चारित्र्य म्हणजे अप्रकट शक्ती. मनुष्याचे आजचे सारे जीवन म्हणजे गत जीवनाचा इतिहास होय. इतिहासातील खोल रहस्य ते हेच. या कारणामुळेच इतिहासाला महत्त्व आहे. ज्याला उज्ज्वल भूतकाळ आहे, त्याला उज्ज्वल भविष्यकाळ आहे. भविष्यकाळ भूतकाळापासून भिन्न असू शकणार नाही. दुसर्‍याच्या आईबापापासून माझे शरीर निर्माण होणे हे जितके अशक्य, तितकेच भूतकालाहून भविष्य भिन्न असणे हे अशक्य आहे.

भूतकाळातील काही अंशांमधूनच भविष्यकाळ जन्म घेतो असे नाही. तो संबंध सारा भूतकाळ भविष्यकाळाला जन्म देतो व भविष्यकाळाच्या विकासाच्या मर्यादाही ठरवितो. कर्मतत्त्वाचा हाच अर्थ आहे. जीवनाचा अर्थ नीट लक्षात येण्यास पूर्वजन्माचे तत्त्व फार उपयोगी पडते. व्यक्तीच्या जीवनातील नानाविध छटांचा, गुंतागुंतीचा, त्यामुळे उलगडा होतो. मनुष्याच्या आजच्या जीवनावरून त्याच्या मनातील आकांक्षा कळून येतात, त्यांचे अप्रकट रूप जमवून येते. सहज न कळत ज्या गोष्टी तो करतो, त्यांवरून त्याचा भूतकाळही कळून येतो. मनुष्याचे आजचे वर्तन त्याच्या भूतकाळावर व त्याच्या भविष्यकाळावर प्रकाश पाडीत असते. ज्याला सदैव गुलाम म्हणून राहण्याचीच सवय, तोही एखादे दिवशी कदाचित् सिंहासनावर बसलेला दिसेल; परंतु अंतर्भेदी दृष्टीच्या माणसास त्या राजाच्या पोषाखाने नटलेल्या माणसाच्या पाठीवरील चाबकाचे वळ दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आजचा गुलामही पूर्वी अनेक वेळा राजा असेल व सूक्ष्म दृष्टीच्या माणसाला अशा भिकार्‍याच्या शब्दातही तेज, त्याच्या डोळ्यांत प्रसंगविशेषी प्रकट होणारी चमक, अपमानाने त्याच्या चेहर्‍यावर चढणारी स्वाभिमानसूचक लाली या गोष्टी दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत.

मनुष्याच्या प्रत्येक कृतीत त्याचे सारे जीवन दिसून येते. मनुष्याचे जीवन त्याच्या प्रत्येक कृतीत स्वच्छपणे लिहिलेले असते. ते जगाला वाचता येवो वा न येवो; ते तेथे नमूद केलेले आहे खास. चांगदेवांनी पाठविलेले कोरे पत्रही निवृत्तिनाथ वगैरेंनी वाचिले व ज्ञानेश्वरांनी त्याला उत्तर दिले. वाचणारा पाहिजे. उदात्त व महनीय इच्छा ही कधी फुकट जात नाही. थोर गोष्टीसाठी केलेला निश्चय हानी करीत नाही. मनात आणलेले, मनात खेळवलेले विचारही जीवनाला रंगरूप देतच असतात. आपल्या प्रत्येक उद्गारात, आपल्या प्रत्येक दृष्टिक्षेपात, आपल्या प्रत्येक बारीकसारीक कृतीत आपले रूप प्रकट होत असते. आपल्या अनेक कृत्यांनी मिळून होणारे हे जीवन - त्या जीवनात चारित्र्य प्रकट होत असते. स्थिर स्वरूप म्हणजे चारित्र्य. चारित्र्य जीवनाची किल्ली आहे. आध्यात्मिक सृष्टींतील कार्यकारणभाव कधी चुकत नाहीत. “आपण जे चिंतन केले, त्या चिंतनाचे कार्य म्हणजे आजची स्थिती.” वास्तवशास्त्रज्ञ म्हणतात, “पाणी आपली पातळी शोधून काढते.” जसे पाण्याचे तसेच माणसाचे. माणूस जेथे जाईल तेथे आपले योग्य स्थान मिळवील. एकच पाऊल भक्कम रोवण- परंतु त्याच्या पाठीमागे शेकडो श्रम उभे असतात. अनंत काळाच्या अनंत श्रमांनी एकेक पाऊल टाकता येते. तुम्ही शीलाच्या शैलावर जितके उंच चढाल, चारित्र्याच्या शिखरावर जितके उंच जाल, तितकेच उंच इतर कोणत्याही कामात चढाल. जितके तुमचे शील उंच तितके तुमचे इतर कार्यातील स्थान उंच.

आज साम्राज्याची सूत्रे हालवणारा लहापणाचेच खेळ मोठ्या प्रमाणात खेळतो, दुसरे काय ? नेताजी व बाजी लहानपणी काटेरी झुडुपांनाच शत्रू समजून त्याच्याबरोबर लढत व त्यांना झोडपून काढीत. वेलिंग्टन लाकडी शिपायांबरोबर लहानपणी लटोपटीच्या लढाया खेळे. पुढच्या आयुष्यांतील लढाया माणसे लहानपणीच लढवीत असतात. जे लहानपणी असते त्याचाच विस्तार होतो. ज्या पुरुषाच्या दृष्टीला एक क्षण का होईना एकत्वाचा दिव्य अनुभव आला, तो पुरुष ते एकत्व आजूबाजूच्या सर्व विश्वात भरलेले अनुभवीपर्यंत शांत बसणार नाही. तो एकत्वाचा अद्वैताचा अनुभव दिक्कालांत वाढतीतच राहील व एक दिवस दिक्कालातीत होईल. तो पर्यंत अनंत जन्म घेऊन तो प्रयत्न करीत राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel