माता वैष्णोदेवीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे.दरवर्षी सर्व भारतातून लक्षावधी यात्रेकरू येथे येत असतात.दरवर्षी नित्यनेमाने येणारे यात्रेकरूही आहेत.मातेने बोलावल्याशिवाय तेथे जाण्याचा योग येत नाही असे म्हणतात .आम्ही काश्मीरला गेलो उत्तर हिंदुस्थानच्याही यात्रा झाल्या परंतु मातेकडे जाण्याचा योग आला नाही.शेवटी मातेने आम्हाला बोलाविले व आम्ही मातेच्या दर्शनासाठी निघालो.आम्ही गेलो त्यावेळी बसने जम्मूहून कटरा तेथून पुढे वैष्णोदेवी दर्शन असा कार्यक्रम झाला.इच्छा असूनही वयोमानामुळे आम्हाला चालत जाणे शक्य नव्हते.डोली करून  त्यातून दर्शनासाठी गेलो .वस्तीला कटरा येथे होतो .आम्ही सकाळी यात्रेला सुरुवात केली .वैष्णोदेवी मंदिराकडे जाण्यासाठी प्रशस्त वाट केलेली आहे .यात्रेकरू कोणत्याही वेळी मातेच्या दर्शनासाठी पर्वत चढू लागतात .बरेच जण संध्याकाळी पर्वत चढू लागतात .त्यामुळे थंड वेळी उत्साहाने न दमता पर्वत चढून जाता येते .आम्ही गेलो त्यावेळी इलेक्ट्रिक रिक्षा नव्हत्या हल्ली त्या आहेत व त्यासाठी चांगला रस्ताही झालेला आहे असे ऐकतो .     

पुरातन स्वयंभू पूजास्थानामध्ये वैष्णोदेवी हे एक आहे.येथील यात्रेला केव्हापासून सुरुवात झाली त्याचा मागोवा घेता येत नाही .भूगर्भशास्त्रीय संशोधनानुसार पवित्र गुहेचे आयुष्य दहा लाख वर्षे आहे असे सांगितले जाते .वैदिक वाङ्मयामध्ये स्त्री देवतेची पूजा किंवा स्त्री देवतेचा उल्लेख आढळून येत नाही.चार वेदांमध्ये सर्वात जुना असलेल्या ऋग्वेदामध्ये त्रिकुट पर्वताचा उल्लेख आहे .पुराणकाळामध्ये शक्तीची पूजा सुरू झालेली आढळून येते.वैष्णोदेवीची पूजा व यात्रा केव्हापासून सुरू झाली याबद्दल एकवाक्यता आढळत नाही.जी थोडी बहुत एकवाक्यता आढळते ती पुढील प्रमाणे .

सातशे वर्षांपूर्वी पंडित श्रीधर यांच्या भंडाऱ्यामध्ये साक्षात वैष्णोदेवी हजर होती.भैरवनाथापासून सुटका करून घेण्यासाठी श्री वैष्णोदेवी तेथून अकस्मात अदृश्य झाली.माता अकस्मात अदृश्य झाल्यामुळे श्रीधर पंडितला अतिशय दुःख झाले .आयुष्यातील सर्व स्वारस्य संपल्यासारखे त्याला वाटले .त्या दुःखामध्ये त्याने अन्न पाण्याचा त्याग केला व स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले .त्या खोलीमध्ये माता प्रगट व्हावी म्हणून तो  अन्न पाण्याचा त्याग करून प्रार्थना करीत होता.मातेने पंडित श्रीधरच्या स्वप्नात येऊन मी त्रिकुट पर्वतावर खडकाच्या रूपात आहे असे सांगितले .श्रीधर पंडित मातेच्या दर्शनासाठी व्याकूळ होऊन त्रिकुट पर्वतावर निघाला .जेव्हां जेव्हां त्याला  वाट सापडत नाहीशी झाली तेव्हां तेव्हां मातेने त्याच्या स्वप्नात येऊन त्याला वाट दाखविली. 

जम्मू विभागातील  त्रिकुट पर्वतावर गुहेमध्ये मातेचे स्वयंभू स्थान खडकाच्या रूपात आहे .हिंदूंच्या निरनिराळया यात्रा स्थानांमध्ये वैष्णोदेवीचे स्थान फार वरच्या पातळीवर आहे.पार्वती किंवा शक्ती येथे साक्षात वास करते .दरवर्षी जवळजवळ एक कोटी लोक मातेचे दर्शन घेतात .लोक चालत रांगत नमस्कार करीत गडगडत डोलीतून रिक्षा हेलिकॉप्टर इत्यादी साधनाच्या मार्फत मातेचे दर्शन घेतात .माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते असा भाविकांचा विश्वास आहे .ज्यांना मूलबाळ नाही त्यांना मातेच्या आशीर्वादाने पितृत्व मातृत्व प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.यात्रेकरू वर्षातील सर्व ऋतूंमध्ये येत असतात .गरिबाला श्रीमंती,अंधाला दृष्टी,दुर्बलाला शक्ती,संतान नसलेल्याला संतान प्राप्ती होते, अशी श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी नियमितपणे दुर्गम अशा या पर्वतावर कितीही अडचणी सोसून दर्शनाला येणारे लोक आहेत. 

रामायण काळात वैष्णोदेवी मनुष्यरूपात होती .त्रिकुट पर्वताच्या पायथ्याला तिचा आश्रम होता .हा आश्रम रामाच्या सांगण्यावरून तिने बांधला होता .नवरात्र करून तिने रामाच्या विजयासाठी प्रार्थना केली होती .रामाने चिरंजीव होशील, सर्व जग माता म्हणून तुझी आराधना व स्तुती करीलअसा तिला वर दिला .त्याचप्रमाणे कलियुगात मी तुझ्याशी विवाह करीन त्रिकुट पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात आपण राहू असेही सांगितले. अशी एक कथा आहे. तेव्हापासून माता पवित्र गुहेमध्ये खडक रूपाने वास करीत आहे .प्रभू रामाच्या या वरामुळे वैष्णोदेवीला शक्ती,सामर्थ्य,सर्व जगाकडून स्तुती आणि प्रसिद्धी प्राप्त झाली आहे असा भाविकांचा विश्वास आहे .भैरवनाथाने तिचा पाठलाग केला आणि तिने स्वतःशी विवाह करावा म्हणून तिच्यावर दबाव आणला .हे सर्व महायोगी गोरक्षनाथ यांच्या सांगण्यावरून  भैरवनाथाने केले.अंतर्ज्ञानाने गोरखनाथना राम व वैष्णोदेवी यांच्यामधील संवाद माहीत होता .मातेबद्दल जास्त माहिती करून घेण्यासाठी गोरखनाथांनी भैरवनाथाला पाठविले होते असे सांगितले जाते. भैरवनाथ हा गोरखनाथांचा प्रमुख शिष्य होता.  

भैरवनाथाला त्रिशूळाने मारल्यानंतर त्याने क्षमेची याचना केली तेव्हा मातेने क्षमा केली.त्याला मोक्ष मिळाला.  नंतर गुहेमध्ये तिने स्वतःच्या मनुष्यरूपाचा त्याग केला आणि सतत अनंत काळ ध्यान करण्यासाठी  खडक रूप धारण केले .या गुहेत तिने मनुष्यरूपाचा त्याग केला म्हणून ही गुहा अत्यंत पवित्र समजली जाते .हा खडक साडेपाच फूट उंचीचा आहे .त्यावर तीन पिंडी आहेत. म्हणजेच तीन शिर आहेत .भाविक वैष्णौदेवी म्हणून या खडकाचे दर्शन घेतात.वैष्णोदेवीचे मंदिर स्थापन होण्याच्या अनेक कथा आहेत परंतु श्रीधर पंडित यांची कथा जास्त सर्वमान्य आहे .

महाकथा महाभारत यामध्ये अर्जुनाने कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या अगोदर मातेची प्रार्थना केली .युद्धामध्ये विजय मिळेल असा आशीर्वाद मातेने दिला  असा उल्लेख आहे . महाभारतात देवीचा उल्लेख जंबूपर्वताच्या उतारावर  जिचा चिरंतन निवास असतो अशा देवीची प्रार्थना केली असा आहे .जंबू म्हणजे जम्मू होय असे अनेक विद्वानांचे मत आहे .

मातेचे दर्शन घेण्यासाठी नवरात्र हा अत्यंत शुभ काळ आहे असे समजले जाते.या काळातील दर्शन तुम्हाला स्वर्गाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेते असे म्हटले जाते. 

शीख धर्म संस्थापक गुरू गोविंदसिंह यांनीही  वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते असे म्हणतात .

मातेकडे जाण्याच्या तीन प्रमुख गुहा आहेत.त्यातील एक प्रमुख गुहा बंद ठेवली जाते. तीन गुहा एका यात्रेसाठी योग्य नाहीत असे समजले जाते.फक्त दोन गुहा यात्रेकरूंसाठी उघड्या ठेवल्या जातात .

हल्लीचा गुहेतील मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा मूळचा रस्ता नाही .पूर्वीचा रस्ता अत्यंत अरुंद होता . अर्धकुवारी येथे म्हणजेच एकूण घाटीच्या अर्ध्यावरती डोंगराचे दोन भाग करून दोन रस्ते तयार करण्यात आले.

मुख्य गुहा फारच थोडय़ा सुदैवी भाविकांना बघता येते.जेव्हा दर्शनासाठी दहा हजारांपेक्षा कमी भाविक असतात तेव्हाच मुख्य गुहेचे दरवाजे उघडले जातात .डिसेंबर व जानेवारी या थंडीच्या दिवसांत भाविकांची संख्या कमी असते त्या वेळी मुख्य गुहेचे दरवाजे उघडले जाण्याचा संभव अधिक असतो .

वैष्णोदेवी स्थानात पुरातन गुहेचे अतिशय महत्त्व आहे .मातेने भैरवनाथाचे शिर त्रिशुळाने उडविले ते भैरवदरीमध्ये पडले.आणि धड या पुरातन गुहेमध्ये आहे असे समजतात .गुहेमधून गंगेचा एक प्रवाह  वाहत असतो.आणि भाविक या गंगेमध्ये पाद हस्त प्रक्षालन करून नंतर मातेचे दर्शन घेतात .

अर्धकुमारी येथे एक गुहा आहे त्या गुहेमध्ये मातेने नऊ महिने भैरवनाथापासून स्वतःला गुप्त ठेविले होते.एखादे मूल आईच्या गर्भात असावे त्याप्रमाणे मातेने स्वतःला ठेवले होते.या गुहेला गर्भजून असे नाव आहे .यामध्ये जो प्रवेश करतो तो जन्ममरणाच्या फे्र्‍यातून मुक्त होतो असा समज आहे .जर एखाद्याला जन्म मिळाला तरी तो जन्म होण्याच्या सर्व समस्यांपासून व त्रासापासून मुक्त होतो .

त्रिकूट पर्वताचा पाया एकच आहे परंतु शिखरे तीन आहेत.वैष्णोदेवीचे स्थानही तसेच आहे. पाया एक व शिर तीन.या तीन शिरांचे रंगरूप भिन्न आहे.त्रिकुट पर्वत व पवित्र गुहा हे परमेश्वराकडे जाण्याचा दरवाजा आहे.तीन पिंडींची पूजा केली जाते. 

~  माता महाकाली~

पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूची पिंडी माता महाकालीची आहे. ती विनाश दर्शविते.उत्पत्ती स्थिती व लय अश्या तीन स्थिती आहेत. तर ती "लय"ची स्वामिनी आहे.ती तमोगुण दर्शविते .तिचा रंग काळा आहे .शास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ असे म्हणतात की विश्वाचा फारच लहान भाग जाणीवयुक्त आहे.बाकी सर्व जाणिवेच्या पलीकडे आहे .या जाणिवेपलीकडच्या भागात आपल्याला अज्ञात अशा अनेक गूढ गोष्टी आहेत .तमप्रेरणेवर विजय मिळवण्यासाठी महाकाली तिच्या भक्तांना सतत साहाय्य करीत असते.मनुष्याला जीवनाबद्दल अत्यंत अल्प माहिती असते.जीवनाचा बराचसा भाग त्याला अज्ञात असतो .या अज्ञात प्रदेशात अनेक गूढ गोष्टी असतात.हे सर्व माता महाकालीच्या क्षेत्रात येते.काळाचे अडथळे पार करून जी शक्ती जाते ती महाकाली होय. 

~माता महालक्ष्मी ~

मध्यभागी असलेली पिंडी माता महालक्ष्मीची आहे .रज तत्त्वाच्या  अस्तित्वाचे ते प्रतीक आहे . तिचा रंग पिवळसर लाल आहे.अस्तित्वाची महाशक्ती माता महालक्ष्मी आहे.अंत:प्रेरणा प्रयत्न संपत्ती समृद्धी भौतिक लाभ जीवनाचा दर्जा हे सर्व रजोगुण दर्शवितो तिची स्वामिनी माता महालक्ष्मी होय .संपत्ती व समृद्धी यांचा रंग पीत आहे .

~माता महासरस्वती ~

पाहणाऱ्यांच्या सर्वात डावीकडील पिंडी ही माता महासरस्वतीची आहे .ही उत्पत्तीची सर्वश्रेष्ठ शक्ती आहे .जर लक्ष केंद्रित करून बघितले तर पिंडीमध्ये धवल रंगाची छटा दिसते .ज्ञान शहाणपणा अध्यात्मिकता जे जे  काही सर्वात चांगले आहे , मंगल आहे,दिव्य आहे, भव्य आहे ,सुंदर आहे ,कलात्मक आहे,श्रेष्ठ आहे, त्याची उत्पत्ती माता सरस्वती पासून होते.शुद्धता, सत्त्वगुणाची ती स्वामिनी आहे. 

माता वैष्णोदेवीमध्ये या तीनही सर्वश्रेष्ठ शक्ती एकत्र आहेत.

प्रत्येक व्यक्तींमध्ये वरील तीनही गुणांचा (सत्त्व रज व तम) समुच्चय  असतो .ज्या गुणाचे प्राधान्य असते त्याप्रमाणे ती व्यक्ती वर्तन करीत असते.व्यक्तींमध्ये या तिन्ही गुणांचा समतोल पाहिजे .हा समतोल पवित्र गुहेतील माता वैष्णोदेवीमध्ये आहे.व्यक्तींमध्ये हा समतोल निर्माण करण्याचे कार्य माता वैष्णोदेवी करते.तिच्या दर्शनाने पूजनाने हा समतोल प्राप्त होतो असा विश्वास आहे .  

पुन्हा एकदा नमूद केले पाहिजे कि गुहेमध्ये मूर्ती तसबीर काहीही नाही .फक्त खडकाच्या तीन पिंडी आहेत .दर्शनाला जात असताना अनेक तसबिरी वचने माहिती दिलेली आहे .त्यामुळे तुम्हाला वैष्णोदेवीच्या तीन पिंडीचे दर्शन घेताना सर्व काही व्यवस्थित स्पष्ट समजते.

पवित्र गुहा अठ्याण्णव फूट लांब आहे . पवित्र गुहेमध्ये तेतीस कोटी देवांचे अस्तित्व आहे असे समजले जाते .केव्हा ना केव्हा ते येथे येऊन गेले आहेत आणि त्यांची पदचिन्हे येथे  आहेत .या पवित्र गुहेमध्ये येऊन त्यांनी माता वैष्णोदेवीची भक्ती केलेली आहे. रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा मातेची आरती होते त्यावेळी ते सर्व उपस्थित असतात असा विश्वास आहे .

गुहेत प्रवेश करताना डाव्या बाजूला वक्रतुंड गणेशाची प्रतिमा आहे .त्याच्या शेजारीच सूर्य व चंद्र यांच्या प्रतिमा आहेत .आत प्रवेश केल्यावर आपण भैरवनाथाच्या धडावरून जातो. ते चौदा फूट लांब आहे.मातेचा भैरवनाथाचा शिरच्छेद  त्रिशूळाने केला.मातेने मारलेल्या त्रिशूळा मुळे त्याचे शिर काही किलोमीटर दूर असलेल्या दरीत जाऊन पडले.त्यानंतर लंकावीर हनुमानाची प्रतिमा आहे .त्यानंतर मातेच्या पदस्पर्शाने पुनित झालेला चरणगंगेचा एक प्रवाह येथे गुहेत वाहात असताो .त्यामधूनच सरकत सरकत आपल्याला पुढे जावे लागते.पवित्र गुहेतून पुढे असाच प्रवास केल्यावर आपल्याला गुहेचे छत शेषनागाने तोलून धरलेले दिसते.शेषनागाच्या खाली हवन कुंड आहे.तेथेच शंख चक्र गदा पद्म यांच्या प्रतिमा आहेत .छतावर पाच पांडव सप्तर्षी व स्वर्गीय दैवी कामधेनूची कास व आचळ आपल्य़ाला दिसतात.त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश शिव पार्वती यांच्या प्रतिमा आहेत .त्यानंतर पुराणकालीन प्रल्हादने  घट्ट धरून ठेवलेला खांब आपल्याला दिसतो.या खांबाच्या खाली पाण्याच्या पातळीबरोबर एक यंत्र आहे.त्यावर कित्येक गूढ प्रतिमा कोरलेल्या दिसतात.त्यानंतर बावीस फूट पुढे सिंहाचा पंजा आहे.सिंह हे मातेचे वाहन आहे . छत तोलून धरत असलेल्या शेषनागाच्या शिरानंतर शिव गौरी यांच्या प्रतिमा आहेत .येथून तेरा फूट पुढे पवित्र पिंडी आहेत .

पवित्र पिंडीच्या वरच्या बाजूला गणेश सूर्य चंद्र अन्नपूर्णा यांच्या प्रतिमा आहेत.तिथेच खालच्या बाजूला सिंहराज आहेत.त्याच्यापुढे जगाला आश्वासित करीत असलेला मातेचा वरदहस्त आहे.स्वतःच्या शरीराचा त्याग करीत असलेल्या सतीचा (शक्तीचा) हात काश्मीरमध्ये पडला.व तेथे शक्तीपीठ निर्माण झाले.अशी एक कथा आहे .तर काहींच्या मतानुसार त्रिकुट पर्वतावर हा हात माता वैष्णोदेवीजवळ पडला. वरदहस्ताच्या समोर पशुपती नाथाची प्रतिमा आहे .

ही सर्व दर्शने जर जुनी गुहा उघडली असेल तरच आपल्याला होतात .गर्दीच्या वेळी नवीन गुहा उघडली जाते.जर तुम्हाला ही सर्व दर्शने व्हावी असे वाटत असेल तर ज्यावेळी विशेष गर्दी नसते अशा वेळी तुम्ही दर्शनाला येणे आवश्यक आहे .त्याप्रमाणे यात्रेचे नियोजन केले पाहिजे . पिंडीच्या खालून पाणी वाहात असते त्याला चरणगंगा असे म्हणतात हे पाणी गुहेच्या बाहेर जाते.तीर्थ म्हणून हे पाणी लहान भांड्यांमध्ये गोळा  करून यात्रेकरून नेतात .हेच पाणी स्नान घाटावर जाते यात्रेकरू तिथे स्नान करून नंतर दर्शनाला उभे राहतात .

एका लेखकाच्या लिहिण्यानुसार त्याला तो दर्शनाला गेला असताना दोन रांगा आढळल्या .दोन्ही रांगातील लोकांना दर्शन झाले परंतु त्यांची भेट कुठेही झाली नाही.तेव्हा दर्शनासाठी पिंडीचे दोन सेट आहेत का असा त्याला संभ्रम पडला .

तर दुसऱ्या लेखकाच्या म्हणण्यानुसार दोन रांगा जरी असल्या तरी त्या दोन दिशेने एकाच पिंडीकडे येतात.मूळच्याच पिंडीचे सर्वांना दर्शन होते .  

वैष्णोदेवी संस्थानच्या संचालक  मंडळाच्या म्हणण्याप्रमाणे एकाच पिंडीचे सर्वांना दर्शन होते.गर्दीच्या वेळी नवी गुहा उघडली जाते तर एरवी जुनी गुहा उघडी असते. 

अाम्ही रांगेमध्ये उभे राहिलो.आपल्या जवळील सर्व चीज वस्तू बाहेर ठेवाव्या लागतात .आत जाताना काही घातक वस्तू नेत नसल्याबद्दल खात्री करून घेण्यासाठी प्रत्येकाची तपासणी केली जाते.देवीला वाहण्यासाठी घेतलेला भोग प्रसाद फक्त बरोबर ठेवता येतो .

आम्ही गुहेतून पिंडीच्या दर्शनाला गेलो .गुहा अत्यंत अरुंद होती.गुहेमध्ये प्रवेशही विशिष्ट पद्धतीने करावा लागतो .पायाखालून सतत पाणी वाहत असते .तिरके तिरके होत खडकाचा आधार घेत गुहेतून जावे लागते.आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो होतो .गर्दीचा हंगाम असल्यामुळे आम्हाला नव्या गुहेतून जावे लागले .अठ्याण्णवफूट लांबीची जुनी गुहा आम्हाला पाहायला मिळाली नाही.दर्शनाची एकच रांग होती .आम्हाला दोन रांगा कुठेही पाहायला मिळाल्या नाहीत .

माता वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाले .भैरवनाथाला त्रिशुळाने मारल्यानंतर त्याचे शिर ज्या दरीमध्ये पडले तिथे भैरवनाथाचे मंदिर आहे .भैरवनाथाने मरताना क्षमेची याचना केली.मातेने त्याला क्षमा करून तुझे दर्शन घेतल्याशिवाय माझी यात्रा पुरी होणार नाही असा वर दिला .भैरवनाथाचे दर्शन करून आम्ही डोलीतून पर्वताच्या दुसऱ्या बाजूने उतरायला सुरुवात केली .पर्वताला वळसा मारून अर्ध्यावरती आम्ही पहिल्या रस्त्याला येऊन मिळालो.

*अंगावर येणारा अतिशय उंच पर्वत,

*पायथ्याला वसलेले कटरा गाव,

*पर्वतावर चढत जाणारा नागमोडी रस्ता, 

*वाटेत खानपानाची व्यवस्था ,

*रात्रीही प्रकाशाने उजळलेला पर्वत,

*माता वैष्णोदेवीच्या तीन पिंडीचे दर्शन ,

*भैरवनाथ,

*गुहेतून तिरके तिरके होत खाली पाणी वाहत असताना केलेला प्रवास,

*पर्वतावरून उंच स्थानावरून दिसणारे विहंगम दृश्य,

*मातेचा जयघोष करीत वाहणारा भक्तांचा अखंड ओघ,

*त्यांची भाविकता, 

*त्यांचे मातेच्या दर्शनासाठी व्याकुळलेले मन, 

* सर्व काही मनोपटलावर रेखाटलेले आहे. * 

*मला तीर्थ स्थानातील देवदेवतांचे दर्शन घेणे तर आवडतेच, पण त्यापेक्षाही तेथे येणारे भाविक ज्या व्याकूळतेने तेथे येत असतात त्यांच्याकडे बघणे जास्त आवडते .*

*त्यांची दर्शन व्याकुळता स्वतःमध्ये नाही याबद्दल खंत वाटते का?या वस्तुस्थितीचे मी साक्षित्व करीत असतो .*

*असा हा माता वैष्णोदेवीचे दर्शन प्रवास* 

७/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel