वाल्मिकी रामायणानुसार, जेव्हा राक्षस राज रावणाने सर्व राजांना जिंकून घेतले, तेव्हा तो महिष्मती नगर ( सध्याचे महेश्वर) चा राजा सहस्त्रबाहू अर्जुन याला जिंकण्याच्या हेतूने नगरात आला. त्या समयाला सहस्त्रबाहू अर्जुन आपल्या पत्नीन्सोबत नर्मदा नदीत जलक्रीडा करत होता. रावणाला जेव्हा समजले की सहस्त्रबाहू अर्जुन नाहीये तेव्हा तो युद्धाच्या इच्छेने तिथेच थांबून राहिला. नर्मदा नदीचा प्रवाह पाहून रावणाने तिथेच भगवान शंकराचे पूजन करण्याचा विचार केला. ज्या जागेवर रावण शंकर भगवानांची पूजा करत होता, तिथून थोड्याच अंतरावर सहस्त्रबाहू अर्जुन आपल्या पत्नींच्या सोबत जलक्रीडा करत होता. सहस्त्रबाहू अर्जुनाचे एक हजार हात होते. त्याने खेळा खेळात नर्मदेचा प्रवाह रोखला, ज्यामुळे नर्मदेचे पाणी किनाऱ्यावरून वाहू लागले. ज्या स्थानावर रावण पूजा करत होता, ती जागाही पाण्यात बुडाली. नर्मदेला अचानक आलेल्या या पुराचे कारण शोधण्यासाठी रावणाने सैनिकांना पाठवले. सैनिकांनी रावणाला सारा इतिवृत्तांत सांगितला. रावणाने सहस्त्रबाहू अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिले. नर्मदेच्या काठावरच रावण आणि सहस्त्रबाहू अर्जुन यांच्यात घनघोर युद्ध झाले. युद्धाच्या अंती सहस्त्रबाहू अर्जुनाने रावणाला बंदी बनवले. ही गोष्ट जेव्हा रावणाचे पितामह (आजोबा) पुलस्त्य मुनींना समजली तेव्हा ते सहस्त्रबाहू अर्जुनकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडे रावणाला सोडण्यासाठी निवेदन केले. सहस्त्रबाहू अर्जुनाने रावणाला सोडून दिले आणि त्याच्याशी मैत्री केली.