दादांची बायको माझ्या गावचीच होती. मी तिला वयनी म्हणत असे. तिचा गावचाच मी असल्यामुळे एक प्रकारे तिच्या माहेरचाच मी होतो; परंतु ती माझ्या आतेभावाची पत्नी असल्यामुळे मी तिला सासरच्या माणसापैकीही एक वाटत असे. त्यामुळे कधी ती माझ्याशी गोड बोले; तर कधी ती रागवे. कधी माझे उष्टे ती मला काढावयाला लावी, तर कधी मी आपण होऊन काढू लागलो तर 'राहू द्या हो भावोजी. मी काढीन. जा तुम्ही.' असे गोड शब्दांत सांगावयाची. एखादे वेळेस वयनी रागावलेली असली म्हणजे स्वत:च्या लहान मुलीस ती बदड बदड बदडायची. सासुरवासिनीस स्वत:च्या सत्तेची एकच वस्तू असते व ती म्हणजे तिचे मूल. कोठे तरी राग काढावयास जागा पाहिजे असते, ती मुलांच्या पाठीवर तिला मिळत असते. पुण्याला मी मामीच्या मुलीस खेळवीत असे. येथे कापदापोलीस आतेभावाच्या मुलीस खेळवावे लागे. वयनीच्या मुलीला मी घेऊन गेलो म्हणजे वयनी प्रसन्न असे.

आत्याचा जगन्नाथ हा सर्वांत लहान मुलगा. तो तात्या व आत्या यांचा लाडका होता. कारण लहानपणी आजारपणातून मरतामरता वाचला होता. तात्या त्याला लहानपणी 'रोंग्या' म्हणत असत. जगन्नाथ माझ्यापेक्षा दोन-अडीच वर्षानी लहान होता. जगन्नाथाचा आवाज गोड होता. जगन्नाथ व मी दोघेच लंगडीने खेळत असू. कधी चेंडूने गावठी क्रिकेट खेळत असू. एखादे वेळेस आत्याच्या मुली माहेरी आल्या असल्या म्हणजे त्या, मी, जगन्नाथ, वयनी सारी जणे चांदण्यात लंगडीने किंवा छाप्पोपाणी खेळत असू. आत्या किंवा तात्या किंवा सनातनी दादाही रागे भरत नसत.

आत्याकडची माझी चार वर्षे तशी सुखात गेली. तेथे विशेष त्रास नव्हता. त्रास जरा एकच असे व तो म्हणजे कधी कधी कराव्या लागणा-या कामाचा. पाऊस संपल्यावर मिरच्यांना पाणी नेऊन घालावे लागे. आत्याच्या विहिरीवर हातरहाट नव्हता. दोरीने पाणी खेचून काढावे लागे. त्यामुळे हाताला करकोचे पडत व हात दुखत. कधी मी दळावयास. भात भरडावयासही हात लावीत असे. कधी माझे उष्टे-शेण मलाच करावे लागत असे. पत्रावळीसाठी पाने आणावयास जावे लागत असे व पत्रावळी लावाव्या लागत असत. देवपूजा व फुले वेचणे ही कामेही पुष्कळदा माझ्याकडेच असत. परंतु मी कधी कुरकुर केली नाही किंवा वडिलांजवळ तक्रार केली नाही.

आत्याचे देवदेवतार्चन फार. त्यामुळे जेवणास सदैव उशीर होत असे. शाळा दीडपावणेदोन मैल दूर टेकडीवर. जेवण झाल्याबरोबर मी पळत पळत जात असे; तरीही घंटा सापडत नसे. 'रोज तुला उशीर कसा होतो ?' असे शिक्षक बोलत. तरी मी आत्याला ९ वाजले असले तरी ९ । ।  सांगत असे; परंतु आत्याच्या तुळशीच्या प्रदक्षिणा असत. त्या तिने आधी घातल्या नाही तर दुपारी ऊन होत असे. उन्हाचा तिला त्रास होई. तिचेही खरे व मला उशीर होई ही गोष्टही खोटी नव्हती.

शेवटी एके दिवशी मी न जेवता उपाशीच शाळेत गेलो. नेमके त्याच दिवशी माझे वडील तेथे आले होते. त्यांना कळले की, मी न जेवता शाळेत गेलो. आत्याला वाईट वाटले. दुस-या दिवसापासून श्यामला जर लौकर भातभाजी मिळू लागली. त्याग केल्याशिवाय कोणतेही फळ मिळत नसते. 'त्यागेन एकेन अमृतत्वमानशु:' एक दिवसाच्या अन्नत्यागाने मी कायमचे लौकर जेवण प्राप्त करुन घेतले. 'स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्' थोडाही त्याग मोठया संकटापासून वाचवू शकतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel