१५. एकीचें व बेकीचें फळ.

(सम्मोदमान जातक नं. ३३)

वाराणसींत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतां बोधिसत्त्व लावा पक्ष्याच्या कुळांत जन्मून हजारों लाव्यांचा पुढारी होऊन अरण्यांत रहात असे. त्या काळीं एक पारधी त्यांच्या वस्तीच्या जागीं जाऊन एका ठिकाणीं चरणार्‍या लाव्यांवर जाळें टाकी व त्यांत सापडलेल्या लाव्यांला बाजारांत विकून आपला निर्वाह करी. एके दिवशीं बोधिसत्त्व आपल्या समुदायांतील लाव्यांना म्हणाला, ''हा पारधी आमच्या ज्ञातिवर्गाचा नाश करीत आहे. ह्याला एकच उपाय आहे तो हा कीं जर तुम्हांपैकीं कोणी त्याच्या जाळ्यांत सांपडलें, तर एकमतानें ते जाळें घेऊन तुम्ही उडावें, व एकाद्या कांटेरी झुडपावर टाकून त्याच्या खालून निघून जावें.''

दुसर्‍या दिवशीं कांही लाव्यांवर पारध्यानें जाळें टाकल्याबरोबर, बोधिसत्त्वाच्या उपदेशाप्रमाणें त्यांनीं तें उडवून नेलें, व एका कांटेरी झुडपावर टाकून त्याच्या खालून पळ काढिला. कांट्यांतून जाळें मोकळें करतां करतां पारध्याला सांज झाली, व रिकाम्या हातानेंच घरीं जाण्याचा प्रसंग आला. हा क्रम बरेंच दिवस चालला. तेव्हां त्याची बायको रागावून त्याला म्हणाली. ''रोज रोज एक कवडीहि न आणतां घरी येतां; ह्याच्यावरून असें दिसतें कीं दुसरी कोणीतरी बाई तुम्ही संभाळली असली पाहिजे, व तिच्यासाठीं सर्व पैसा खर्चण्यांत येत असला पाहिजे.''

पारधी म्हणाला, ''भद्रे, ही तुझी समजूत चुकीची आहे. मला कोणतेंही व्यसन नाहीं पण मी काय करूं ? लावे एकजुटीनें जाळें घेऊन जातात व कांटेरी झुडपावर टाकतात; त्या योगें माझा सारा दिवस जाळें सोडविण्यांत जातो, आणि शेवटीं हातीं काहीं लागत नाहीं. तथापि मी निराश झालों नाहीं. जोपर्यंत त्यांच्यांत एकी आहे तोंपर्यंत जाळें घेऊन उडून जातील. पण जेव्हां आपसांत भांडूं लागतील, तेव्हां खात्रीनें माझ्या हातीं येतील.''

कांही दिवसांनी चरावयाला जात असतांना एक लावा दुसर्‍याच्या डोक्यावरून गेला. त्यामुळें दुसर्‍याला राग आला. पहिल्या लाव्यानें क्षमा मागितली. तथापि दुसर्‍यानें तें न ऐकतां भांडण्यास सुरवात केली. होतां होतां सर्व समुदायांत फूट पडली. तेव्हां बोधिसत्त्वानें विचार केला कीं जेथे एकी नाहीं, तेथें सुरक्षितपणा नाहीं. आपण येथून दूर गेलेलें चांगलें. त्याप्रमाणें बोधिसत्त्व आपल्या वचनांत रहाणार्‍या समुदायाला घेऊन दुसरीकडे निघून गेला. इकडे लाव्यांपैकीं कांही जण जेव्हां जाळ्यांत सांपडत तेव्हां तेथेंहि भांडणें करीत, पक्षप्रतिपक्ष करीत; व जाळें उडवून नेण्याचें सामर्थ्य न राहिल्यामुळें पारध्याच्या हातीं जात. अशा रीतीनें पारध्याची चांगली चैन चालली व बायकोची त्याच्यावर फार मर्जी बसली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel