श्री मयुरेश्वर, मोरगाव अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या मोरगाव येथील या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मयुरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली. जवळच कर्‍हा नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मयुरेश्वराच्या डोळ्यांत आणि नाभीत हिरे बसवलेले आहेत. मोरेश्वराची मनोहारी मुर्ती सभामंडपातूनच लक्ष वेधून घेते. मुर्ती पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची असून मुर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत. श्री च्या मस्तकावर नागराजाचा फणा पसरलेला आहे. तसेच त्याच्या डाव्या उजव्या बाजूस ऋध्दी - सिध्दीच्या पितळी मुर्ती आहेत.या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे. मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात क-हा नदीच्या काठावर आहे. या गावात पूर्वी मोरांची संख्या जास्त असल्यामुळे याला मोरगाव असे नाव पडले. अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती म्हणजेच मोरगावचा हा मोरेश्वर. गाणपत्य सांप्रदायाच्या साडेतीन पीठांपैकी आद्यपीठ, मोरगाव क-हा नदीच्या काठावर वसलेले आहे.अष्टविनायक यात्रा प्रथेप्रमाणे येथील श्री मयुरेश्वराचे (मयुरेश्वर) दर्शन घेऊनच यात्रा सुरू केली जाते व सर्व अष्टविनायकांचे दर्शन घेऊन पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घेतल्यावर ती संपूर्ण झाली असे समजले जाते. अष्टविनायक : महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ गणपतिक्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्यांची नावे, स्थाने व जिल्हे अनुक्रमे पुढीलप्रमाणे होत: (१) मोरेश्वर (अथवा मयूरेश्वर); मोरगाव; पुणे. (२) सिद्धिविनायक; सिद्धटेक; नगर. (३) बल्लाळेश्वर; पाली; कुलाबा. (४) वरदविनायक (अथवा विनायक); महड (अथवा मढ); कुलाबा. (५) चिंतामणी; थेऊर; पुणे. (६) गिरिजात्मज; लेण्याद्री; पुणे. (७) विघ्नेश्वर; ओझर; पुणे. (८) श्री. गणपती; रांजणगाव; पुणे. पुराणात कथेनुसार सिंधू राक्षसाला ठार मारणारा हा मयुरेश्वर होय. मोरावर बसून गणेशाने राक्षसाला मारले म्हणून मोरेश्वर (मयुरेश्वर) हे नाव प्राप्त झालं. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम | बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणीं थेवरम || लेण्याद्रीं गिरीजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरे | ग्रामे रांजण संस्थितो गणपते कुर्यात सदा मंगलम् || या श्लोकात अष्टविनायकांचा त्यांच्या स्थान-नावासह उल्लेख आलेला आहे. महाराष्ट्रात गणपतींची आठ स्थाने आहेत, जे अष्टविनायक म्हणून ओळखले जातात. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो. निजे भूस्वानंदे जडभरत भूम्या परतरे । तुरियास्तीरे परमसुखदेत्व निवससि ।। मयुराया नाथा तवमसिच मयुरेश भगवान । अतस्त्वा संध्याये शिवहरिरणी मयुरेश ब्रम्हजनकम ।।१।। अर्थात – हे मयुरेशा, तू सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद क्षेत्रात जडभरतमुनिच्या भुमीमध्ये, कऱ्हा नदीच्या तीरावर असलेल्या मोरगाव या सुखदायी क्षेत्रात वास करतोस. तुरिया अवस्थेत असल्यामुळे शिवशंकरांना तू ब्रम्हानंद देतोस. हे मयुरेश्वरा, मयुर हे आसन आसणा-या तुला माझा नमस्कार. ब्रम्हदेवाने उभारलेल्या तुझ्या ह्या देवळात दक्षिणेस रक्षणासाठी शंकर व उत्तरेला सुर्य सिध्द केले आहे. मोरेश्वराची कथा:- अख्यायिका - गंडकी नगराचा राजा चक्रपाणी याला सुर्याउपासनेतून पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्याने सिंधू असे ठेवले. सिंधूने सुध्दा सुर्यदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचा वरदान मिळवला. परंन्तू वरदान मिळताच सिंधूराज उन्मत झाला. त्रिलोक्याच्या लालसेने त्याने पृथ्वी जिंकली व देवांस गंडरी नगरीत बंदीवासी केले. त्याच्या जाचाला कंटाळून देवांनी संकट विमोचनार्थ गणेशाची आराधना सुरू केली त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन, ‘ लवकरच पार्वती मातेच्या पोटी जन्म घेऊन मी तूमची सुटका करेन.’ असा आशिर्वाद दिला. भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेशाने बालकरूपात अवतार घेतला. काही दिवसांनी मोरावर आरूढ होऊन गणेशाने सिंधू राजाबरोबर युध्द आरंभले. गणेशाने कमलासुराचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराचे मस्तक ज्या ठीकाणी पडले तेच मोरगाव. थोडय़ाच कालावधीत गणेशाने सिंधूराजाचा वध करून देवास मूक्त केले. मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश मोरेश्वर - मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. तर येथील स्थानास मोरगाव म्हणून ओळखू जावू लागले. मंदिरातील मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी व डाव्या सोंडेची पूर्वाभिमुक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसविले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे.मूर्तीच्या पुढे मूषक व मयूर आहेत. या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. या मुर्तीसंबंधी एक आख्यायिका अशी :- सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमित्त येथे आले असता मूळ मूर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून तिला तांब्याचा पत्र्याने बंदिस्त केले. सध्या असलेली मूर्ती ही नित्यपूजेकरिता बसवली. नवसाला पावणारा :- या क्षेत्री राहून जो कोणी गणपतीची उपासना करेल, त्याला कसलीही भीती राहणार नाही, असा गणेशाचा आशीर्वाद आहे. हा गणपती नवसास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मोरगावला जाण्याचा मार्ग:- * पुण्यापासून मोरगावला जाण्यासाठी हडपसर-सासवड मार्गे जेजुरीपर्यंत जावे लागते. तिथून मोरगाव १९ कि.मी. वर आहे. * पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे. याही मार्गे मोरगावला जाता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel