( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी तिला विचारले,

"रात्री बारा वाजता तुम्ही एखादे कुटुंब वत्सल घर शोधत फिरणार आहात का?तथाकथित कुटुंबवत्सल घरात तुम्हाला धोका पोहोचणार नाही याची गॅरंटी काय?असे घर शोधीत असतानाच तुम्हाला धोक्याला तोंड द्यावे लागणार नाही कशावरून?माझ्या इथे तीन शयनगृहे आहेत.एकामध्ये तुम्ही झोपू शकता.तुम्ही शयनगृह आंतून लॉक करून घेऊ शकता.विचार करा नाहीतर मी दरवाजे बंद करून आता झोपायला जाणार आहे."

असे बोलून मी दरवाजा बंद करू लागलो. क्षणभर तिने विचार केला आणि तिने जरा थांबा असे म्हणत दरवाजातून आंत प्रवेश केला.                                 

तिने दिवाणखान्यात प्रवेश केल्यावर आता तिच्यावर पूर्ण प्रकाश पडला होता.दरवाजाबाहेर प्रकाश पुरेसा नव्हता.दरवाजावर कोण आले आहे ते पाहण्यापुरता कमी वॅटचा दिवा होता.ती वाटली होती त्यापेक्षा जास्तच आकर्षक आहे हे लक्षात आले.आता तिचा चेहरा व तिची शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती.जिथे हवी तिथे तिच्या शरीराला वक्रता व गोलाई होती.ती संकोची स्वभावाची असेल असे वाटत होते परंतु तिच्याशी बोलताना ती मोकळय़ा स्वभावाची आहे हे लक्षात आले.एका परक्या घरात, एका परक्या पुरुषाच्या संगतीत, तोही तो एकटा असताना,ती माझ्यावर अवास्तव विश्वास दाखवित आहे असे वाटत होते. मी तिला विश्वासार्ह वाटलो होतो याबद्दल मला समाधान वाटले.

तिचे जेवण व्हायचे असावे ही गोष्ट थोड्याच वेळात माझ्या लक्षात आली.मी तिला तुमचे जेवण झाले आहे का असे विचारले.त्यावर तिने नाही असे उत्तर दिले.तिला निघायला उशीर झाला होता.वाटेत तिने घाईघाईने काही स्नॅक्स घेतले होते.काकांचे घर शोधण्यात खूप वेळ गेला होता.तिच्या गाडीतील पेट्रोलही जवळजवळ संपले होते.ती रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकली नव्हती.आणि आता ती शेवटी माझ्या घरात माझ्यासमोर होती.मी तिला आता या वेळी बाहेर गेलो तरी रेस्टॉरंट बंद झालेली असतील.बाहेर जेवायला मिळणे कठीण आहे असे सांगितले.त्यावर तिने ठीक आहे एक दिवस उपवास केला तरी बिघडत नाही असे हसत हसत सांगितले.ती पुढे म्हणाली तुमच्या घरात दूध असेलच आपण कॉफी करू म्हणजे झाले.मला घरात कांही च्यॅव म्यॅव असले तरी चालेल.तिचा स्वभाव मोकळा  होता.मी तिला घरात ब्रेड व अंडी आहेत.दूध व कॉफी तर आहेच आहे.असे सांगितले.मी तिला आम्लेट ब्रेड चालेल का?खिचडीही थोडी शिल्लक आहे असे विचारते.तिने चालेल का धावेल असे हसत हसत उत्तर दिले.मी तिला किचनमध्ये घेऊन गेलो.तिने पुढाकार घेऊन किचनचा ताबा घेतला.आम्लेट ब्रेड खिचडी यावर ताव मारला.नंतर तिने कॉफी केली.आम्ही दोघांनी गप्पा मारत किचनमध्येच डायनिंग टेबलवर बसून तिचा आस्वाद घेतला. 

तिच्या हालचाली मोकळय़ा होत्या.तिचा स्वभाव मोकळा दिसत होता.उगीचच्या उगीच ती संकोच करीत नव्हती. माझ्या मनात ती जास्त जास्तच घर करत होती.ती अशीच घरात कायमची फिरत राहावी असे मला वाटत होते.ती कुठे राहते? तिच्या काकांचा पत्ता काय? वगैरे सर्व गोष्टी मी तिच्याशी गप्पा मारताना माहीत करून घेतल्या.मी तिला तिच्या घरी व काकांकडे फोन करून ती इथे असल्याचे सांगू का असे विचारले.त्यावर तिने काका व काकू  आता झोपले असतील.त्यांना झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही.त्यांना रिंग ऐकू जाईल असे नाही.असे उत्तर दिले.तिच्या घरी फोन करुन कळवू का असे विचारता ती म्हणाली,मी सर्वस्वी परक्या माणसाच्या घरात आहे. तोही घरात एकटाच आहे.हे ऐकून निष्कारण रात्रभर काळजी करीत बसतील तेव्हा नकोच.उद्या सकाळीच त्या दोघांना फोन करू असे सांगितले.ती तर मला आवडली होतीच.ज्या मोकळेपणाने ती बोलत होती वागत होती त्यावरून मीही तिला आवडलो असावा असा माझा तर्क होता.तिला माझ्याबद्दल विश्वास वाटत होता.अर्थात हे सगळे मनातल्या मनात बांधलेले मनोरे होते.

माझ्या आईचा ज्योतिषावर विश्वास आहे.तिने एकदा माझी पत्रिका एका नामांकित ज्योतिषाला दाखविली होती.इतर अनेक गोष्टींबरोबर तिने माझा विवाह केव्हां होईल असे विचारले होते.त्यावर त्या ज्योतिषाने त्याची पत्नी तुमच्या घरी आपणहून चालत येईल असे सांगितले होते.अक्षरशः ही आपणहून तिच्या पावलांनी माझ्या घरी चालत आली होती.माझा अगोदर ज्योतिषावर एवढासा विश्वास नव्हता.परंतु आता विश्वास बसू लागला होता!

उशीर बराच झाला होता.मी तिला तिचे शयनगृह दाखविले.शयनगृहाला टॉयलेट अंतर्गत होते.तिथे एक छोटा फ्रीज होता.त्यात पाण्याच्या बाटल्या आणि सॉफ्ट ड्रिंकही होते.तिला मी ते सर्व दाखविले.यातील हवे ते तुम्ही   घ्या,संकोच करू नका,घरच्यासारखे रहा असे सांगितले.तुम्ही आता शांतपणे झोपा.आंतून कडी लावून घ्या असे सांगून गुडनाइट म्हणून तिचा निरोप घेतला.

मी भिंतीवरील घडयाळाकडे पाहिले.जवळजवळ दोन वाजत आले होते.आपणही आता झोपायला जावे असा विचार मी केला.तेवढय़ात माझ्या मनात एक विचार चमकून गेला.या मुलीला मी सभ्य समजतो.तिने सांगितलेली सर्व हकिगत खरी मानली.ही मला लुटण्यासाठी आली नसेल कशावरून?बाहेर हिचे साथीदार वाट पहात थांबले नसतील कशावरून?रात्री मी झोपलो की ती तिच्या साथीदारांना बोलविल.त्यांच्या हाताला ज्या कांही मौल्यवान वस्तू लागतील तेवढ्या घेऊन सर्वजण नौ दो ग्यारह होतील.बाहेर लुटालूट चालली असताना मी कांहीही करू शकणार नाही.पोलिसांना फोन केला तरी ते वेळेवर येतीलच असे नाही. माझे दुसरे मन तसे नसावे असे सांगत होते. पाहुणीला मी तिचे नावही विचारले नव्हते.सुरक्षितता म्हणून तिच्या खोलीला बाहेरून कडी लावावी असा विचार मी केला.म्हणजे जरी ती खोटी असली,चोर असली, तरी तिला खोलीतून बाहेर पडता येणार नाही.प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असे म्हणत मी तिच्या खोलीला बाहेरून कडी व कुलूप लावले.बंगला बांधताना प्रत्येक खोलीला बाहेरून कडी कुलुपाची गरज काय?सेल्फ लॉक असले म्हणजे पुरे झाले?असा प्रश्न मी बाबांना केला होता.त्यावर कुलूप कडीची सोय असलेली बरी असे ते म्हणाले होते.आता मला ते सर्व आठवत होते.त्याचा मला आता चांगलाच उपयोग झाला होता.ती चोर असली तरी मला पूर्ण सुरक्षितता मिळाली होती.  

तिने तिच्या घरी व काकांकडे फोन आता करू नका म्हणून सांगितले होते त्यासाठी कांही  पटणारी कारणेही सांगितली होती.ती कारणे खरी की खोटी असाही एक विचार मनात आला. एकदा हा विचार मनात आल्यावर जरी मी जाऊन माझ्या शयनगृहात झोपलो असतो तरी झोप लागणे कठीण होते.ती शयनगृहात कोंडली गेली आहे.परंतु बाहेर तिचे साथीदार मोकळे आहेत हा विचारच अस्वस्थ करणारा झोप उडवणारा होता.उद्या सकाळी पाहुणीचा पूर्ण तपास करायचा.तिने सांगितलेला पत्ता बरोबर आहे ना त्याची खात्री करून घ्यायची.तिला तिच्या घरचा फोन नंबर  विचारायचा.तिथे फोन करून खात्री करून घ्यायची. तिची मोटार प्रत्यक्ष जावून पाह्यची आणि तिला मदत करायची. तिच्या काकांकडे जायचे.असे मी मनात ठरविले.ती फ्रॉड असेल तर लगेच कळेल.पानी का पानी और दूध का दूध हो जाएगा.असा विचार करीत मी एकदा बाहेरचा दरवाजा चेक केला आणि शयनगृहाकडे निघालो.         

एवढ्यात माझ्या फोनवर माझ्या मित्राचा एक मेसेज झळकला.~न्यूज चॅनेल बघ काळजी घे.~असा तो संदेश होता.मी त्याने सांगितलेला न्यूज चॅनेल सुरू केला.त्यामध्ये पुढीलप्रमाणे बातमी पुन्हा पुन्हा सांगितली जात होती.

कात्यायनी नावाची एका बावीस तेवीस वर्षांची मुलगी मनोरुग्ण होती.दुसऱ्या भाषेत सांगायचे तर ती वेडी होती.तिला एरवी पाहिले तर ती मनोरुग्ण वाटत नव्हती.तसा संशयही येत नव्हता. तिने तिच्या आईवडिलांचा व भावंडांचा ती सर्व झोपेत असताना रात्री खून केला होता.एकूण पांच खून तिने केले होते.ही गोष्ट जवळजवळ वर्षभरापूर्वींची होती.तिला पकडण्यात आले. तिच्यावर खटलाही चालला.तिची तपासणी केली असता ती मनोरुग्ण आहे असे डॉक्टरांना आढळून आले.त्यामुळे तिला फाशीची शिक्षा न होता मनोरुग्णालयात पाठवण्यात आले. अकस्मात तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेत होते.प्रकृतीमध्ये बिघाड हे सर्व तिचे नाटक होते. तिने तिच्याबरोबर स्वयंपाकघरातील सुरी लपवून आणली होती. अॅम्ब्युलन्समध्ये बसताना तिने त्या सुरीचा वापर करून आणखी दोन खून केले होते.आणि ती फरार झाली होती. तिच्या अंगावर मनोरुग्णालयाचा वेष होता.त्याच्यावर ठळक अक्षरात पुढून व मागून दिसेल असे *सरस्वती मनोरुग्णालय* असे मनोरुग्णालयाचे नाव होते.

कुणालाही ती सापडल्यास पोलिसांना कळवावे.असे पुन्हा पुन्हा न्यूज रिपोर्टर सांगत होता.ती मनोरुग्णालयाच्या पोशाखातच असेल असे नाही.आपण ओळखले जावू नये म्हणून ती कुठुनतरी दुसरा ड्रेस हस्तगत करील.वेळप्रसंगी ती त्यासाठी एखादा दुसरा खून करायलाही कमी करणार नाही. आणि त्या मिळविलेल्या दुसर्‍या  पोशाखात फिरत असेल.ती तशी अगदी व्यवस्थित मुलगी वाटेल.मनोरुग्ण असल्याचा संशयही येणार नाही हे तो पुन्हा पुन्हा सांगत होता.तरी सावधानता बाळगावी. सोबत तिचे छायाचित्र पुन्हा पुन्हा दाखवले जात होते.ते छायाचित्र बघून मी हादरून गेलो.माझ्याकडे आलेल्या आणि जिच्या प्रेमात मी पडलो असे मला वाटत होते त्या पाहुणीचे ते छायाचित्र होते.पुढून,डाव्या उजव्या बाजूने,तिचे छायाचित्र दाखवीत होते.क्लोज अपमध्येही छायाचित्र दाखविले जात होते.कात्यायनी आज सकाळीच दोन खून करून पळाली होती.  

पाहुणी तीच मुलगी होती किंवा हिच्यामध्ये व तिच्यामध्ये   प्रचंड साम्य होते. दोघी जुळ्या बहिणी वाटत होत्या.छायाचित्रातील मुलीचे गाल गोबरे होते तर हिचे पाहुणीचे गाल गोबरे नव्हते.छायाचित्रातील मुलीचे दात पुढे आलेले नव्हते तर पाहुणीचे दात थोडे पुढे होते.पाहुणीचा शोल्डर कट होता.फोटोतील मुलीचा तसा नव्हता.फोटो कदाचित जुना असावा.पाहुणीची मान उंच वाटत होती तर हिची तशी नव्हती.फरक होता परंतु तो मामुली होता.फोटो कित्येकवेळा फसवे असतात.प्रत्यक्ष दर्शन व फोटो यामध्ये बरीच तफावत असते.एकंदरीत पाहुणी कात्यायनी असण्याचा दाट संभव वाटत होता.संदेश पाठविलेल्या मित्राचे मी मनोमन आभार मानले.

तिच्या खोलीला बाहेरून कडी कुलूप लावले हे चांगलेच केले असे माझ्या लक्षात आले.त्याचे कारण जरी त्यावेळी वेगळे असले तरी आता मला चांगलीच सुरक्षितता होती.आपण सरळ पोलिसांना बोलवावे आणि पाहुणीला त्यांच्या हवाली करावे असे मी ठरविले.

असा विचार करीत असताना माझे मन मला मागे खेचत होते.

जर पाहुणी कात्यायनी नसती तर माझी काही खैर नव्हती.मी तिला फसवून पोलिसांत दिल्यावर माझी तिच्याकडे डाळ शिजणे शक्यच नव्हते.

प्रेम वगैरे तर दूरच राहिले.तिच्याजवळ मैत्रीसुद्धा अशक्य झाली असती.

तिने माझ्याशी बोलायलाही नकार दिला असता.तिने पुन्हा आयुष्यात माझे तोंडही पाहिले नसते.

काय करावे अशा द्विधा मन:स्थितीत मी सापडलो होतो.

एका बाजूला मला माझे तिच्यावरील प्रेम ओढत होते.एखादा प्रेम या शब्दाला जोरदार आक्षेप घेईल.कॉफी जशी  उकळल्यावर चांगली होते तशीच इन्स्टंटही चांगली होते.प्रेमाचेही तसेच आहे.दीर्घ परिचयानंतर प्रेमाचा सुगावा लागतो.तसाच तो लगेचही लागतो.कांहीजणांना हे इन्स्टंट प्रेम फालतू असते, खरे नसते, ते केवळ आकर्षण असते, टाकाऊ असते, असे वाटते.म्हटले तर यात तथ्य आहे म्हटले तर नाही ते परिस्थितीवर व व्यक्तीवर अवलंबून असते असो.

*ती कात्यायनी असेल तर तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेच पाहिजे.मला माझे कर्तव्य बजावलेच पाहिजे.*

*ती खुनी आहे.ती मनोरुग्ण आहे.मला तिच्यापासून धोका संभवतो.मलाच काय ती अशीच मोकळी समाजात फिरत राहिली तर अनेक जणांना धोका संभवतो असे वाटत होते.*

*हॉलमध्ये थोडा वेळ मी विचार करीत स्तब्ध उभा होतो.*

* आल्यापासून ती माझ्या सहवासात जवळजवळ दीड दोन तास होती.*

*त्या काळात तिच्यामध्ये वेडेपणाचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते.*

*शेवटी पोलिसांना बोलावण्याचे मी ठरविले.आणि पोलिसांचा नंबर फिरवला.*

(क्रमशः)

२५/१/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel