७३. खरें बंधुप्रेम.

(असदिसजातक नं. १७९)


वाराणसीच्या राजाला दोन पुत्र होते. थोरल्याचें नांव असदृशकुमार, आणि धाकट्याचें नांव ब्रह्मदत्तकुमार असें होतें. त्यांत असदृशकुमार हा आमचा बोधिसत्त्व होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यानें तक्षशिलेला जाऊन एका प्रसिद्ध आचार्याच्या हाताखालीं तीन वेदांचें आणि अठरा शास्त्रांचें अध्ययन केलें आणि तो परत वाराणसीला आला. त्याचा पिता मरतेवेळीं असदृशकुमाराला राज्य देऊन ब्रह्मदत्ताला युवराज करावें असें प्रधानमंडळाला सांगून मरण पावला. त्याचें उत्तरकार्य आपटल्यावर प्रधानमंडळानें बोधिसत्त्वाला राज्याभिषेक करण्याची सर्व व्यवस्था केली. परंतु बोधिसत्त्व म्हणाला, ''मला राज्यकारभाराचा भार नको आहे. शास्त्राध्ययन आणि धनुर्विद्या यांतच ती आनंद मानीत असतों. माझा धाकटा भाऊ सर्व तर्‍हेनें राज्यभार वाहण्याला योग्य आहे आणि राजा होण्याची त्याला फार इच्छाहि आहे. तेव्हां त्यालाच राज्यपदावर बसवावें अशी मी सर्वांना विनंति करतों.''

सर्व प्रधानमंडळानें आणि वाराणसीवासी प्रजाजनांनीं बोधिसत्त्वाला राज्यपद स्वीकारण्याविषयीं फार आग्रह केला. परंतु त्यांचा इलाज चालला नाहीं. शेवटीं बोधिसत्त्वाच्या इच्छेप्रमाणें ब्रह्मदत्तालाच त्यांनीं अभिषेक केला. ब्रह्मदत्त आपल्या वडील भावाच्या सल्ल्यानेंच सर्व राज्यकारभार पहात असे. पण हळु हळु राज्यपदाच्या धुंदींत तो सांपडला. हांजी हांजी करणार्‍या लबाड लोकांची त्याच्या भोंवतीं मालिका जमली. आपल्या धन्याला संतुष्ट करण्यासाठीं ज्याच्या त्याच्या खोट्या नाट्या चुगल्या करण्याचा धंदा त्यांनीं सुरूं केला. एकानें तर राजाला असें सांगितलें कीं, वडील भाऊ असदृशकुमार राजाला मारून राज्य बळकावण्याचा कट करीत आहे. झालें ! ही गोष्ट निघाल्याबरोबर दुसरा म्हणाला, ''मला या संबंधानें मागेंच बातमी लागली होती. परंतु म्हटलें उगाच महाराजांचें आपल्या वडील बंधूविषयीं मन कलुषित कां करा ? म्हणून चुप राहिलों.''

त्यावर तिसरा म्हणाला, ''अहो पण तुमचें हें करणें अगदींच अयोग्य झालें. राजेसाहेब अन्नदाते, त्यांच्या जिवावर जर कोणी उठला- मग तो वडील भाऊ किंवा आजा असो- आम्हीं त्याच्या कटाची बातमी महाराजांना ताबडतोब दिली पाहिजे. पण तुम्ही इतके दिवस मौन धरून बसलां याला काय म्हणावें ?''

अशा रीतीनें त्या लुच्चा लोकांनीं राजाचे मन बिघडवून टाकलें आणि त्यामुळें एके दिवशीं राजानें आपल्या भावास पकडून कैद करण्याचा हुकूम दिला. बोधिसत्त्वाचा एक अत्यंत जिवलग मित्र प्रधानमंडळांत होता. त्यानें ही बातमी त्याला कळवली. अशा लबाड लोकांच्या हातीं लागण्यापेक्षां येथून पलायन केलेलें बरें, असा सुविचार करून बोधिसत्त्व रात्रींच्या रात्रीं वाराणसींतून पळून गेला. तो दूरच्या एका मांडलिक राजापाशीं जाऊन नोकरीस राहिला. त्या राजानें बोधिसत्त्वाचें धनुर्विद्या-कौशल्य पाहून त्याचा फार सन्मान केला, आणि त्याला सदोदित आपल्याजवळ ठेऊन घेतलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel