(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी घ्यावी म्हणून तो कॉफी शॉपमध्ये आला .कॉफी पिता पिता त्याची नजर सहज समोर गेली . तिथे त्याची सहकारी विशाखा एकटीच कॉफी पीत बसली होती .

सर्वांबरोबर न जाता ही इथे एकटीच कशी असे  कुतूहल त्याला निर्माण झाले . कसे कोण जाणे नेहमीप्रमाणे कोषात न रहाता त्याच्या अंगात एकदम साहस संचारले. कॉफीचा कप हातात घेऊन तो तिच्या टेबलाकडे गेला.तुम्ही इथे कसे? फिरायला गेले नाहीत का? म्हणून सहज त्याने प्रश्न केला .त्याच्या वर्तनात आगाऊपणाही नव्हता आणि संकोचही नव्हता ,अगदी सहज तो बोलत होता .

तिने माझे डोके प्रवासाने खूप चढले होते त्यामुळे मी गेले नाही असे सांगितले .न विचारता पुढे तिने आता बरेच बरे वाटत असल्यामुळे मी येथे कॉफी पिण्यासाठी आले असे उत्तर दिले .उगीचच इथे थांबले सर्वांबरोबर गेले असते तरी बरे झाले असते.नाशिक तरी पाहून झाले असते .असेही ती म्हणाली.यात तिला आणखी काही सुचवायचे होते की काय ते तिलाच माहीत !

सागरच्या अंगात कुठून कोणजाणे एकदम धैर्यधर शिरला .त्याने तिला मी नाशिक अनेकदा लहानपणी पाहिले आहे .मोठेपणीही इथे नातेवाईक असल्यामुळे माझे अनेकदा येणे झाले आहे .तुम्हाला बरे वाटत असेल तर आपण फिरायला जाऊया मी तुमचा गाइड म्हणून छान काम करीन असे सांगितले .नंतर मलाच तुम्ही गाइड म्हणून नेमाल असेही तो वर बोलला .मनातल्या मनात त्याला आपण एकदम असे कसे काय बोलू शकलो असे वाटले .आतापर्यंत त्याने कोणत्याच मुलीला असे विचारले नव्हते.ऑफिसमध्येही तो सर्वांशी जेवढ्यास तेवढेच बोलत असे .आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीला तो असे प्रपोज करीत होता.तिनेही पटकन आनंदाने चला आपण जाऊया म्हणजे दोघांनाही फ्रेश वाटेल असे सांगितले .त्यानेही  अगदी सहज स्वेटर किंवा शाल घ्या.नाशिकची थंडी आहे तुम्हा मुंबईकरांना सहन होणार नाही असे नाशिककरांच्या थाटात सांगितले . 

त्यांने लगेच एक टॅक्सी बुक केली.सर्व सहकारी गंगेवर देवदर्शनाला तर हे दुसऱ्या दिशेने देवदर्शनाला गेले.नवश्या गणपती, सोमेश्वर, सोमेश्वर धबधबा, इ.  नामांकित ठिकाणांकडे त्यांने आपली टॅक्सी वळविली.     

नाशिकच्या थंड हवेमध्ये निसर्गरम्य परिसरात दोघेही मोकळी मोकळी झाली.परकेपणाचे बंध केव्हां तुटून पडले ते दोघांनाही कळले नाही.तशी ती दोघे गेली दोन वर्षे एकमेकांना पहातच होती.स्मितहास्यापलीकडे त्यांचे संबंध गेले नव्हते.फार फार तर हाय हॅलो आणि सर्वांबरोबर एकत्र जेवण हीच त्यांच्या नात्याची परिसीमा होती. दोघेही  जसे काही दीर्घकाळ त्यांची ओळख आहे अश्या प्रकारे हातात हात घालून कधी चालू लागले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही .बोलता बोलता एकमेकांच्या घरची माहितीही त्यांनी एकमेकांना दिली.गेली दोन वर्षे एकाच ऑफिसमध्ये काम करीत असूनही आपण एकमेकांजवळ काहीच बोललो कसे नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत होते  .गंगापूरच्या धरणातून पाणी सोडले होते .त्यामुळे सोमेश्वरचा धबधबा भरभरून ओसंडत होता .तिथे खाली खडकाजवळ उभे राहून पाण्याचे तुषार अंगावर घेताना दोघांनाही खूप मजा वाटत होती.पाण्याच्या सानिध्यात नाशिकचा गारवा जरा जास्तच झोंबत होता.नकळतच ती त्याच्या जरा जास्तच जवळ सरकली.दोघांनाही स्पर्शाची ऊब सुखावून गेली . नंतर दोघेही सुला वाईनला गेली. तिथे त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवणही घेतले.शेवटी दोघेही रात्री नऊ दहा वाजता हॉटेलवर झाली .

इतर स्टाफने दोघांच्याही खूपच फिरक्या घेतल्या .म्हणे माझे डोके दुखते. म्हणे माझे डोके चढले आहे. ही बाम लावून झोपणार होती.वर हा पठठ्या या नाशिकचाच असल्यामुळे उगीचच फिरण्यासाठी तयार नव्हता .मग ट्रिपबरोबर नाशिकला आला तरी कशाला?दोघांचे अगोदरच जर स्वतंत्र फिरण्याचे ठरले होते तर तसे आम्हाला सांगायचे आम्ही कांही  आडकाठी केली नसती .ऑफिसमध्ये दोघेही जसे काही आपली ओळख नाही असे दाखवतात आणि इथे मात्र एकमेकांसोबत स्वतंत्र  फिरतात .तुम्ही दोघे असे आतल्या गाठीचे असाल,छुपे रुस्तुम निघाल, असे वाटले नव्हते .सर्वजण काहीना काही त्यांच्यावर बरसतच होते आणि दोघेही हसत हसत मुकाट्याने सर्व ऐकत होते .किंबहुना ते ऐकताना त्यांच्या मनाला गुदगुल्या होत होत्या .

दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वरला जायचे होते त्या वेळीही सर्वांनी त्यांना तुमचे डोके दुखत आहे ना तुम्ही येणार नसालच असे त्याना म्हणून घेतले.दोघेही मुकाट्याने बसमध्ये येऊन बसले .सर्वांनी त्यांना एकाच सीटवर बसविले .विशाखा दुसरीकडे कुठेतरी बसायला बघत होती परंतु तिला कुणीही कुठेही बसायला जागा दिली नाही.शेवटी ती मुकाट्याने सागरच्या शेजारी येऊन बसली .

याचीच पुनरावृत्ती त्र्यंबकेश्वरहून परत येताना, शिर्डीला जाताना व शिर्डीहून मुंबईला परत येताना झाली.

* नाशिकला जाताना एकमेकांना अनोळखी असलेली ती दोघे आता एकमेकांच्या अतिशय जवळ आली होती.*

* दिवसें दिवस त्यांची जवळीक आता वाढणारच होती.*

(समाप्त)

८/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel