ऐकून आलो. आम्ही निराधार आहोत. घर ना दार आहे का अशी वसाहत?’

‘ती स्वराज्यवाडी?’

‘तीच असेल. दिवस उजाडला म्हणजे जाऊ विचारत.’

‘माझा टांगा तिकडेच जात आहे. रिकामा आहे. येणारी माणसे आली नाहीत. तुम्ही येता? नेतो.’

‘आम्ही पायी येऊ,  दादा, तुम्हीही काँग्रसचे दिसता! खादी आहे.’

‘मी त्या स्वराज्यवाडीतच राहतो. चला. खरेच चला. मुलेबाळे घेऊन केव्हा येणार चालत? कोठे आहे सामान? एवढेच?’

‘हो. आम्ही उचलून ठेवतो.’

‘तुम्ही मुलांना उठवा. मी टांगा घेऊन येतो.’

रमाने मुलांना उठवले. सारी टांग्यात बसली. सिंधु, रमेश, उमेश पुढे बसली होती. कृष्णनाथाच्या डोळयांतुन पाणी येत होते.
‘तुम्ही रडतासे?’  सिंधुने विचारले.

‘तुम्ही थंडीत कुडकुडत होता म्हणून वाईट वाटले!’

‘थंडीत कुडकुडणारेच ज्या देशात फार आहेत, तेथे कुणी कुणासाठी रडावे?’ रघुनाथ पाठीमागून म्हणाला.

टांगा स्वराज्यवाडीत आला. कृष्णनाथाच्या पर्णकुडीसमोर थांबला.

‘विमलताई आल्या’ असे म्हणून मंडळी आली. तो टांग्यातून निराळीच मंडळी उतरली.

‘एक नवीन कुटुंब आपल्या स्वराज्यवाडीत आले आहे. फार दुरुन आले आहे!’ कृष्णनाथ म्हणाला.

‘आपल्या स्वराज्यवाडीची कीर्ती सर्वत्र जात आहे.  तरी ना कुठे जाहिरात, ना गाजावाजा!’

‘सूरतसे कीरत बडी! बिनपंख उडत जाय.’  रघुनाथ म्हणाला.

‘आई, घरात जायचे?’ सिंधूने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel