काळकाच्या मसलतीप्रमाणें राजानें दुसर्‍या दिवशीं त्या उद्यानांत एक रत्‍नखचित तलाव बांधण्याचा बोधिसत्त्वाला हुकूम केला. शक्राच्या कृपेनें बोधिसत्त्वानें तो देखील एका रात्रींत बांधून राजाला नजर केला. तेव्हां राजानें एक उद्यानाला साजल अस हस्तिदंती गृह एका रात्रींत बांधण्याचा हुकूम केला. तोहि बोधिसत्त्वानें इंद्राच्या सहाय्यानें अंमलांत आणला. नंतर राजानें एक उत्तम हिरा आणून त्या घरांत ठेवण्यास सांगितलें. हें काम देखील चोवीस तासांच्या आंत करावयाचें होतें. पण इंद्र प्रसन्न असल्यामुळें बोधिसत्ताला तें कठीण वाटलें नाहीं. इंद्रानें दिलेला हिरा त्यानें दुसर्‍या दिवशीं सकाळींच राजाला अर्पण केला. राजा बहुतेक निराशच होऊन गेला. परंतु थोडा धीर देऊन काळक म्हणाला, ''महाराज, हताश होण्यांत अर्थ नाहीं, पुरोहिताला प्रसन्न असलेली देवता उद्यान, तलाव वगैरे अचेतन पदार्थ उत्पन्न करूं शकेल. पण एखादा मनुष्य तिला उत्पन्न करतां यावयाचा नाहीं. आपण पुरोहिताला अशी आज्ञा करा कीं, चतुर्गुणी असा एक उद्यानपाल चोवीस तासाच्या आंत आणून द्या. देवतेला ही गोष्ट अशक्य होऊन ती बोधिसत्त्वावर उलटेल किंवा त्याला सोडून पळून तरी जाईल.''

ठरल्याप्रमाणें राजानें दुसर्‍या दिवशीं पुरोहिताला चतुर्गुणी उद्यानपाल आणून द्यावयास सांगितला. बाधिसत्त्वानें घरीं जाऊन शक्राचें स्मरण केलें परंतु शक्र कांही आला नाहीं. तेव्हां अरण्यांत जाऊन बोधिसत्त्व ध्यानस्थ बसला. तेथें शक्र ब्राह्मणरूपानें प्रकट होऊन म्हणाला, ''हे मनुष्या तूं या अरण्यांत दुर्दैवी प्राण्यासारखा चिंताग्रस्त होऊन कां बसला आहेस ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''माझ्या राजासाठीं शक्राला प्रसन्न करून घेऊन मी पुष्कळ गोष्टी केल्या परंतु त्याची तृप्ति न होतां तो चतुर्गुण संपन्न उद्यानपाल मागत आहे ! असा मनुष्य मी कोठून आणावा ?''

शक्र म्हणाला, ''तूं घाबरूं नकोस. राजाच्या पदरीं एक हुजर्‍या आहे त्याला उद्यानपाल नेमा असें तूं आपल्या राजाला सांग. म्हणजे हें तुझ्यावरचें संकट निरस्त होईल.'' असें म्हणून शक्र तेथेंच अंतर्धान पावला.

दुसर्‍या दिवशीं राजसभेंत जाऊन बोधिसत्त्व राजाला म्हणाला, ''महाराज, आपल्या पदरींच चतुर्गुणसंपन्न उद्यानपाल असतां आपण मला असा मनुष्य देण्यास कां सांगतां ?''

राजा म्हणाला, '' असा मनुष्य येथें कोण आहे बरें ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज आपल्या पोषाखाच्या कामावर असलेला छत्रपाणी हुजर्‍या अशा तर्‍हेचा मनुष्य आहे. त्याला बोलावून आणून उद्यानपालाचें काम द्या.''

राजानें छत्रपाणीला बोलावून त्याच्या अंगीं कोणतें चार गुण आहेत अशी पृच्छा केली. तेव्हां तो म्हणाला, ''महाराज, दुसर्‍याचा मत्सर न करणें, मद्यपानापासून निवृत्ति, न्यायकठोरता आणि सर्वांवर समबुद्धि ठेवणें या चार गुणांचा पुष्कळ जन्मीं मी अभ्यास केला आहे. अधिकार्‍याच्या अंगीं या चार गुणांची फार आवश्यकता आहे. म्हणून मी आपलें कोणतेंहि विश्वासाचें काम करण्यास योग्य आहें.''

हें छत्रपाणीचें भाषण ऐकून राजा प्रसन्न झाला. काळक सेनापतीनें आपल्या मनांत संशय उत्पन्न करून आपणाला भलत्याच मार्गास लावलें याबद्दल त्याला फार फार वाईट वाटलें. काळकाला देहांत शिक्षा देऊन तेव्हांपासून बोधिसत्त्वाच्या सल्ल्यानें त्यानें राज्यकारभार चालविला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel