( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

सागर भारतात एमएस्सी झाला.आणि नंतर पीएचडीसाठी, पुढील संशोधनासाठी युनायटेड स्टेट्समध्ये गेला.तिथे त्याने कोणत्यातरी रसायनामध्ये संशोधन केले.यशस्वीपणे पीएच डी मिळवली. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने त्याला व्याख्याता आणि पीएच डी साठी (गाइड) मार्गदर्शक म्हणून हार्वर्ड विश्वविद्यालयात   सन्मानपूर्वक नोकरी दिली. सागर अमेरिकेत गेला त्यावेळी फक्त संशोधनासाठी जाणार, पीएच डी मिळाली, शिक्षण पूर्ण झाले की भारतात परत येणार, असा त्याचा विचार होता.आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला व्हावा अशी त्याची इच्छा होती.भारतात परत येण्याला आणखी एक कारण होते.तेच कारण जास्त महत्त्वाचे होते.आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता.आईवडील परदेशात येऊन आपल्याकडे राहणार नाहीत. त्यांना तिथे करमणार नाही.त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांच्याजवळ असले पाहिजे असे त्याला वाटत होते. त्यांची सेवा करणे आपले कर्तव्य आहे अशी त्याची भावना होती.त्यामुळे तो शिक्षण पूर्ण झाले की भारतात लगेच परतणार होता.प्रेम व कर्तव्य त्याला भारतात परत बोलावीत होते.     

शिक्षण पूर्ण झाले तो भारतात परत येणार होता एवढय़ात त्याला सन्मानपूर्वक लठ्ठ पगाराची नोकरी अमेरिकेत,जिथे त्याने संशोधन केले त्याच हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत मिळाली होती. कांही वर्षे तेथेच नोकरी करावी आणि मग भारतात परत यावे असा विचार तो आता करू लागला होता.त्याने त्याच्या आई वडिलांना फोन केला त्यांची परवानगी घेतली.इतकी चांगली नोकरी तुला लगेच मिळत आहे.ते तुला आपण होऊन बोलवीत आहेत तर अवश्य स्वीकार असे त्यानी सांगितले.

अमेरिकेतच नव्हे तर   कोणत्याही देशात, तो ऑस्ट्रेलिया असो, जर्मनी असो, किंवा स्वित्झर्लंड असो,शिकायला जाताना जे विचार असतात ते पुढे कायम राहात नाहीत.असा सर्वसाधारण अनुभव आहे.प्रथम मनुष्य कांही वर्षे नोकरी करतो पैसे मिळवतो आणि मग परत येतो असे म्हणत असतो.नंतर तिथे प्रेमविवाह होतो,एखादे वेळी अमेरिकेत जाण्यापूर्वीच त्याचे लग्न जुळलेले असते किंवा भारतातील मुलीशी विवाह जुळविणार्‍या  संस्थांमार्फत विवाह  केला जातो.हळूहळू मनुष्य त्या वातावरणात रुळतो.तेथील रस्ते त्याच्या सवयीचे होतात.तेथील स्वच्छता त्याच्या अंगवळणी पडते.तेथील जीवनपद्धती आपल्या नसा नसात केव्हा भिनली तेच त्याला कळत नाही.तरीही तो मी परत येणार आहे असे कांही वर्षे म्हणत राहतो.मुले होतात.मुले शाळेत जाण्याअगोदर म्हणजे अगदी लहान असताना जर तो भारतात परत येऊ म्हणाला तर येऊ शकतो.एकदा मुले शाळेत जाऊ लागली की तेथील शिक्षणपद्धती मुलांच्या सवयीची होते.मुले इकडे आल्यावर येथे अॅडजेस्ट होऊ शकत नाहीत.मुलेच काय त्यांचे आईवडीलही येथे स्वत:ला सामावून घेऊ शकत नाहीत.येथे आल्यावर त्यांना पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखे वाटू लागते.थोडक्यात तिकडे परदेशात जो गेला तो गेला.जाणारे शंभर आणि परत येणारा एखादाच असा सर्वसाधारण अनुभव आहे.

सागरचेही बहुधा तसेच होणार असे वाटू लागले होते.प्रथम शिक्षणासाठी तो तेथे गेला.नंतर चांगली नोकरी चालून आली त्यामुळे तेथे राहिला. अर्थात आईवडिलांची परवानगी त्यासाठी त्याने घेतली होती.मुलाला एवढी चांगली नोकरी मिळते असे म्हटल्यावर आई वडीलही त्याला ती नोकरी तू कर. कांही दिवस परदेशात रहा. तुझ्या इच्छेप्रमाणे वाग असे स्वाभाविकपणे सांगतात.नोकरी करू नको. इकडे ये. असा सल्ला कसा काय ते देणार ?

सागरचे वडील अण्णासाहेब व आई माईसाहेब यांना त्याचे लग्न अशा एखाद्या मुलीशी व्हावे असे वाटत होते की जिच्या ओढीमुळे,तो भारतात परत येईल.सागर एकुलता एक होता.अर्थातच तो लाडका होता.त्याने आपल्या जवळ येऊन राहावे असे त्यांना उत्कटतेने वाटत होते.त्यांना परदेशी जीवनपद्धती भाषा वातावरण कायमचे राहण्यासाठी पचनी पडणे कठीण होते.पैसा असला तरी तो सर्व कांही देऊ शकत नाही.म्हातारपणी दुखले खुपले पाहायला,आपली काळजी घ्यायला, आपला मुलगा आपली मुलगी आपल्या जवळ असावी असे स्वाभाविकपणे आई वडिलांना वाटत असते.सागर जर तिथे एखाद्या अमेरिकन मुलीच्या गळ्यात पडला.किंवा अमेरिकन मुलगी त्याच्या गळ्यात पडली.तरी त्याचा शेवट एकच होणार.सागरच्या परतीच्या वाटा बंद होणार.अमेरिकन मुलगी मग ती जरी भारतीय असली तरीही त्या संस्कृतीत वाढली मोठी झाली तिला भारतात कायम राहण्याची कल्पना पचनी पडणे शक्य नव्हते.  

त्यांनी सागरला तुझ्यासाठी आम्ही येथे मुली पाहतो. आम्ही पसंत केलेल्या मुलीला  आॅनलाईन तूही पाहा. तिच्याशी बोल तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केले तरच आपण पुढे जाऊ असे सांगितले.या सगळ्यामागे सागरने लग्न करावे हा तर हेतू होताच.लग्नाचा विषय काढला की तो टाळाटाळ करीत असे.शिक्षण पुरे होऊ दे.नोकरी लागू दे.नोकरीमध्ये स्थिर होऊ दे. मग बघू असा एकूण त्याचा खाक्या होता.

जरी मुलेमुली मोकळेपणाने मागील पिढीपेक्षा अलीकडच्या काळात  एकमेकांत मिसळत असली तरी अजूनही ठरवून केलेली लग्नेच मोठ्या प्रमाणात होत असतात.वधू वर विवाह मंडळे पन्नास वर्षांपूर्वीही होती.महाजालामुळे स्मार्टफोनमुळे त्यांचे स्वरूप बदलले आहे.गाभा तोच आहे.वधू वर मंडळे आजही आहेत.सागरची संमती मिळताच त्यांनी दोन चार विवाह मंडळात त्याचे नाव नोंदवले.नेटमुळे व्हॉट्सअॅपमुळे स्मार्टफोनमुळे पत्रिका पाठवा, फोटो पाठवा, स्वतः भेटायला जा, मुलगी दाखवा इत्यादी गोष्टींची गरज राहिलेली नाही.

एकदा तुम्ही फी भरली की तुम्हाला लॅपटॉपवर मोबाइलवर कम्प्युटरवर लग्नेच्छू मुली,मुलगे पाहायला मिळतात त्यांची सर्व  माहिती मिळते.आपल्याला हवी असेल ती चौकशी करता येते.मुलीशी, मुलाशी आॅनलाईन बोलता येते.व्हीडिओ कॉल करता येतो.जवळजवळ प्रत्यक्ष भेट झाल्यासारखीच स्थिती असते.तिच्या,त्याच्या आशा आकांक्षा, अपेक्षा, इच्छा, कल्पना, लक्षात येतात.मुलगा मुलगी परस्परांशी गप्पा मारू शकतात.अशा भेटीनंतर पुढे वाटल्यास प्रत्यक्ष भेटता येते.

तर अण्णासाहेब व माईसाहेब या सागरच्या आईवडिलांनी, प्रथम मुली पाहायला सुरुवात केली.सागरने तुम्ही प्रथम निवडा. मग मी तिला पाहीन व तिच्याशी बोलेन. मग आपण पुढे जाऊ असे त्यांना सांगितले होते.

थोडक्यात अण्णासाहेब व माईसाहेब जोरात कामाला लागले होते.त्यांनी सागरचे नाव,फोटो, पत्रिका, शिक्षण, नोकरी, पगार,अपेक्षा, इत्यादी सर्व गोष्टी आॅनलाईन टाकल्या होत्या.सागरचे स्थळ आकर्षक होते.सागर स्वतःही बऱ्यापैकी आकर्षक होता.त्यामुळे अनेकांचे तो लक्ष्य होता!

अण्णासाहेब व माईसाहेब  संभाव्य वधूंचे फोटो लॅपटॉपवर पाहात असताना कांचनच्या फोटोकडे त्यांचे लक्ष गेले.त्यांनी ज्याप्रमाणे फोटो पाहिला त्याप्रमाणे शिक्षण,वय,अपेक्षा इत्यादी गोष्टीही पाहिल्या.अपेक्षांमध्ये त्यांना आकर्षक वाटणारी गोष्ट म्हणजे मुलगा भारतात राहणारा हवा ही स्पष्ट सांगितलेली अट होती.

कांचन तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती.त्यासाठी तिची मुख्य अट मुलगा भारतातील पाहिजे इथे राहणारा पाहिजे ही होती.त्याचप्रमाणे तिच्या आईवडिलांची जबाबदारी तिच्यावर आहे हे ज्याला मान्य आहे असा मुलगा पाहिजे अशी होती.बाकी सर्व दृष्टीनेही अण्णासाहेब व माईसाहेब   या दोघांच्या मतानुसार कांचन सागरला अनुरूप वाटत होती.

अण्णा व माईनी महाजालाच्या साह्य़ाने,गप्पा मारल्या त्यांच्या अपेक्षा सांगितल्या. तिच्या अपेक्षा जाणून घेतल्या.तिला प्रत्यक्ष दोघे भेटले. तिच्या आई वडिलांनाही भेटले.नंतर त्यांनी तिची ओळख सागरशी अर्थातच महाजालामार्फत करून दिली.  

सागर व कांचन यांच्या आता रोज( महाजालामार्फत) भेटी होऊ लागल्या.दोघांच्या वेळेमध्ये साधारण बारा तासांचा फरक होता.कांचन तिच्या ऑफिसमधून संध्याकाळी सहा वाजता मोकळी होत असे.त्यावेळी सागर नुकताच उठलेला असे किंवा उठत असे.साधारण आठची वेळ दोघांनाही गप्पांसाठी सोयीची होती.कांचन घरी येऊन ताजीतवानी झालेली असे.सागर स्नान वगैरे करून ब्रेकफास्टसाठी तयार असे.नऊ साडेनऊला त्याला हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत कामावर जावे लागे.दोघेही आठ ते नऊ या वेळात एकमेकांशी गप्पा मारीत असत. एकमेकांना भेटत असत.

कांचनने पहिल्याच भेटीत स्पष्टपणे सागरला सांगितले होते.मी आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे.त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे.कर्तव्य व प्रेम दोन्ही दृष्टीने त्यांच्या म्हातारपणी मी त्यांच्याजवळ असणे गरजेचे आहे.हे ज्याला मान्य असेल त्याच्याशीच मी लग्न करणार आहे.भाऊ व ताई(कांचनचे वडील व आई) यांच्याशी माझ्याप्रमाणेच त्यांच्या जावयाचे संबंध असले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे.तू अमेरिकेत राहतोस.तुला तिथे लठ्ठ पगाराची नोकरी आहे.जर तू तिथेच राहणार असशील तर आपण पुढे न गेलेले बरे.  त्यावर सागरने माझीही तुझ्यासारखीच परिस्थिती आहे.मी एकुलता एक आहे.मी येथे केवळ उच्च शिक्षणासाठी आलो आहे.इथे मला आपणहून नोकरीची ऑफर मिळाली. नोकरी चांगली होती म्हणून मी ती आई बाबांच्या परवानगीने स्वीकारली.मी भारतात परत येणार आहे.

त्यावर कांचन स्पष्टपणे म्हणाली,इच्छा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये अंतर असते.तुझी इच्छा असली तरी शेवटी कांही ना कांही कारणाने सबबी सांगून परदेशात गेलेले लोक तिकडेच राहतात असा सार्वत्रिक अनुभव आहे.तू इकडे केव्हां येणार ते निश्चित कर .मगच तुझ्या बोलण्याला कांही अर्थ आहे.    

त्यावर विचार करीत   सागर म्हणाला,लवकरात लवकर एक वर्ष किंवा जास्तीत जास्त दोन वर्षांनी मी भारतात परत येणार आहे.पीएचडीसाठी गाइड म्हणून मी येथे काम करीत आहे.त्याचप्रमाणे मी लेक्चरर म्हणूनही काम करीत आहे.मी आणखी विद्यार्थी गाईड करण्यासाठी स्वीकारणार नाही.आहे यांचे काम पूर्ण झाले की मी मोकळा होईन.नंतर मी भारतात परत येणार आहे.

दोघांनीही परस्परांना पाहताच एकमेकांना पसंत केले होते.लग्नगाठी कुठेतरी कुणीतरी निश्चित केलेल्या असतात असा एक अनुभव आहे.त्याची ती किंवा तिचा तो एकमेकांना भेटले की कुठेतरी ठिणगी पडते आपलेपणाची जाणीव निर्माण होते.पुढे गोष्टी नेहमीच्या वळणाने जातात.अपवाद वगळता सर्वसाधारण असा अनुभव आहे.इथेही तेच झाले हाेते.    

*शक्यतो रोज,कामाची गर्दी असेल तर कमी वेळ कां होईना दोघेही एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नसत.*

*सुटी असेल त्या दिवशी मनमोकळेपणाने जास्त वेळ गप्पा मारीत.*

*अशावेळी दोघे काय गप्पा मारतात असा प्रश्न अनेक जणांना पडतो.परंतु गप्पा मारणार्‍यांना तो प्रश्न पडत नाही!*

*थोडक्यात दोघांनीही आपल्या घरच्यांना ग्रीन सिग्नल दिला.*  

(क्रमशः)

११/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel