वागणुकीचे नियम

याप्रमाणे भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावें असा बुद्ध भगवंताचा उपदेश होता.  तथापि मनुष्यस्वभावाला अनुसरून कांही भिक्षु या वस्तु स्वीकारण्यांत देखील अतिरेक करीत; म्हणजे तीन चीवरांपेक्षा जास्त वस्त्रें घेत; मातीचें किंवा लोखंडाचें पात्र ठेवण्याऐवजी तांब्यापितळेचें पात्र स्वीकारीत; चीवरें प्रमाणाबाहेर मोठीं बनवीत.  येणेंकरून परिग्रहाला वाव मिळत असे.  यास्तव त्याला आळा घालण्यासाठी पुष्कळसे नियम करावे लागले.  अशा नियमांची संख्या बरीच मोठी आहे.

विनयपिटकांत भिक्षुसंघासाठी एकंदरींत २२७ निषेधात्मक नियम दिले आहेत. त्यांना 'पातिमोक्ख' असें म्हणतात.  त्यांपैकी दोन अनियत (अनियमित) आणि शेवटचे ७५ सेखिय, म्हणजे खाण्यापिण्यांत चालण्याबोलण्यांत शिष्टाचाराने कसें वागावें या संबंधाचे नियम, एवढे वजा जातां, बाकी १५० नियमांनाच अशोककालाच्या सुमाराला पातिमोक्ख म्हणत असत, असें वाटतें.  त्या कालापूर्वी हे सर्व नियम अस्तित्वांत नव्हते; आणि जे होते त्यांत मूलभूत नियम सोडून बाकी नियमांत योग्य फेरफार करण्याला संघाला पूर्णपणें अधिकार होता.  परिनिर्वाण पावण्या र्वी भगवान् आनंदाला म्हणतो, ''हे आनंदा, जर संघाची इच्छा असेल तर माझ्या पश्चात् संघाने बारीक सारीक नियम गाळावे.''

यावरून बारीक सारीक नियम गाळण्याला किंवा देशकालानुसार सामान्य नियमांत फेरफार करण्याला भगवंताने संघाला पूर्णपणें मुभा दिली होती, हें स्पष्ट होतें.

शरीरोपयोगी पदार्थ वापरण्यात सावधगिरी

भिक्षूला लागणार्‍या पदार्थांत चीवर, पिण्डपात (अन्न), शयनासन (राहण्याची जागा) आणि औषध हे चार पदार्थ मुख्य असत.  पातिमोक्खाच्या नियमानुसार त्यांचा उपभोग घेत असतांना देखील विचारपूर्वक वागावें, असें भगवंताचें म्हणणें होतें.

चीवर वापरतांना भिक्षूला म्हणावें लागे- 'नीट विचार करून हें चीवर वापरतों, तें केवळ शीत, उष्ण, डास, माशा, वारा, ऊन, साप यांची बाधा न व्हावी म्हणून आणि गुन्ह्येंद्रिय झाकण्याच्या उद्देशाने'

पिण्डपात सेवन करतांना म्हणावें लागे -- 'नीट विचार करून हा पिण्डपात सेवन करतों, तो शरीर क्रीडा करण्यास समर्थ व्हावें, मस्त व्हावें, मण्डित आणि विभूषित व्हावें, म्हणून नव्हे, तर केवळ या देहाचा सांभाळ व्हावा, त्रास नष्ट व्हावा आणि ब्रह्मचर्याला मदत व्हावी म्हणून.  याप्रमाणे मी (भुकेची) जुनी वेदना नाहीशी करीन, आणि (जास्त खाऊन) नवीन वेदना उत्पन्न करणार नाही.  यामुळे माझी शरीरयात्रा चालेल, लोकापवाद राहणार नाही आणि जीवन सुखकर होईल.'

शयनासन वापरतांना म्हणावें लागे-- 'नीट विचार करून हें शयनासन वापरतों, तें केवळ शीत, उष्ण, डास, माशा, वात, ऊन, साप यांची बाधा न व्हावी म्हणून आणि एकांतवासांतील विश्रांतीसाठी'.  औषधि पदार्थ वापरतांना म्हणावें लागे-- 'नीट विचार करून हा औषधि पदार्थ वापरतों, तो केवळ उत्पन्न झालेल्या रोगाच्या नाशासाठी आणि आरोग्य प्राप्‍त होईल तोंपर्यंतच.'*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  येणेंप्रमाणे चार शरीरोपयोगी पदार्थ सावधानपणें वापरण्याला पच्चवेक्खण (प्रत्यवेक्षण) म्हणतात आणि त्याची वहिवाट आजलाही चालू आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel