उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर कानपूर येथील अतिप्राचीन जगन्नाथ मंदिर हे मान्सून च्या अचूक भविष्यवाणी करिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. भीतरगांव विकासखंड मुख्यालयाच्या बेहटा गावात असलेल्या या मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब खाली गळू लागले की इथले शेतकरी ओळखतात की मान्सून चे ढग जवळच आहेत.
जाळून टाकणाऱ्या उन्हाळ्याच्या मध्ये मान्सून येण्या आधी साधारण १ आठवडा अगोदर मंदिराच्या छतातून पाणी गळायला सुरुवात होते. परंतु पाऊस सुरु झाल्यावर मात्र मंदिराचा आतील भाग पूर्णपणे सुका राहतो.
पुरातत्व विभागाने मंदिराचा इतिहास शोधून काढण्यासाठी आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न केले आहेत, तरीही या अतिप्राचीन मंदिराचे वय आणि निर्मिती याबाबत अजूनही काही समजू शकलेले नाही. पुरातत्व खात्याच्या वैज्ञानिकांच्या अनुसार मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार ११ व्या शतकाच्या आसपास झाला असावा.
बौद्ध मठासारखा आकार असलेल्या या मंदिराच्या भिंती १४ फूट उंच आहेत. मंदिरात भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या काळ्या चकचकीत दगडाच्या मूर्ती विराजमान आहेत. या व्यतिरिक्त मंदिराच्या प्रांगणात सूर्यदेव आणि पद्मनाभ यांच्या मूर्ती देखील विराजमान आहेत. मंदिराच्या बाहेर मोराचे निशाण आणि चक्र बनवलेले असल्याने चक्रवर्ती सम्राट हर्षवर्धन याच्या काळात मंदिराची निर्मिती झाली असावी असा अंदाज वर्तवला जातो.
मंदिराचे वय आणि इथे गळणारे पाणी यांच्याबद्दल संशोधन करण्यासाठी पुरातत्व विभागाचे वैज्ञानिक कित्येक वेळा इथे आले, पण मंदिराची निश्चित निर्मिती आणि इथे मान्सून येण्याच्या आधीच गळणारे पाणी याबद्दल त्यांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
मंदिरात गळणाऱ्या पाण्याचा थेंब जेवढा मोठा पडतो, पाऊस देखील तेवढाच मोठा पडतो. मंदिरात पाण्याचा थेंब पडल्यावर लगेच शेतकरी आपले बैल घेऊन शेताकडे निघतात. मंदिर अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. इथे सामान्यतः स्थानिक आणि परिसरातील लोकच दर्शन घेण्यासाठी येतात.