मला आता रडे आवरेना. मी भरपूर मुकाटयाने रडलो. परंतु किती वेळ रडणार ? उद्या सकाळी   माझ्या नशिबी काय आहे, ते मला कळेना. ते पुजारी मला मामांकडे का घेऊन जातील ? मामा काय म्हणतील ? त्या वाडयातील सारे काय म्हणतील ? माझ्या तोंडात सर्वजण शेण घालतील. ते सारे अपमान, तो फजितवाडा माझ्या डोळयांसमोर उभा राहिला. दिंडीदरवाजा उघडून पळून जाऊ या, असेही मनात आले. मी खरोखरच उठलो व अंगणातील दरवाज्याजवळ गेलो. आकाशातील प्रशांत तारे माझ्याकडे पहात होते. दरवाज्याजवळ मी उभा राहिलो; परंतु कडी काढण्याचे धैर्य होईना. मी रात्री कोठे जाऊ ? पोलीस पकडतील अशी भीती वाटे. शेवटी मी पुन्हा त्या घोंगडीवर येऊन बसलो.

गार वारा सुटला. मला थंडी वाजू लागली. ते थंडीचे दिवस होते. मी जमिनीवर निजलो व ती घोंगडी अंगावर घेतली. त्या फाटक्या घोंगडीने माझा थंडीपासून बचाव केला. या श्यामचा तिने सांभाळ केला. विचारात व चिंतेत मग्न असताना केव्हा तरी हळूच निद्रामाउलीने येऊन माझे डोळे मिटले. सकाळी मला उठवीपर्यंत मी त्या घोंगडीखाली-गोपाळ कृष्णालाही आवडणा-या त्या घोंगडीखाली-शांत झोपलो होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel