(ही गोष्ट काल्पनिक आहे    कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आज घरात पुरणपोळी केलेली आहे.पुरणपोळीचा खमंग वास येत आहे .मलाही एकेकाळी पुरणपोळी प्रचंड आवडत असे. मी पुरणपोळी  सोडून दिली त्याला अनेक वर्षे लोटली आहेत .मी पुरणपोळी खात होते हेही विसरून गेले  आहे.पुरणपोळीची चवही आता मला आठवत नाही. पुरणपोळीशी कटू आठवणी जोडलेल्या आहेत .त्या सर्व आठवणी पुरणपोळी पाहिली की जागृत होतात .पुरणपोळी  खावी असे आतूनच वाटत नाही.आजी तू पुरणपोळी कां खात नाहीस म्हणून  माझी नातवंडे विचारतात.त्याना मी काय उत्तर देऊ ते मला समजत नाही . दिले तरी त्यांना ते कितपत समजेल माहीत नाही. 

माझी धाकटी बहीण सायली हिला पुरणपोळ्या खूप आवडत असत. आमच्या घरात माझ्या माहेरी  मधूनमधून कारणाकारणाने सणावाराला किंवा कारणाशिवाय एरवीही  पुरणपोळ्या होतच असत.तरीही मधूनच सायलीला पुरणपोळ्या खायची हुकी येई  .ती आईला उद्या पुरणपोळ्या कर म्हणून सांगत असे.आणि आईही मोठ्या कौतुकाने त्या करीत असे .आमची आई पुरणपोळ्या अत्यंत उत्कृष्ट ए वन करीत असे. आम्ही दोघी बहिणी मी सुनंदा व धाकटी सायली .आम्हा दोघींमध्ये अंतर फक्त दोन वर्षांचेच होते .लोकांना आम्ही जुळ्या बहिणी आहोत असेच वाटत असे.

मी डॉक्टर झाले तर सायली सी.ए.झाली .सायलीला सायकलीवरून फिरण्याची फार हौस होती.मित्र मैत्रिणींबरोबर ती सायकलवरून  दूर दूरच्या प्रवासाला जात असे.सुटीमध्ये आठ आठ दिवस ती मित्र मैत्रिणींबरोबर कुठेना कुठे सायकलीवरून जात असे.बायकाना इतके सायकलिंग बरे नाही असे आई तिला वारंवार सांगत असे .कुठे अपघात झाला तर कायमचे अपंगत्व यायचे. रस्त्यावरून मोटारी ट्रक तुफान जात असतात .सायकलचे निरनिराळे अपघात आपण वाचतो.इत्यादी बडबड आई करीत असे.सायली तिच्या बडबडीकडे विशेष लक्ष देत नसे.

सायली आईला समजून सांगे अपघात कसेही होतात. रस्त्यावरून चालतानाही होऊ शकतात.अपघात नशिबात असेल तर तो चुकणार नाही .नशिबात नसेल तर मोटार अंगावरून गेली तरी मनुष्य वाचेल. सायकल, स्कूटर, मोटार, रेल्वे ,लिफ्ट,  विमान, इतके कशाला चालतानाही अपघात होऊ  शकतात .घरात बसून राहिले तरीही डोक्यावर प्लास्टरचा एखादा तुकडा पडेल, भांडे आपटेल,पाय घसरून पडायला होईल .आपण आपल्या परीने काळजी घ्यावी मग सर्व काही देवावर नशिबावर सोडून द्यावे.

आईला तिचे बोलणे पूर्णपणे पटत असे.परंतु वळत मात्र नसे.सायली सायकलिंगला निघाली की आईचे चार शब्द तिला ऐकावे लागत .ती येईपर्यंत आई अस्वस्थ असे .आणि आईची भीती एक दिवस खरी ठरली .अशीच सायकलिंगला गेली असताना तिला लहानसा अपघात झाला .तिची सायकल घसरली ती  रस्त्यावर आपटली . डोक्यावर हेल्मेट होते म्हणून ती सहीनसही बचावली .त्या अपघातात तिच्या मणक्याला कुठेतरी मार बसला .ऑपरेशन करावे लागले . काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढून ती घरी आली .तिला पूर्णपणे बरे कधीच वाटले नाही .तिची कंबर कमी जास्त प्रमाणात  सतत दुखत असे .हळूहळू दुखण्याचे प्रमाण कमी झाले .तरीही मधून मधून दुखणे उपटत असे.

तिचे सायकलिंग कायमचे बंद झाले.सततच्या कमरेच्या दुखण्यामुळे तिने एक फार मोठा  निर्णय घेतला होता .कधीही लग्न न करण्याचा तो निर्णय होता .आपण नवऱ्याला शरीर सुख व्यवस्थित देऊ शकणार नाही अशी भीती तिला वाटे.  तसेच गर्भारपणात व प्रसूतीच्या वेळी खूप त्रास होईल याचीही तिला भीती वाटे. गर्भारपणात कदाचित अपंगत्व येईल म्हणूनही ती घाबरत असे .मी डॉक्टर असल्यामुळे मला तिच्या बाजूने किंवा तिच्या विरुद्ध काहीही बोलता येत नसे .त्रास होईल किंवा होणार नाही दोन्ही  शक्यता फिफ्टी फिफ्टी होत्या. तिची आई तू लग्न कर म्हणून तिच्या मागे सतत लागत असे .आणि ती नाही म्हणून ठामपणे सांगत असे .

आईची एक तर्‍हा तर बाबांची दुसरीच तर्‍हा. बाबानी आम्हाला पूर्णपणे मोकळीक दिली होती.तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वागा. तुम्ही आता मोठ्या झाल्या आहात. तुम्हाला तुमचे बरेवाईट कळते. असे त्याचे नेहमी सांगणे असे .तू अमुक कर किंवा तू अमुक करू नको असे आम्हाला त्यांनी कधीही सांगितले नाही .ते सल्ला देत .त्यांना जे काही योग्य अयोग्य वाटे ते सांगत परंतु निर्णय आमच्यावर सोपवत.त्यांनी कधीही निर्णय आमच्यावर लादला नाही . उलट आईला हसून ते सांगत असत, एखाद्या कुकुल्या बाळाप्रमाणे मुलींना वागवू नकोस.  त्या मोठ्या झाल्या आहेत .त्या जबाबदार झाल्या आहेत.लहानपणी सुद्धा त्यानी आमच्यावर विशेष जोरा केलेला आठवत नाही.

आम्ही शिक्षण कोणते घ्यावे याचाही निर्णय त्यांनी आमच्यावर संपूर्णपणे सोपविला होता .ते सल्ला देत, परंतु निर्णय शेवटी आम्ही घ्यावा असे त्यांचे ठाम मत होते .त्यांनी सर्वार्थाने आम्हाला आमच्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याची मुभा दिली होती .त्यानी आम्हाला शिक्षणासाठी पैशाला कुठेही कमी पडू दिले नाही .माझ्या इच्छेप्रमाणे मी डॉक्टर झाले व सायली सीए झाली .

मी डॉक्टरी पेशात असल्यामुळे डॉक्टर नवरा असावा असे माझ्या वडिलांना वाटत होते .माझ्या मित्र मैत्रिणी खूप होत्या .त्यातीलच एखाद्या मित्राबरोबर मी लग्न करीन असे माझ्या बाबांना वाटत होते.परंतु एवढ्या मित्रांमध्ये मला हजबंड मटेरियल कुणातही आढळले नाही .शेवटी लग्नाच्या गाठी कुठेतरी वरती परमेश्वरच मारीत असतो हेच खरे.एका सेमिनारमध्ये माझी एका डॉक्टरशी ओळख झाली .त्यातून मैत्री व पुढे मैत्रीचे रूपांतर विवाहात झाले .मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माझ्या मुलां नातवंडांसोबत मी सुखात आहे .

लिहिता लिहिता मी जरा विषयाला सोडून लिहित गेले .मला एकेकाळी पुरणपोळी आवडत असूनही ती मी खात का नाही ?खावी असे मला का वाटत नाही?असा तुम्हाला प्रश्न पडला असेल .त्याची कथा मी तुम्हाला सांगत होते .

सायली विवाह करणार नाही असे कां म्हणाली त्याचे कारण मी तुम्हाला सांगत होते . सायली सीए झाल्यावर एका सीए फर्ममध्ये नोकरीला लागली.त्या फर्मचा मालक तरुण होता .मुळात ती फर्म त्यांच्या वडिलांची होती. त्याचे वडील अधूनमधून फर्ममध्ये येत असत .हल्ली मुलगाच फर्म सांभाळीत असे.उमेश, त्या फर्मचा  मालक,त्याला सायली आवडली.एक सांगायचे राहिले सायली उंचनिंच  आणि सुंदर होती.तिची छाप कुणावरही पडत असे .तिच्या बोलण्यात एक गोडवा माधुर्य होते .बहुधा पाडगावकरांनी तू अशीच चालत राहा असे कुठेतरी सखीला उद्देशून म्हटले आहे.त्याप्रमाणेच सायली बोलायला लागली की तू अशीच बोलत राहा असे म्हणावेसे वाटे.तिचा स्वभावही खूप मनमिळावू कोणालाही लगेच आपलेसे करणारा  होता .

तर उमेश तिच्या प्रेमात पडला यात काही नवल नाही .त्याने तिला लग्नाबद्दल विचारले . सायलीला तिच्या वैयक्तिक कारणांसाठी लग्न करायचे नव्हते .तिने त्याला ठामपणे नकार दिला .उमेश सायलीलाही आवडला होता.परंतु तिच्या त्या कारणामुळे तिला लग्न करायचे नव्हते . उमेश व सायली ऑफिस संपल्यावर ऑफिसातच गप्पा मारीत बसत .केव्हा चौपाटीवर फिरायला जात.केव्हा सिनेमाला जात .दोघांची मैत्री दाट होती.ती दोघे लग्न करणार म्हणून सर्वजण धरून चालले होते.

लग्नाचा विषय निघाला म्हणजे  सायली ठामपणे नाही म्हणत असे .तिने उमेशला तिला लग्न करायचे नाही म्हणून सांगितले होते .तुला तसेच फिरणे पसंत नसेल तर आपण इथेच आपल्या मैत्रीला पूर्णविराम देऊया असेही एकदा तिने त्याला सांगितले .शेवटी उमेशने तिला खोदून खोदून असे का म्हणून विचारले .त्यावर तिने तिची वैयक्तिक कारणे मणकादुखी, कंबरदुखी,गर्भारपण व प्रसूती पेलेल की न पेलेल,लहान मुलाचे संगोपन करायला झेपेल कि न झेपेल ,  इत्यादी सर्व कारणे  सांगितली.

उमेश सायलीच्या प्रेमात इतका आकंठ  बुडाला होता की त्याने तिला एक प्रस्ताव (प्रपोजल) दिला .आपण लग्न करू या . तुला आपले स्वतःचे मूल असावे असे  वाटले तरच आपण मूल होऊ देऊ. आपण प्रख्यात गायनाकॉलॉजिस्टचा व आर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेऊ .तुला भीती वाटत असेल तर आपण मूल होऊ देणार नाही .आपण अनाथाश्रमातून एखादे काही महिन्यांचे मूल दत्तक घेऊ .त्याला आपले म्हणून वाढवू.त्याच्या संगोपनासाठी आपण एक प्रशिक्षित दाई ठेवू म्हणजे संगोपनाचा ताण  तुझ्यावर पडणार नाही .  तुझ्या मनासारखे सर्व होईल .तुला जी भीती वाटते तसे काहीही होणार नाही.मी तुला आश्वस्त करतो . शेवटी प्रेमाचा उमेशचा जय झाला.सायली लग्नाला तयार झाली आणि इथे खरी समस्या निर्माण झाली .

उमेश आमच्या जातीचा नव्हता.आमची आई अत्यंत कर्मठ देव देव करणारी होती .वडील बरोबर त्याच्या विरुद्ध होते .आईला देवळात गेल्याशिवाय एक दिवस सुद्धा चैन पडत नसे .तर वडील देवळात कधीही जात नसत .आईचा रोज किमान एक तास तरी पूजाअर्चा करण्यामध्ये जाई.तर बाबांनी कधीही पूजा केली नाही .आईचे असंख्य उपास तापास चालत .बाबांनी कधीही उपास केले नाहीत .आईचे धार्मिक कर्मकांड जबरदस्त होते . आई व बाबा दोन टोके होती .

बाबांनी आंतरजातीय विवाहाला परवानगी दिली असती .आईने प्राण गेला तरी दिली नसती .  सायलीचे आईवर नितांत प्रेम होते .आईला दुःख देऊन तिला काहीही करायचे नव्हते .उमेशवरील प्रेम व आईवरील प्रेम यांमध्ये ती सँडविच झाली होती . ती चिरडली जात होती .ती ताणली जात होत। 

मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की आम्ही दोघी सख्ख्या बहिणीसारख्या होतो .आम्ही बहिणी कमी व जीवश्चकंठश्च मैत्रिणी जास्त होतो. सायली वेळोवेळी माझ्या जवळ तिचे मन मोकळे करीत असे.मनातील सर्व सांगायला आणि मन हलके करण्यासाठी तिला माझ्याशिवाय दुसरे कोणी नव्हते.

उमेशने प्रस्ताव दिल्यापासून सायली मला ताणाखाली दिसत होती .तिचे कशातच नीट लक्ष लागत नसे . रस्त्यातून चालताना, रेल्वेत चढ  उतार करताना,रस्ता क्रॉस करताना,तिचे मन कुठे तरी असे.आई सतत तिला लग्न कर म्हणून दबाव टाकीत असे.तिला सत्य काय ते सांगता येत नसे . आई आक्रस्ताळेपणा करील असे तिला वाटत असे आणि ते काही खोटे नव्हते .आईचा आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा, अतार्किक बोलणे, पराकोटीचे होते .कोणतीही गोष्ट तिला समजावून सांगणे अशक्यप्राय होते .

(क्रमशः)

१३/१/२०२०©प्रभाकर  प्रभाकर 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel