एकदा शंकर पार्वती दोघे महाकाल वनात भ्रमण करत होते. तिथे गणपती काही बालकांसोबत खेळत होता. शंकराने पार्वतीला सांगितले की हा जो बालक फुलांनी खेळतो आहे, तो बाकी त्याच्यावर पुष्पवृष्टी करणाऱ्या बालकांना खूपच प्रिय आहे. शंकराने तो बालक पार्वतीला दिला. पार्वतीने पुत्राला पाहण्याच्या इच्छेने आपली सखी विजया हिला सांगितले की तू जाऊन गणेशाला घेऊन ये. विजया बालकांच्या त्या समूहात गेली अन गणेशला मनवून कैलासावर घेऊन आली. इथे गणेशाला त्यांनी अनेक अलंकार आणि चंदन, पुष्प यांनी सजवले आणि शंकराच्या गणांत खेळायला सोडले. बालक तिथे देखील पुष्पांनी खेळत राहिला. पार्वतीने शंकराकडे वरदान मागितले की हा माझा बालक असून त्याला तुम्ही वरदान द्या की त्याची पूजा सर्वात आधी होईल, आणि पुष्पांशी खेळत असल्याने त्याचे नाव कुसुमेश्वर होईल. शंकराने सांगितले की जो मनुष्य कुसुमेश्वराचे पूजन करील त्याला कधीही कोणतेही पाप लागणार नाही. कुसुमेश्वराचे जो कोणी फुले वाहून पूजन करील तो अंती शिवलोकात जाईल. शंकराच्या वरदानामुळे कुसुमेश्वर शिवलिंग रुपात महाकाल वनात स्थापित झाला.