फार काळापूर्वी एक त्वष्टा नावाचा प्रजापती होऊन गेला. त्याचा एक पुत्र होता कुषध्वज. तो दान धर्म करत असे. एकदा इंद्राने त्याला मारून टाकले. यावर प्रजापतीने क्रोधाने आपल्या जटेतील एक केस काढून अग्नीत टाकला. तेव्हा अग्नीतून वृत्रासुर नावाचा राक्षस उत्पन्न झाला. प्रजापतीच्या आज्ञेवरून वृत्रासुरने देवताना युद्ध करून पराभूत केले, इंद्राला बंदी बनवले आणि स्वर्गावर राज्य करू लागला. काही काळानंतर देवगुरु बृहस्पती तिथे आले आणि त्यांनी इंद्राला बंधनमुक्त केले. इंद्राने त्यांना स्वर्ग परत मिळवण्याचा उपाय विचारला तेव्हा ते म्हणाले की इंद्र तू त्वरित महाकाल वनात जा आणि तिथे खंडेश्वर महादेवाच्या दक्षिणेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन पूजन कर.
इंद्राने महाकाल वनात जाऊन शिवलिंगाचे पूजन केले. भगवान शंकराने प्रकट होऊन इंद्राला वरदान दिले की माझ्या प्रभावाने तू वृत्रासुर सोबत युद्ध कर आणि त्याला पराभूत कर. इंद्राने वृत्रासुरचा नाश केलाल आणि स्वर्गाचे राज्य पुन्हा मिळवले. इंद्राच्या पूजनामुळे हे शिवलिंग इंद्रेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन पूजन करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि इंद्राप्रमाणे तो स्वर्गाला प्राप्त करतो.