(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.कथेचा आशय नावे इत्यादीमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

एवढ्यात संदेशचा फोन युवराजांना आला .  त्याने अशी काही माहिती गोळा केली होती .की त्यामुळे निर्मल खुनाच्या आरोपातून निश्चित सुटणार होता . खरा खुनी पकडला जाणार होता.

*त्यांनी संदेशला प्रत्यक्ष भेटण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले*

संदेश लगेच युवराजच्या ऑफिसमध्ये आला .त्यांने पुढीलप्रमाणे आपल्या संशोधनाचा अहवाल दिला.

लहानपणी निर्मल व विमल जिथे राहात होते तिथे जाऊन त्यांने तिथे तेव्हांपासून राहणाऱ्या कुटुंबामध्ये चौकशी केली.दोघेही भाऊ नावाप्रमाणेच निर्मळ आहेत त्यांचे परस्परांवर राम लक्ष्मण याप्रमाणे प्रेम आहे .त्यांच्यामध्ये एकी आहे कुणीही कुणाचा खून करू शकणार नाही .

हल्लीच्या फ्लॅटमध्ये ते गेली दहा वर्षे राहतात .तिथे चौकशी करता त्यांच्याबद्दल वरील प्रमाणेच चांगले उद्गार सर्वांकडून ऐकण्यास मिळाले.

त्याने त्यांचे जिथे मोबाइल  सर्व्हिस व सेल सेंटर आहे तिथे जावून चौकशी केली.दोघे भाऊ अत्यंत प्रामाणिकपणे दुकान चालवतात.त्यांची वर्तणूक अत्यंत सभ्य व शालीन आहे .असभ्य शब्द, उगीचच गैरवर्तणूक,ते केव्हाही करणार नाहीत असा तिथे रिपोर्ट मिळाला.

मात्र तिथे आणखी एक माहिती मिळाली त्यांच्या शेजारी एक कापडाचे दुकान आहे .त्याला तयार कपडय़ांचा विभागही सुरू करावयाचा आहे .त्याला यांची सर्व्हिस सेंटरची जागा पाहिजे आहे .त्यासाठी तो वाट्टेल तेवढी रक्कम द्यायला तयार आहे .तो दुकानदार त्यांना दुसरीकडे सेंटरसाठी जागा देणार होता .परंतु यांना आहे ती जागा सोडायची नाही .ही जागा शहराच्या सेंटरमध्ये आहे .इथे व्यवसाय चांगला होतो. तेव्हापासून हा दुकानदार काही ना काही कारणाने यांच्याशी भांडणे उकरून काढीत असतो .तो दुकानदार बराच चालू वाटला. हल्लीच्या जगात एखादा केवळ मोक्याची जागा मिळावी म्हणून वेळप्रसंगी खून खराबा करण्याला तयार होईल.हा दुकानदार त्या प्रवृत्तीचा वाटला. हे भाऊ जरी शांत सज्जन असले तरी जशास तसे या न्यायाने वर्तन करणारे आहेत.या जागेच्या प्रश्नावरून तो दुकानदार व हे भाऊ यांच्यामध्ये मी मी तू तू झालेले होते.असे असले तरी तो दुकानदार एखाद्याचा खून करण्यापर्यंत जाईल असे वाटत नाही .

अर्थात एकाचा खून करायचा,त्याचा संशय दुसऱ्यावर  जाईल त्याला शिक्षा होईलअशी योजना करायची, आणि अशा प्रकारे दोघांचाही काटा काढायचा, असा प्लॅन एखादा आखणार नाहीच असे नाही. तेव्हा या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही .

संदेशने नंतर आणखी एक अहवाल दिला .या भावांचा फ्लॅट जेथे आहे त्याच सोसायटीत कमलचे आईवडील राहतात .निर्मल व कमल यांचा प्रेम विवाह आहे .कदाचित विमल कमलवर प्रेम करीत असेल.थोरला भाऊ व कमल यांचे प्रेम लक्षात आल्यावर त्याने त्याचे कमलवरील प्रेम मनातच ठेवले असेल.आणि अशा परिस्थितीत पोलिसांनी जी शंका प्रदर्शित करून निर्मलवर खुनाचा आरोप केला आहे आणि त्याला अटक केली आहे तसे घडले नसेलच असे नाही.

असा काही संशय आल्यावर रागाच्या भरात एखादा काय करील ते सांगता येत नाही .परंतु असे घडले असेल असे वाटत नाही .निर्मल व कमल यांच्याबद्दलचे सर्वांचे मत अतिशय चांगले आहे .ते विचारात घेता असे घडले असेल असे वाटत नाही.

संदेशने नंतर आणखी एक रिपोर्ट दिला .कमलला एक मोठा भाऊ आहे.तो विशेष शिकलेला नाही .तो कुठे नोकरीही  करीत नाही .तो नेहमी उड्डाणटप्पूंच्या संगतीत असतो.चोरी लबाडी गुद्दागुद्दी मारामारी शिवीगाळ यांत तो तरबेज आहे.काही न कमविताहि तो छानछोकीत राहात असतो.वडील त्याला पैसे देत असतील असे वाटत नाही .एवढा पैसा हा कुठून कमावतो ते कळत नाही .त्याचे मार्ग गैरच असणार.

एवढे सांगून संदेश थांबला .

कमल व निर्मल यांच्याबरोबर युवराजांची जी भेट झाली. त्या दोघांबरोबर त्यांचे जे बोलणे झाले ते युवराजाना आठवत होते .

तीन वर्षांपूर्वी कमलचा भाऊ या दोघा भावांकडे नोकरीला होता .त्यावेळी निर्मल व कमल यांचे लग्न झाले नव्हते.त्यांचे कोर्टींग चालू होते .त्यावेळी हा भाऊ कसा आहे ते दोघांनाही माहीत नव्हते.कमलच्या सांगण्यावरूनच निर्मलने त्याला नोकरीवर ठेवले होते .या निमित्ताने तो सुधारावा व व्यवस्थित योग्य  मार्गाला लागावा अशी निर्मल व कमल यांची इच्छा होती . सुरुवातीला त्याने विश्वास संपादन केला .आता दादा सुधारला असे कमलला वाटले.त्यामुळे त्यांच्यावर दुकान सोपवून दोघे भाऊ निश्चिंत होऊ लागले . दुर्दैवाने त्याने व्यवस्थित काम न करता अफरातफर केली .त्याच्यावर अवास्तव विश्वास ठेवला होता .त्याने काही उंची मोबाईल परस्पर विकून पैसे खिशात घातले . त्याचप्रमाणे पैशाची अफरातफर केली .त्याने जवळजवळ चार पाच लाख रुपयांची अफरातफर केली. त्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्या अगोदर निर्मल व कमल  यांचे लग्न झाले होते.तेव्हापासून तो मधून मधून "मी तुमचे पैसे परत देईन" असे सांगत असतो .

पंधरा दिवसांपूर्वी कमलने त्याच्याकडे पैसे मागितले.त्याने बहिणीला मी नक्की आठ दिवसांत देईन म्हणून सांगितले.आत्तापर्यंत त्याने असे तीन चार वायदे केले होते.कमलने त्याला त्या पूर्वीच्या वायद्यांची आठवण करून दिली होती .त्यावरून बहीण भावंडांमध्ये थोडे भांडणही झाले होते .

आठ दिवसांपूर्वी  विमलने त्याच्याजवळ वायद्याप्रमाणे पैसे मागितले.त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यावरून विमल व कमलचा भाऊ यांच्यामध्ये थोडी वादावादी झाली . त्यावेळी निर्मल तिथेच होता .शेवटी निर्मलने मध्ये पडून ते भांडण सोडविले.जाता जाता रमणने(कमलचा  भाऊ )बघून घेईन अशी भाषा वापरली होती .

निर्मलने, शेजारचा दुकानदार व हे दोघे भाऊ यांच्यामध्ये होणारा वाद व त्या दुकानदाराचे म्हणणे युवराजांच्या कानावर घातले होते.

युवराज,त्यांना कमल व निर्मलने सांगितली हकीगत व संदेशने दिलेली माहिती यांची एकत्र सांगड कशी घालता येईल ते पाहात होते .त्यातून त्यांना काही कल्पना सुचत होत्या .ते काही संभाव्य पर्यायी निष्कर्ष काढीत होते .

जरा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी संदेशला पुढील माहिती गोळा करण्यास सांगितले .

१)रमण ,या दोघा भावांच्या दुकानाच्या शेजारचा दुकानदार, कमल ,निर्मल, व विमल यांचे कॉल रेकॉर्ड .

२)शक्य असल्यास त्यांच्या बोलण्याचे गेल्या आठ दिवसातील रेकॉर्डिंग ,

३)गेल्या पंधरा दिवसात रमण कुणाकुणाला भेटला त्याबद्दलची माहिती ,

४)त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचे, ज्या दिवशी विमलचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज .

५) विमलचा पोस्टमार्टेम रिपोर्ट 

ही सर्व माहिती मी तुम्हाला उद्या देतो म्हणून संदेशने युवराजांचा निरोप घेतला .

दुसऱ्या दिवशी संदेश 

वरील सर्व माहिती ,(कॉल रेकॉर्ड्स,बोलण्याचे रेकॉर्डिंग,सीसी टीव्हीचे सोसायटीतील फूटेज,रमण कुणाकुणाला भेटला ती माहिती व पोस्टमार्टम रिपोर्टची कॉपी  )घेवून युवराजांना भेटला.

युवराज त्या सर्वांचा संदेशबरोबर जवळजवळ दोन तास व्यवस्थित अभ्यास करीत होते .त्यातून त्यांनी पुढील प्रमाणे निष्कर्ष काढला .

बहिणीबरोबरील भांडण,मेहुणा व बहिणीच्या दीराबरोबर झालेला झगडा,हे सर्व लक्षात घेऊन त्याने हा प्रश्न एकदाचा कायम निकालात काढण्याचे ठरविले .रमण ज्या भाईंच्या हाताखाली काम करीत होता त्याला, यांच्या शेजारच्या दुकानदाराने, या दोघा भावांना दुकान विकण्यासाठी समजावण्याची, सुपारी दिली होती .त्या भाईने रमणला दुकानदाराला भेटण्यास सांगितले.शेवटी पुढीलप्रमाणे एक योजना आखण्यात आली .

निर्मल बाहेर गेलेला असताना आणि विमल घरी असताना रमणने मी पाच लाख रुपये देण्यासाठी येउ का ?म्हणून विचारावे.विमल त्याला अर्थातच भेटण्यासाठी लगेच तयार होईल.दुपारची कमल आपल्या खोलीत आराम करते .रमणने बरोबर दोन हस्तकांना घेऊन तिथे जावे.रमणने दरवाजा उघडल्यावर,कमल आराम करीत आहे ना याची खात्री करून घ्यावी .रमणला ओरडू न देता त्याचे तोंड दाबून तिघांनी त्याला उचलून खाली फेकावे.नंतर दरवाजा  बंद करून तिथून निघून जावे.

विमल खाली पडल्याची आरडाओरड झाल्यावर कमल जागी होईल .निर्मलला फोन करून  घरी ये म्हणून सांगेल.तो आल्यावर अर्थातच पोलिस केस होईल .तेव्हा इन्स्पेक्टरला कुणीतरी निनावी फोन करावा .निर्मलने संशयावरून विमलला खाली फेकून दिले असे सांगावे.जमले तर इन्स्पेक्टरला मॅनेज करावे .निर्मल पकडला जाईल .त्याला काही ना काही शिक्षा होईल .कमलला नाईलाजाने दुकान विकावे लागेल.शेजारचा दुकानदार व रमण या दोघांचेही एका दगडात काम होईल.

योजनेप्रमाणे सर्व काही घडून आले .फक्त युवराजांनी ती बातमी वाचली आणि यात रस घेतला.तिथे सर्व घोटाळा झाला .

युवराजांनी शामरावांना फोन करून त्या इन्स्पेक्टरसह आपल्या ऑफिसवर येण्यास सांगितले.ते दोघेही आल्यावर त्यांच्यापुढे पुढील पुरावा ठेवला. 

रमण दोन व्यक्तींबरोबर निर्मलच्या फ्लॅटमध्ये जातो ते सीसीटीव्ही फुटेज . 

आत्महत्या करणारा माणूस वरून सरळ उडी मारतो .तो उडी जिथून मारतो त्या उंचीप्रमाणे एका विशिष्ट पोझिशनमध्ये खाली पडतो .फेकून दिलेला माणूस वेगळ्या पद्धतीने खाली पडतो .त्याचे प्रात्यक्षिक एका तेवढ्या वजन व आकाराच्या डमीच्या(तेवढे वजन भरलेली कापसाची मनुष्य आकृती ) सहाय्याने युवराज यांनी करून दाखविले .त्याला  फेकून दिले असले पाहिजे असे सिद्ध केले .

पोस्टमार्टेम रिपोर्ट तो नशेमध्ये नव्हता हेही सांगत होता .

तोंड दाबून उचलून फेकताना त्याच्या तोंडावर व शरीरावर वळ उठले होते .तो पोस्टमार्टेम रिपोर्टमधला भागहि युवराजांनी शामरावांना दाखविला .

रमण व दोन व्यक्ती विमलला खाली फेकतानचे सीसीटीव्ही फुटेज.(निर्मलच्या फ्लॅटच्या समोरच्या बिल्डिंगवर बसविलेल्या सीसी टीव्हीमध्ये हे फुटेज आले होते) 

भाई व रमण, रमण व दुकानदार,रमण आणि विमल यांच्या परस्परांशी झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग(ज्या संभाषणांमधून विमलला मारण्याची, निर्मलला अडकवण्याची योजना स्पष्ट होत होती.)(हे त्या त्या व्यक्तीचे बोलणे आहे हे तज्ञांकडून सिद्ध करता आले असते.)

निर्मलच्या दुकानाच्या शेजारचा दुकानदार व रमण यांचा खुनाचा हेतू स्पष्ट दिसत होता .हा खून पूर्वनियोजित होता .अकस्मात रागाच्या भरात झालेला नव्हता .

हा सर्व पुरावा पाहिल्यावर शामरावांनी निर्मलवरील केस काढून घेतली.तो दुकानदार, रमण, रमणला मदत करणाऱ्या दोन व्यक्ती व भाई यांना अटक केली .त्या दोघांनाही(रमण व दुकानदार) खुनाच्या आरोपावरून दहा दहा वर्षे शिक्षा झाली.रमणच्या बरोबर आलेल्या दोन गुंडांना सात सात वर्षे शिक्षा झाली.  भाई सावधगिरी म्हणून फोनवर विशेष बोललेला नसल्यामुळे तो सहीसलामत सुटला .त्याच्याविरुद्ध प्रत्यक्ष पुरावा सापडला नाही .तो या सर्वांच्या पाठीमागे होता .त्याने योजना आखली होती.हे सिद्ध करता आले नाही.

*युवराजांच्या वाचनात जर ही आत्महत्येची बातमी आली नसती, जर त्यांनी यामध्ये रस घेतला नसता,तर बहुधा  निर्मलला  निर्दोष असतानाही शिक्षा झाली असती.*

*एका निर्दोष कुटुंबाची वाताहात झाली असती *

*केवळ युवराजमुळे तो वाचला *

*समाप्त*

२८/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

युवराजांच्या वाचनात जर ही आत्महत्येची बातमी आली नसती, जर त्यांनी यामध्ये रस घेतला नसता,तर बहुधा  निर्मलला  निर्दोष असतानाही शिक्षा झाली असती. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel