भिक्षुसंघांतील दुसरें एक भांडण

दुसरें एक भिक्षुसंघांत साधारण भांडण कौशाम्बी येथे उद्धवल्याचें सविस्तर वर्णन महावग्गांत सापडतें.  महावग्गाच्या कर्त्याने किंवा कर्त्यांनी संघाला ह्यासारख्या इतर प्रसंगीं उपयोगी पडेल अशा रीतीने या कथेची रचना केली आहे.  त्याच्या म्हणण्याचा सारांश असा की, दोघां विद्वान भिक्षूंत विनयाच्या एका क्षुद्र नियमासंबंधाने मतभेद होऊन हें भांडण उपस्थित झालें.  त्या वेळीं भगवंताने त्यांना दीर्घायूची गोष्ट सांगितली.  परंतु ते ऐकेनात.  त्यांपैकी एक भिक्षु म्हणाला, ''भदन्त, आपण स्वस्थ राहा.  आम्ही या भांडणाचें काय होतें तें पाहून घेऊं.''  त्या सर्वांची मनें कलुषित झालीं आहेत असें पाहून भगवान् कौशाम्बीहून प्राचीन वंसदाव उपवनांत गेला.  तेथे अनुरुद्ध, नंदिय व किम्बिल हे तिघे भिक्षु राहत असत.  त्यांचा एकोपा पाहून भगवन्ताने त्यांचें अभिनंदन केलें; आणि तेथून भगवान पारिलेय्यक वनांत गेला.  त्याच वेळीं एका हत्तींच्या कळपाचा पुढारी हत्ती आपल्या कळपाला कंटाळून त्या वनांत एकटाच राहत होता.  त्याने भगवंताचें स्वागत केलें.  भगवान् त्या ठिकाणीं कांही काळ राहून श्रावस्तीला आला.

इकडे कौशाम्बी येथील उपसकांनी त्या भांडणार्‍या भिक्षूंना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांचा कोणत्याही रीतीने आदरसत्कार करूं नये आणि त्यांना भिक्षा देऊ नये, असा बेत केला.  त्यामुळे वठणीला येऊन ते भिक्षु श्रावस्तीला गेले.  तेव्हा भगवंताने भांडण कसें मिटवावें यासंबंधाने कांही नियम करून उपालि वगैरे भिक्षूंकडून तें भांडण मिटविलें.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  'बौद्धसंघाचा परिचय', पृ. ३७-४३ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मज्झिमनिकायांतील उपक्किलेससुत्तांत (नं. १२८) महावग्गाच्या मजकुरापैकी बराच भाग आला आहे.  पण त्याच्यामध्ये दीर्घायूची गोष्ट तर नाहीच आणि त्या सुत्ताची समाप्ति प्राचीनवंसदाव वनांतच होते.  पारिलेय्यक वनांत बुद्ध भगवान गेल्याचा भाग त्या सुत्तांत नाही.  तो उदानवग्गांत सापडतो.

कोसम्बियसुत्तांत यापेक्षा निराळाच मजकूर आहे.  त्याचा सारांश असा --

भगवान कौशाम्बी येथे घोषितारामांत राहत होता.  त्या वेळीं कौशाम्बींतील भिक्षु परस्परांशीं भांडत होते.  भगवन्ताला ही गोष्ट समजली.  तेव्हा त्याने त्या भिक्षूंना बोलावून आणलें; आणि भगवान त्यांना म्हणाला, ''भिक्षुहो, जेव्हा तुम्ही परस्परांशीं भांडतां तेव्हा तुमचें परस्परांविषयीं कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्म मैत्रीमय होणें शक्य आहे काय ?''

''नाही,'' असें त्या भिक्षूंनी उत्तर दिलें.  तेव्हा भगवान म्हणाल, ''जर असें नाही, तर तुम्ही भांडतां कशाला ?  निरर्थक माणसांनो, अशा प्रकारचें भांडण तुम्हांला चिरकाल हानिकारक आणि दुःखकारक होईल.''

पुन्हा भगवान म्हणाला, ''भिक्षुहो, ह्या सहा संस्मरणीय गोष्टी भांडणें तोडण्याला, सामग्रीला आणि एकोप्याला कारणीभूत होतात.  त्या कोणत्या ?  (१) मैत्रीमय कायिक कर्मे, (२) मैत्रीमय वाचसिक कर्मे, (३) मैत्रीमय मानसिक कर्मे, (४) उपासकांकडून मिळालेल्या दानधर्माचा सर्व संघाबरोबर समविभागने उपभोग घेणें, (५) आपल्या शीलांत यत्किंचित् उणीव असूं न देणें, आणि (६) आर्यश्रावकाला शोभण्यासाठी सम्यक् दृष्टि ठेवणें.''

या सम्यक् दृष्टीचें भगवन्ताचे बरेंच विवेचन केलें आहे.  तें विस्तारपूर्वक येथे देण्याची आवश्यकता वाटत नाही.  या उपदेशाच्या शेवटीं त्या भिक्षूंनी भगवन्ताच्या भाषणाचें अभिनंदन केलें.

याचा अर्थ असा होतो की, हें भांडण तेथल्या तेथेच मिटलें.  नाही तर भगवन्ताच्या भाषणाचें त्या भिक्षूंनी अभिनंदन कसें केलें असतें ?  महावग्गांत आणि उपक्किलेस सुत्तांत त्या भिक्षूंनी भगवन्ताचें अभिनंदन केल्याचा उल्लेख नाही; ते भांडतच राहिले आणि त्यांना कंटाळून भगवान तेथून निघून प्राचीनवंसदाव वनांत गेला असें तेथे म्हटलें आहे.  तेव्हा या परस्पर विरोधाचा मेळ कसा घालावा ?

अंगुत्तर निकायांतील चतुक्क निपाताच्या २४१ व्या सुत्तांत हा मजकूर आहे :-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel