एकदा रावणाने ऐकले की किश्किंधापुरी चा राजा वाली प्रचंड बलवान आणि महापराक्रमी आहे, तेव्हा तो युद्ध करण्यासाठी तिथे गेला.
वालीची पत्नी तारा, ताराचे पिता सुषेण, युवराज अंगद आणि वालीचा भाऊ सुग्रीव यांनी रावणाला सांगितले की या वेळी वाली संध्या उपासना करण्यासाठी नगराच्या बाहेर गेला आहे. तोच तुमच्याशी युद्ध करू शकतो. अन्य कोणताही वानर एवढा पराक्रमी नाही, की जो तुमच्याशी युद्ध करू शकेल. म्हणूनच तुम्ही थोडा वेळ त्यांची प्रतीक्षा करावी. तसेच सुग्रीवाने रावणाला वालीची शक्ती आणि क्षमतेविषयी सांगितले, आणि त्याला दक्षिण तटावर जाण्यास सांगितले, कारण वाली तिथेच होता.
सुग्रीवाचे बोलणे ऐकून रावण तत्काळ विमानात बसून दक्षिण सागराकडे त्या स्थानावर जाऊन पोचला, जिथे वाली संध्या आरती करत होता. रावणाने विचार केला की मी गुपचूप वालीवर आक्रमण करेन. वालीने रावणाला येताना पहिले, मात्र चित्त जराही विचलित होऊ न देता आपल्या संध्येतील वैदिक मंत्रोच्चार चालू ठेवले. जसा रावणाने त्याला पकडण्यासाठी पाठीमागून हात पुढे आणला, वालीने त्याचा हात आपल्या काखेत दाबून धरला आणि आकाशात उडाला. रावण सारखा वालीला आपल्या नखांनी कुरतडत राहिला, पण वालीने त्याची काहीच चिंता केली नाही. तेव्हा मग त्याला सोडवायला रावणाचे मंत्री आणि शिपाई आरडओरड करत त्यांच्या मागे धावले, पण ते वालीच्या जवळपासही पोचू शकले नाहीत. अशा प्रकारे वाली रावणाला घेऊन पश्चिम सागर किनाऱ्यावर गेला, आणि तिथे आपली संध्या उपासना पूर्ण केली.
मग तो दशाननाला घेऊन किष्किंधापुरीत परत आला. आपल्या उपवनात एका आसनावर बसून त्याने रावणाला आपल्या काखेतून मुक्त केले आणि विचारले की आता सांगा तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आला आहात? रावणाने सांगितले की मी लंकेचा राजा रावण आहे आणि तुमच्याशी युद्ध करण्यासाठी आलो होतो. मी तुमची अद्भुत शक्ती पाहिली. आता मी अग्नीला साक्षी ठेऊन तुमच्याशी मैत्री करू इच्छितो. मग दोघांनी अग्नीला साक्षी मानून एकमेकांशी मैत्री केली.