'तेथे तर मुक्ता मरण पावली असे तुमच्या सहीचे पत्र आले.'

'काही तरी घोटाळा झाला. दोन पत्रे होती का?'

'नाही. एकच पत्र तुमच्या सहीचे होते. सही फक्त तुमची होती. वरचे अक्षर निराळे होते; परंतु सही मी ओळखली.'

'परंतु सारेच पत्र मी लिहिले होते. सुमुख व्यापार्‍याजवळ देण्यासाठी घेऊन गेला होता.'

'सुमुख?'

'हो.'
'त्यानेच तर मग हा घात केला. दुष्ट, दुष्ट सुमुख!' असे म्हणून सेवानंद ताडकन् उठला. तो एकदम आपल्या घरी जायला निघाला. माईजींनी त्याला अडवले नाही.

विजयच्या घरी सर्व मंडळी बसली होती. मुक्ताने मंजुळेस सारी गोष्ट सांगितली होती. एकदम दारावर कोणी तरी धक्का मारला.

'कोण आहे?' बलदेवने विचारले.

'मी' विजयने उत्तर दिले.

दार उघडले, तो भिक्षू सेवानंद दारात उभे. ते घरात आले. त्यांनी दार लावले. सेवानंद थरथरत होते. सारी चकित झाली.

'बाबा, आई, हा तुमचा विजय. ज्याला तुम्ही छळलेत तो हा विजय आणि सुमुख, कोठे आहे तो चांडाळ? त्याने घात केला. मुक्ताचे व माईजींचे पत्र फाडून त्याने 'मुक्ता मेली' असे मला लिहिले. खाली माईजींची सही. काय रे ए चांडाळा, दुष्टा, नष्टा, पाप्या! ऊठ, तुला ठार करतो. कोठे लपशील आता?'  असे म्हणून तो वाघासारखा धावला.

मुक्ताने व मंजुळेने त्याला आवरले.

'विजय, शांत हो. तुझे प्रवचन तू आठव. खुनी माणासांवरही दया करावी, तू सकाळी सांगितलेस. राजगृह राजधानीत खुनी इसमास तू पोटाशी धरलेस व तो रडला, असे तू सकाळी सांगितलेस. मग भावावर नाही का दया करणार? त्यालाही हृदयाशी धर. मन जिंकणे किती कठीण आहे बघ. तुलाही जर क्रोध नाही आवरता येत, तर सुमुखला मत्सर नाही आवरता आला, तर त्यात काय आश्चर्य! तू आलास. भेटलास. शेवट गोड झाला. तू ही भिक्षूची वस्त्रे फेक. संसारी हो. संसारात राहूनच हळुहळू मनाला जिंकून घे.' मुक्ता जणू मुक्त पुरुषाप्रमाणे प्रवचन देत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel