'मुक्ता, तू का खरेच लग्न करणार नाहीस?'

'रुक्माकाका, का विचारता खोदखोदून?'

'त्याचे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझेही त्याच्यावर आहे. लपवू नकोस.'

'परंतु त्याच्या पित्याची इच्छा निराळी आहे. पित्याची इच्छा तो कशी मोडील? पित्याचे इच्छा मोडणे गुन्हा आहे ना?'

'पाहू काय काय होते ते.' रुक्मा म्हणाला.

पुन्हा एकदा संधी साधून विजय असाच आला होता. फाटक्या चित्राचे ते तुकडे घेऊन तो आला होता. आज उजाडात आला होता. येता येता वाटेतील रानुफुलांचा एक सुंदर गुच्छ त्याने केला होता.

'मुक्ता, ही घे फुले. रानफुले.' तो म्हणाला.

'गोकुळातील कृष्णाला रानफुलेच आवडत असत.'

'भगवान बुध्दांनाही फुले फार आवडायची'

'विजय, फुले म्हणजे प्रेमाची, माधुर्याची व पावित्र्याची सुगंधी सृष्टी फूल म्हणजे ईश्वराचे स्वरूप, असे तुला नाही वाटत?'

'खरे आहे हो.'

'माझ्या बाबांना वृक्षवनस्पतींचा फार नाद होता. त्यांना औषधांची किती माहिती! किती पाले, मुळे त्यांना माहीत. आमची मोठी शेतीवाडी होती. तेथे बाबांनी खूप तर्‍हेतर्‍हेच्या वृक्षवनस्पती लावल्या होत्या; परंतु ती सारी शेतीवाडी गेली. तुमच्या गावाचा ग्रामपती आहे ना, त्याने बळकावली. बाबा त्या बाबतीत काही बोलत नाहीत व मलाही बोलू देत नाहीत. जाऊ दे, तुला कशाला ऐकू या कटकटी?'

'मुक्ता, मला आता तू, 'तू' म्हटलेस.'

'आणि तूही मला आता 'तू' म्हटलेस.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel