(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.कथा पात्रे इत्यादींमध्ये  कोणतेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

कोर्टरूम खचाखच भरली होती .प्रदीपच्या खटल्याचा आज निकाल होता .प्रदीपने सहा महिन्यांपूर्वी  संध्याकाळी साडेसहा वाजता त्याची प्रेयसी आर्या हिचा सार्वजनिक बागेमध्ये खून केला होता.लोकांनी त्याला लगेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते .अनेक जणांनी त्याला तिच्यावर वार करताना पाहिल्यामुळे त्यानेच खून केला याचे अनेक साक्षीदार होते .कोर्टात केस तशी एकतर्फी चालली होती .सर्व साक्षी पुरावे झाले होते .सरकारतर्फे प्रदीपला वकील देण्यात आला होता .त्याने मला वकील नको मी खून केला आहे अशी कबुली सुरुवातीलाच दिली होती .तरीही सरकारतर्फे प्रदीपला वकील देण्यात आला होता.माननीय जज्ज साहेब आज बहुधा निकाल  देतील असा सर्वांचाच अंदाज होता.पोलीस, गुन्हेगार प्रदीप, दोन्ही बाजूचे वकील ,कोर्टात वेळेवर हजर होते .बरोबर अकरा वाजता जज्जसाहेबानी कोर्टरूममध्ये प्रवेश केला.

सुरुवातीला त्यांनी प्रदीपला तुला काही सांगायचे आहे का म्हणून विचारले .त्यावर त्याने मला बरेच काही सांगायचे आहे .मला बराच वेळ लागेल तरी कृपया मला वेळ द्यावा अशी विनंती केली .त्यावर जज्ज साहेबानी तुला हवा तेवढा वेळ तू घे .असे सांगून परवानगी दिली .

प्रदीप बोलण्यासाठी उभा राहिला व त्याने बोलण्याला सुरुवात केली. 

मी प्रदीप शर्मा मूळचा उत्तर प्रदेशमधील परंतु माझ्या गेल्या दोन पिढय़ा इथे मुंबईत गेल्या.मराठी मित्र असल्यामुळे मराठी वस्तीत राहात असल्यामुळे मला मराठी चांगले बोलता येते . मी आता महाराष्ट्रीयनच झालो आहे .मुंबईमधून मी माझी एमबीएची डिग्री मिळविली .नंतर मला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली .कंपनीची शाखा पुण्यात असल्यामुळे  मला पुण्याला ट्रान्सफर करण्यात आले.अशाप्रकारे मी येथे पुण्यात आलो .

आमच्या ऑफिसमध्ये बराच स्टाफ आहे .पुण्याच्या ऑफिसमध्ये दोन रिसर्च ऑफीसरच्या जागा भरायच्या होत्या .त्यासाठी बरेच अर्ज आले होते .मी व माझे  मुंबईचे वरिष्ठ  मुलाखती घेऊन या जागा भरणार होतो .मुलाखती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये मी जिचा खून केला ती आर्याही होती .आर्या व आणखी एक अशा दोघांची आम्ही नेमणूक केली .आर्या पहिल्यापासून हुशार चुणचुणीत व आपल्या कामांमध्ये प्रवीण होती .

प्रथम आमचे संबंध फक्त कामापुरतेच होते. नीटनेटकेपणामुळे व्यवस्थित काम करण्याच्या तिच्या पद्धतीमुळे व मोकळ्या स्वभावामुळे ती मला आवडू लागली. माझे आई वडील मुंबईला असतात.मी इथे एकटाच रहात होतो.कंपनीतर्फे मला फ्लॅट देण्यात आला होता .आमची जरा जास्त ओळख झाल्यावर आर्या तिच्या डब्यात अधूनमधून माझ्यासाठी महाराष्ट्रीयन पदार्थ आणू लागली .अश्या प्रकारे हळूहळू आमची ओळख व मैत्री वाढत गेली.ऑफिसमध्ये ऑफिस व्यक्तिरिक्त  इतरही गप्पा होऊ लागल्या .

मी नेहमी ऑफिसला स्वतःच्या गाडीने जात असे. माझ्या  ऑफिसला जाण्याच्या वाटेवर तिचे घर आहे .ती ऑफिसला नेहमी स्कूटरवरून येत असे.एक दिवस स्कूटर ऐवजी ती बसने येण्यासाठी बसस्टॉपवर उभी होती.मी ऑफिसला माझ्या गाडीने येत असताना मला ती बसस्टॉपवर दिसली .स्वाभाविक मी तिला लिफ्ट दिला.परत जातानाही अर्थातच मी तिला तिच्या घराजवळ सोडले. यानंतर जवळजवळ ही रोजचीच प्रॅक्टिस झाली .ती माझ्याबरोबर ऑफिसला माझ्या गाडीने येऊ व परत जाऊ लागली.अश्या प्रकारे आमची ओळख जास्त जास्त वाढत गेली.नंतर हळूहळू बागेत फिरायला  सिनेमाला किंवा नाटकाला आम्ही एकत्र जाऊ लागलो .

ऑफिसमध्ये आम्ही दोघे लग्न करणार याची सर्वांनाच खात्री पटली होती .एक दिवस ती मला तिच्या घरी घेऊन गेली .ती आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती.मधून मधून तिची आई मला घरी जेवायला बोलावीत असे .मी जरी उत्तर प्रदेशीय असलो तरी आमच्या दोन पिढ्या महाराष्ट्रात गेल्यामुळे आता महाराष्ट्रीयनच होतो.तिच्या आईवडिलांची आंतरप्रांतीय लग्नाला मूक संमती होती असे आम्हाला वाटत होते . आमचे रिलेशन तिच्या आई वडिलांनाही पसंत होते असे आम्हाला जाणवत होते .

अजून मी तिला लग्नाबद्दल स्पष्ट विचारले नव्हते.परंतु मनोमन आम्ही एकमेकांना पसंत आहोत हे परस्परांच्या लक्षात आले होते. अश्या प्रकारे सर्व गोष्टी सुरळीत चालल्या होत्या .चांगली नोकरी,जिच्यावर मनापासून प्रेम करावे अशी हुषार सुशिक्षित मनमिळावू मुलगी,दोन्ही बाजूच्या आई वडिलांची मूक संमती ,अशा सर्व गोष्टी मला प्राप्त झाल्या होत्या .मखमलीच्या पायघडय़ांवरून चालत आहे व पुढेही चालत राहणार आहे असे मला वाटत होते . 

आणि एक दिवस माझ्या आयुष्यात माशी शिंकली .सुटी होती. घरात बसून कंटाळा आला होता.काही कारणाने आर्याही आज फिरायला येणार नव्हती.मी दुपारचा झोपलो होतो .जाग आल्यावर लोळत पडण्याचा कंटाळा आला.मी एखाद्या सिनेमाला जायचे ठरविले .फ्रेश होऊन मी थिएटरवर गेलो . मी गेलो तेव्हा अगोदरचा शो सुटत होता.तेवढ्यात मी आर्याबरोबर  एका तरुणाला पाहिले.दोघे फार जुनी ओळख  असल्यासारखी गप्पा मारत हसत खेळत जात होती.मी आर्याला हाक  मारणार होतो परंतु एवढ्यात का कोणजाणे मी स्वतःला सावरले.तसे केले नसते तर फार बरे झाले असते असे आता वाटते .ती दोघे काय करतात ते पाहायचे ठरविले.ती दोघे गप्पा मारीत कॅन्टीनमध्ये गेली .मीही कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात दूरवर बसून त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो.तो अनामिक तरुण तिला मनापासून आवडत असावा असा माझा समज झाला .तिने माझा विश्वासघात केला असेही मला कुठेतरी उगीचच  वाटले.आत्तापर्यंत आम्ही अनेकदा भेटलो होतो. खूप गप्पा मारल्या होत्या परंतु त्या तरुणाबद्दल ती केव्हाही काहीही बोलली नव्हती.कदाचित ते सर्व सहज झाले असेल असे आता लक्षात येते .मला थोडे वैषम्य वाटत होते .

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना मी तिला सहज म्हणून कालचा दिवस कसा गेला असे विचारले .त्यावर तिने त्या तरुणाचा, सिनेमा पहाण्याचा, काहीही उल्लेख न करता केवळ छान गेला असा अभिप्राय दिला.तिने आपणहून त्या तरुणाबद्दल सांगावे असे मला वाटत होते.तिला तो विषय महत्त्वाचा वाटत नव्हता.किंवा तिला तो विषय मुद्दाम टाळायचा होता.मीही तिला त्या तरुणाबरोबर पाहिले  वगैरे काहीही सांगितले नाही.

तिचे बोलणे चालणे वागणूक नेहमीसारखीच होती.थोड्याच दिवसात मी ती गोष्ट विसरून गेलो.

*नंतर एक दिवस मी माझ्या मोटारीतून जात असताना सिग्नलवर थांबलो होतो.*

*तेवढ्यात पाठीमागून एक स्कूटर येऊन सिग्नलवर थांबली .त्यावर  तो तरुण व आर्या दोघेही होती.*

*आर्याने त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला होता.ती  त्याच्या खांद्यावर हनुवटी टेकून काही बोलत होती व तोही मागे वळून बोलत होता.* 

*कसला तरी विनोद झाल्यामुळे दोघेही हसत होती.*

(क्रमशः)

१८/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel