'चल माझ्याबरोबर.' तो म्हणाला.

मुक्ता व रुक्मा लपत छपत तुरुंगाच्या दरीकडे भिंतीच्या बाजूस आली. बाणाच्या बारीक सुतळी अडकवून रुक्माने त्या खिडकीतून बाण मारला. विजय घाबरला. तो बाण खाली पडला. तो त्याला ती दोरी दिसली. चटकन त्याच्या लक्षात आले. कोणीतरी सुटकेची खटपट करीत आहे. खास. तो तो धागा ओढू लागला. दोरी येत होती. आता जरा जाडी दोरी आली. आता आणखी जाडी. शेवटी मजबूत दोर आत आला. बाहेर आता अंधार पडू लागला. विजयने खोलीतल्या पेटार्‍याला तो दोर गुंडाळून ठेवायचे ठरविले. पेटारा मजबूत आहे की नाही ते तो पाहत होता, तो त्या पेटार्‍याचे झाकण एकदम निघाले. त्या पेटार्‍यात कागद होते. कसले कागद? अद्याप थोडा अंधुक प्रकाश होता. तो पाहू लागला. तो एके ठिकाणी मुक्ताच्या वडिलांच्या शेतीवाडीसंबंधीचे कागद होते. अरे चोरा! मुक्ताच्या वडिलांना फसवलेस काय? ते कागद त्याने आपल्याजवळ घेतले. त्याने ती दोरी त्या पेटीच्या खालून अगदी बळकट बांधली बाहेरच्या लोकांनी खाली दोरी ताणून धरली. काळोख पडला. विजयने ईश्वराचे स्मरण केले आणि तो दोरीवरून चढू लागला. तो खिडकीत आला. हळुहळू तो बाहेर लोंबकळू लागला. मुक्ता पाहात होती.

'जपून, विजय जपून' ती हळूच त्या दरीतून म्हणाली.

त्या शब्दांनी विजयचे थरथरणारे हात स्थिर झाले. तो खाली खाली येत होता. आला. उतरला. मुक्ताजवळ उभा राहिला. इतक्यात दूर दिवा दिसला. कोण येत आहे? सुगावा लागला की काय? विजय, मुक्ता व रुक्मा प्रचंड दगडाच्या आड बसली. तो दिवा जवळ जवळ येत होता. कोण होते? हा तर सुमुख व त्याच्याबरोबर कोण आहे ते? ती पांगळी मंजुळा! विजयला तुरुंगात टाकल्याचे कळल्यावर मंजुळा दुःखी झाली. ग्रामाधिपतीस इतक्या थरावर गोष्टी नेण्याचे काय कारण? असे तिला वाटले. विजयची सुटका केलीच पाहिजे होती. ती सुमुखला म्हणाली, 'सुमुख, आज भावाच्या उपयोगी पड. तू उंच भिंत चढतोस. दोरी कंबरेला बांधून चढ. बघ त्या तुरुंगाच्या भिंतीवरून चढता येईल का? आपण रात्री जाऊ. मी येईन बरोबर.' आणि सुमुखने कबूल केले. त्याच्याबरोबर रात्री कुबडया घेऊन मंजुळा निघाली. किती तिचे बंधुप्रेम! दगडाधोंडयांतून ठेचाळत ती येत होती. सुमुखच्या हाती कंदील होता. दोघे त्या दरीत आली. तो तेथे दोर आधीच बांधलेला.

'विजय सुटून गेला बहुधा.' मंजुळा म्हणाली.

'मी बघतो आत जाऊन. दोर आहेच. एका क्षणात आत जाऊन येतो.' सुमुख म्हणाला.
त्याने कंदील डोक्यावर नीट बांधला आणि दोरावर चढू लागला. भीषण देखावा! सुमुख त्या खिडकीतून आत शिरला. त्या कोठडीत उतरला. तो तेथे कोणी नाही. त्याने पेटी उघडली. तो आत सरकारी कागद. त्याने ते फाडले. फेकले. त्यांना आग लावून दिली आणि झपझप दोरीवरून पुन्हा खाली आला.

'गेला पक्षी पळून. चल घरी ताई.' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel