(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

पूर्वी तसे गाव छोटे होते .हळूहळू गावाचे नागरीकरण होत होते .भरपूर पाणी, शुद्ध हवा, मोकळी जमीन, यामुळे निरनिराळे उद्योग येऊ लागले होते.काही ना काही कारणाने खेड्यातून या खेडेवजा शहराकडे लोकांचा ओघ चालू झाला होता.एकेकाळी बहुतेक सर्व लोकसंख्या नदीच्या  दोन्ही तीरांवर केंद्रित झाली होती . गावाबाहेर दाट झाडी होती . मधून मधून काही शेती होती .गावातील घरे चाळीवजा होती.सार्वजनिक संडास तोही भारतीय पद्धतीचा, सार्वजनिक बाथरूम, समोर एक सार्वजनिक पॅसेज, प्रत्येकाला  दोनच खोल्या.थोड्या फार फरकाने सर्वत्र  अशी रचना होती.स्नान  सार्वजनिक बाथरूमममध्ये किंवा नळावर करावयाचे, अन्यथा स्वयंपाकघरातील मोरीमध्ये, अशी व्यवस्था होती.स्वयंपूर्ण ब्लॉक,कमोड पद्धत ,ही अजून आली नव्हती. 

गावातील राहण्याच्या जागा संपल्या होत्या .वाडे जुनाट झाले होते. काही वाडे आता पडतात की उद्या पडतात, अश्या जीर्ण शीर्ण भग्न अवस्थेत होते.जुने भाडेकरू असल्यामुळे त्यांचे भाडे वाढविता येत नव्हते .वाढत्या महागाईत दुरुस्तीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न होता.  आपण मोकळ्या हवेत स्वयंपूर्ण टुमदार बंगल्यात राहावे असे वाटू लागले होते . आर्थिक संपन्नतेचा स्तर वाढला होता. पुणे मुंबईसारख्या शहरातील टुमदार वसाहती पाहिल्यावर आपणही तसेच राहावे असे वाटू लागले होते . एक किंवा अनेक कारणांनी, काहीही कारणामुळे असो,मुख्य गावाच्या बाहेर, लहान लहान  टुमदार कॉलनी निर्माण होत होत्या.एकाच प्लॉटवर जुळे बंगले,स्वतंत्र बंगले किंवा चाळीवजा ब्लॉक्स,रो हाउसेस इत्यादी निर्माण होत होत्या .जागेचे भाव हळूहळू वाढू लागले होते .बिल्डर ही एक नवीन जमात उदयाला येत होती .ग्रामपंचायतीचे रुपांतर म्युनिसिपालिटीमध्ये हळूहळू झाले होते. या कॉलनी उभ्या होत असताना झाडी तोडली जात होती.जिथे मळे होते ते नष्ट होत होते. त्या त्या ठिकाणी कॉलनी उभ्या राहात होत्या .

वृक्ष  ही आपली ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा आहे.ती तोडून अापण पर्यावरणाचा नाश करीत आहोत.वगैरे आरडाओरड खूप चालली होती.एक झाड तोडले तर तीन झाडे लावावीत. त्यातील निदान एक तरी जगेल,असे व्याख्यानातून सांगितले जात होते. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून लिहिले जात होते.इतके हजार ,इतके लाख ,झाडे लावली. अशी खरी खोटी  आकडेवारी प्रसिद्ध होत होती. प्रत्यक्षात किती झाडे लावली जात होती ते त्या झाड लावणाऱ्यांनाच माहिती . झाडे तुटतच होती. घरे बांधली जात होती. 

नवनवीन कॉलनी निर्माण होत होत्या .शहराचा विस्तार आडवा होत होता.उभा विस्तार व्हायला अजून खूप अवधी होता . अजून अनेक मजली  इमारतींना,फ्लॅट सिस्टीमला सुरुवात झाली नव्हती . अशीच एक नवीन सुखसंवाद वसाहत (कॉलनी) निर्माण झाली होती .झाडे तोडून तिथे ही कॉलनी निर्माण झाली होती .

मुख्य रस्त्यापासून ही कॉलनी सुमारे पाचशे फूट अंतरावर होती .इथे जाण्यासाठी वसाहत उभी राहू लागली तेव्हा पायवाटही नव्हती .बिल्डरने ट्रक, खोदकामाची यंत्रे आणण्यासाठी, ओबडधोबड रस्ता तयार केला होता .लोकांनी येऊन जावून, दगड विटा सिमेंट इत्यादीच्या  गाड्या येवून जावून काहीसा रस्ता निर्माण झाला होता. पावसानंतर शेवटी एक खडबडीत अशी पायवाट राहिली होती.तेवढीच गरज पडली तर चारचाकी मोठ्या कष्टाने येऊ शकत असे .दोन तीन बंगल्यात बंगल्याचे मालक राहायला आले होते .काही प्लॉट्सची विक्री व्हायची होती. काहींची झाली होती.काहींवर बंगले उभे राहात होते.अधूनमधून एखादा दुसरा ट्रक,बैलगाडी, येत जात असे . पायवाटेवरून बंगल्यात  येण्यासाठी गर्द झाडीतून यावे लागे.दिवसा एवढी भीती वाटत नसे.परंतु संध्याकाळ झाली, रात्र झाली, की मात्र पोटात गोळा उभा राहात असे.चोरांची तर भीती होतीच परंतु भुते, जंगली प्राणी,  यांची भीती जास्त वाटे .अजून कॉलनीत वीज आली नव्हती.पायवाटेने विजेरीच्या प्रकाशात येताना कुठेही खुट्ट झाले तरी पोटात गारगार वाटत असे. पोटातून कुणीतरी सुरी फिरवत आहे असे वाटे.झाडांवर पक्ष्यांची घरटी होती. सांजवेळी पक्षी घरट्यात परत येत असत.काही वेळ त्यांचा किलबिलाट चाले. त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्याला थोडा धीर वाटत असे.नंतर मात्र गूढ ,विचित्र,स्मशान शांतता पसरत असे .

एवढेसे जेमतेम पाचशे सहाशे फुटांचे अंतर परंतु रात्रीचे  ते पार करताना सर्वांना ब्रह्मांड आठवे .रात्र जशी जून होत असे तशी भीती वाढत्या श्रेणीने वाढत असे . काही जण रामनामाचा जप करीत तेवढे पाचशे फूट चालत असत.काही जण धावत पळत जीव मुठीत धरून जात असत.आसपास अरण्य खूप होते. आपण  प्राण्यांच्या वसतिस्थानावर आक्रमण करीत असल्यामुळे,कोल्हा बिबट्या वाघ डुक्कर तरस यांची भीती तर वाटेच.परंतु  सर्वात मोठी भीती भुतांची वाटे .जे दिसते त्यापेक्षा जे दिसत नाही परंतु आहे असे वाटते त्याची भीती जास्त वाटते. काळोखातून जाताना झाडांवर जरा जरी आवाज आला तरी चालणाऱ्यांची गाळण उडत असे .एखादा पक्षी जरी जोरात ओरडला तरीही घाबरगुंडी उडत असे.जोरात पळून ते अंतर कापावे असे जरी मनातून वाटत असले तरी पाय त्याला साथ देत नसत.सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यती, अशी अर्जुनासारखी स्थिती होत असे.परंतु मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकृष्ण मात्र नसे.  

पायरस्त्याने जात असताना पुढे कुणीतरी चालत आहे असे दिसल्यास अंमळ धीर येत असे.एक दिवस असाच माधव त्या रस्त्याने येत होता .पुढे कुणीतरी चालत आहे असे त्याला वाटले .त्याला धीर आला .त्याच्याबरोबर चालत जाण्यासाठी त्याने आपली गती वाढविली .पुढच्या व्यक्तीनेही गती वाढविली .माधवने गती कमी केली त्यानेही गती कमी केली . माधव थांबला ती व्यक्तीही थांबली. दोघांमधील अंतर कायम राहात होते .माधवने त्या व्यक्तीकडे बघत बघत थोडे पाठीमागे उलटे चालून पाहिले.ती व्यक्तीही तशीच उलटी मागे चालत आली .आता मात्र माधवचा धीर सुटला . हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे हे त्याच्या लक्षात आले .पुढे ती व्यक्ती किंवा जे कुणी होते ते असल्यामुळे त्याला पुढेही पळता येईना. उलट फिरूनही धावता येईना. त्या अनामिकाने आपल्यावर पळत येऊन झडप टाकली तर, अशी भीती पोटात होती .पाहता पाहता पुढे चालणारी व्यक्ती हवेमध्ये विरून गेली.अदृश्य झाली.माधवची पँट ओली झाली. ती घामाने झाली असावी असे आपण म्हणूया.माधवला ही काय जादू आहे. भुताटकी आहे ते कळेना.तो वेडावाकडा होत बेशुद्ध होऊन तिथेच खाली पडला .कुणीतरी येणाऱ्या जाणाऱ्याने त्याला पाहिले. कॉलनीत कळविण्यात आले . त्याला उचलून आणण्यात आले .डॉक्टरांना बोलाविण्यात आले.तापाने चार दिवस माधव आजारी होता .

चालता चालता पुढील माणूस अदृश्य झाला ही गोष्ट त्याने शुद्धीवर आल्यावर सांगितली . 

माधव बेशुद्ध झाल्यापासून त्या पायरस्त्याची दहशत आणखीच वाढली .चांदण्या रात्री प्रकाश असल्यामुळे जास्त धीर येण्याऐवजी आणखीच धीर सुटत असे .चांदण्यामुळे दोन्ही बाजूला झाडांच्या सावल्या सर्वत्र दिसत असत.त्यांचे चित्रविचित्र आकार जमिनीवर निर्माण होत .वाऱ्यामुळे ते हालत .त्यातून  निरनिराळ्या आकृती चालत आहेत, फिरत आहेत, नाचत आहेत,स्वतःभोवती गिरक्या मारीत आहेत ,असा भास होई.प्रकाशाचा आधार वाटण्याऐवजी जास्तच घबराट निर्माण होत असे .चांदण्या रात्री पेक्षा काळोखी रात्र बरी वाटे .

कॉलनी बाहेर राहणारा एक जण काही कामासाठी कॉलनीत आला होता .जाताना तो त्या पायरस्त्यावर मरून पडला .त्याचे अंग काळेनिळे पडले होते .त्याला विषबाधा झाली असे निदान करण्यात आले .कुणीतरी सरपटणाऱ्या  जनावराने दंश केला असावा  असे वाटत होते.नक्की कुणी दंश केला ते डॉक्टरनाही सांगता येत नव्हते. त्याचा आकस्मिक मृत्यू एखाद्या जबरदस्त भुताने केला असावा असे सर्वजण म्हणत होते.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू "रिझन अननोन" अशी नोंद केली.  

म्युनिसिपालिटीने  या पायरस्त्यावर दिवे लावावेत म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. अर्ज विनंत्या ,या सभासदाला भेट ,त्या सभासदाला भेट,इंजिनिअरला भेट,असे अनेक प्रयत्न करून शेवटी दोन तीन दिवे त्या रस्त्यावर लावण्यात आले . झाडे वाढून त्या  फांद्या दिव्यांवर आल्या.वार्‍यावर फांद्या हलू लागल्यावर जमिनीवर त्याच्या विचित्र सावल्या पडत आणि त्या हालत .दिवे लावल्यामुळे भीती कमी होण्याऐवजी ती जास्तच वाढली . दिव्यांमुळे प्रकाश येण्याऐवजी अंधार जास्त गडद झाला.चांदण्या रात्री वाटणाऱ्या भीतीप्रमाणे आताही  सदैव भीती वाटू लागली.पूर्वी फक्त चांदण्या रात्री भीती वाटे आता ती नेहमीच वाटू लागली . भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीप्रमाणे म्युनिसिपालिटीला तुझे मंद प्रकाशाचे दिवे नकोत. बंद कर. असे सांगण्याची वेळ आली .

(क्रमशः)

२०/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel