१३२. पुत्रशोकाचें विनोदन करण्याची युक्ति.

(घतजातक नं. ४५४)


प्राचीनकाळीं उत्तर प्रदेशांत कंसभोगराष्ट्रांत असितांजन राजधानींत मका (?हा) कंस नांवाचा राजा राज्य करीत असे. त्याला कंस आणि उपकंस या नांवाचे दोन पुत्र व देवगर्भा नांवाची एक कन्या होती. ती जन्मली त्या दिवशीं ज्योतिषशास्त्रकोविदांनीं इच्या उदरीं जन्मीं येणारा पुत्र कंसवंशाचा नाश करील असें भविष्य वर्तविलें. परंतु अत्यंत प्रेमामुळें राजानें आपल्या मुलीचा नाश केला नाहीं. पुढें इचे भाऊ वाटेल तें करोत असा विचार करून तो स्वस्थ राहिला.

त्याच्या मरणानंतर कंस राजा झाला व उपकंसाला युवराजपद मिळालें. त्यांनीं असा विचार केला कीं, जर आपल्या बहिणीला मारलें किंवा हाकून दिलें तर आपली लोकांत दुष्कीर्ती होईल. मात्र हिला विवाह केल्यावांचून नजरकैदेंत ठेवावें म्हणजे झालें. त्याप्रमाणें त्यांनीं एकाच खांबावर प्रासाद रचून तिला तेथें ठेविलें. तिच्या सेवेला नंदगोपा नांवाची एक दासी देण्यांत आली व त्या दासीचा नवरा अंधकविष्णु त्या प्रासादावर पहारा करण्यास पहारेकरी नेमिला गेला.

त्या काळीं उत्तरमथुरेंत महासागर नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या मरणानंतर त्याच्या सागर नांवाच्या वडील मुलाला गादी मिळाली व दुसरा मुलगा उपसागर युवराज झाला. परंतु उपसागरानें राजाचा मोठा अपराध केल्यामुळें त्याला राजधानींतून हाकून देण्यांत आलें. त्यानें व उपकंसानें एकाच आचार्यांच्या घरी अध्ययन केलें होतें. तेव्हां तो आपल्या वडील भावाच्या राज्यांतून निघून असितांजन नगराला आला. उपकंसानें त्याला ताबडतोब ओळखलें व मोठ्या आदरानें आपल्या घरी ठेवून घेऊन राजाची आणि त्याची भेट करवून दिली. आपल्या भावाच्या भिडेस्तव कंसराजानें उपसागराला मोठी पदवी देऊन त्याचा फार गौरव केला.

कांहीं काळानें राजाच्या दरबारीं जात असतां उपसागराची दृष्टी एकस्तंभप्रासादाच्या खिडकींत उभी असलेल्या कंसाच्या भगिनीकडे गेली. ही कोण व हिला अशा ठिकाणीं कोंडून ठेविण्याचें कारण काय इत्यादि गोष्टींची त्याला फार जिज्ञासा झाली व त्यानें थोडक्याच काळांत त्या सर्व गोष्टींचा खुलासा करून घेतला. नंदगोपेला आणि अंधकविष्णूला लांच देऊन त्यानें वश करून घेतलें व देवगर्भेची आणि आपली वारंवार गांठ पडेल अशी मोकळीक मिळविली.

पुढें गांधर्वविधीनें देवगर्भेला त्यानें वरिलें आणि कांहीं काळानें देवगर्भा गरोदर झाली. तिच्या बंधूंला ही गोष्ट समजली तेव्हां त्यांना फार राग आला. परंतु उपसागराला किंवा बहिणीला ठार मारण्यानें प्रजेंत असंतोष माजेल असें वाटून त्यांना तो गिळून टाकावा लागला. पण बहिणीच्या आणि उपसागराच्या संमतीनें त्यांनी असा ठराव केला कीं, जर देवगर्भेला मुलगा झाला तर त्याचा वध करण्यासाठीं तिनें आपल्या भावाच्या हवाली करावा व मुलगी झाली तर तिचें पालनपोषण करावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel