मनालीपासून रोहतांग पास सुमारे पन्नास किलोमीटरवर आहे . हिमालयाच्या पीर पांजाल पर्वतराजींमध्ये पूर्वेकडे ही खिंड आहे .रोह याचा स्थानिक भाषेमध्ये अर्थ प्रेत होय.तांग म्हणजे ओलांडून जाणे.जो वाईट हवामानामध्ये ही खिंड ओलांडण्याचा प्रयत्न करतो तो मृत्यू पावतो असा याचा अर्थ आहे.असे आम्हाला सांगण्यात आले .हिमाचल प्रदेशातील स्पीती व  लाहोल दरीला ही खिंड जोडते .स्पिती व लाहोल या दरीना जोडण्यासाठी रोहतांग बोगदा खणण्याचे काम  सुरू आहे .दोन हजार वीसमध्ये या दरींमध्ये बोगदा सुरू झाल्यावर वर्षाचे बाराही महिने जाता येईल.या दरीमध्ये जाण्यासाठी जवळजवळ चढ व उतार मिळून पाच सहा तास खर्च होतात.वेळ पैसा पेट्रोल डिझेल खर्च होते. शिवाय अपघातांचाही धोका संभवतो . बाराही महिने रस्ता मोकळा रहात नाही .हे सर्वच दूर होईल .केवळ अर्ध्या तासात पलीकडे कोणत्याही ऋतूत जाता येईल .

एक दिवस आम्ही वसिष्ठ गाव जेथे वसिष्ट ऋषींचा आश्रम होता तेथे गेलो होतो .तिथे गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे आहेत .त्याचे स्नान त्वचारोगावर व इतरही अनेक रोगांवर उपयुक्त आहे असे सांगितले जाते.तिथे अनेक लोक स्नान करताना आढळून येतात .स्त्रियांसाठी गंधकयुक्त पाण्याने स्नान करण्यासाठी स्वतंत्र सोय केलेली आहे .हिमालयातील आमच्या ठिकठिकाणच्या प्रवासात गरम पाण्याचे झरे व शेजारीच बर्फासारख्या थंड पाण्याचे झरे अनेकदा आढळले. निसर्गाचा हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित व्हायला होते . 

मनालीमधील माल रोडवरती विविध प्रकारच्या वस्तूंच्या दुकानांची मालिका आढळते.(उत्तर हिंदुस्थानात जवळजवळ प्रत्येक शहरांमध्ये माल रोड आहे.माल रोड म्हणजे  जिथे माल पाहायला व विकत मिळतो तो रोड होय!) नवीन मनाली शहराचा मालरोड हा केंद्रबिंदू आहे .तिबेटीयन बाजार(मार्केट) मनू बाजार( मार्केट) इत्यादी मार्केट्स आहेत. येथे पुढील वस्तू आपल्याला खरेदी करता येतात.

तिबेट व हिमालयामधील हस्तकला वस्तू .
लोकरीचे सर्व प्रकारचे कपडे .
विविध प्रकारच्या शाली विशेषत: किनारी व कुलू शाली 
प्रार्थना चक्र 
वैशिष्टय़पूर्ण कुलु टोप्या 
थंगका पेंटिंग्ज (ही पेंटिंग्ज वैशिष्टपूर्ण तिबेटीयन शैलीमधील असतात )

डोर्जे (वज्र)तीन धारा असलेली गदे सारखी  दांडा असलेली पवित्र वस्तू जी  बौद्धधर्मीय प्रार्थना करताना हातांमध्ये घेतात.
जवळच जुने मनाली गाव आहे .तिथे मनूचे पुरातन मंदिर आहे.जुन्या मनाली गावांमध्ये सर्वत्र दगडी इमारती अाहेत .
मनाली नदीच्या पलीकडे एका डोंगरावर हिडिंबा देवीचे मंदिर आहे .(या मंदिराला धुनगरी मंदिर असेही संबोधले जाते )

धुनगिरी(धनगिरी) वनविहार- मंदिराभोवतालची सीडर वृक्षांची घनदाट अरण्यशोभा  पाहण्यासारखी आहे. हिमालयाच्या पायथ्याला हे वन इतके दाट आहे की ते निसर्ग सौंदर्य पाहताना देहभान हरपून जाते.तेथेच पक्ष्यांचे अभयारण्य आहे .तेथून आपला पाय निघत नाही.परत येताना मागे वळून वळून पाहत राहावे व सर्व नजारा डोळ्यात साठवून ठेवावा असे वाटते.
  
हिमाचल प्रदेशात हिडिंबादेवी ही प्रसिद्ध देवी आहे .ती नवसाला पावणारी देवी आहे. पांडव वनवासात येथे रहात होते .भीमाने हिडिंबाशी लग्न केले.त्यांना घटोत्कच नावाचा एक पुत्र झाला .महाभारत युद्धामध्ये त्याने अतुलनीय पराक्रम केला वगैरे  सर्वांना माहीत आहेच.पांडव वनवासातून परतले त्यावेळी हिडिंबा त्यांच्याबरोबर परत गेली नाही .ती येथेच तप करीत राहिली.आणि त्यामुळेच तिला देवीत्व प्राप्त झाले.  हिडिंबा देवीचे मंदिर पंधराशे त्रेपन्नमध्ये येथील राजाने बांधले.संपूर्ण मंदिर लाकडांमध्ये कोरलेले आहे अतिशय प्रेक्षणीय आहे .

ज्यांना रस असेल त्यांना  वस्तूसंग्रहालय (म्युझियम) पाहण्यासारखे आहे .हिमाचलमधील पुरातन वास्तूकला येथे पाहायला मिळते .त्याचप्रमाणे तेथील संस्कृतीचीही ओळख होते . 

बुद्ध मंदिर, बौद्ध भिक्षूंची राहण्याची जागा, इत्यादीही प्रेक्षणीय पर्यटनस्थळे आहेत .

पुढील खेळांसाठी येथे अनेक हौशी लोक येत असतात .
१ पॅराग्लायडिंग
२ट्रॅकिंग 
३स्कीइंग 
४माउंटनिअरिंग 
५माउंटन बायकिंग 
६राफ्टिंग
    
चंद्रताल भृगू अशी उंचावरील अनेक सरोवरे आहेत.तेथे ट्रेकिंग करीतच जावे लागते.

रोहतांग पासच्या दिशेने बर्फ सापडेपर्यंत आम्ही गेलो.व तेथे बर्फात मनमुराद खेळलो .प्रचंड भीतीदायक वळणे व खोल दरी असलेल्या रस्त्याने जाणे व येणे हाही एक रोमांचक अनुभव होता .ध्येय प्राप्त होणे आनंददायी असतेच परंतु तोपर्यंतचा प्रवासही आनंददायी असतो.  साधे पर्यटक (टुरिस्ट)(साहसी खेळाडू पर्यटक नव्हे )असल्यामुळे केवळ  सर्वसाधारण पर्यटन स्थळांना भेट दिली .माल रोड, हिडिंबा मंदिर, वशिष्ठ झरे,तिबेटीयन मार्केट ,म्युझियम,मनू बाजार , रोहतांगपासच्या दिशेने बर्फ सापडेपर्यंत अश्या पर्यटन स्थळांना भेट दिली. प्रेक्षणीय अशी अनेक तलाव मंदिरे व स्थळे आहेत .आम्ही सर्वच काही पाहू हिंडू शकलो नाही .आम्ही पर्यटन कंपनीबरोबर गेलो होतो .अडीच दिवसांमध्ये जितके जास्तीत जास्त  फिरता व पाहता येईल तेवढे पाहून आम्ही कुलूच्या दिशेने मार्गस्थ झालो.

(समाप्त)
२६/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com


 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel