(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

एक दिवस शंकररावाना काही कारणाने ऑफिसमध्ये उशीर झाला .त्यांना यायला रात्रीचे दहा वाजले .मी उशिरा येणार आहे हे त्यांनी अगोदरच घरी कळविले होते. अकरा वाजले तरी ते घरी आले नाहीत .त्यांना फोन केला तर तो स्वीच ऑफ होता .ऑफिसात फोन केल्यावर कुणीही उत्तर देईना.त्यांच्या ऑफिसातील मित्राकडे फोन केल्यावर त्यांनी  ते केव्हाच घरी गेले असे सांगितले. शेजारच्या बंगल्यातील माणसांना उठवून तीन चार जण शंकररावाना शोधण्यासाठी  निघाले .त्या पायरस्त्यावर ते  वेडेवाकडे खाली पडलेले आढळून आले .त्यांची नाडी लागत नव्हती. श्वास मंद चालला होता.ते बेशुद्धावस्थेत होते .त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले .डॉक्टरने माईल्ड  हार्टअटॅक असे निदान केले. पंधरा दिवसांनी त्यांची तब्बेत नीट बरी झाल्यावर त्यांनी पुढील हकीगत सांगितली . ऑफिसमधील कामामुळे त्यांना खूप उशीर झाला होता. दहा वाजून गेले होते.  ते रामनामाचा जप करीत त्या पायरस्त्याने भरभर चालत येत होते .एवढ्यात एका झाडावरून प्रदीर्घ किंकाळीचा आवाज आला.ते जागच्या जागी थबकले.एवढ्यात त्यांच्या पुढ्यात कुणीतरी उडी मारली . ती आकृती अक्राळविक्राळ  होती.पुढे काय झाले ते त्यांना आठवत नाही . ते नंतर शुद्धीवर आले तेव्हां हॉस्पिटलमध्ये होते. 

कॉलनीमध्ये दोन तीन बंगल्यांमध्ये लोक राहायला आल्यावर काही महिन्यांनी कॉलनीमध्ये वीज आली.मुख्य रस्त्यावर विजेचा लखलखाट असे .कॉलनीमधील रस्त्यांवर दिवे असत .बंगल्यात दिवे लागलेले असत .कॉलनीमध्ये कमी जास्त प्रकाशमानता होती.त्या पायवाटेवर मात्र भीषण परिस्थिती तशीच होती .दिवे लावल्यामुळे भीती कमी होण्याऐवजी जास्तच वाढली होती .

एक दिवस कॉलनीतील एका बंगल्याच्या आऊटहाऊसमधील गडी काहीतरी सामान आणण्यासाठी  मुख्य गावात गेला होता .येताना त्याला पाठीमागून कुणीतरी येत आहे असा त्या पायरस्त्यावर भास झाला. तो मागे वळून पाहतो तो कुणीतरी अक्राळविक्राळ  जनावर त्याच्या पाठीमागे उभे होते.त्याला दोन पाय होते कि चार पाय होते तेही त्याला नीट दिसले नाही.त्या प्राण्याने गड्याला पकडण्याचा प्रयत्न केला.गडी जीव खावून पळत सुटला. तो त्या प्राण्याच्या तडाख्यात सापडणारच होता, परंतु मोठ्या मुश्किलीने तो त्याच्या तडाख्यातून सुटला . त्याच्या  पाठीवरील शर्ट फाटला होता.पाठीवर चार तीक्ष्ण ओरखडे उठले होते .त्यातून रक्तस्राव होत होता .त्याच्या पाठीला विषबाधा झाली होती .त्याला बरे होण्यासाठी सहा महिने लागले .तो गडी इतका घाबरला की त्यानंतर तो लगेच गावी निघून गेला.

कॉलनीतली लोकसंख्या हळूहळू वाढत होती  . लोकांचे येणे जाणे अर्थातच वाढले होते .एकटादुकटा कुणीही त्या रस्त्याने सहसा रात्रीचा जात नसे.मंडळी गटाने जात असत .सिनेमा नाटक किंवा आणखी कुठला कार्यक्रम यासाठी चार लोक बरोबरच बुकिंग करीत असत .बरोबरच जात. बरोबरच येत .तरीही केव्हा ना केव्हा एकट्याने जाण्याची वेळ येत असेच. अश्या  वेळी काही ना काही अनुभव प्रत्येकाला येत असे .यातील अफवा किती आणि प्रत्यक्ष घडलेले प्रसंग किती ते सांगणे कठीण आहे .कथा, अफवा, पसरतच राहिल्या.

कुणी सांगे माझ्या डाव्या बाजूने झाडीतून कुणीतरी चालत होते .कोण ते दिसत नव्हते परंतु पायरव येत होता.

कुणी सांगे माझ्या उजव्या बाजूने कुणीतरी चार पायांचे जनावर चालत होते.माझ्यावर उडी मारण्यासाठी ते टपले होते .मी जिवाच्या आकांताने पळत पळत ती पायवाट पार केली आणि कॉलनीत आलो.

कुणी धावत येई .

कुणी पळत येई .

कुणी घामाने निथळत येई .

लोक येत जात होते .

अर्थात नाईलाजाने . 

कथा पसरतच होत्या. 

अनुभव येतच होते.

दिवस जातच होते .

एकदा तर एकाने कमालच केली .माझ्या डोक्यावरून कुणीतरी फडफड फडफड करीत उडत होते .ते काहीतरी अमानवी होते .मी एकदाच वर पाहिले आणि पळत सुटलो.घरी येऊन अंगणात बेशुद्ध  झालो. 

कॉलनीतील लोकांनी आम्हाला आमच्या दुचाकी इकडे आणता येत नाहीत.पायवाटेने आणताना फार त्रास होतो. टायर्स पंक्चर होतात. चारचाकी तर मुळीच आणता येत नाहीत. अश्या  अर्जविनंत्या केल्या तेव्हा कुठे  रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.शेवटी कच्चा का होईना परंतु रस्ता झाला .पायवाटेचे रूपांतर रस्त्यांमध्ये केले गेले.रस्ता सिंगल होता .  रस्ता करताना आड येणारे एखादे दुसरे झाड तोडण्यात आले .बाकी सर्व झाडे तशीच होती .रस्त्याच्या कडेला दिवे लावण्यात आले . सुमारे पाचशे फूट रस्त्यावर दोन तीन मंद प्रकाशाचे दिवे लावण्यात आले.पूर्वीच्या दिव्यांची प्रकाशमानता आणि या दिव्यांची प्रकाशमानता यात काहीही फरक नव्हता .बर्‍याच वेळा व्होल्टेज कमी असल्यामुळे दिव्यांचा प्रकाश आणखीच मंद होत असे. प्रकाशामुळे काळोख अधिकच गडद झाला असे वाटू लागले .लोक बरोबर विजेरी बाळगत.मोबाइलचा टॉर्च अपुरा वाटे.विजेरी कशासाठी असे विचारल्यावर म्युनिसिपालिटीने लावलेले दिवे पाहण्यासाठी असा एक विनोद प्रचलित होता. 

तेवढा रस्ता आक्रमताना सायकलवाले जिवाच्या आकांताने सायकल दौडीत असत.   

मोटारसायकलवाले भुर्रदिशी रस्ता पार करीत.तरीही त्यांचा जीव टांगणीला लागलेला असे.  

त्यातल्यात्यात चारचाकीवाले सुरक्षित काचेआड बसून रस्ता  पार करीत असत.

झाडे तोडावीत, रस्ता दुतर्फा करावा, जास्त प्रकाशाचे दिवे लावावेत, अशा मागण्या करून करून लोक थकले .हळूहळू  कॉलनीमधील लोकसंख्या वाढत होती. बंगले उभे राहात होते. लोक रहायला येत होते.संध्याकाळी आणि रात्री रस्ता पार करताना होणारी दैना तशीच होती.

एकदा एकाचा तीव्र स्वरूपाच्या  हार्ट अटॅकने त्या रस्त्यावरच मृत्यू झाला.त्याचा चेहरा एवढा वेडा वाकडा झाला होता की त्याने असे काय भयंकर विचित्र पाहिले अशी चर्चा डॉक्टर मंडळीच करीत होती.

लोकांच्या तर त्याने काय पाहिले असेल याबद्दलच्या,  अकटोविकट, कल्पनेत येऊ शकतील , व येऊ शकणार नाहीत अश्या  प्रकारच्या सर्व चर्चा होत्या.

एकदा तर कमालच झाली .एका इसमाचा त्या रस्त्यावर   खून झाला .पोटातील कोथळा काढलेल्या स्थितीत तो झाडावर लटकत असलेला आढळला .बहुधा  आपसातील वैमनस्यामुळे त्याचा खून झाला असावा असे काही जण म्हणत होते. तरसासारख्या एखाद्या  जनावराने ते केले असावे असे पोलिस म्हणाले .जंगली प्राण्यांवर बालंट जावे यासाठी खुन्यांनी त्याला झाडावर लटकाविले असे काही जणांचे म्हणणे होते .तर काही जणाना हा सर्व वेताळाचा प्रताप असे वाटत होते .

हे कृत्य लावसटीचेच (एक प्रकारचे भूत)अशी श्रद्धा मात्र बहुतेक लोकांची होती.

+++

आता वस्ती खूप वाढली आहे .कॉलनीला जोडणारा रस्ता दुतर्फा झाला आहे .आजूबाजूची झाडीही बऱ्याच प्रमाणात तोडण्यात आली आहे.तिथेही कमी जास्त प्रमाणात बंगले उठत आहेत .आता रस्त्यावर एलईडी, भरपूर प्रकाश देणारे दिवे   लावण्यात आले आहेत.

आता कुणाला भुतांची  भीती वाटत नाही .

मानसशास्त्रज्ञ, मानसरोगतज्ञ ,त्या जुन्या काळात झालेले मृत्यू, आलेले अनुभव, हे सर्व मानसिक किंवा आधिभौतिक होते असे म्हणतात .भूत बीत सब झूट आहे असे त्यांचे म्हणणे आहे . ते अनुभव सर्व मनाचे खेळ होते असे त्यांचे म्हणणे आहे.पक्षी ओरडतच असतात .रानटी जनावरे जंगलात फिरत असतात. सरपटणारे प्राणी असतातच.आकस्मिक मृत्यू होतातच .जंगलात रानटी जनावरे हल्ला करतातच .असे त्यांचे सांगणे आहे .

लोक मात्र काहीतरी तिथे होते असे अजूनही म्हणतात .

माणसांच्या गर्दीला, गोंगाटाला, कंटाळून "ते" तिथून निघून गेले असे काहींचे सांगणे आहे. 

आज काहीही भीती राहिलेली नाही .

याचा अर्थ सर्व काही शांत आहे असा नाही .भीतीचे स्वरूप बदलले आहे .

श्रीमंतांची, गुंडांची, तथाकथित राजकारण्यांची, उंची मोटरसायकली चालविणारी,मुलींची छेड काढण्यात आनंद मानणारी ,तरुण पोरे आहेतच .  

पाकिटमार,चोर, दरोडेखोर, गुंड, मवाली, दारूड्ये, चोरटा धंदा  करणारे, अनैतिक व्यवसाय करणारे ,खुनी आहेतच. भय आहेच. फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.

शहर खूप वाढले आहे.आता आपण रानटी नाही. सुसंस्कृत आहोत. 

भुतांचे भय संपले आहे .ते सर्व मनाचे खेळ होते .असे सर्व म्हणतात.

भय कमी झाले आहे की वाढले आहे ते नक्की सांगता येणार नाही .

*अनामिक भयापेक्षा हे भय जास्त ठसठशीत आहे .जास्त तीव्र आहे .जास्त गंभीर आहे.जास्त विचार करायला लावणारे आहे.*

*भयाचे स्वरूप बदलले आहे .अज्ञाताच्या भयाऐवजी ज्ञाताचे भय निर्माण झाले आहे.*

~  *भय इथले संपत नाही* अशी परिस्थिती चालूच आहे.~

(समाप्त)

२०/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel