रमा नेहमीप्रमाणे रात्री साडेबारा वाजता ऑफिसमधून निघाली होती .नेहरू रोडला महात्मा गांधी रोड काटकोनात छेदित असे.महात्मा गांधी रोडवरून ती नेहरू रोडला वळली.हा रोड डेड एंड होता .कॉलनी मोठी होती.एकूण सोळा गल्ल्या होत्या .डावीकडे आठ व उजवीकडे आठ.डावीकडे सम अंकांच्या गल्ल्या  होत्या तर उजवीकडे विषम अंकांच्या गल्ल्या होत्या .कॉलनीमध्ये सर्व इमारती सात मजली होत्या.उजवीकडच्या चौथ्या नंबरच्या गल्लीत मधुकुंज इमारतीत पाचव्या मजल्यावर रमा राहात असे .हायवेवर फारशी गर्दी नसल्यामुळे ती रात्री येताना नेहमी थोडी टेन्शनमध्ये असे .एकदा नेहरू रोडला वळल्यावर घर आलेच म्हणून ती रिलॅक्सड असे. एवढय़ात तिची गाडी  वेडीवाकडी जाऊ लागली .डाव्या बाजूचा मागचा टायर पंक्चर झाला होता .ब्रेक लावून गाडी थांबविण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता .टायर बदलणे तिला शक्य नव्हते .तिने पर्स घेतली. गाडी लॉक केली आणि ती आपल्या घराच्या दिशेने चालू लागली .ती थोडी पुढे जाते तोच मागून एका गाडीमधून टवाळांचे टोळके आले.प्रत्येकाने थोडी बहुत घेतलेली असल्यामुळे सर्वच रंगात होते.एकटी मुलगी रात्री एक वाजता एकटीच रस्त्यावरून जाताना पाहून त्यांना  चांगलाच चेव चढला .

त्यांनी तिच्यावर वाटेल ते अश्लील रिमार्क्स मारण्यास सुरुवात केली .त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रमा भराभर आपल्या इमारतीच्या दिशेने चालत होती.ती घाबरलेली बघून त्या मुलांना आणखीच चेव चढला .त्यातील एक मुलगा पुढे येऊन त्याने तिचा हात धरला .चल येतेस का रात्रीचा तुझा दर  किती वगैरे बडबड सुरू केली .रमा घाबरून थरथर कापत होती .रात्रीचा दीड वाजला होता .रस्ते सुनसान होते .ती ओरडली असती तरी तिला मदत करायला कुणीही धावून येण्याचा संभव नव्हता.आज वर्षभर नोकरीला लागल्यापासून रमा अशीच एकटी येत जात होती .मोटारीतून येत जात असल्यामुळे तिला सुरक्षित वाटत असे.शक्यतो तिला पहिली शिफ्ट देत असत .परंतु या वेळेला तिला दुसरी शिफ्ट  मिळाली होती .आठ दिवस काही समस्या निर्माण झाली नव्हती .आजही मोटार पंक्चर झाली नसती तर ती एव्हाना आपल्या बेडमध्ये झोपलेली असती .परंतु या पंक्चरने सगळा घोटाळा केला .

ती पोरे तिला आपल्या मोटारीत ओढू लागली .तिला मोटारीतून कुठेतरी घेऊन जाण्याचा त्यांचा इरादा दिसत होता.एवढ्यात काय झाले माहित नाही .थरथरणाऱ्या रमेची थरथर एकदम थांबली .तिला आपल्या अंगात विलक्षण ताकद आल्याचा भास झाला .तिने एका क्षणात तिचा हात ओढणाऱ्याला  आडवे केले .त्या गुंडांचा हात उखडला गेला. तो इतक्या जोरात जमिनीवर आपटला की त्याचा पाठीचा मणका खिळखिळा झाला .तिचा हा आवेश पाहून ते गुंडांचे टोळके त्याला तिथेच रस्त्यावर सोडून पळून गेले .दुसऱ्याच क्षणी रमाचा सर्व आवेश संपला .ती पुन्हा थरथरू लागली .तो गुंड रस्त्यावर विव्हळत पडलेला पाहून तिला त्याची कणव आली.तिने लगेच पोलिसांना फोन लावला .पोलिसांना तिने जबानी थोडी वेगळ्या प्रकारे दिली .ती कामावरून आपल्या घरी नेहमीप्रमाणे परत येत होती .  तिची मोटार पंक्चर झाली .गाडी लॉक करून घरी जात असताना तिला हा रस्त्यावर विव्हळत पडलेला आढळला . ही एवढीशी मुलगी या गुंडाला एवढी दुखापत  करू शकेल असा संशयही पोलिसांना आला नाही .त्यानी त्या गुंडाला हॉस्पिटलमध्ये भरती केले .त्याला विचारता त्यांनेही मला कोणीतरी अज्ञात गुंडाने मारले असा जबाब दिला.कुणालाच काहीही संशय आला नाही .रमाला अस्पष्टपणे आपण त्याला धरून आपटले असे वाटत होते.आपल्या अंगात कुणीतरी त्यावेळी शिरले आणि त्याने आपल्याकडून ते करून घेतले असे तिला आठवत होते .रमाने घाबरून ऑफिसला मला सकाळी आठ ते चार अशीच ड्युटी द्या  नाहीतर मी राजीनामा देते असे सांगितले .रमाच्या कामाची ऑफिसला गरज असल्यामुळे  त्याप्रमाणे तिला ड्युटी दिली .तिच्या पुरता तो विषय तिथे संपला .

नंतर आठवड्याभराची गोष्ट .बालवाडीची शाळा सुटल्यानंतर त्यांच्या मोटारीतून मुलांना  घरी सोडले जात होते .त्या कॉलनीत दुपारी चार वाजता बालवाडीची मोटार येऊन थांबली .मोनिकाला नेण्यायासाठी काही कारणाने तिची आई आली नव्हती.मुलांना कुणातरी जबाबदार ओळखीच्या माणसांच्या हातात सोपविल्याशिवाय तसेच मुलाला रस्त्यात सोडून जायचे नाही अशी स्ट्रीक्टऑर्डर  होती.आता काय करावे या विचारात तो प्यून होता. एवढ्यात मोनिकाची आई समोरून लगबगीने येताना दिसली.त्याने सुटकेचा निश्वास टाकला . मोनिकाला तिच्या हवाली करून बस पुढे निघाली .त्या दिवशी मोनिकाच्या आईला काही कामासाठी दुसरीकडे जायचे होते .काम संपेपर्यंत पाच वाजले .तिने शाळेला फोन केला .तुमची मुलगी तुमच्या घरी सोडण्यात आली असे तिला सांगण्यात आले .तिला नेण्यासाठी कोण आले असावे असा ती विचार करीत होती .तिने घाईघाईत घरी फोन लावला .तर आजोबांनी मोनिका केव्हाच घरी आली असे सांगितले .मोनिकाने तू तिला दरवाज्यापर्यंत सोडले आणि नंतर कुठे तरी कामाला गेलीस असे सांगितले असेहि ते म्हणाले .तू कुठे गेली होतीस असेही विचारले.मोनिकाची आई बुचकळ्यात पडली . जर कुणी मुलाला नेण्यासाठी आले नाही तर मुलाला शाळेत घेऊन यायचे व नंतर तिथून पालकांना फोन करायचा अशी पद्धत होती .शाळेने मुलीला तिच्या आईने घरी नेली असे सांगितले .तिच्या आईने घरी फोन केला असता मोनिकाच्या आजोबांनी ती घरी सुखरूप आली असे सांगितले .मोनिकाने विचारता मम्मी तू मला न्यायला आली होतीस दरवाज्याजवळ सोडून ही आत्ताच येते म्हणून कुठे तरी कामाला गेलीस असे सांगितले .मोनिका आपल्या आईला ओळखणार नाही असे शक्य नव्हते.तिच्या आईने प्राचार्यांकडे तक्रार केली .प्यून तिच्या आईकडे सोपविले असे शपथपूर्वक सांगत होता .मोनिका आई घ्यायला आली होती असे सांगत होती .व तिची आई मी आले नव्हते असे म्हणत होती . मोनिकाचे आजोबा बेल वाजली आणि दारात दरवाजा उघडल्यावर मोनिका उभी होती असे सांगत होते .शेवटी प्यूनला ताकीद देऊन प्रकरण मिटविण्यात आले. मोनिकाच्या आईने हे प्रकरण इतके धसाला लावले की सर्व हकीकत सविस्तर पेपरमध्ये छापून आली .कुणीतरी एक अज्ञात बाई कॉलनीत वावरत असते. तिच्यापासून सर्वांनी सावध राहावे व संशयास्पद व्यक्ती दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे अशा प्रकारचा मजकूर पेपरमध्ये छापून आला . 

नेहमीप्रमाणे काही दिवसात सर्वजण ही हकीगत विसरले .रात्रीची वेळ होती .महात्मा गांधी रोडवरील बसस्टॉपवर एक पंचवीस वर्षांची बाई बसची वाट पाहत उभी होती .रात्रीचे दहा वाजले होते.थंडी प्रचंड पडल्यामुळे रस्ते सुनसान झाले होते .तुरळक वाहने रस्त्यावरून जात होती .त्या बाईला त्रास देण्याचा प्रयत्न एका मवाल्याने केला.दुसऱ्याच क्षणी त्या मवाल्याच्या पुढ्यात एक धूम्रमय आकृती निर्माण झाली.क्षणात त्या आकृतीने त्या माणसाच्या शरीरात प्रवेश केला .आणि तो माणूस शेजारच्या भिंतीवर जोरजोरात आपले डोके आपटू लागला.डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले . शेवटी बेशुद्ध झाल्यावर तो मनुष्य  थांबला .हीही हकीगत पेपरमध्ये सविस्तर छापून आली . त्या कॉलनीमध्ये भुतांचा वावर असतो .हे भूत परोपकारी आहे .संकटात सापडलेल्या विशेषत: मुली व स्त्रियांना ते मदत करते  अशा स्वरूपाचा तो मजकूर होता .

त्यानंतर कुणाला गॅलरीत कुणाला गच्चीवर कुणाला रस्त्यात ते भूत दिसू लागले .खरेखोटे त्यांनाच माहीत. अडचणीत असलेल्या व्यक्तींना ते भूत मदत करीत असे .एकदा एक आजी गावाहून आल्या .काही कारणाने त्यांचा नातू त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला नव्हता .रिक्षा करून त्या घरी आल्या .रात्रीचे अकरा वाजले होते .त्यांची बॅग जड होती .आजींना एकट्याने ती बॅग नेणे शक्य नव्हते .आजींजवळ दूरध्वनी होता .परंतु तो पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यामुळे आजींना आपल्या घरच्यांशी संपर्क करता येत नव्हता .एवढ्यात एक मुलगी रस्त्याच्या कोपऱ्यावरून चालत आली .आजी त्या मुलीला ओळखत नव्हत्या .त्या मुलीने ती बॅग उचलून आजींना त्यांच्या ब्लॉकपर्यंत लिफ्टमधून व्यवस्थित पोहोचविले .आणि ती अदृश्य झाली .आजींना तुम्ही कशा आल्यात असे घरच्यांनी विचारल्यावर त्यांनी ही हकीकत सांगितली .

असे अनुभव सुमारे चार पाच वर्षे त्या कॉलनीत मधून मधून सर्वांना येत होते .ज्या ज्या वेळी कुणी संकटात असे त्या त्या वेळी ते भूत येऊन मदत करीत असे.त्या भुतांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही पुरुषांना मदत करीत नसे .फक्त स्त्रियांना ते मदत करीत असे.

एकदा एका ब्लॉकमध्ये काही कारणाने आग लागली .सर्वत्र धूर पसरला .आग हळूहळू सर्वत्र पसरत गेली .जिन्याने खाली जाता येणे शक्य नव्हते .लिफ्ट स्वाभाविक बंद पडला होता .घरात फक्त स्त्रिया होत्या .अश्या वेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रत्येकाला उचलून हवेतून क्षणात बाहेर रस्त्यावर जमिनीवर आणून ठेविले.जर त्या व्यक्तीने वाचवले नसते तर ती मंडळी जळून किंवा घुसमटून  मेली असती .

त्या भुताबद्दलची लोकांची भीती हळूहळू नष्ट झाली .परोपकारी भूत म्हणून ते ओळखू जावू लागले.त्याचे दर्शन काहीना झाले तर काहींना झाले नाही.पाच सहा वर्षांनी हे प्रकार आपोआप थांबले .

त्या कॉलनीतील एकाकडे कोकणातून एक सद्गृहस्थ  आले होते.त्यांचा या विषयाचा अभ्यास होता .ते आले असताना सहज भुतांचा  विषय निघाला .ते ध्यानस्थ बसले नंतर त्यांनी काही आकडेमोड केली .मग त्यांनी विचारले .पाच वर्षांपूर्वी एका मुलीने गच्चीतून उडी मारून आत्महत्या केली होती काय?आत्महत्येचे कारण अज्ञात होते हे बरोबर आहे काय ?.त्यावर अर्थातच होय एका मुलीने आत्महत्या केली होती असे त्याना सांगण्यात आले .तिचे हे परोपकारी भूत झाले असे ते म्हणाले . त्यांच्या पुढे असे बोलण्यात आले की .ज्याप्रमाणे मनुष्याला जन्म व मृत्यू आहे त्याप्रमाणेच भुतानाही जन्म व मृत्यू आहे .ती मुलगी अत्यंत सुस्वभावी असल्यामुळे ते भूत परोपकारी होते .ती आता पुढच्या गतीला गेली .

खरे खोटे माहित नाही परंतु त्यानंतर मात्र कुणालाही तसा अनुभव आला नाही .

६/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel