(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आईचा आक्रस्ताळेपणा आरडाओरडा, अतार्किक बोलणे, पराकोटीचे होते .कोणतीही गोष्ट तिला समजावून सांगणे अशक्यप्राय होते .

मी सायलीला एकदा म्हटले सुद्धा, तू आईला उमेश बद्दल सांगून बघ,  लग्नाला तू तयार झालीस हे पाहून तिला आनंद होईल .ती आंतरजातीय विवाहाला परवानगी देईल .

परंतु आईची तिला खात्री वाटत नव्हती.आई रागाच्या भरात जिवाचे कमी जास्त करून घेईल असे तिला वाटत असे.

ती सदैव तिच्या विचारात गुंग असे .अशीच मन हरवलेल्या स्थितीत तू राहिलीस तर एक दिवस तुला अपघात होईल किंवा तुला वेड लागेल .हे सर्व सोडून दे असेही मी तिला आर्जवपूर्वक सांगितले होते ."बी प्रॅक्टिकल" व्यवहारी हो असेही तिला सांगितले होते.

आईला सर्व काही सांगून टाक. ती मान्य करील किंवा करणार नाही .तिने मान्य केले तर आनंदच आहे परंतु जर तिने विरोध केला, अकांडतांडव केले, तर तू तुझा मार्ग निश्चित कर .वेळ प्रसंगी घरातून बाहेर पडून लग्न कर. काही वर्षे गेली की आईचा विरोध मावळेल असेही मी तिला सांगत असे. सर्वार्थाने इतका चांगला मुलगा मिळणार  नाही .अशी संधी वारंवार येत नसते.दैव देते आणि कर्म नेते असे होऊ नये.

पण ती तिच्या विचित्र मन:स्थितीतून बाहेर यायला तयार नव्हती.

शेवटी तिने मनाचा निश्चय केला.सर्व काही घरात सांगितले.बाबांनी नेहमीप्रमाणे तिला मान्यता दिली. पाठिंबा दिला.आईने अपेक्षेप्रमाणे आकांडतांडव केले .जीव देईन वगैरे धमकी दिली .तिच्याशी अबोला धरला .आई मान्यता देईल असे वाटत नव्हते .विरोध करून घराचा त्याग करून लग्न करावे लागणार होते .

काय करावे अशा द्विधा मनस्थितीत ती होती.आईच्या मनाप्रमाणे वागावे असे एकदा तिला वाटत होते तर दुसऱ्या बाजूने विरोध करून लग्न करावे असे वाटत होते.

तिची विचित्र मन:स्थिती, स्वतःतच गुरफटून रहाणे, जगाकडे लक्ष नसणे,मन हरवलेल्या स्थितीत सतत असणे ,यातून ती काही शेवटपर्यंत बाहेर आली नाही .पूर्वी सांगावे कि न सांगावे अशी तिची मन:स्थिती होती तर आता आईच्या मनाप्रमाणे वागावे की आपल्या मनाप्रमाणे  वागावे या विचारात ती गुरफटलेली होती .

आणि तो दिवस उजाडला.

त्या दिवशी श्रावणी शुक्रवार होता .मुलांच्या आयुष्यासाठी  श्रावणातील कोणत्याही शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावण्याची प्रथा आहे .श्रावणात जे कुलाचार किंवा कुळधर्म ,आचारधर्म, पाळले जातात त्यातील हा एक आहे .(दुपारी जेवायला बोलावण्याची प्रथा आहे परंतु सोयीसाठी संध्याकाळीही बोलाविले जाते )त्या दिवशी संध्याकाळी सवाष्ण जेवायला येणार होती . आईचा निरोप घेऊन ती कामावर जाण्यासाठी  बाहेर पडली .आईने तिला तू आज कामावरून लवकर ये तुझ्या आवडीच्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत म्हणून सांगितले .हे सांगताना सुद्धा आईचा चेहरा रागावलेला होता. तिच्या विचित्र स्वभावाला अनुसरून ते ठीकच होते .

सायली हो म्हणाली आणि कामावर गेली.त्या दिवशी तिची मन:स्थिती कशी होती ते कळायला मार्ग नाही .कारण त्या दिवसानंतर ती मला भेटली नाही .

त्या दिवशी रात्री साडेसात वाजले होते .शेजारच्या काकूना सवाष्ण  म्हणून जेवायला बोलाविले होते .त्यांना आठची वेळ दिली होती .त्या साडेसातलाच आल्या. प्रथम गप्पा मारू नंतर जेवण होईल असा त्यांचा विचार असावा .इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या .टी व्ही चालू होता. त्यावर कोणता तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम चालू होता .आई गप्पांमध्ये भाग म्हटले तर घेत होती म्हटले तर घेत नव्हती.ती आपल्याच विचारांत बुडालेली दिसत होती . नेहमीसारख्या गप्पा रंगत नाहीत असे पाहून काकूंनी आईला विचारले.तुमची प्रकृती बरी नाही का ?यावर ती उत्तरली मला काय धाड भरली आहे.  हे उत्तर ऐकून काकू चपापल्या.आईचे काहीतरी बिनसले आहे हे त्यांनी ओळखले. बाबांनी विषय बदलला .काकू आमच्या शेजारी पंचवीस वर्षे राहत असल्यामुळे त्यांना आईचा स्वभाव माहीत होता.

त्यांनी आईच्या मूडकडे व उद्गारांकडे विशेष लक्ष दिले नाही .

सायली दादरला कामासाठी जात असे .ती काम करीत असलेली सीएची फर्म दादरला होती .तिची गाडी सात पंचेचाळीसला स्टेशनवर येत असे.आठ पर्यंत ती नेहमी घरी येत असे .आठ वाजायला आले .सायली आली नाही .कदाचित काही कारणाने गाडी लेट असेल किंवा तिची गाडी चुकली असेल ती मागच्या गाडीने येईल असे आम्हाला वाटले.

आमच्या घरावरून सारख्या रेल्वे गाड्या जात येत असत .मी गॅलरीत बसून सायली गाडीच्या  दरवाज्यात उभी दिसते का ते पाहात होते. येणाऱ्या  जाणार्‍या  रेल्वे गाडय़ा घरातून दिसत असत.काही वेळा प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या गाड्याही दिसत असत .आमच्या खिडकीत उभे राहिले तर, येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या दरवाज्यात, उभा असलेला मनुष्य, गाडीला सिग्नल नसल्यामुळे स्लो झाली असेल तर काही वेळा ओळखताही येत असे .मुंबईहून येणारी गाडी थांबे  तो प्लॅटफॉर्म आमच्या बाजूला पूर्व दिशेला होता.स्टेशन आले म्हणून सायली दरवाज्याजवळ येऊन उभी राहिली असेल.ती हात हलवील.म्हणून मी पाहात होते  

साडेआठ झाले तरी ती आली नाही.थोडी काळजी वाटू लागली .घरात  जेवणासाठी पाने घेतलेली होती. देवीची पूजा झाली होती .चंदनी उदबत्त्यांचा सुवास घरभर भरून राहिला होता .सायली आली की लगेच जेवायला बसायचे होते .ती अजून का आली नाही म्हणून सर्वांनाच काळजी वाटू लागली होती .सायली तशी वक्तशीर होती. ती नेहमीच आठपर्यंत घरी येत असे .आज तर सण लवकर ये वेळेवर ये म्हणून तिला सांगितले होते .आज ती उशीर करणे शक्य नव्हते.

एवढय़ात दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले .आम्हाला वाटले सायली आली परंतु कुणीतरी अनोळखी माणूस दरवाजात उभा होता.मधुकर आपटे यांचे घर हेच का म्हणून तो विचारीत होता .मी हो म्हणत पुढे झाले .आलेला माणूस रेल्वेचा होता .प्लॅटफॉर्मवर गाडीचा धक्का लागून एक मुलगी मेली आहे.तिच्या पर्समध्ये हा पत्ता होता .साहेबांनी डेड बॉडी ओळखण्यासाठी बोलाविले आहे .

तो इतक्या मोठ्याने बोलत होता ते सर्वांना ऐकू जात होते. ती सायलीचं असणार याबद्दल सर्वांचेच एकमत होते .माझी आई बेशुद्ध  होऊन धाडकन खाली पडली.बाबाही खचून सोफ्यावर मटकन बसले. मी प्रथम धावत आईकडे गेले.तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले .माझ्याजवळ स्मेलिंग सॉल्ट नव्हते .नेहमीचा घरगुती उपाय कांदा फोडून  मी तो तिच्या नाकाजवळ धरला.ती शुद्धीवर आली .बातमी कळल्याबरोबर सर्वच शेजारी आमच्याकडे जमले होते .

आलेल्या रेल्वेच्या माणसाबरोबर बाबा शेजारच्या काकांबरोबर रेल्वे स्टेशनवर गेले .त्यांच्याबरोबर सोसायटीतील आणखी एक दोन तरुण मुले गेली. सर्वांना एकच आशा होती की ती सायली नसेल.दुसऱ्याच एखाद्या  माझ्या किंवा सायलीच्या मैत्रिणीची ती पर्स असेल त्यात आमचा पत्ता सापडला असेल .परंतु वाईट बातम्या खोट्या ठरत नसतात .ती सायलीच होती. तिचीच पर्स होती .

सायली घरी येण्यासाठी नेहमीच्या ट्रेनने स्टेशनवर उतरली .रेल्वेचा ओव्हरब्रीज दुसऱ्या टोकाला होता .संपूर्ण प्लॅटफॉर्म चालत जाऊन नंतर रेल्वे ओव्हरब्रीज  ओलांडून पुन्हा पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून तेवढेच चालत येऊन नंतर आमच्या घराकडे यावे लागे .स्टेशनच्या मुंबई बाजूला आमचे घर होते .एवढी यातायात करण्यापेक्षा गाडी येत नाही असे पाहून रेल्वे लाइन पटकन ओलांडणे सोपे जात असे.स्टेशनच्या पूर्वेच्या बाजूला राहणारे बरेच हा मार्ग अवलंबित असत .त्यावेळी म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी या स्टेशनचा पूर्वेकडचा भाग विशेष विकसित झाला नव्हता. पश्चिम भाग भरपूर विकसित झाला होता.आता पूर्वेकडचा भागही प्रचंड विकसित झाला आहे .अपघात होऊ नये, लोकांनी रेल्वे लाइन क्रॉस करू नये, म्हणून कुंपण घालण्यात आले आहे.त्यावेळी कुंपण नव्हते. जर कुंपण असते तर माझी सायली वाचली असती.  

प्लॅटफॉर्मला लागून जिथून रेल्वे लाइन लोक ओलांडीत असत तिथे एक झुडूप पाऊस पिऊन तरारले होते . त्यामुळे येणारी रेल्वेगाडी दिसत नसे .प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहून वाकून पाहावे लागे.आणि नंतर रेल्वे लाईन ओलांडावी लागे. 

रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी सायली  वाकून पहात असताना तिला  त्याच वेळी आलेली रेल्वे दिसली नसावी .

किंवा दिसूनही तिला मागे होता आले नसावे .

कदाचित ती आपल्या विचारात गुंग असल्यामुळे तिला आपल्या हालचाली जलद करता आल्या नसाव्यात .

कदाचित जाणूनबुजून तिने रेल्वेला आपल्याला धडक मारू दिली असावी.

शक्यता अनेक आहेत परंतु आमची सायली आम्हाला सोडून गेली  एवढे मात्र खरे.

आईला तर सायलीच्या मृत्यूला ती अपराधी आहे असे वाटत होते . लग्नाला परवानगी दिली असती तर हे घडलेच नसते असे तिला राहून राहून वाटत असे .तसे ती बोलूनही दाखवी.मी सायलीचा खून केला असेही पुटपुटताना तिला मी एेकले आहे .

या घटनेनंतर आईचे देव देव ,पूजा अर्चा,भजन पूजन, अतिशय वाढले.बाबा आणखी वेगळ्या दुसऱ्या टोकाला गेले.त्यानंतर आई कित्येक वर्षे विमनस्क सरकलेल्या मन:स्थितीत होती.

आपल्यामुळे सायली गेली ही गोष्ट तिने मनाला फार लावून घेतली .होणारे ते झाले .ज्याचे जसे प्राक्तन तसे होते. दैवगती कुणाला टळली आहे. अश्या  प्रकारे तिला खूप जणांनी निरनिराळ्या प्रकारे समजावले .परंतु शब्द हे नसते बुडबुडे .ज्याचे जळते त्याला कळते. ज्याचे त्याचे भोग  ज्याचे त्याला भोगावे लागतातच .

त्या दिवशीचे रात्रीचे जेवण भिकाऱ्यांना वाटून टाकण्यात आले .

*त्यानंतर आमच्या घरात पुन्हा  पुरणपोळ्या झाल्या नाहीत.*

मी कुठे गेल्ये तिथे पुरणपोळी असली तरीही मी पुरणपोळी खात नाही .

*पुरणपोळी बघितली की त्या रात्रीचे सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहते .*

सायली आठवते .तिचे व माझे प्रेम, मैत्री, आठवते .

आम्ही दोघी एकमेकांजवळ केव्हाही कसलेही हितगुज करीत असू.

मला अंतरीचे गूज सांगण्यासाठी कुणी उरले नाही 

* दोघीनी एकमेकांपासून केव्हाही काहीही लपविले नाही .*

*मग मला सांगितल्याशिवाय सायली कशी गेली ?*

*सायलीला पुरणपोळी अतिशय आवडत होती .*

* मी पुरणपोळीचा घास घेतला तरी ,तो घशातून खाली उतरणार नाही .*

(समाप्त)

१३/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel