(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .वास्तवातील घटना किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

( चकवा म्हणजे फसवणूक जे प्रत्यक्षात नाही परंतु आहे असे वाटणे भास  होणे म्हणजे  चकवा.)

घाटाच्या सुरुवातीला युवराज  आले तेव्हा बारा वाजले होते.हा  घाट कोकणात उतरत होता.कोकणवासियांच्या  खास मागणीमुळे हा घाट नवीनच बांधलेला होता .या घाटात रात्री बारा ते दोन पर्यंत  प्रवेश करण्यास मनाई होती .ही बंदी गेले सहा महिने अस्तित्वात होती .रात्री बारा ते दोन हा घाट धोक्याचा समजला जात होता .त्यामुळे बंदी घातली होती .

एखाद्याला जर तातडीच्या काही कारणामुळे घाट पार करायचा असेल तर त्याला विशेष परवानगी काढावी लागत असे.तशी परवानगी युवराजांनी घेतली होती .युवराजांच्या शेजारी संदेश बसला होता .युवराज ड्रायव्हिंग करीत होते .

घाट उताराला लागल्यानंतर युवराजांना गेल्या वर्षांतील घटना आठवत होत्या .घाट नवीन होता .घाट रहदारीला एक वर्षांपूर्वी खुला करण्यात आला होता . पहिले दोन महिने घाटातील वाहतूक विना तक्रार व्यवस्थित सुरू होती.घाट सुरू झाल्यानंतर दोन महिन्यानी रात्री एकच्या सुमारास तो अपघात घडला.घाटातील एका अवघड वळणावर चढावावर एक मोटार ट्रकला ओव्हरटेक करीत होती.याचवेळी समोरून उतारावर एक मोटार जोरात आली .काय झाले कळण्याच्या अगोदर दोन्ही मोटारीची टक्कर झाली .त्या ट्रकवर आदळल्या .क्षणार्धात तीनही वहाने दरीत कोसळली .

कुणीतरी खबर दिली . घाटाच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या होत्या .पोलिस आले दरीतील वाहने वर काढण्यात आली .एकही माणूस वाचला नाही. एकूण आठ मृत्यू झाले.घाटाच्या निम्या अंतरावर एक अवघड वळण होते .तिथे हा अपघात झाला होता .तेव्हापासून तिथे रात्री एक दोन दिवसाआड एखादा अपघात होऊ लागला होता.वाहने दरीत कोसळत नव्हती .परंतू एकमेकांची टक्कर होत होती.घाट धोक्याचा आहे येथे भुताटकी आहे अशी अफवा सर्वत्र पसरली .घाटात कोसळलेली मंडळी रात्री त्यावेळी तिथे येऊन नाचतात अशीही अफवा होती.

घाटाची सुरुवात एकशे सात किलोमीटर पासून होत होती व घाट एकशे पंधरा किलोमीटरवर संपत होता .बरोबर मध्यावर एकशे अकराव्या किलोमीटरवर एक अवघड हेअर पिन वळण होते या ठिकाणी अपघात घडत होते .

काही वाहनचालकांनी त्यांचे अनुभव पुढील प्रमाणे सांगितले 

समोरून जोरात वाहन येताना दिसते.त्याची आपल्याशी टक्कर होईल असे वाटते म्हणून आपण ब्रेक दाबावे तो ते वाहन नाहीसे होते.

समोरून जोरात वाहन येते आपल्याला ओलांडून ते पुढे जाते परंतु नंतर रेअरव्ह्यूमिररमध्ये ते दिसत नाही अदृश्य होते .

पाठीमागील वहान येताना दिसत नाही .आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेल्यावर मात्र ते दिसते.

पुढून येणार्‍या  वाहनाने काही वेळा  आपले डोळे दिपतात तर काही वेळा दिपत नाहीत .

एकाने तर असे सांगितले की समोरून येणाऱया वाहनाने माझे डोळे दिपले .मी करकचून ब्रेक दाबले .समोरील वाहनही तसेच  थांबले.मी दिवे मालवले हेतू असा की त्याला रस्ता व्यवस्थित दिसावा.त्यानेही दिवे मालवले . कदाचित माझ्या प्रमाणे त्यानेही मला नीट दिसावे म्हणून दिवे मालवले असतील असे समजून  मी दिवे लावले तोच त्यानेही दिवे लावले .मी दिव्यांची उघडझाप केली त्यानेही केली.जणू काही तो माझी नक्कल करीत होता .शेवटी मी त्याचा नाद सोडला .गाडी सुरू करून पुढे निघून गेलो.त्यानेही बरोबर तसेच केले .

गाडय़ांचे त्याच स्पॉटवर अपघात कसे होतात याचे सर्वांना नवल वाटू लागले.त्यातील विशेष गंमत म्हणजे हे अपघात रात्री एकच्या सुमारास  होत असत .त्याचवेळी पहिला अपघात झाला होता . एकशेअकरा आकडा अपशकुनीआहे तेव्हा तो बदलावा अशीही काहींनी सूचना केली .तर हा जावई शोध आहे असे म्हणून काही जणांनी टर उडविली.वर्तमानपत्रात उलटसुलट पत्रे व बातम्या येतच होत्या  

आणखी एकदा एकच वाहन दरीत कोसळले.त्याला दुसऱ्या एखाद्या वाहनाने पुढून किंवा मागून ठोस दिली की त्याचे नियंत्रण गेले.की गाडीमध्ये काही दोष निर्माण झाला .की त्याला एखाद्या अज्ञात शक्तीने दरीत ढकलले .काही कळायला मार्ग नव्हता .

त्या अवघड हेअरपिन  वळणाच्या ठिकाणी भक्कम लोखंडी गर्डर बसविण्यात आले .तेव्हापासून वाहन दरीत कोसळले नाही .फक्त लोखंडी गर्डरसना जोरात धक्का मारण्याचे प्रकार अनेकदा झाले.

हळूहळू घाटामध्ये भुतांचा वावर असतो अशा अफवा सुरु झाल्या .निरनिराळे लोक निरनिराळ्या कहाण्या सांगू लागले .त्या सर्वामध्ये एकाच बाबतीत एकवाक्यता होती .त्या सर्व हकीगती किंवा अफवा अवघड वळणाशी संबंधित होत्या .

विधिमंडळात यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला.या नवीन घाटात वारंवार अपघात होत आहेत. सरकार त्याबाबतीत काय करणार आहे?शेवटी या घाटात  रात्री बारा ते दोन कोणत्याही बाजूने प्रवेश बंद करण्यात आला .जर कोणतीही इमर्जन्सी असेल तर खास परवानगी सुरुवातीच्या  पोलीस चौकीवर घ्यावी .स्वतःच्या जबाबदारीवर प्रवेश करावा. मग कोणतीही तक्रार चालणार नाही .असे लिहून द्यावे लागत होते 

यासंबंधी निरनिराळ्या वर्तमानपत्रात बातम्या येऊन गेल्या .ही भुताटकी आहे इथपासून घाट व्यवस्थित न बांधल्यामुळे हे अपघात होतात.संबंधित आर्किटेक्ट व इंजिनिअर यांची चूक आहे. ते अवघड वळण काढून टाकावे.यासाठी एक कमिटी बसविण्यात आली .कमिटीमध्ये इंजिनियर तंत्रज्ञ यंत्रज्ञ मानसशास्त्रज्ञ इत्यादी मंडळी होती.वळण काढताना सर्व काळजी घेतलेली आहे रस्ता व्यवस्थित आखलेला आहे.अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा वाहनामध्ये असलेल्या दोषांमुळे होतात असा  निष्कर्ष काढण्यात आला होता.

दोन तास घाटात प्रवेश बंद हे केवळ लोकांच्या समाधानासाठी होते .त्याला शास्त्रीय आधार काहीही नव्हता .भुताटकी ही अर्थातच सर्व शहाण्यानी  अशास्त्रीय ठरविली होती .अपघाताची वेळ साधारण पहाटे असते कारण त्यावेळी ड्रायव्हरला झोप येत असते. डोळ्यावर झांपड असते.

या घाटातील वळणाबद्दल युवराजांनी बरेच काही वाचले होते त्यांना कुठलीच मीमांसा पटत नव्हती .याचा केव्हातरी छडा लावण्याचे त्यांनी मनाशी निश्चित केले होते .अनायासे ती संधी चालून आली होती .त्याना कोकणात जायचे होते. त्यांनी वाकडी वाट करून त्या घाटातून जायचे ठरविले. 

१२/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel