चंडप्रद्योताची कन्या वासुलदत्ता (वासवदत्ता) मोठी हुशार होती. मंत्र ग्रहण करण्याला ती समर्थ होती खरी; पण उदयनाला आणि तिला एकत्र येऊं देणें प्रद्योताला योग्य वाटलें नाही. तो उदयनाला म्हणाला, ''माझ्या घरीं एक कुबडी दासी आहे, ती पडद्याच्या आड राहून तुला नमस्कार करील आणि तुझें शिष्यत्व पत्करून मंत्र शिकेल. तिला जर मंत्रसिद्धि मिळाली, तर तुला मी बंधमुक्त करून तुझ्या राज्यांत पाठवीन.''

उदयनाने ही गोष्ट कबूल केली. प्रद्योताने वासवदत्तेला सांगितलें की, ''एक श्वेतकुष्ठी मनुष्य हत्तीचा मंत्र जाणतो. त्याचें तोंड न पाहतां त्याला नमस्कार करून तो मंत्र ग्रहण केला पाहिजे.'' त्याप्रमाणें वासवदत्तेने उदयनाला पडद्याआडून नमस्कार करून मंत्र शिकण्यास सुरुवात केली. तो शिकत असतां कांही अक्षरें तिला नीट उच्चारतां येईनात. तेव्हा उदयन रागावून म्हणाला, ''हे कुबडे, तुझे ओठ फारच जाड असले पाहिजेत !'' तें ऐकून वासवदत्ता अत्यंत संतापली व म्हणाली, ''अरे कुष्ठया, तूं राजकन्येला कुबडी म्हणतोस काय ?''

उदयनाला हा काय प्रकार आहे तें समजेना. तें जाणण्यासाठी त्याने एकदम पडदा बाजूला सारला. तेव्हा त्या दोघांनाही प्रद्योताचा मतलब समजला. ताबडतोब दोघांचें परस्परांवर प्रेम जडलें व अवंतीहून पळून जाण्याचा त्यांनी बेत रचला. शूभ मुहूर्तावर मंत्रसिद्धीसाठी एक औषधि आणली पाहिजे म्हणून वासवदत्तेने आपल्या बापाकडून भद्रवती नांवाची हत्तीण मागून घेतली. आणि प्रद्योत उद्यानक्रीडेला गेला आहे, असें पाहून तिने व उदयनाने त्या हत्तिणीवर बसून पळ काढला. उदयन हत्ती चालवण्यांत पटाईत होताच. तथापि त्याच्या मागोमाग पाठवलेल्या शिपायांनी त्याला वाटेंत गाठलें. वासवदत्तेने बापाच्या खजिन्यांतून शक्य तेवढ्या सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या बरोबर आणल्या होत्या. त्यांपैकी एक पिशवी सोडून तिने नाणीं रस्त्यांत फैलावलीं. शिपाई ती वेचण्यांत गुंतले असतां उदयनाने हत्तिणीला पुढे हाकलें. पुन्हा शिपायांनी हत्तिणीला गाठलें, तेव्हा तसाच प्रयोग करण्यांत आला; आणि या उपायाने त्या दोघांनी कौशाम्बी गाठली.

उदयन एकदा आपल्या उद्यानांत क्रीडेसाठी गेला असता तेथेच झोपला. पिंडोल भारद्वाज भिक्षु जवळच्या एका वृक्षाखाली बसला होता. राजाला झोप लागली आहे, असें पाहून त्याच्या बायका पिंडोल भारद्वाजापाशीं गेल्या आणि त्याचा उपदेश ऐकत बसल्या. इतक्यांत राजा जागा झाला व रागावून पिंडोल भारद्वाजाच्या अंगावर तांबड्या मुंग्या सोडण्याचा त्याने प्रयत्‍न केला, असा उल्लेख संयुक्तनिकायाच्या अट्ठकथेंत सापडतो. पण पुढे पिंडोल भारद्वाजाचाच उपदेश ऐकून उदयन बुद्धोपासक झाला.

कौशाम्बी येथे घोषित, कुक्कुट आणि पावारिक या तीन श्रेष्ठींनी बुद्धाच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी अनुक्रमें घोषिताराम, कुक्कुटाराम आणि पावारिकाराम असे तीन विहार बांधल्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकथेंत आणि धम्मपदअट्ठकथेंत सापडतो. उदयनाची एक प्रमुख राणी सामावती आणि तिची दासी खुज्जुत्तरा (कुब्जा उत्तरा) या बुद्धाच्या दोन मुख्य उपासिका होत्या. यावरून असें दिसतें की, उदयन राजा जरी फारसा श्रद्धाळू नव्हता, तरी कौशाम्बीच्या लोकांत बुद्धभक्त पुष्कळ होते आणि भिक्षूंचा योगक्षेम नीट चालवण्यास ते उत्सुक असत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'बौद्धसंघाचा परिचय', पृ. २३७-२४५ पाहा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel