दगडालाही भावना असतात, असे आपण ठरविले आहे. दगडाच्या न बोलत्या देवाला मोदक आवडतात की लोणीसाखर आवडते, हे आपण ठरविले; परंतु आजूबाजूला लाखो बोलणारे चैतन्यमय देव आहेत, त्यांना दुपारी नैवेद्य मिळाला की नाही, याची मात्र वास्तपुस्त आपण घेत नाही. दगडाच्या देवाला सोन्याचांदीचे मुकुट आहेत. त्यांच्या कासेला पीतांबराची धटी आहे; परंतु सभोवतालच्या लाखो बंधूंना थंडीच्या दिवसांत डोक्याला बांधावयास फडके नाही व अंगावर घालावयाला चिंधी नाही. काय ही मूर्तिपूजा ! त्या मूर्तीत जर खरोखर देव असेल तर तो काय म्हणेल ? ईश्वराची लाखो लेकरे अन्नान्नदशेत असताना त्या दगडांच्या देवाला अन्नकोट रुचतील का ? लाखो लेकरांना पांघरायला नाही, देवाला पीतांबर रुचतील का ? तुमचे पीतांबर देवाला सापासारखे वाटतील. तुमची ती चंदनचर्चने देवाला निखा-याप्रमाणे वाटतील. तुमचे ते मुकुट देवाला काटयाप्रमाणे वाटतील. एखाद्या भाग्यवंत मातेला बरीच मुले असावीत; परंतु त्या मुलांतील एक दोन मुले इतरांपेक्षा प्रबळ झाली. समजा, इतर भावांची हे दोन भाऊ मुळीच काळजी घेत नाहीत, त्यांना ना देत खायला, ना देत प्यायला; परंतु भावांना जरी विचारीत नसले तरी ते दोन भाऊ आईकडे जातात व म्हणतात, 'आई ! तुझ्यावर आमची भक्ती आहे. ही घे तुला पैठणी. हे घे मोत्याचे दागिने.' त्यावेळेस माता काय म्हणेल ? ती म्हणेल, 'बाळांनो ! इतर भावांना तुम्ही लाथा मारता. त्यांना घासही तुम्ही देत नाही, त्यांची चिंता वहात नाही. मला हे कसे घेववेल ? माझ्या मुलांना आधी द्या. त्यांना मिळाले म्हणजे मला पोचले. माझ्या मुलांचे गाल वर आले म्हणजे माझेही गाल आनंदाने फुलतील. माझ्या मुलांना अंथरा-पांघरायला, नेसायला मिळाले म्हणजे सारी महावस्त्रे मला मिळाली; परंतु हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत या वस्तूंना माझ्याच्याने कसा हात लाववेल ? तुम्ही प्रेमाने मला नटविलेत तरी मी शोकाग्नीने जळूनच जाईन.' सा-या भावांनी प्रेमाने परस्परांची काळजी वहात एकत्र नांदणे यात मातेची खरी पूजा असते.

परमेश्वराला आपण एकीकडे माता म्हणतो व दुसरीकडे त्याच्या लाखो लेकरांना लाथा मारतो. परमेश्वर जर खरीखुरी माता असेल तर मातेजवळ सर्व लेकरांना का जाता येऊ नये ? अस्पृश्यांना, हरिजनांना मनात आले तर या मातेच्या पायांजवळ का जाता येऊ नये ? त्या हरिजनांना तर दूर ठेवतो ! त्यांना दूर करताच दगडात देव न राहता तेथे दगडच राहतो व त्याच्यासमोर हात जोडणाराही दगडच उभा असतो. दूर असलेल्याबद्दल मातेला काळजी. त्याप्रमाणे ज्याला सर्वांनी दूर ठेविले आहे त्याच्याजवळ देव असणार.

लोक म्हणतात, 'हरिजन सर्वत्र आले तरी चालतील; परंतु मंदिरांत नाही येता कामा,' मी म्हणेन, 'इतर जागी नका येऊ देऊ; परंतु मंदिरात तर आधी येऊ दे.' मंदिराला मंदिरत्व तरच येईल. तरच त्या दगडाला देवपण येईल. ईश्वरासमोर मी ब्राह्मण, मी उच्च, असे भेद का माजवावयाचे ? सारे भेद जेथे विसरावयाचे, तेथेही भेदांचा बुजबुजाट करावयाचा का ? बाहेर परस्परांवर भुंकतोच; परंतु मंदिरात ईश्वराच्या समोर एकमेकांवर भुंकावयाचे का ? तेथेही आपली जानवी, आपल्या शेंडया, आपली गोत्रे, आपली नावे, आपली आडनावे, यांची विस्मृती नाही का होऊ द्यावयाची ! हे उच्चपणाचे बिल्ले, ही श्रेष्ठ वर्गाची पदके छातीवर लटकावून का त्या त्रिभुवन-सुंदराजवळ, कारुण्यसिंधूजवळ, त्या जगन्माऊलीजवळ जावयाचे ?

'तेथ जातीव्यक्ती पडे बिंदुले'


अरे ! देवासमोर जातीव्यक्तीच्या नावाने शून्याकार होऊ दे. तेथेही मोठेपणा मिरवणार का ? तेथे मातीचे कण व्हा, पाण्याचे बिंदू व्हा व त्या अनंतात मिसळा. येऊ देत सारे. येऊ देत आईजवळ सारी लेकरे. पावित्र्य व प्रेम यांचा पूर होऊ दे क्षणभर ! भेदातीतता, अद्वैत सर्वांना अनुभवू दे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel