(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.कथा पात्रे इत्यादींमध्ये  कोणतेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आर्याने त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला होता.ती  त्याच्या खांद्यावर हनुवटी टेकून काही बोलत होती व तोही मागे वळून बोलत होता.

कसला तरी विनोद झाल्यामुळे दोघेही हसत होती.

यावेळी ती मला फसवत आहे. ती माझ्याशी डबल गेम खेळत आहे असे मला वाटले .तिने मोकळेपणाने त्या तरुणाबद्दल मला सांगावे एवढीच माझी अपेक्षा होती .ती त्या तरुणाशी लग्न करणार असती  तरीही माझी काही हरकत नव्हती.तशा आम्ही एकमेकांना आणाभाका काहीच दिल्या नव्हत्या . मला  वाईट वाटले असते तो भाग वेगळा परंतु मी ते सर्व पचविले असते.फक्त एकाच वेळी तिने दोघांनाही आपल्या तालावर नाचवू नये एवढीच माझी माफक अपेक्षा होती .माझ्याशी मोकळेपणाने वागणे हे केवळ नोकरी टिकविणे,बढती मिळविणे, एवढ्याच स्वार्थी हेतूने होते असे मला उगीचच वाटून गेले.

अजूनही ती मला सर्व काही सांगेल असे वाटत होते .मी तिला आडून आडून कालचा दिवस कसा गेला वगैरे विचारले.त्यावर तिने हसून मान वेळावीत छान एवढेच उत्तर दिले.

त्यानंतर घडलेली घटना ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली .मी एका लग्न समारंभाला गेलो होतो .तिथे मी या जोडीला पुन्हा पाहिले.इथेही ती दोघे मनमोकळेपणाने वावरत होती .

आता मात्र मी या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा असे ठरविले .दुसऱ्या दिवशी ती मला ऑफिसात भेटली तेव्हा बागेत फिरायला जायचे सुचविले .मला तिच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे असेही सांगितले .हे ऐकून तिला आनंद झाल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.तिच्या आनंदित चेहऱ्याकडे बघून मी तिला प्रपोज करणार असे बहुधा  तिला वाटले असावे असा मला संशय आला .माझा तिच्याबद्दलचा अंदाज  चुकत तर नाही ना असेही मला एकदा वाटले.

बागेत भेटल्यावर मी तिला त्या तरुणाबद्दल विचारले.त्यांना आतापर्यंत तीनदा वेगवेळ्या ठिकाणी पाहिल्याचेही सांगितले . तो कोण? त्याचा व तिचा संबंध काय?आत्तापर्यंत तो कसा दिसला नाही? हल्लीच तो कसा दिसतो?तो पुण्याचा आहे की आणखी कुठला आहे ?वगैरे गोष्टी शांतपणे विचारण्या ऐवजी मी तिच्यावर आरोप केल्यासारखे बोलत होतो .तिने मला फसविले. तिने माझा विश्वासघात केला. ती दुटप्पी आहे.केवळ ऑफिसमध्ये स्थैर्य बढती सुविधा या स्वार्थी हेतूने तिने माझ्याशी गोड गोड संबंध ठेवले.अशा प्रकारे मी तिला अद्वातद्वा बोललो .मी तिला प्रपोज करीन अशा उत्सुकतेने ती माझ्याकडे पाहात असताना मी तिच्यावर हे घाव घातले.हे माझ्या आता लक्षात येत आहे .त्या वेळी मी उद्विग्नतेने व तिने मला फसविले या भावनेने वेडापिसा झालो होतो .

मी तिच्यावर वाटेल ते आरोप करीत सुटलो होतो .एकदा तर मी तिला कुलीन स्त्रीला बोलू नये अशा शब्दात बोललो .बोलता बोलता माझे मानसिक संतुलन सुटले होते.माझा मी न राहता माझ्यावर क्रोध स्वार झाला होता .थोडक्यात मी रागाने वेडापिसा झालो होतो .

तिचा झालेला अपेक्षाभंग आणि त्यानंतर कुलीनस्त्रीवर करू नयेत असे वाटेल ते अकस्मात  केलेले असंख्य आरोप ऐकून ती अतिशय चवताळली.तिनेही रागाच्या भरात अद्वा तद्वा बोलण्याला  सुरुवात केली.तो तरुण कोण हे सांगण्याऐवजी तिने माझ्यावरच अनेक आरोप केले.तू कसा आहेस हे अगोदरच कळले हे बरे झाले .नाहीतर तुझ्याशी लग्न करून मी फसले असते .होय माझे त्या तरुणावर प्रेम आहे.मी कुणाबरोबर फिरावे व कुणाबरोबर फिरू नये हे सांगणारा तू कोण?तू अजून मला प्रपोजही केलेले नाही .तुझा माझा साखरपुडाही झालेला नाही .तरीही तू माझ्यावर एवढा हक्क कसा गाजवू शकतोस?तू एवढ्या कोत्या मनाचा असशील असे मला वाटले नव्हते .तू शेवटी असा हलकट निघशील  असे मला वाटले नव्हते.तरी मला माझे आईवडील सांगत होते की हे उत्तरप्रदेशीय सर्व भय्ये असेच.ते मी तेव्हाच ऐकले असते तर बरे झाले असते.

तो तरुण कोण हे न सांगता स्वतःची कोणतीही सफाई न देता तिचे ते बोलणे माझ्या काळजाला घरे पाडीत होते .तिला काय वाटेल ते बोललो ते मी सर्व विसरून गेलो होतो.माझ्या डोक्यात सैतान  घुसला होता.संशय पिशाच्च्याने व क्रोधाने माझा संपूर्ण ताबा घेतला होता . त्यात तिने मला भय्या म्हणून सर्व भय्ये असेच असे म्हणून अपमान केला .हा भैय्या शब्द माझ्या जिव्हारी लागला .मला माझे भान राहिले नाही . 

बागकामाचे खुरपे तिथे जवळच पडले होते.माळी बहुधा  विसरून गेला असावा.

रागाच्या भरात सर्व भान हरवलेला मी ते खुरपे उचलले व तिच्या अंगावर  पूर्ण ताकदीने वाट्टेल तसे चालवले .तिला मी असे काही करीन अशी कल्पना नसावी.बोलता बोलता आमचे आवाज चढले होते .बागेतील इतर मंडळी आमच्याकडे पाहत होती .त्याचे आम्हाला भानही नव्हते .

बघता बघता ती रक्ताच्या  थारोळ्यात पडली.लोकांनी मला धरले .व पोलिसांच्या ताब्यात दिले .पुढचे सर्व काही तुम्हाला माहित आहेच.

आणखी एकच गोष्ट मला सांगायची आहे.मी पोलीस कस्टडीत असताना तो तिच्याबरोबरचा  तरुण मला भेटायला आला होता .

माझ्या मनात मरताना कोणतेही किल्मिष राहू

नये असे त्याला वाटत होते.

त्याने तो तिचा बालपणापासूनचा मित्र आहे असे सांगितले .तिला भाऊ नसल्यामुळे ती त्याला भाऊ मानत असे असेही सांगितले.तोही तिला बहीण मानत असे.तो हल्ली परगावी असतो. तो सुट्टीवर इथे आला होता .प्रत्येक भाऊबिजेला ती त्याला ओवाळीत असे.राखी पौर्णिमेला ती त्याला राखी बांधत असे .ती दोघे सख्खे भाऊबहिण नसली तरीही त्यांचे संबंध  तसेच होते हे त्याने तिची शपथ घेवून मला सांगितले .तसेच तिचे माझ्यावर उत्कट प्रेम होते हेही सांगितले.मी तिला केव्हा प्रपोज करतो याची ती वाट पाहात होती.त्या दिवशी जेव्हा मी तिला बागेत बोलाविले तेव्हां तिने त्याला मी आज तिला प्रपोज करणार आहे असे सांगितले होते . त्या दिवशी ती अतिशय आनंदात होती .

हे सर्व ऐकल्यानंतर  मी केलेली भयंकर चूक आता माझ्या लक्षात आली आहे.मी आत्ता पश्चातापाने जळत आहे.संशयाच्या भरात व क्रोधामुळे मी तिचा खून करून बसलो .मी तिला गमावले.मी माझ्या व तिच्या आई वडिलांना म्हातारपणी  दुःख दिले.मी आता जगून काय करू?जज्ज साहेबांनी मला फाशी द्यावी अशी मी त्याना विनंती करतो.      

~मी सर्व तरुणांना सावध करण्यासाठी माझी गोष्ट सविस्तर सांगितली आहे .तरुण बऱ्याच वेळा भडक माथ्याचे असतात.त्यांना राग पटकन येतो .राग आला तरी त्यावर ते नियंत्रण मिळवू शकत नाहीत .आणि रागाच्या भरात ते एखादे वेळी काहीही करून बसतात .रागाला आळा घालणे अत्यावश्यक आहे .~

~मला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे केव्हां केव्हां एखाद्याच्या डोक्यात  संशय पिशाच्च घर करते.आणि  मी जसा माझ्या प्रेमिकेचा आर्याचा खून केला तसा एखादा  मनुष्य काहीही करून बसतो .तेव्हा प्रत्येकाने विशेषत: तरुणानी राग व संशय या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत.~

*शांतपणे वेळीच दोघांमध्ये असलेले गैरसमज दूर केले पाहिजेत*

*आततायीपणाने कोणतेही पाऊल उचलता कामा नये* 

मला जे काही सांगायचे होते ते सांगून पूर्ण झाले आहे .माझ्या गुन्ह्याला खरे म्हणजे प्रायश्चित नाही.फाशीची शिक्षाही  अपुरी आहे.

एवढे बोलून प्रदीप खाली बसला .ओंजळीत तोंड घालून तो ढसाढसा रडत होता .

हा पूर्वनियोजित खून नाही केवळ तत्कालिक रागाच्या भरात केलेला खून आहे म्हणून  जज्जसाहेबांनी त्याला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

*पश्चात्तापदग्ध होऊन सतत जळत राहणे हीच खरी शिक्षा होय असेही ते म्हणाले .*

*आरोपीने दिलेली जबानी सर्वांनी लक्षपूर्वक वाचावी व मनन करावी असेही पुढे ते म्हणाले .*

(समाप्त)

१८/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel