डागेमध्ये(डाग म्हणजे डोंगर उतारावरचा दाट झाडी असलेला भाग )एक वटवृक्ष फार मोठ्या जागेवर पसरला होता.त्याच्या असंख्य पारंब्या लोंबत होत्या.काही पारंब्या जमिनीमध्ये खोल जाऊन त्या वृक्षाला आधार देत आहेत असे वाटत होते .त्या वडाखाली दाट सावली असे .जवळूनच पायवाट गेलेली असल्यामुळे येणारा जाणारा दमलेला पांथस्थ तिथे विश्रांती घेत असे .जवळपास काम करणारे दुपारच्या जेवणासाठी भाकर तुकडा घेऊन झाडाखाली बसत असत. उन्हाळ्यातील दोन महिने सोडून पाटाचे पाणी जवळूनच झुळुझुूळु वाहात असे .जेवल्यानंतर पाण्याची सोय जवळच होती.ही डाग अण्णांच्या मालकीची होती व जवळच खालच्या बाजूला अण्णांचे घर होते .

कोकणामध्ये जवळ जवळ घरे आहेत अश्या वाड्या थोड्या असतात .जे कमी जास्त जमीन बाळगून आहेत ते बऱ्याच वेळा स्वतंत्र रहात असतात .प्रत्येकाच्या कम्पाउंडची रचना सामान्यपणे पुढीलप्रमाणे असते. डोंगरमाथ्यावरील दगडाचा गवताळ प्रदेश ,डोंगर उतारावर निरनिराळ्या प्रकारच्या वृक्षांची  गच्च दाट झाडी असलेला उताराचा भाग(डाग) ,हल्ली मात्र विविध वृक्ष संपदा जाऊन डोंगर उतारावर झाडी तोडून हपूस आंब्यांची कलमे लावलेली आढळून येतात.डोंगर उतार संपल्यावर किंवा डोंगर उतारावरच मालकाचे घर गोठा इत्यादी असते. त्यानंतर माड पोफळी इत्यादीची बाग आणि नंतर भातशेतीची जागा मग समुद्र किंवा नदी अशी रचना असते. अर्थात निरनिराळ्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार थोडीबहुत  रचना भिन्न असू शकते .मालकाचे घर कंपाऊंडमध्ये असण्याचे व मध्यभागी असण्याचे कारण म्हणजे त्याचे सर्वत्र लक्ष राहते.चोरीचे प्रमाण कमी होते .

अशी ही डाग अण्णासाहेबांच्या मालकीची होती.उतारावरच पुढे अण्णासाहेबांचे घर होते .पाठीमागील अंगणामध्ये उभे राहिल्यानंतर हा वटवृक्ष सहज दिसत असे.अण्णासाहेबांच्या कंपाउंडमधून पायवाट गेलेली होती .अण्णा नामांकित वैद्य होते .अण्णांनी औषध दिले म्हणजे बरे वाटणारच असा एक विश्वास होता .पंचक्रोशीतील लोक अण्णांकडे औषधासाठी येत असत .अण्णा त्यांच्या प्रचंड तापटपणासाठीही, वैद्यकीय कौशल्याप्रमाणेच प्रसिद्ध होते.नाडी परीक्षेमध्ये त्यांचा हातखंडा होता .नाडी पाहून रोगाचे स्वरूप एवढेच नव्हे तर प्राकृतिक रोग आहे की पैशाचिक आहे हेही ते ओळखत असत.नाडी परीक्षेवरून ते स्त्री गर्भार आहे की नाही हे तर ओळखतच पण त्या बरोबर मुलगा किंवा मुलगी हेही ओळखत असे म्हटले जाई .ते कधी मुलगा की मुलगी हे मात्र सांगत नसत .जर एखाद्या भुताचे लागीर असेल तर ते तसे स्पष्टपणे सांगत व त्या प्रकारची उपाययोजना करण्याचा सल्ला देत .त्यांना भूतबाधा व त्यासंबंधी उपाय यांचे ज्ञान होते परंतू ते त्याचा कधीही वापर करीत नसत.त्यांच्या तापटपणापुढे घरातील लोक चळचळ कापत असतच ,परंतु गावातील लोकही कापत असत.उत्कृष्ट वैद्यकी हे त्यांचे मोठे शस्त्र होते त्यामुळे सर्वजण त्यांना दबकून असत.त्यांनी एकदा अमुकअमुक झाले पाहिजे किंवा होता कामा नये असे सांगितल्यावर त्याविरुद्ध  जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती .

असा हा अण्णांच्या जागेतील वटवृक्ष व जवळच घर असलेले असे हे अण्णा .एका पावसाळ्यात प्रचंड वीज त्या वडावर कोसळली .व अर्धा अधिक वड जळून गेला .उरलेल्या वडाचीहि शान गेली.पूर्वीसारखी दाट छाया राहिली नाही.तरीही पांथस्थ  तिथे थांबत असत .गडी माणसे भाकर तुकडा खाण्यासाठी तिथे थांबत.एके दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला तेथून जाणाऱ्याला त्या झाडावर कसली तरी काळी छाया दिसली.भास झाला असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केले .परंतु असे भास वारंवार अनेकजणांना होऊ लागले. काहींना आवाज ऐकू येऊ लागले .हळूहळू त्या झाडावर भूत आहे अशी बातमी पसरली . वीज पडून वड जळाला असल्यामुळे त्या भुताला जळके भूत असे नाव पडले .हे भूत कुणाला त्रास देत नसे .फक्त घाबरविण्याचे काम करीत असे .त्याचे दुसरे एक वैशिष्टय़ म्हणजे ते अनेकदा हेल काढून रडत असे.रडण्याचे निरनिराळे आवाज काढण्यात ते माहीर होते.त्याच्या रडण्यामुळे येणारे जाणारे लोक घाबरत बिचकत असत.त्याच्या मागच्या जन्मी असे काय झाले होते की ते सारखे रडत होते ते त्या भुताला व वेताळालाच माहिती !त्या भुताची दोन नावे पडली रडके भूत व जळके भूत कुणी या नावाने तर कुणी त्या नावाने त्याचा उल्लेख करीत असत !

अण्णांकडे रात्री  कोणत्याही वेळी रडण्याचे आवाज येऊ लागले.कधी आवाज डागेतून वडाजवळून येई तर कधी अगदी घराजवळून येई .केव्हा पुढच्या अंगणामध्ये तर कधी मागच्या अंगणामध्ये तर कधी घरावर तर कधी गोठ्यात बसून रडण्याचा आवाज येई .घरातील मुले बायका माणसे भयभीत झाली. अण्णा त्या भुताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत होते.अण्णांच्या धाकामुळे काही बोलण्याचीही सोय नव्हती.एकदा अण्णांच्या वृद्ध आईने त्यांना या भुताचा काहीतरी बंदोबस्त कर म्हणून सुचविले.त्यावर गडगडाटी हास्य करीत अण्णा म्हणाले ते भूत तर सारखे रडत असते त्याला काय घाबरावयाचे!त्यावर अण्णांची आई म्हणाली की मुले घाबरतात .मुलांनी घाबरता कामा नये. धीट झाले पाहिजे. मी काही करणार नाही. व तुम्हीही काही करता कामा नये असे म्हणून अण्णांनी तो विषय इथेच संपला असे अविर्भावाने सुचविले.अण्णा प्रचंड हट्टी होते.अण्णांपुढे काही बोलण्याची सोय नव्हती. कुणाची हिम्मतही नव्हती .आजीने म्हणजे अण्णांच्या आईने एक तोडगा सुचविला .

दर अमावस्येला एक नारळ त्या झाडाखाली भुताच्या नावाने फोडून ठेवावा व त्याच बरोबर दही भात कालवून तो झाडाखाली ठेवावा.शेवटी आजी दही भात घेऊन तिन्ही सांजेला वडाखाली एका नातवाला बरोबर घेऊन गेली व तिने नातवाकडून नारळही फोडला.हे मान्य करून घे आम्हाला त्रास देऊ नकोस अशी प्रार्थनाही केली .अर्थात हे सर्व गुपचूप अण्णांना कळू न देता करण्यात आले. त्या रात्रीपासून भूत रडण्याचे थांबले.एखाद्या अमावास्येला जर काही कारणाने नारळ व नेवैद्य  दिला गेला नाही तर ते भूत रडण्याला सुरुवात करी .नंतर जरी नारळ व नेवैद्य दिला तरी पुढच्या अमावास्येपर्यंत रडारड चालूच राही. भूत रडत नाही ही गोष्ट अण्णाच्या लक्षात आली.भूत त्याच्या रडण्याला अापण दाद देत नाही असे लक्षात आल्यावर पळून गेले कि काय असे ते एकदा विनोदाने म्हणाले.भुताला नारळ दिला जातो ही गोष्ट केव्हा तरी अण्णांच्या लक्षात आली.अण्णा प्रचंड रागावले. कुणीही त्या भुताला नारळ द्यायचा नाही म्हणून त्यांनी दम भरला.अण्णांच्या पुढे बोलण्याची कुणाचीहि हिंमत नव्हती. अमावास्येला जर अण्णा संध्याकाळी घरी असतील तर नारळ देता येत नसे .मग महिनाभर त्या भुताचा रात्रभर गोंधळ चाले .अण्णा नसतील तर मात्र नारळ दिला जाई .भुताच्या रडण्याचा आवाज आला नाही कि कुणीतरी अमावास्येला नारळ दिला हे अण्णांच्या लक्षात येई. नंतर अण्णांचा आरडाओरडा सुरू होई.त्यांची आई सर्व जबाबदारी आपल्यावर घेई.मग मात्र ते फारसे आकांडतांडव करीत नसत.पुढे अण्णा दर अमावस्येला कटाक्षाने संध्याकाळी घरी राहू लागले . नारळ देता येईना .जळक्या भुताची रडारड सुरू झाली .साधा नारळ तोही महिन्यातून एकदा देण्याची गोष्ट परंतु अण्णांना ते पसंत नव्हते.प्रश्न नारळाचा नव्हता तर तत्त्वाचा होता .त्या भुताचे व अण्णांचे काय वाकडे होते ते कळत नाही.आजीने शेजारी पाजारी तुम्ही तरी अमावस्येला नारळ फोडा वगैरे सांगून पाहिले परंतु अण्णांच्या धाकाने कुणीही तयार होईना.

पुढे त्या भुताची हिंम्मत वाढली. त्याचा उपद्रवीपणाही वाढला. घरातील मंडळी वारंवार आजारी पडू लागली .अण्णांच्या औषधांचाही यावा तेवढा गुण येईना .चारीपांची मुलांना मोठ्या प्रमाणात खरूज झाली .त्यानंतर दोन तीन मुलांना तीव्र स्वरूपाचा आमांशहि झाला.खरुज,अामांश आणि ताप वगैरे भुताला नारळ व नेवैद्य  न दिल्यामुळे झाला असे आजीचे ठाम मत होते .तर भुताचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असे अण्णांचे ठाम मत होते. आजारपण त्यामुळे असेल किंवा नसेल नारळ द्यायला काय हरकत आहे असे आजीचे मत.तर कोणत्याही परिस्थितीत नारळ द्यायचा नाही असे अण्णांचे आग्रही मत .या रस्सीखेचीमध्ये अण्णांचा थोरला मुलगा अामांशाने वारला.बाराही महिने सतत येणारे पाटाचे झुळूझुळू पाणी हळूहळू आटत गेले .पुढे ते फक्त पावसाळ्यात येऊ लागले .आजीच्या म्हणण्याप्रमाणे भुताला नारळ न दिल्याचा भुताची शांती न केल्याचा हा परिणाम होता .तर अण्णांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला काही वेगळी भौतिक कारणे होती.

अशीच पाच सात वर्षे गेली .भूतही रडून रडून कंटाळून गेले. त्याची रडण्याची तीव्रता व फ्रिक्वेन्सी(वारंवारिता) हळूहळू कमी होत गेली .त्याला नारळ काही मिळाला नाही .अण्णांच्या जबरदस्त आग्रही हट्टापुढे व क्रोधापुढे कुणाचे काही चालेना.मुले ठणठणीत बरी झाली.मोठीही झाली .शेवटी भूत बहुधा कंटाळून जिथे नारळ व नेवैद्य  मिळेल तिथे निघून गेले असावे!कदाचित त्याची ट्रान्सफर झाली असावी !! किंवा पुढच्या गतीलाही गेले असावे .रडक्या भुताच्या आठवणी हळूहळू विसरल्या गेल्या .

एका रात्री तो जळका वडही पावसाळी वाऱ्याबरोबर उन्मळून पडला . आणि त्याच बरोबर जळक्या रडक्या भुताच्या सर्व आठवणीही नामशेष झाल्या.

२१/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel