोघांनी काही जणांच्या तोंडून ऐकलेले होते .त्यामुळे ते दोघे इथे जेव्हा आले तेव्हा घाबरत होते .थोडेसे दहशतीखाली होते.इथे त्यातील काहीच आढळून आले नाही .सर्व काही शांत शांत मंगल व स्फूर्तीदायक होते .त्याचाच  दोघांवरही फार चांगला परिणाम झाला .तेथील वातावरणामुळे आपण बरे झालो बरे होणारच असा एक विश्वास निर्माण झाला .या वातावरणाचा फार खोलवर मनोवैज्ञानिक परिणाम त्यांच्यावर झाला .

तिथे एक आठवडा राहिल्यावर दोघांनाही शांत शांत वाटू लागले.आपण सर्व समस्या मुक्त झालो आहोत अशी त्यांना आतून खात्री वाटू लागली . सुधा संपूर्णपणे स्वप्न मुक्त झाली होती .बाबांनी सर्व हकीगत शांतपणे ऐकून घेतली .त्यांनी बाळ तुला निश्चित बरे वाटेल .तू मुळीच काळजी करू नको तुमचा संसार हरा भरा होईल असा आशीर्वाद दिला.मंत्रवून एक गंडा तावीज तिच्या गळ्यात बांधला .त्याचप्रमाणे एक काळा दोरा तिच्या दंडामध्येहि बांधला.

पंधरा दिवसांनी बाबांनी त्यांना परत जाण्याची परवानगी दिली .निघताना तू सर्व चिंतामुक्त झाली आहेस असा सुधाला आशीर्वाद दिला .तिला रोज जपण्यासाठी काही मंत्रही दिला .दोघेही आनंदाने मुंबईला परत आली .

त्यानंतर सुधाला केव्हाही पूर्वीची अक्राळ विक्राळ स्वप्ने पडली नाहीत .वत्सला एकदाही स्वप्नात आली नाही .आता त्याना दोन गुटगुटीत मुले आहेत .दोघेही पूर्वीचे सर्वकाही विसरले आहेत .

मानस रोगतज्ज्ञाच्या  ट्रीटमेंटमुळे असो ,बाबांच्या मंत्रांमुळे असो,अत्यंत भावनिक असलेल्या सुधावर बाबांचा जो खोलवर मानसिक परिणाम झाला त्यामुळे असो,सुधा व मधुकर आता आनंदाने काळ घालवीत आहेत एवढे मात्र खरे .

जे आधुनिक विचारसरणीचे आहेत त्यांना बाबांचा मानसिक परिणाम झाला मंत्र बिंत्र सब झूट आहे.शिवाय मानसरोगतज्ज्ञाने बदलून दिलेल्या औषधांचा व ट्रीटमेंटचाही फायदा झाला असे वाटेल.जे भाविक आहेत त्यांना बाबांच्या तावीजमुळे गंड्यांमुळे बरे वाटले असेही वाटेल .

मी एवढेच म्हणतो की आपल्याला जगातील सर्व गोष्टी माहीत नाहीत.जे माहीत नाही ते अस्तित्वातच नाही असे म्हणणे बरोबर ठरणार नाही.बाबांचा चांगला झालेला मानसिक परिणाम असो, डॉक्टरांची औषधे असोत,किंवा तावीज मध्ये असलेले काही गुणधर्म असोत,किंवा या सर्वांचा समवायी परिणाम असो,दोघेही चिंतामुक्त व आनंदी आहेत.त्यांचे कुटुंब आता चौकोनी आहे एवढे मात्र खरे !

  (समाप्त )

२८/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel