पांडवानी महाभारतीय महायुद्धानंतर कित्येक वर्षे राज्याचा उपभोग घेतला .नंतर त्यांनी देवभूमी उत्तराचलमधून स्वर्गारोहण केले.स्वर्गारोहण करीत असताना द्रौपदीसह एक एक पांडवाचा वाटेत मृत्यू झाला . कारण प्रत्येकाने काही ना काही पाप केले होते. तो काही ना काही असत्य बोलला होता.शेवटी धर्मराज त्यांच्या कुत्र्यासह  (यमधर्म } एकटाच स्वर्गात सदेह गेला.त्याचे फक्त एक बोट गळून पडले .कारण तो अश्वत्थामा हत्ती मारला गेला त्यावेळी संदिग्ध बोलला असा प्रवाद आहे. 

ही सर्व कथा आठवण्याचे कारण म्हणजे आम्ही केलेली चार धाम यात्रा होय.या यात्रेला उत्तरांचल चारधाम यात्रा असे म्हणतात .यामध्ये जमनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ अशी चार धाम येतात .सर्वसाधारणपणे प्रवासी कंपन्या व स्वतंत्रपणे जाणारे लोक वरील क्रमाने ही यात्रा करतात.बद्रीनाथ हे सर्वश्रेष्ठ  स्थान समजले जात असल्यामुळे तिथे शेवटी जातात.पश्चिमेकडून पूर्वेकडे याच क्रमाने ही धाम आहेत . आम्हीही त्याच क्रमाने जाणार होतो .हरिद्वारला असताना बातमी कळली कि जमनोत्रीच्या रस्त्यावर मोठा लँडस्लाइड (भूस्खलन)झाला आहे .रस्ता मोकळा होण्यास चार दिवस लागतील .त्यामुळे आयत्या वेळी आम्ही प्रथम बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री व जमनोत्री अशी उलट यात्रा करण्याचे ठरविले .आमची बस बद्रीनाथच्या दिशेने निघाली .इथेही वाटेत बद्रीनाथजवळ भूस्खलन झालेले होते .हेमकुंड साहिब नावाचा  प्रसिद्ध गुरुद्वारा आहे.तिथून पुढे प्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आहे .तिथे जाणारा रस्ता बद्रीनाथच्या अगोदर तीस पस्तीस  किलोमीटरवर उजव्या हाताला जातो .तिकडे जाण्यासाठी अलकनंदा नदीवर पूल आहे .तिथून जो घाट सुरू होतो त्याला गोविंद घाट असे म्हणतात.तो रस्ता फुटतो त्याच्या किंचित पुढे बद्रीनाथच्या  दिशेने हे भूस्खलन झाले होते.आमची बस पुढे जाऊ शकत नव्हती .परंतु अगोदरच पुढे गेलेल्या वाहनांचीही तीच अवस्था होती .ती परत येऊ शकत नव्हती.भूस्खलनाच्या पलीकडे रस्त्याच्या कडेला त्यांचा तांडा लागलेला होता .रस्त्यावर आलेली माती काही प्रमाणात काढलेली होती .त्यातून चालत चालत पलीकडे जाता येत होते.मात्र डाव्या बाजूला लक्ष देत देत जावे लागत होते.कारण जमीन घसरतच होती .एखादा दगड येऊन आपल्यावर आदळला तर लगेच प्रचंड वेगाने वाहणाऱ्या अलकनंदा मध्ये जलसमाधी मिळाली असती .

उजव्या बाजूला प्रचंड वेगाने वाहणारी पांढरी शुभ्र फेसाळणारी अलकनंदा, त्यावरील हेमकुंड साहिबकडे जाणारा पूल,पलीकडे प्रचंड  उंचीचा पर्वत.त्यावरील हेमकुंडांकडे जाणारा गोविंदघाट  .त्या रस्त्यावरून काही लोक तो प्रचंड उंचीचा पर्वत चढत होते ,हे दृश्य तर डावीकडे मोठा डोंगर त्यावरील  घसरणारी माती. त्यावरील माती दगड गोटे वेगाने रस्त्यावर येत होते .एखादा लहान मोठा दगड आपल्याला लागणार नाही याची काळजी घेत पुढे जावे लागत होते .बराचसा रस्ता पायवाट म्हणून मोकळा झाला होता .तरीही शंभर दोनशे पावले मातीतून जावे लागले .शेवटी धोक्याचा रस्ता पार करून आम्ही आमच्या ठरविलेल्या बसमध्ये बसलो .आम्हाला इथपर्यंत आणलेली बस तिथेच आम्ही दुसऱ्या दिवशी परत येईपर्यंत थांबणार होती.यात बराच वेळ गेला पण हाही एक अनुभव होता.  प्रचंड वेगाने धावणाऱ्या अलकनंदेचे व गोविंदघाट यांचे, भूस्खलन झाल्यामुळे नाईलाजाने थांबावे लागल्यामुळे ,शांतपणे मनमुराद दर्शन घेता आले .अन्यथा गोविंदघाटचा रस्ता केव्हा गेला ते कळले नसते. नंतर आम्ही काही अडचण आल्याशिवाय तासाभर्‍यात बद्रीनाथला संध्याकाळी चारच्या सुमारास  पोचलो.

सातव्या शतकात आद्य शंकराचार्य येथे आले होते.त्यावेळी येथे काहीही नव्हते.कदाचित स्वर्गद्वार पाहण्यासाठी ते येथे आले असावेत .त्यांना बहुधा साक्षात्कार झालेला असावा .त्यांनी पायी चालत सर्व हिंदुस्थानचा प्रवास केला असे सांगतात.ते बद्रीनाथ येथे आलेले असताना त्यांना अलकनंदाच्या प्रवाहात शाळिग्रामची विष्णूची मूर्ती मिळाली .येथे पहिल्यापासून एक नैसर्गिक "तप्त कुंड" आहे .त्याच्या शेजारी असलेल्या गुहेत त्यांनी त्याची स्थापना केली .तेव्हांपासून बद्रीनाथची यात्रा सुरू झाली . नंतर पुढे एका गढवाल राजाने सोळाव्या शतकात हल्लीचे मंदिर बांधले .पूर्वी लोक अर्थातच पायी चालत येत असत .शेकडो किलोमीटर पायी चालत जाणे विविध कष्ट सोसणे हे ऐकून त्यांची निष्ठा किती जाज्वल्य असली पाहिजे ते लक्षात येते.या विभागात पहिल्यापासून भूकंप भूस्खलन ढगफुटी होत असते.त्यामुळे ही यात्रा जास्त बिकट व धोकादायक होते . त्याचमुळे ती काहीवेळा अपूर्णही रहाते.

येथे विष्णू शंकराची तपश्चर्या करीत बसले होते .त्यांना ऊन लागू नये म्हणून लक्ष्मीने बोरीचे रूप घेतले व त्यांच्यावर छाया केली.या उंचीवरील सर्व प्रदेश उजाड आहे .फक्त छोटी छोटी बोरीची झाडे आहेत.बद्री म्हणजे बोरी म्हणजे लक्ष्मी व तिचा नाथ तो बद्रीनाथ .किंवा येथे विष्णू व शंकर एकत्र नांदतात म्हणून बद्रीनाथ .

सुरुवातीला जवळजवळ पहिल्या महायुद्धापर्यंत फक्त बद्रीनाथ मंदिरात काम करणाऱ्या लोकांची येथे वस्ती होती .जेमतेम पंधरा वीस झोपड्या होत्या .मोटारी आल्या . मोटारीचे रस्ते झाले. त्यामुळेही यात्रेकरूमध्ये वाढ होत गेली. नंतर हळूहळू येथील वस्ती वाढत गेली .हॉटेल्स इत्यादी सुविधा निर्माण झाल्या .तरीही अजून कायम वस्ती अशी सुमारे पाचशे लोकांची असते .तेही इथे सात महिने असतात .नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात साधारणपणे कपाट म्हणजे बद्रिनाथचे दरवाजे बंद होतात .नंतर मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुन्हा कपाट उघडते.यात्रेचा कालावधी सुमारे सात महिने असतो .

यात्रेकरू मात्र हजारोंच्या संख्येने येतात .हल्ली जवळ जवळ सात आठ लाखापर्यंत यात्रेकरूंचा वार्षिक आकडा गेलेला आहे .

काही वर्षांपूर्वी अलकनंदेच्या खोर्‍यात ढगफुटी झाली आणि फारच मोठी वाताहात झाली.तरीही यात्रेकरूंचा ओघ विशेष कमी झालेला नाही .

पांडव स्वर्गारोहण करीत असताना याच रस्त्याने गेले .येथून तीन किलोमीटरवर मान नावाचे गाव आहे .तिथपर्यंत मोटररस्ता आहे .आम्ही बसने तिथपर्यंत गेलो .स्वर्गारोहण करण्याअगोदर पांडव येथे काही काळ थांबले होते अशी आख्यायिका आहे.याच ठिकाणी व्यासांनी महाभारत सांगितले.मी भरभर सांगत असताना ते भरभर लिहून घेणारा पाहिजे.मध्ये थांबणार नाही. जर लिहिण्यात खंड पडला तर मी पुढे सांगणार नाही .अशा व्यासांच्या अटी होत्या .गणपती शिवाय एवढा कुशल कोण असणार ?येथे दोन गुहा दाखविल्या जातात.एक व्यास गुहा व दुसरी गजानन गुहा.व्यास एका गुहेतून सांगत होते व अंतर्ज्ञानाने ते ओळखून गजानन दुसर्‍या गुहेत लिहून घेत होते .लिहिताना टाक मोडला तेव्हा खंड पडू नये म्हणून गणपतीने स्वतःचा एक सुळा मोडून त्याचा वापर टाक म्हणून केला. अशी आख्यायिका आहे .

येथून अलकनंदा फारच तीव्र गतीने वाहत असते .ती ओलांडून जाण्यासाठी एक मोठी शिळा आहे. भीमाने स्वर्गारोहणाच्यावेळी सर्वांना अलकनंदा ओलांडून पलीकडे जाता यावे म्हणून ती टाकली अशी आख्यायिका आहे . आम्ही त्यावरून पलीकडे जाऊन परत आलो .येथून पुढे सहा किलोमीटरवर अलकनंदेचा एक मोठा धबधबा आहे .त्या धबधब्याचे नाव वसुंधरा फॉल असे अाहे. तिथे जाऊन परत येण्यास एखादा दिवस लागतो.धबधब्याची उंची सुमारे चारशे फूट आहे .हा सर्व ट्रेक कठीण आहे आम्ही अर्थातच भीमशिळेच्या पुढे  गेलो नाही .येथून पुढे स्वर्गारोहिणी पर्वत आहे.

अलकनंदा व वसुंधरा धबधबा यासंबंधी एक अाख्यायिका आहे.भगीरथाने जेव्हा तप करून गंगेला पृथ्वीवर येण्यासाठी प्रसन्न करून घेतले . त्या वेळी गंगा प्रसन्न होऊन म्हणाली की मी  जर पृथ्वीवर आले तर माझा आवेग पृथ्वीला सहन होणार नाही. तेव्हा मी दोन धारानी पृथ्वीवर येईन.त्यातील एक म्हणजे भागीरथी होय.आणि दुसरी धारा म्हणजे अलकनंदा .गंगा वसुंधरेवर आली म्हणून या धबधब्याचे नाव वसुंधरा धबधबा असे आहे .भागीरथी प्रमाणेच अलकनंदाचे पाणी औषधी आहे . जर ते पाणी बाटलीमध्ये भरून ठेवले तर दोन वर्षांनी सुद्धा त्या पाण्याचे गुणधर्म कायम असतात .

देवप्रयागला भागीरथी व अलकनंदा यांचा संगम होतो .तिथून पुढे प्रवाहाला गंगा असे नाव आहे .कारण हे गंगेचेच दोन प्रवाह आहेत . दोन्हीही सारखेच औषधी आहेत .मात्र भागीरथीला हिंदूंच्या मनात जे आदराचे स्थान आहे ते अलकनंदाला नाही .भागीरथी पवित्र व पूज्य समजली जाते .तेवढी अलकनंदा नाही .स्नानाच्या वेळी हर गंगे भागीरथी असे म्हटले जाते .हर गंगे अलकनंदा नाही!

बद्रीनाथ हे भाविकांचे जसे पवित्र स्थान आहे .यात्रेचे ठिकाण आहे .त्याचप्रमाणे बद्रीनाथ हे ट्रेकर्सचेहि एक मुख्य स्थान आहे .येथून जवळ असलेल्या अनेक पर्वतशिखरांवर  आरोहणाला सुरुवात येथून केली जाते .येथून जवळ नर नारायण या नावाची दोन पर्वत शिखरे आहेत .त्यातील एक अर्जुन व दुसरा कृष्ण असे म्हटले जाते.कोणे एके काळी हे दोघे पूर्व जन्मात येथे तपश्चर्या  करीत बसले होते .

आम्ही गेलो त्या दिवशी पौर्णिमा होती .चंद्रग्रहण होते .त्यामुळे दर्शन बंद होते .दुसऱ्या दिवशी पहाटे ग्रहण संपल्यावर संपूर्ण मंदिर धूत होते .त्यामुळे आत जावून व्यवस्थित खुलासेवार दर्शन झाले नाही .लांबून दर्शन घेऊन त्यावरच समाधान मानावे लागले .काहीजणांची चारी धाम यात्रा भूस्खलनामुळे  अर्धवट रहाते .जमनोत्रीला भुस्खलन अगोदरच झाल्यामुळे व ते आम्हाला वेळीच कळल्यामुळे आम्ही आमचा मार्ग बदलला त्यामुळे सर्व चारी धाम व्यवस्थित पाहाता आले .

कोणत्याही (जीवन यात्रा किंवा भू यात्रा ) यात्रेचा उद्देश केवळ अंतिम स्थानाला पोहोचणे हा नसावा.तिथपर्यंत जाण्याचा रस्ताही दोन्ही बाजूंनी पाहात जावे .तो प्रवासही सुखद व रोमांचकारी असतो .आपला देश व्यवस्थित पाहावा यासाठीच निरनिराळी तीर्थस्थळे निर्माण  झाली असावीत .निरनिराळ्या तीर्थस्थानांचे स्थान लक्षात घेतले तर ही गोष्ट  प्रकर्षत्वाने लक्षात येते.दुसरे चारी धाम म्हणजे पूर्वेला जगन्नाथपुरी, उत्तरेला बद्रीनाथ ,पश्चिमेला द्वारका, दक्षिणेला रामेश्वर होय.ही चारी धाम यात्रा करीत असताना बहुतेक हिंदुस्थान पहाला जातो .

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत हिमालयातील प्रदेश व शहरे पाहिली उदाहरणार्थ  अरुणाचल भूतान गंगटोक दार्जिलिंग नेपाळ चारी धाम सिमला कुलू मनाली धर्मशाला डलहौसी वैष्णोदेवी काश्मीर इ. तर बहुतेक हिमालय पाहून होतो .हिमालयाचे सौंदर्य  रौद्र व नेत्र सुखद आहे.त्याचा प्रत्यक्ष निरनिराळ्या ठिकाणी जाउन अनुभव घेतला पाहिजे.

*उरलेली तीन धाम पुन्हा केव्हा तरी .*

*अशा प्रकारे आम्ही पांडव ज्या मार्गाने पुढे गेले ते स्वर्गद्वार बघून आलो.* 

४/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel