‘माझ्या मनात एक विचार आला आहे. कस्तुरबा फंडाला देऊन टाक! या तालुक्यासाठी तेथे आदर्श विद्यालय आपण करु. मी सृतिकाशास्त्र शिकून यावे म्हणते. आजूबाजूंच्या खेडेगावांतून स्त्रियांमध्ये हिंडत जाईन. जवळ साधी औषधे. मुलांनाही तपाशीन. खरुज, दुखरे डोळे, सारे पाहात जाईन. कस्तुरबांच्या स्मारकांतून स्त्रीसेविका निघाव्यात अशी इच्छा आहे. मी सेविका होऊ इच्छिते. जाऊ का कृष्णनाथ?’

‘ये शिकून. या पंचक्रोशीत आपल्या त्या वाडयाचे आरोग्यधाम कर! विमल, तू अशी सेवा करीत हिंडशील, औषधे देशील, गोड बोलशील! लहान मुलांना खाऊ देशील. तू देवता होशील. प्रकाशदेवता, प्रेमदेवता!’

‘कृष्णनाथ, परंतु हा प्रकाश, हे खरे प्रेम मला कोणी शिकविले?’

‘महात्माजींनी!’

‘माझा महात्मा तू!’  असे म्हणताना तिच्या डोळयांतून अश्रू आले. स्वराज्यवाडीतील स्त्री-पुरुषांनी विमलताईस निरोप दिला. ती शिकायला गेली.

‘आपल्या स्वराज्यवाडीतून तुमच्या आरोग्यधामास आम्ही मदत करु!’  ते सारे म्हणाले.

‘परंतु ताई, आम्हांला नका सोडून जाऊ. विसरु नका!’

‘अरे, मी शिकून येथेच येणार आहे. जेथे कृष्णनाथ तेथे मी! जाऊन येऊन येथेच मी विसाव्याला येईन. दमली भागलेली पक्षीण घरटयात येते, तशी मी येथेच येईन! माझे विशाला घर असले तरी हे छोटे घर मला हवेच!

रघुनाथ, रमा मुलांसह एका धर्मशाळेत होती. मोठी मुलगी सिंधु आजारी होती. वाटेतच तिला ताप भरला. सिंधु मोठी गोड मुलगी होती. आईला मदत करायची, लहान भावंडांना खेळवायची. तिच्यावर आईबापांचा जीव! सिंधु आपली संजीवनी आहे असे त्यांना वाटै. वाटेतील एका स्टेशनवर ती उतरली आणि धर्मशाळेत राहिली.

सिंधुचा ताप आज उतरला होता.
‘कसे वाटते बाळ?’ आईने विचारले.

‘आई, मी मेले असते तर तेवढेच एक तोंड कमी झाले असते. लहान भावंडांना अधिक देता आले असते!’ ती म्हणाली.

‘असे नको हो मनात आणू. देव पुरेसे देईल. बरी हो बाळा! मनाला लावून घेऊ नकोस!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel