महाभारताच्या युद्धात संजयला तर सगळेच ओळखतात. संजयचे वडील विणकर असल्यामुळे त्याला सूतपुत्र मानले जात असे. त्याच्या वडिलांचे नाव गावल्यगण होते. त्यांनी महर्षी वेदव्यास यांच्याकडून दीक्षा घेऊन ब्राम्हणत्व ग्रहण केले होते. वेदादि विद्यांचा गहन अभ्यास करून ते धृतराष्ट्राच्या राज्यसभेत सन्मानित मंत्री बनले होते. आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे ते टेलीपथिक विद्येमध्ये पारंगत होते.
असे म्हणतात की गीतेचा उपदेश दोन व्यक्तींनी ऐकला, एक अर्जुन आणि दुसरा संजय. एवढेच नाही, देवतांना देखील दुर्लभ असे विश्वरूप आणि चतुर्भुज रूपाचे दर्शन देखील केवळ या दोघांना घडले होते.
संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होता. तो धृतराष्ट्राला नेहमी योग्य सल्ला देत असे. एकीकडे जिथे तो शकुनीच्या कुटील कारस्थानांबद्दल त्याला सावध करत असे तिथेच दुसरीकडे दुर्योधानाकडून पांडवांशी होणाऱ्या असहिष्णू वागणुकीबद्दल देखील धृतराष्ट्राला अवगत करून सावध करत राहत असे. तो धृतराष्ट्राचा संदेशवाहक देखील होता.
संजयला दिव्यदृष्टी प्राप्त होती, तेव्हा त्याला युद्धक्षेत्रावरील सर्व दृश्य महालात बसून दिसत असत. अंध धृतराष्ट्राने महाभारत युद्धाची प्रत्येक घटना संजयच्या वाणीने ऐकली होती. धृतराष्ट्राला युद्धाचे इत्यंभूत सजीव वर्णन करण्यासाठीच व्यास मुनींनी संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली होती. महाभारत युद्धाच्या नंतर अनेक वर्ष संजय युधिष्ठिराच्या राज्यातच राहिला. त्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीसोबत त्याने देखील सन्यास घेतला. पुढे धृतराष्ट्राच्या मृत्युनंतर तो हिमालयात निघून गेला जिथून पुन्हा कधीही परतून आला नाही.