गंगेच्या काठी वसलेले, असलेले, एक  तीर्थस्थान.याला कुणी हरिद्वार असे म्हणतात तर क्वचित कुठे हरद्वार असेही म्हणतात .हरी म्हणजे विष्णू,हर म्हणजे शंकर,या दोन्ही देवाबद्दल हिंदूंच्या मनात  आदर प्रेम व भक्ती याशिवाय काहीही नाही .हिंदूंच्या मनात सर्व देव एकच आहेत अशी भावना असते .त्यामुळे जो हरी तो हर आणि जो हर तोच हरी.

काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की आर्य हे येथून येथे बाहेरून आले.त्यांचा देव विष्णू म्हणजेच हरी होय .शंकर हा येथील स्थानिकांचा देव होता .दोन संस्कृतीची सरमिसळ  होत असताना विष्णू स्थानिकांचा झाला व शंकर आर्यांचा झाला.काहीही असो हरी हा हर व हर हा हरी म्हणूनच नेहमी हरिहर असे म्हणण्याचा प्रघात आहे .

हरिद्वार हे हरीकडे जाण्याचे द्वार आहे विष्णू लोकांमध्ये जाण्याचे द्वार आहे.स्वर्गद्वार नव्हे हे लक्षात घ्या.स्वर्गलोक सुखोपभोग घेण्याचे स्थान आहे .तुमच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा यांची पूर्ती तिथे होते .तिथून तुमचे पतन शक्य आहे.सुखोपभोग घेऊन झाल्यावर तुमचे स्वर्गातून पतन होते अशी हिंदूंची भावना आहे .विष्णू लोकातून पतन नाही .जिथे तुम्हाला काहीही अपेक्षा नसतात त्यामुळे अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंग यामुळे होणारे सुख किंवा दुःख नसते.तर केवळ आनंद असतो .तो विष्णुलोक होय

जिथे वास केल्यामुळे, जिथे तप केल्यामुळे,जिथे स्नान केल्यामुळे, जिथे मृत्यू  आल्यामुळे तुम्ही विष्णु लोकात जाता म्हणजेच तुमच्या काहीही अपेक्षा  राहात नाहीत त्यामुळे तुम्ही केवळ आनंद स्वरूप होता असे स्थान म्हणजे हरिद्वार होय.

कित्येक जण वृद्धपणी किंवा कदाचित तरुणपणीही स्वतःला गंगार्पण करतात .अशा देह अर्पणाला आत्महत्या म्हणत नाहीत तर देह विसर्जन असा शब्द वापरला जातो.त्यामुळे आपण विष्णुलोकांत जातो अशी कल्पना आहे

असे हे हरिद्वार याबद्दल बरेच काही वाचले ऐकले व टीव्हीवर सिनेमागृहात पाहिले होते .या प्रख्यात हरिद्वारला जाण्याचा योग एकदा नव्हे तर दोनदा आला .इथे गंगा नदी हिमालयाची साथ सोडून सपाटीवर वाहण्याला सुरुवात करते .सपाटी असा शब्द वापरला तरी प्रवाह संथ नसतो .प्रवाहाला विलक्षण वेग असतो .

आम्ही सिमला कुलू मनालीला मेमध्ये जाणार होतो .सुप्रसिद्ध पर्यटन कंपनी केसरी मार्फत आमचा प्रवास होणार होता .केसरी पर्यटन कंपनी फुटून वीणा वर्ल्ड स्थापन होण्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे .जातच आहोत तर चार दिवस अगोदर निघून मसुरी पाहावी आणि त्याचबरोबर हरिद्वार ही पाहावे असे मनात आले . ज्यावेळी इतर सिमल्याला पोचतील त्याच वेळी आपण त्यांना जाउन  मिळावे असा विचार आम्ही केला .मसुरी ते सिमला व्हाया हरिद्वार  अशी टॅक्सी केली.प्रथम ऋषिकेश व तिथला सुप्रसिद्ध झुलता पूल पाहून आम्ही दुपारी हरिद्वारला आलो .हरिद्वारला गंगेच्या प्रवाहाला विलक्षण गती ओढ आहे .जर तुम्हाला मुख्य प्रवाहात स्थान करायचे असेल तर मुख्य प्रवाहाच्या कडेलाच स्नान करावे लागते.पांढरे शुभ्र स्वच्छ जल विलक्षण  गतीने प्रवास करीत असते.मुख्य प्रवाहात पट्टीच्या पोहणार्‍यालाही जाणे अशक्य आहे .एखादा गेल्यास तो कित्येक किलोमीटर खाली किनार्‍याला लागेल असा माझा अंदाज आहे .

स्नानाच्या सोयीसाठी गंगेचा प्रवाह थोडा वळवून आतून घेतलेला आहे . ही व्यवस्था बहुदा नैसर्गिकच असावी .तिथे तुम्हाला शांतपणे व्यवस्थित स्नान करता येते.तिथेच घाटावर सुप्रसिद्ध गंगाआरती सायंकाळी केली जाते.हरिद्वारला मध्यभागी मोठा खडक आहे .त्याच्या आतून जो प्रवाह येतो तो शांत आहे . मुख्य प्रवाहाच्या कडेला साखळदंड बांधलेले आहेत .ते साखळदंड घट्ट पकडून आपण स्नानाचा आनंद घेऊ  शकतो.प्रवाहाबरोबर आपण तिरके तिरके होत जातो आणि साखळदंड आधारे आपल्याला परत मूळच्या ठिकाणी यावे लागते .किंचित धाडस आणि पुरेशी शक्ती असेल तर तिथे स्नान करण्याला मजा येते.  पहिल्या वेळी आम्ही तिथेच स्नान केले .भर दुपारी बर्फासारख्या थंडगार असलेल्या स्वच्छ वाहत्या वेगवान पाण्यात   स्नान करण्याचा आनंद अवर्णनीय होता .पाण्यातून बाहेर येऊ नये असे वाटत होते .वेळेची मर्यादा असल्यामुळे, आम्हाला टॅक्सीमधून सिमल्याला संध्याकाळपर्यंत पोहोचायचे असल्यामुळे,सेवटी नाइलाजाने स्नान आवरते घेऊन आम्ही सिमल्याला मार्गस्थ झालो.

दुसऱ्यांदा आम्ही हरिद्वारला चारी धाम यात्रा करून परत येत असताना गेलो.ही आमची यात्रा केसरी बरोबरच होती .चार धाम यात्रा दोन प्रकारच्या आहेत एक हिंदुस्थान चारी धाम व दुसरी उत्तरांचल चारी धाम .

हिंदुस्थान चारी धाम मध्ये दोन शंकरांची स्थाने व दोन विष्णूची स्थाने आहेत .पूर्व पश्चिम जगन्नाथ पुरी व द्वारका  या विष्णूच्या जागा .व दक्षिणोत्तर काशी विश्वेश्वर व रामेश्वर या दोन शंकराच्या जागा .यातही एक पाठभेद आहे.काहींच्या बहुसंख्यांकांच्या मतानुसार बद्रीनाथ ,द्वारका,जगन्नाथपुरी व रामेश्वर ही चार प्रमुख धामे होत.यातील पहिली तीन विष्णूची धामे होत.तर शेवटचे रामेश्वर शंकराचे धाम होय .

उत्तरांचल चारी धाममध्ये जम्नोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ अशी चार मुख्य प्रसिद्ध धामे आहेत.चारही ठिकाणी नद्या उगम पावतात .परंतू नावाप्रमाणे यमुना गंगा यांचा उगम जम्नोत्री व गंगोत्री येथे होतो .केदारनाथ शंकराचे स्थान व बद्रीनाथ विष्णूचे स्थान आहे .

या उत्तरांचल चारी धाम यात्रेहून परत येत असताना आम्ही हरिद्वारला थांबलो होतो.जाताना आम्ही हरिद्वार वरूनच गेलो परंतु तिथे थांबलो नव्हतो .स्नान चारी धाममध्ये कुठेही कुंडांमध्ये झाले नव्हते .या वेळी हरिद्वारला जिथे आरती होते त्या ठिकाणी किंवा साखळदंड बांधले आहेत त्या ठिकाणी स्नान न करता  स्नानासाठी बांधलेल्या घाटावर स्नान केले .

इथे सौभाग्यवतीने स्नान केले. स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी तिथेच सुरक्षित बंद जागा आहेत .मी घाटाच्या पायऱ्यावर बसून आमच्या चीज वस्तूंचे संरक्षण करीत होतो आणि गंगेचे सौंदर्य न्यहाळत होतो .

हरिद्वारला असंख्य आश्रम आहेत .आधुनिक पद्धतीची असंख्य हॉटेल्स निवासस्थाने आहेत .निरनिराळ्या वस्तुंची उत्पादन केंद्रेही आहेत .बर्‍यापैकी बाजारपेठ आहे. प्रसिद्ध पतंजली कारखाना तिथेच आहे.केसरीच्या प्रवास योजनेमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही औद्योगिक टूर्स किंवा धार्मिक टूर्स(आश्रम वगैरे ) नसल्यामुळे कुठेच आम्ही गेलो नाही

गंगा आरती हा एक प्रेक्षणीय श्रवणीय व धार्मिक अंत:करणासाठी  वंदनीय कार्यक्रम आहे .तो अनुभवलाच पाहिजे .जवळच एक छोटासा पूल आहे . त्यावरून आपण जिथे आरती होते त्या समोरच्या खडकावर येतो .याच खडकाला साखळदंड बांधले असून त्या साखळीच्या आधारे आम्ही मुख्य प्रवाहात पूर्वीच्या हरिद्वार भेटीवेळी स्नान केले होते.खडक, पूल, घाट व आजूबाजूचा सर्व प्रदेश इथे माणसांची आरती अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली असते .असंख्य वाती असलेले आरतीची भांडे वाती पेटवून नंतर हातात धरून तेथील गुरुजी आरतीला सुरुवात करतात .सुमारे अर्धा पाऊण तास हा कार्यक्रम चालतो .कार्यक्रम प्रेक्षणीय असतो .

*हरिद्वारला ज्यासाठी लोक जातात ते हरिद्वार पाहण्याचा अनुभवण्याचा आम्हाला हरीकृपेने दोनदा योग आला.*

३०/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel