कामाला जा उद्यांपासून. बसून बसून मरशील. हात पाय हलव जरा. जा कामावर* तो म्हणाला. ती मिलमध्ये गेली. तेथे एक नवीन नर्स आली होती. ती म्हणाली. बाई इतक्यात नका कामाला येऊ! दोन महिने झाले का? बाई नवरा घरी मारील. द्या काही काम - सांगा मालकाला, ती म्हणाली. ती नर्स मॅनेजरकडे गेली व म्हणाली, काही हलके काम द्या तिला.

‘तुम्हांला काय गरज? कायदा आमच्या बोकांडी आहे. जाऊ दे तिलां. मॅनेजर म्हणाला.

ती घरी गेली. नवरा बोले, मारी. शेवटी इतर कामगार बाया एके दिवशी त्या नर्सला म्हणाल्या, ‘ठेवा तिला कामावर. येथे आमच्याजवळचा तुकडा खाईल. घरी नरकयातना आहेत तिलां. त्या नर्सने  मॅनेजरची समजूत घालून तिला हलके काम
दिले. इतर बाया तिला चटणी भाकर थोडीथोडी देत.

‘मूल का गेले?’ त्या बाया विचारीत. तिचे अश्रू उत्तर देत. पगाराचे थोडेतरी पैसे मागे रहावे, काही खायला घ्यायला होतील तिला वाटले. परंतु पगाराचा कागद होई त्या दिवशी नवरा हजर असे.

त्या महिन्यात तिने खोटेच सांगितले. ‘मी गेले होते. संडासात. पगाराचा कागद मिळाला नाही. दंडही झाला आहे.’ परंतु त्यांने चौकशी केली. ते खोटे होते.

'घरी तर ये सटव्ये, तुझा संडास काढतो' तो गरजला.

त्यांने तिला मरेमरेतो झोडपले. सकाळी तिला उठवेना. तो कामाला गेला. ती विव्हळत होती. ‘देवा नारायणा, मला ने, अंबाबाई, झोळाई, सोमजाई, मला ने ती म्हणत होती. तो घरी आला. ती निश्चेष्ट होती.

पुरे ढोंग. ऊठ रांडे’ असे म्हणून त्याने लाथ मारली. परंतु हालचाल नाही. काही नाही. त्याने तीव्रपणे पाहिले. तो जवळ बसला. ‘मेलीस की काय?’ तो म्हणाला. उठून शेजा-यांना जाऊन म्हणाला. ‘बायको मेली काय, बघा हो.’ ते आले. आयाबाया आल्या. कोणी डॉक्टरला आणले.

‘मेली’, डॉक्टर म्हणाला. ‘हे सांगायची फी हवी का?’ ‘तर मेल्याचे का फुकट सांगू?’

‘तुला पैसे देऊन दारुला काय?’ डॉक्टर निघून गेला. रामा तेथे बसला होता. रागाने म्हणाला,’ इतक्यात मरायला फावलं तुला. दवाखान्यात तुला पाठवले बाळंतपणाला. त्याचे पैसे तरी फेडायचे होतेस माझे. आणि आता तुला जाळायला कोठून आणू पैसे? बोल की सटवे’.

शेजा-यांनी सारी क्रिया केली. रामा नुसता बरोबर गेला. तिकडे अनाथालयात आज बाळ रडत होता.

दिवाळीचे दिवस. रामा मुलखात गेला. तुळशीची लग्ने लागली. रामाने नवीन नोवरी हेरुन ठेवली. ‘मार्गसरात येतो. बार उडवतो तो म्हणाला. कोणी त्याला म्हणाला, अरे काही कामगार चार चार बायका करतात. त्यांचा पगार मिळावा म्हणून लग्न. द्यावा ओला सुका तुकडा, द्याव्या चिंध्या, आणि घ्यावा पगार. खेळाचा जुगार, बघावा सिनेमा, प्यावी दारू. स्पिरिट. तुला एक बायको मिळायला काय पंचाईत? रामा हसला. तो मुंबईस गेला. आणि म्होंरं माघाच्या महिन्यात पुन्हा मुलखात जाऊन नव्या नोवरीला पर्णून तिला मुंबईस घेऊन आला. तीही गिरणीत कामाला लागली. घाण्याला जुंपली गेली. ती पहिली सीताधरित्रीमाईच्या पोटात गेली. आता या दुस-या रमीचे काय होणार? दारुला नि जुगाराला माहित! आणि मुलांची काळजी घेणारे अनाथालय आहेत!!

खरेच नको ही दारू. करा तिला दूर.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel