( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

ती कात्यायनी असेल तर तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेच पाहिजे.मला माझे कर्तव्य बजावलेच पाहिजे.ती खुनी आहे.ती मनोरुग्ण आहे.मला तिच्यापासून धोका संभवतो.मलाच काय ती अशीच मोकळी समाजात फिरत राहिली तर अनेक जणांना धोका संभवतो असे वाटत होते.

हॉलमध्ये थोडा वेळ मी विचार करीत स्तब्ध उभा होतो.ती आल्यापासून माझ्या सहवासात   जवळजवळ दीड दोन तास होती.त्या काळात तिच्यामध्ये वेडेपणाचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते.  

शेवटी पोलिसांना बोलावण्याचे मी ठरविले.आणि पोलिसांचा नंबर फिरवला.

पोलिसांनी फोन करण्याचे कारण विचारले.

मी: एक संशयास्पद मुलगी माझ्याकडे आली आहे.     पोलिस:मग मी काय करू? 

मी:कात्यायनी नावाची एक  

मनोरुग्ण पळून गेल्याची

बातमी तुमच्याकडे आली  

असेलच? 

पोलिस:अशी कांहीही तक्रार

आमच्याकडे आलेली नाही.

मी:असे काय करता?न्यूजमध्ये पुन्हा

पुन्हा ते सांगत होते की

ती मुलगी कुणालाही 

दिसल्यास ताबडतोब

पोलिसांकडे  तक्रार करा.  

पोलीस:हा नंबर लॉस्ट ऍण्ड

फाऊंडचा नाही.तुम्ही *****  

नंबरवर फोन करा. 

त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला.त्याना सर्व हकिगत सांगितली.ती मुलगी कात्यायनी कशावरून असे त्याने विचारले.मला तसा संशय वाटतो. न्यूज चॅनेलमध्ये  त्यांनी जो फोटो दाखवला साधारण तशीच ती दिसायला आहे.तुम्ही येऊन खात्री करा.मी तिला खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून घेतली आहे.त्याचबरोबर त्यांना सांगितले कृपा करून सायरन वाजवत येऊ नका.त्यामुळे ती सावध होण्याचा संभव आहे.ती सशस्त्र आहे असा मला संशय आहे. 

पोलिसांना फोन केल्यावरही मी बरोबर केले की चूक केले या संभ्रमात होतो . 

थोड्याच वेळात मी दिलेल्या पत्त्यावर पोलीस आले.मी सूचना केल्याप्रमाणे त्यांनी येताना  सायरन वाजविला नव्हता.मी त्यांची   वाट पाहत खिडकीत उभा होतो. त्यांना पाहताच मी दरवाजा उघडला.त्याना घेऊन पाहुणी ज्या शयनगृहात होती तिथे गेलो.कुलूप कडी उघडली.पोलीस सशस्त्र तयारीतच होते.दरवाज्यावर थाप मारली.पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावला.पाहुणी गाढ झोपली होती.मी तिला तिचे नावही विचारले नव्हते.शेवटी कात्यायनी कात्यायनी म्हणून हाक मारायला सुरुवात केली.

आली आली म्हणत तिने दरवाजा उघडला.तिने हल्ला केला तर पोलीस तयारीत होते.तिच्याजवळ सुरा असल्याची माहिती होती.अॅम्ब्युलन्समधील दोघांचा सूर्‍याने खून करून ती पळाली होती.माझा लेंगा व शर्ट यामध्ये ती होती.अंगाबरोबर बसणारी जीन्स व टीशर्ट यामध्ये मोकळेपणाने वावरणे शक्य नव्हते.खोलीतील कपाटात तिला माझा ड्रेस मिळाला होता.माझ्या घातलेल्या ड्रेसमध्ये, झोपाळू अवस्थेतही ती आकर्षक दिसत होती.

पोलिसांकडे बघत तिने काय गडबड आहे म्हणून विचारले.त्याचबरोबर तुम्ही कात्यायनी कात्यायनी अशी हाक कां मारीत होता असेही विचारले.   तिच्या डोळ्यावर खूप झोप होती.ती खुनी असेल,मनोरुग्ण असेल, असे मुळीच वाटत नव्हते.पोलिसांबरोबर स्त्री इन्स्पेक्टर हाेती.तिने पाहुणीला  बेडय़ा अडकविल्या.तिने रागात हा काय चावटपणा आहे म्हणून विचारले.तिच्या एकूण बोलण्यावरून आणि अविर्भावावरून कांहीतरी गोंधळ   होत आहे.आपण गैरसमजाने भलत्याच व्यक्तीला कात्यायनी समजत आहोत असे पोलिसांना व मलाही वाटले.मनोरुग्ण कात्यायनीसारखी दिसणारी ही दुसरीच कुणीतरी मुलगी असावी.पोलिसांनी तिला तिचे नाव विचारले.मंदाकिनी बडजादे म्हणून तिने नाव सांगितले.तिला तिचा पत्ता विचारण्यात आला.तिने तिचा अहमदनगरचा पत्ता सांगितला.    

तू खोटे बोलत आहेस. मनोरुग्ण कात्यायनीचा फोटो तिला दाखवण्यात आला.ही तूच ना म्हणून तिला विचारले.तू दोन खून करून सकाळीच पळालीस.आम्ही तुझ्या शोधात होतो.या साहेबांनी आम्हाला बोलाविले म्हणून बरे झाले.नाहीतर तू पुन्हा पळून गेली असतीस.पोलिस म्हणाले.त्यावर ती तुमचा कांहीतरी गैरसमज होत आहे असे म्हणाली.  

तुला जे काही सांगायचे असेल ते पोलिस स्टेशनमध्ये सांग.मनोरुग्णालयाचे डॉक्टर  बोलवू.उगीचच निरपराध असल्याचा आव आणू नकोस.पोलिसांनी तिला सज्जड दम भरला.

ती म्हणाली मी पुन्हा  तुम्हाला सांगते.हा फोटो माझ्यासारखा दिसत असला.मी तिच्यासारखी किंवा ती माझ्यासारखी दिसत असली  तरी मी ती नाही.मी तुमची कात्यायनी नाही.माझे नाव मंदाकिनी आहे.माझे वडील अहमदनगर येथे पोलिस इन्स्पेक्टर आहेत.माझे काका येथेच जज्ज आहेत.मी तुम्हाला फोन नंबर देते.तुम्ही चौकशी करा.खोटे ठरल्यास मी तुमच्याबरोबर पोलिस स्टेशनला येईन.वडिल पोलिस इन्स्पेक्टर, काका जज्ज हे ऐकून पोलिस हादरून गेले.

तिने सांगितलेल्या फोन नंबरवर फोन करता तिचे वडील  खरेच पोलिस इन्स्पेक्टर असल्याचे आढळून आले.ही सर्व मंडळी काकांकडे गेली.बरोबर अर्थातच मीही होतो.तिचे काका खरेच जज्ज होते. काकांना उठवण्यास वेळ लागला.मंदाकिनी म्हणाली त्याप्रमाणे झोपेच्या गोळ्या घेऊन ते झोपले होते.उठल्यावरसुद्धा ते गुंगीमध्ये असल्यासारखे दिसत होते. 

सगळा प्रकार चालला असताना ती माझ्याकडे रागाने बघत होती.मला काय बोलावे ते सुचत नव्हते.तिच्या काकूची साडी तिने नेसली. माझा पोशाख मला देऊन टाकला.मी शरमेने चूर झालो होतो.पोलिसही माझ्यावर रुष्ट झाले होते.त्यांना त्रास दिला हे एक कारण व दुसरे पोलिस इन्स्पेक्टर व जज्ज यांच्यासमोर त्यांची फजिती झाली.त्यांच्याकडून दोघांनाही त्रास दिला गेला.

घरी आलो तरी साडीमधील तिची आकृती माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हती. एवढय़ा प्रकारानंतर  मला झोप लागणे शक्यच नव्हते.एवढे सर्व होईपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. 

मी प्रथम स्नान केले आणि ताजातवाना झालो.गरमागरम चहा करून घेतला.मंदाकिनीचा राग कसा काढावा याचा विचार चाललाच होता.तिची मोटार जवळच कुठेतरी होती.तिच्यात विशेष पेट्रोल नव्हते.घाईगर्दीत बाहेर पडताना तिची पर्स आंत राहिली होती. ती एखाद्या मेकॅनिकला घेऊन गाडीजवळ नक्की येणार.प्रथम दरवाजा उघडणार.नंतर पेट्रोल भरून ती आपल्या काकांकडे जाईल.तिला मोटारजवळ गाठण्याचे मी ठरविले.एक चावीवाला माझ्या माहितीत होता. आम्ही बंगल्यात निरनिराळे कुलपे बसविली तेव्हां प्रत्येक कुलुपाबरोबर दोन किल्या आल्या होत्या. आम्हाला आणखी एक दोन किल्ल्या करून घ्यायच्या होत्या.त्या आम्ही त्याच्याकडून करून घेतल्या होत्या.मी मोटारसायकल काढून प्रथम त्याच्याकडे गेलो.बंगल्यावरून निघताना मी पेट्रोल कॅन बरोबर घेतला होता.पेट्रोल पंपावर भरुन तो बरोबर घेतला.मोटारीजवळ तिची वाट पाहत थांबण्याची योजना बदलून मी काकांच्या बंगल्यावर गेलो.मला बघितल्यावर तिच्या कपाळावर आठय़ा पडल्या.काकांचा माझ्यावर राग दिसत नव्हता.मी जे काही केले ते त्या परिस्थितीत योग्य होते असे जज्ज साहेबांना वाटत होते.मोटार कशी उघडावी आणि त्यात पेट्रोल टाकून ती बंगल्यावर कशी आणावी अशीच त्यांची चर्चा चालली होती.

जज्जसाहेब कोर्टात गेल्यावर कांहीतरी व्यवस्था करणार होते.मी त्यांना प्रथम शुभ प्रभात म्हटले.त्यांनी या या म्हणून माझे स्वागत केले.मी त्याना किल्लीवाला बरोबर घेऊन आलो आहे.पेट्रोल कॅन भरून आणला आहे असे सांगितले. अरे वा तुम्ही तर पूर्ण तयारीत आला  आहात, जज्जसाहेब हसत हसत  म्हणाले.त्यावर मी स्मित करीत बोललो.काल मी तुमच्या पुतणीचा घोर अपराध केला आहे.त्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी मी तयारीत आलो आहे.या माझ्या बोलण्यावर तिच्या चेहऱ्यावर किंचित स्मित फुलले.चहा घेण्यासाठी काका मला आग्रह करीत होते. मी त्यांना प्रथम लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हटले.या माझ्या बोलण्यावर तिलाही चांगलेच हसू फुटले. काकासाहेब गडगडाटी हसले.

काल रात्री तिचे माझ्याबद्दल मत चांगले झाले होते.आम्ही तशा भरपूर गप्पा मारल्या होत्या.दोघांची चांगलीच ओळख झाली होती.मोटारीपर्यंत जाण्यासाठी तिला माझ्या मोटारसायकलवर मागे बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते.आम्ही मोटारीपर्यंत तिघेही गेलो.चावीवाल्याजवळ त्याची गाडी होती.

तिच्या पर्सचे विमोचन झाले.गाडीत पेट्रोल टाकण्यात आले.मी तिला गुडबाय म्हणून घरी जाणार होतो.तिने मला तिच्याबरोबर काकांकडे आलेच पाहिजे असा आग्रह केला.मगाशी तुम्ही चहा घेतला नाही.आधी लगीन कोंढाण्याचे असे म्हणालात. कोंढाण्याचे लग्न झाले.अाता रायबाचे झालेच पाहिजे.                                             

ती हसत हसत म्हणाली.एकूण काल ती जेवढी चिडली होती,आज सकाळी तिच्या कपाळावर आठय़ा दिसल्या होत्या, त्याचा आता मागमूसही दिसत नव्हता.

काल तिला पोलिस बोलवून त्यांच्या ताब्यात दिल्यामुळे जो तिचा जळफळाट झाला होता तो आता नाहीसा झाला होता.तिचा राग, तिचा रुसवा, दूर करण्यासाठी मला बरेच पापड पेलावे लागतील असे वाटत होते.परंतु आता गाडी रुळावर आलेली दिसत होती.आम्ही तिच्या काकांच्या बंगल्यावर पोहोचलो.तेथे चहा नाष्टा वगैरे  झाला.काका कोर्टात गेले होते.काकूंचा स्वभाव प्रेमळ होता. मी येथेच राहतो असे ऐकल्यावर अधूनमधून बंगल्यावर येत जा असे त्यानी  सांगितले. माझी व आई वडिलांची चौकशी केली.आई बाबा आल्यावर त्यांना बंगल्यावर घेऊन यायला सांगितले.

मी त्यांचा निरोप घेऊन निघालो.त्यांच्या बंगल्याच्या फाटकापर्यंत पोहोचवायला मला मंदाकिनी आली होती.मी तिला रात्री  डिनरला येणार का असे विचारले.त्यावर तिने काल ब्रेड ऑम्लेट आणि खिचडी व कॉफी झाली की असे हसत हसत म्हटले.माझ्या बंगल्यावर नाही आपण कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊ मी तिला सांगितले.त्यावर तिने कशाला म्हणून पृच्छा केली.काल मी केलेल्या पापांचे अजून पूर्ण परिमार्जन झाले नाही.तुम्ही डिनरला आलात म्हणजे तुमचा राग पूर्णपणे गेला.तुम्ही मला खरेच माफ केले असे मी समजेन.

त्या दिवशी रात्री ती डिनरला आली.काकांकडे ती दोनच दिवस राहणार होती.त्याऐवजी ती आणखी दोन दिवस राहिली.रोज आम्ही अर्थातच भेटत होतो.अहमदनगरला गेल्यावरही आम्ही व्हिडिओ कॉल व्हॉट्सअॅप याद्वारे सतत संपर्कात होतो.यात्रेहून आईबाबा आल्यावर मी त्यांना घेऊन मंदाकिनीच्या काकांकडे जज्ज साहेबांकडे गेलो.

*मंदाकिनी मला घेऊन एकदा नगरला गेली.तिच्या आई बाबांशी माझी भेट झाली.*

*एकूणच सर्वसंमतीने आमच्या लग्नाचा बार उडाला.*

*त्या दिवशी मंदाकिनीला काकांचे घर सापडले असते.पेट्रोल संपले नसते.पेट्रोल पंप जवळपास मिळाला असता.तर बहुधा माझी व मंदाची भेट झाली नसती.*

*शेवटी विवाह वगैरे योगायोगाच्या गोष्टी असतात हेच खरे* 

(समाप्त)

२७/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

(आपल्याला कदाचित कात्यायनीचे काय झाले त्याचे कुतूहल असेल म्हणून सहज जाता जाता सांगतो कात्यायनीला पकडण्यात आले आणि मनोरुग्णालयात पाठवण्यात आले.) 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel